Keki Moos

केकी मुस | Keki Moos

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Keki Moos

केकी मूस (Keki Moos) नामक एक लोकविलक्षण आयुष्य जगलेला कलावंत आपल्यात होऊन गेला. त्याच्या हयातीतच त्याच्याविषयी असंख्य आख्यायिका पसरल्या होत्या. असं म्हणतात की चाळीसगावातल्या आपल्या बंगल्याबाहेर तो कधी आलाच नाही. त्याचं सारं विश्व बंगल्यातच सामावलं होतं. या बंगल्यातच बसून त्यानं आपल्या छायाचित्रांना असंख्य जागतिक दर्जाची पारितोषिके मिळवून दिली होती. असं म्हणतात, तब्बल ४० वर्ष कलकत्ता मेलनं येणाऱ्या आपल्या प्रेयसीची वाट पाहिली. पण ती काही शेवटपर्यंत आलीच नाही. रोज रात्री कलकत्ता मेल चाळीसगाव स्टेशनातून जाईपर्यंत हा नियमितपणे तिची वाट बघत असे.

उपयोजित चित्रकार ज्यांनी नंतर फोटोग्राफीत विशेष नाव मिळवलं त्या पुण्याच्या दिलीप कुलकर्णी यांना अगदी तरुण वयातच केकी मूस यांचा सहवास लाभला.

‘चिन्ह’नं ठरवलं होतं की केकी मूस यांच्यावर विशेष अंक काढायचा, पण ‘चिन्ह’च्या अनेक संकल्पांप्रमाणे ते काही प्रत्यक्षात आलं नाही.

दिलीप कुलकर्णीचं त्या अंकाचं लेखन करणार होते. त्यांनी नंतर लोकमतच्या २०२० सालच्या दीपोत्सव अंकासाठी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता त्या लेखाचा प्रारंभीचा भाग इथं देत आहोत. जिज्ञासूंनी सदर लेख मूळ अंक मिळवून अवश्य वाचावा.


आठवणीतले केकी मूस (Keki Moos)!

लोकमत दीपोत्सव दिवाळी २०२०

मुंबई – कलकत्ता मेल चाळीसगावच्या दिशेनं सुसाट धावते आहे. चाळीसगाव स्टेशनच्या यार्डात शिरताच तिनं एक जीवघेणा हॉर्न दिला… आणि ‘रेम्ब्राज रिट्रीट’मध्ये आत्तापर्यंत निद्रिस्त असलेली चित्रं, पुतळे क्षणमात्र थरथरले. गाव जरी झोपलेलं असलं तरी हे रिट्रीट जागं आहे. ते ह्याच गाडीची वाट पाहतं आहे. रिट्रीटच्या मालकानं सायंकाळपासूनच लावून ठेवलेले दिवे अजिबात पेंगुळलेले नाहीत. स्वत: मालक मात्र आपल्या बेडरुममध्ये एका कुशीवर पहुडलेला आहे. आपल्या बेडरुमला तो वेटिंगरुम म्हणतो. अलीकडे दिवसाचा बराच काळ तो तिथंच उताणा पडलेला असतो. डोळे छताकडे. पण त्याच्या नकळत ते त्या अभेद्य छतातून बाहेर पडतात आणि सैरभैरपणे इकडेतिकडे भटकत राहतात.

गाडीचा हॉर्न ऐकताच रिट्रिटचा मालक शॉक बसल्यासारखा एकदम उताणा झाला, पण उठला मात्र नाही. तोपर्यंत अवघ्या शांततेच्या चिंध्या उडवत कोलकाता मेल स्टेशनमध्ये येऊन थांबली होती. दीड वाजून गेला म्हणजे गाडीला आज थोडासा उशीर झालाय आणि एक बोगीही कमी आहे आज. ‘देलेपला विचारलं पाहिजे एकदा की कुठं शटिंग-बिटिंग होतं की काय ह्या वन-डाऊनला?’- मालक स्वत:शीच पुटपुटला आणि उठण्यासाठी पुन्हा कुशीवर वळला.

रेल्वेचे दोन रुळ जिथं सांधले जातात, तिथं पूर्वी एक छोटीशी फट ठेवलेली असे. त्यावरुन गाडीची चाकं जाताना एका विशिष्ट लयीत आवाज येई, त्यावरुन हा मालक पडल्यापडल्या प्रथम गाडीची चाकं मोजत असे आणि चाकांवरुन बोग्या !

काही सेकंदांतच तो विशिष्ट लयीतला आवाज करत कोलकाता मेल निघून गेली.

सर्व आवाज थांबल्यानंतर मालक हताशपणे उठला आणि समोरच असलेल्या आरशा समोर अस्ताव्यस्तपणे उभा राहिला. बिछान्यातून तो केव्हाही उठला, तरी हीच कृती तो प्रथम करतो. कुणीतरी मागून ढकलावं तशा बेढब चालीनं एकेका दाराची कडी उघडत तो मुख्य दरवाजापाशी आला. बाहेरचा दिवा मालवला. ह्या कड्या आणि ते प्राचीन दरवाजे उघडताना मोठा आवाज होतो आणि रात्रीच्या शांततेत तर तो प्रकर्षानं जाणवतो. पण मालकाला त्याची तमा नसते. त्याची इच्छा नसताना त्यानं मुख्य दरवाजा किलकिला केला. तो पूर्ण उघडण्याआधीच एक आडदांड काळा कुत्रा सराईतपणे आत शिरला आणि मालकाच्या परवानगीशिवाय वहांड्यातल्या महाकाय बाकड्यावर डोळे मिटून बसला. हा डॉनी.

‘तुझा मेजर आज बी आला नाय काय रे? अरे अजून किती बरस तू त्याचा वेट करणार?’- डॉनीनं क्षणभर डोळे उघडले पण मालकाच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष न देता विषण्णपणे पुन्हा मिटले. मालकानंही मग प्रतिप्रश्न विचारला नाही. कोमेजू पाहणारी फुलांची एक गुलछडी मात्र त्यानं आठवणीनं अंधारात भिरकावून दिली आणि खडखडा आवाज करत तो मुख्य दरवाजा लावून टाकला. या गडबडीत त्याच्या एका पावलातली चप्पल सटकली आणि घरंगळून मागेच राहिली. मालकानं मात्र तिच्याकडं ढुंकूनही पाहिलं नाही. तसाच बेढबपणे पाय ओढत वाटेतला एकेक दिवा मालवत तो पुन्हा त्याच्या खोलीत आला आणि मंचकावर बसला.

…. आता काय करायचं? दिवसातला बहुतेक सर्व वेळ तो इथंच खर्च करी. वास्तविक त्या हवेलीला कित्येक खोल्या होत्या. जेवण्यासाठी स्वतंत्र खोली. अगदी मुदपाकखानाही होता. पण मध्यरात्री कलकत्ता मेल निघून गेल्यानंतर कुणीतरी प्राण काढून घेतल्यासारखी त्याची स्थिती होत असे. आजही तेच होतं ! त्याच्या मंचकाजवळ एक उंच स्टूल होतं त्यावर रात्रीच्या जेवणाचा डबा कुणीतरी आणून ठेवला होता. मालकानं त्यातलं सगळं अन्न एकत्र केलं आणि त्यात चमचा टाकण्याआधी त्यानं वहांड्याकडे पाहून डॉनीला हाक मारली, ‘डिअर डॉनी, अरे तुज्या डिनरचं काय बाबा? मेजर येईल उद्या. उद्याची गाडी येईपर्यंत आपल्याला एनर्जी नको काय?’

त्या डॉनीचे प्राणही यार्डातून धडधडत गेलेल्या पंजाब मेलनं कुणीतरी घेऊन गेलं होतं. त्यानं तर डोळेही उघडले नाहीत ! डॉनी येत नाही असं बघून मालकानं एक आवंढा, एक घास ह्या क्रमानं डब्यातलं अन्न पोटात ढकललं. आदर्श आहार आणि विहार ह्याविषयी एकदा ह्या मालकानं मला एक लेक्चरही दिलं होतं. तो म्हणायचा, ‘अरे, सकाली लवकर ब्रेकफास्ट घ्यावा. कसा? तर लाईक अ किंग! तर किंग्ज ब्रेकफास्टनंतर दुपारी लंच कसं असावं? तर लाईक अ क्वीन! आणि डिनरचा म्हणशील तर इट शूड बी अ प्रॉपर सपर !’

या ‘प्रॉपर सपरनंतर मात्र हा मालक आपलं महाकाय शरीर त्या विशाल मंचकावर पसरुन देत असे. दिवे तर त्याने ‘सपर’ आधीच बंद करून टाकलेले असत. पुन्हा उठायचे कष्ट नकोत. ती कलकत्ता मेल गेल्यानंतर त्याला काहीच करायचं नसे… मग हे ‘सपर’ वा ‘डिनर’ कशाला? – तर उद्याची कलकत्ता मेल येईल तोपर्यंत एनर्जी राहावी म्हणून !

बस्स ! हेच चित्र कितीतरी वर्षं मी बघितलं. ‘रेम्ब्राज रिट्रीट’नं तर मोजली नाहीत इतकी वर्षं !

त्या कॉम्पोझिशनमध्ये प्रथम आली ती कलकत्ता मेल. सुमारे पन्नास वर्षांपूर्वी. नंतर एका सनसेटला देलेप आला. रात्री साडेदहाला पंजाब मेलनं डॉनी आला. साहेबराव तर अगोदरपासूनच त्या वेटिंगरूममध्ये होता. आता इथून पुन्हा बाहेर जाणं नाही आणि पुढं तसंच झालं.

सुमारे पन्नास वर्षं स्वत:ला आजन्म कैद करुन घेणाऱ्या माझ्या एका अवलिया मित्राची ही गोष्ट आहे.

विश्वविख्यात छायाचित्रकार ‘केकी मूस’ (KeKi Moos) हे त्याचं नाव. याच इसमानं मला कॉम्पोझिशन शिकवलं. त्याच्या अमर्याद व्याप्तीची जाणीव करून दिली. एकटं कसं राहावं ह्याचंही ट्रेनिंग त्याच्या सहवासात मला मिळालं. शाळकरी वयात केव्हातरी ह्या मूसबाबाच्या कॉम्पोझिशनमध्ये मी जाऊन बसलो आणि त्याचाच एक भाग बनून गेलो.

मूसबाबाच्या (KeKi Moos) कॉम्पोझिशनमध्ये माझा प्रवेश झाला, त्या वेळी माझे आजोबा चाळीसगावात होते. वडील नुकतेच चाळीसगावला बदलून आले होते. रेल्वे स्टेशनमास्तर होते ते ! त्यांचा जेवणाचा डबा घेऊन मी स्टेशनवर जात असे. त्यांचं जेवण होईस्तोवर मी प्लॅटफॉर्मवर नुसताच भटकत राही. माझं चित्रकलेचं वेड वडील ज्याला त्याला सांगत असत. कुणीतरी वडिलांना सांगितलं की, स्टेशनच्या पाठीमागेच मोठे जगविख्यात आर्टिस्ट राहतात. एकटेच असतात ते. पाठवा ह्या मुलाला त्यांच्याकडे.

‘केकी मूस’ (Keki Moos) म्हणजे कुणीतरी बाई असावी, असं मला अगोदर वाटलं होतं. एका सकाळी मी मूस बंगल्यावर गेलो. प्रचंड झाडीत लपलेला ब्रिटीशकालीन बंगला. संपूर्ण दगडी बांधकाम, खूप वर्षांत कुणी मनुष्यप्राणी तिथं फिरकला नसावा असं वातावरण. एका प्रचंड जाळीजाळीच्या वऱ्हाड्यात एक व्यक्ती बसली होती. संपूर्ण पांढरे झालेले केस मोकळे सोडून ती बसलेली. अंगात पांढरे कपड़े, पण ते इतके ढगळ की अंगात साडी आहे की नुसतंच परकर पोलकं ह्याचा काही मला उलगडा झाला नाही. कपाळ पांढरं होतं म्हणजे ही विधवा बाई असावी, असा माझा समज झाला आणि ती बाई बुलबुलतरंग वाजवत होती. दोन्ही हात मी जाळीत अडकवले. दोन डोळे दोन जाळ्यांत आणि नाक खाली एका जाळीत अडकवलं पण तोंड मात्र जाळीत येऊ शकलं नाही.

‘तूं जोईएँ ?’- ती व्यक्ती बुलबुल तरंग छेडताना मध्येच थांबून म्हणाली.

‘मिसेस केकी मूस (Keki Moos) इथंच राहातात, असं मला कुणीतरी सांगितलं स्टेशनवर. मला त्यांना भेटायचं आहे. आम्ही इथंच पलीकडे राहतो.’ एका कौलारू घराकडे निर्देश करत मी म्हणालो.

‘मिसेस मूस कलकत्ता मेलनी यील आज रातीला. ॲट अबाऊट वन थर्टी इन द नाईट. तुमी उद्या सकाली या.’

दुसऱ्या दिवशी मी पुन्हा गेलो. कालचाच राग आळवत ती व्यक्ती बसली होती. समोर चार भटके कुत्रे होते. तिनं मानेनेच ‘नाही’ म्हटलं आणि मी पुन्हा घरी आलो. आता उद्या जर मूसबाई नाही भेटली तर तिचा नाद सोडायचा असा विचार करुन दुसऱ्या दिवशी सकाळी जरा उशिरा त्या बंगल्याच्या फाटकापाशी उभा राहिलो. नेहमीप्रमाणे आत वहांड्यात विलंबित ख्याल चालू होता. आता हे संपणार केव्हा? असा माझ्या मनात विचार आला. तोच बुलबुलतरंग खाली ठेवत त्या व्यक्तीनं जाळीजवळ येत फाटकातून आत येण्याची खूण केली.

‘आल्या का मूसबाई?’ मी अधिरपणे विचारलं. खालचा ओठ – जास्तीत जास्त बाहेर काढून मानेनंच तिनं मला ‘नाही’ म्हटलं आणि विलंबित ख्यालात ती व्यक्ती गढून गेली. मग नेहेमीप्रमाणे मी वडिलांना डबा द्यायला स्टेशनवर गेलो. त्यांनी विचारलं,

‘झाली का भेट?’

‘नाही. मूसबाई काही मुंबईहून आली नाही. मी तीन दिवस चकरा मारतो आहे. पांढऱ्या केसांची एक विधवा मात्र बंगल्यात रोज बुलबुलतरंग वाजवत बसते.’

‘मीही चित्रं काढतो. एक-दोन बक्षिसंही मिळाली आहेत मला स्केचिंगबद्दल. लवकरच मी जे. जे. स्कूलला जाणार आहे मुंबईला.’

‘अरे डिकरा, गेट मी संध्याकाळी खोलते. आफ्टर सनसेट, कम ईन द इव्हिनिंग बट अलोन. अंडरस्टैंड?’

जाळीत अडकवलेले हात मी हळूहळू खाली घेतले. फसलेला चेहरा जाळीतून बाहेर काढला आणि तिथून धूम ठोकली.

ही आमच्या कहाणीची सुरुवात !

KeKi Moos-©दिलीप कुलकर्णी

केकी मुस | Keki Moos हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

केकी मुस | Keki Moos – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share केकी मुस | Keki Moos

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock