पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Karanji and Rakhi
“फार काही बोलु नको तिच्याशी वांझोटी होती आणि आता विधवा तर आहेच गिळलं माझ्या पोराला आणि बसली आहे डोक्यावर इथं,…समजलं ना..”
सासुबाईंनी बाळंतपणासाठी गावी आलेल्या सुनबाईला सांगितलं,..तिने मान डोलवली खरी पण इथे आल्यापासुन वहिनीसोबतच हसण्या बोलण्यात बरं वाटत होतं,…एकतर खेड त्यात इंटरनेट स्पीड होता पण वापर अगदी कमी म्हणजे नाहीच डॉकटरांनी आणि शिशिरने सांगितलं होतं तस ,..बरं घरात तसे भरपुरजण होते पण जरा हसरी,मायाळू आणि आपल्यापेक्षा थोडीफार मोठी असलेली हि वहिनी आल्यापासुन आपली काळजी घेणारी मग तिच्याशी जरा जास्त गुळपिट जमलेलं बघुन सासुबाईंनी सूचना दिलीच ऋतुला.
खरंतर इतके दिवस सासरी राहायची हिची पहिलीच वेळ, आईला अर्धांगवायु झाला मग सासुबाई म्हणाल्या,” इकडेच ये गावी चांगलं हॉस्पिटल पण उघडलं आहे गावात माझ्या पोरीने आणि आम्ही आहोत तुझं बाळंतपण करायला मग काय शिशिर निवांतच झाला,… दोन महिन्यापुर्वीच आणुन घातलं लंडनहून इथेच पण येताना त्याने जे सांगितलं ते अगदी लक्षात होतं ऋतूच्या म्हणून तर ती पण सतत वाहिनीशी बोलत मैत्री करत होती.
शिशिर म्हणाला होता,”ऋतू माझ्या राखीचे ऋण फेडायचे आहेत तुझी मदत लागेल,..आपला प्रश्नार्थक चेहरा बघत तो सांगु लागला,…दादा गेला तेंव्हा पाच एक वर्षांनी मोठी हसरी वहिनी एकदम गप्प झालेली बघुन वाईट वाटायचं,…मग मी बोलायचो हसायचो तिच्यासोबत वेळ घालवायचो हे बघुन सगळ्यांनी खुप आरडाओरडा केला,…तिचं दुःख ती भोगेल,… तिला तर वाटेल ते वाईट बोलुन गळ घातली माझ्याशी न बोलण्याची.
मी शिक्षणाला बाहेर पडलो,…त्या नंतरच्या राखीला तिचं पत्र आणि राखी (Rakhi) आली त्यात लिहिलं होतं,..” नवरा गेल्यावर कोणी माझ्या मनाचा विचार केला नाही,..माझं एकटेपण कोणाला समजुन घ्यायच नव्हतं,..पण तू लहान भावासारखा वागलास पण समाजाने नाही मान्य केलं,..मला खुप आधार वाटायचा तुझा,..पण आता मला वाट्टेल ते बोलुन तुझ्याशी बोलण्याची बंदी आहे,..पण राखी जवळ आली आणि तुझ्यासाठी चोरून लपुन हि राखी आणि तुझ्या आवडीच्या करंज्या पाठवत आहे.
राखी नक्की बांध,..हे सांगतांना शिशिरच्या डोळ्यात पाणी आलं,..ऋतू म्हणाली “मग तू का नाही तिला त्यातून बाहेर काढलं,..?”तो म्हणाला ,”शिक्षण आणि लगेच हि परदेश वारी आपलं लग्न आणि ती घरच्यांच्याभीतीने बोलत नाहीच माझ्याशी पण आता माझं काम तू करायचं तिच्याशी मैत्री कर सगळे कागदपत्र जमव आणि बास तिला चांगलं आयुष्य देणं हि त्या राखीची परतफेड असेल,..”हे सगळं डोक्यात होतं ऋतूच्या,..
डोहाळजेवण अगदी दणक्यात झालं तस गावातलं श्रीमंत घर,…पण त्या वहिनीला मात्र गरिबीने पिच्छा सोडला नव्हता,…तिच्या अंगावर साड्या सुद्धा सासु,नणंद आणि इतर जावांनी टाकलेल्याच,…माहेरी आठराविश्व दारिद्र्य मग हिला कोण नेणार,…तुझी डोली इथे आली आता अर्थी इथूनच जाऊ दे,…असं सांगुन आईने सोडून दिलं,…हिला लग्नानंतरही बघितलं होतं आपल्या गृहप्रवेशापासुन नुसती लगबग काम करत पळणारी हि वहिनी,..सतत हसरी कोणत्याही कामाला नाही म्हणतच नाही,..खरंच गरिबी इतकं लाचार बनवत असेल माणसाला,… किती ध्येयहीन जगत आहे हि,.. आणि एवढं करून सगळ्यांची वसवस वाईट शब्द ऐकूनच घेते अगदी निमुटपणे,…तेवढ्यात करंजी तळल्याचा वास आला ऋतू भानावर आली.
स्वयंपाक खोलीत जाऊन बघितलं तर वहिनीने करंज्या केल्या होत्या मस्त मुरडीच्या काल आपण म्हंटलो होतो खाव्या वाटतात म्हणून,..ऋतुला दारात बघताच वहिनीने बशीभर करंज्या धरल्या तिच्या पुढ्यात,…अगदी ओठाने खाव्या एवढ्या सुंदर खुसखुशीत शिशिर म्हणालाच होता एकदम खास करते म्हणून,… ऋतू म्हणाली,”थँक्स ग वहिनी खुप खाव्या वाटत होत्या आणि तू लगेच केल्या आणि अगदी अप्रतिम झाल्या आहेत ग,..मुरडीच्या करंज्या तुला कोणी शिकवल्या ग,..?”
वहिनी उदास हसत म्हणाली,”परिस्थितीने,…खरंतर जगणं ह्या करंज्यांनी शिकवलं मी त्यांना शिकले आणि त्यांनी मला शिकवलं,..” ऋतूच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह कायम बघत वहिनी म्हणाल्या,”दोन वर्षाच्या संसारात फार काही आयुष्य जगायला मिळालं नाही ग,..वांझोटी शिक्का लागला आणि लगेच विधवेचाही फुलू पाहणाऱ्या वयाला आता पोक्त बनवायचं होतं मग सुरू झाला संघर्ष माझाच माझ्याशी,..
हाताशी फार शिक्षण नव्हतं,.माहेरची गरिबी नवरा गेल्याने पाठ सोडत नव्हती,…कमवायची अक्कल नाही मग पैसे मागु नकोस हेच ऐकत आले,…दोन महिने खुप रडले,..डोळ्याच्या खाचा झाल्या तेंव्हा शिशिर भावजींना मानसिक आधार दिला पण तो हि समाजाला मान्य नव्हता मग राखी आली.
स्वतःच दुःख विसरून घरातल्या लेकरा बाळांसाठी करंज्या करायला घेतल्या एक एक करंजी सारण भरून मुरड घालताना शिकवायला लागली,…बाहेरून तेल किती गरम असो मधल्या सारणाला धक्का नाही लागला पाहिजे त्याची चव छानच राहिली पाहिजे,…आणि हि मुरड तर म्हणाली कितीही भावना उफाळल्या तरी स्वभावाला मुरड घालायची उलट बोलायचं नाही कारण उलट बोललं कि आतल्या सारणाला धक्का पोहचणार आपलं मन अस्वस्थ होणार आणि मग सगळंच बिथरून जाणार,..” तेवढ्यात कुणीतरी बाहेरून ओरडलं,.. “चहा झाला का,..?”ती लगबगीनं कप घेऊन पळाली,..
हिला हातातली करंजी बघावी का खावी कळेचना,…केवढं तत्वज्ञान ह्या करंजीतून आयुष्यकडे बघण्याचं,…ऋतुने पण शिशिरचा निर्णय पूर्णत्वाला न्यायचा ठरवलंच,…..
ऋतुने मग शिशिरशी बोलुन पासपोर्ट बनवला वहिनीचा,… बाळ सांभाळायला मला ह्यांना न्यावं लागेल असं म्हणत ऋतू आणि शिशिरने काढलं बाहेर वहिनीला,..
मुरडीच्या करंज्यांनी आकाशात झेप घेतली,..हातच्या चवीला आणि वहिनीच्या आयुष्याला कलटणी मिळाली,..घरच्यांशी वाद करत तिकडेच असणाऱ्या विदुर मित्रासोबत लग्न आणि परदेशात ऑनलाईन करंजी प्रसिद्ध झाली.
ऋतू मात्र आजही राखीला करंजी खाताना तिची मुरड आणि आतल सारण न्याहाळत खात बसते,..वहिनी म्हणते काय ग जमली नाही का करंजी??..त्यावर हसत ऋतू म्हणते ,”जमली कि फक्त हि मुरड प्रत्येकाला जमावी म्हणजे,…सारण अबाधित राहिल आणि जगणं ह्या करंजीसारखं गोड होईल,…त्यावर वहिनी हसून म्हणते,”राखीमुळे जसं एका बहिणीचं झालं हो ना शिशिर??,…शिशिरची राखी आणखी सुंदर दिसते,..सगळे हसतात आणि आयुष्यात आपण काहीतरी चांगलं केलं ह्या विचाराने ऋतू आणि शिशिर ला करंजी अधिकच गोड लागते….
-©स्वप्ना मुळे ,औरंगाबाद
करंजी आणि राखी | Karanji and Rakhi हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
करंजी आणि राखी | Karanji and Rakhi – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.