What a rice !!

क्या भात है!! | What a rice !!

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

What a rice !!

आमटीभात… वरणभात… दहीभात… ताकभात… कालवणभात… पिठलंभात… केशरीभात… वगैरे

सांप्रत काळात भारत देशात डाएट नावाच्या फॅडने किंवा स्टाईलने भात किंवा तांदूळ ह्या आपल्या लाडक्या आणि आवडत्या अशा पदार्थावर फार मोठी कुरघोडी करायला लावली आहे.

विकेट किपिंग करताना जांभया दिल्याबद्दल पाकिस्तानी कॅप्टन सरफराज अहमद जितका बदनाम झालाय त्यापेक्षा काकणभर जास्तच बदनामी डाएट ह्या प्रकाराने भाताची केलेली आहे. आणि समस्त भारतीयांसाठी ही गोष्ट खचितच महान चिंतेची बाब आहे.

भा र त ह्या शब्दाची व्युत्पत्तीच मुळात ‘भात जेवण्यात रत असलेल्या लोकांचा देश’ अशी व्हायला हवी होती आणि तेच जास्त संयुक्तिक झालं असतं नाही का. ज्या देशाच्या नावातच भात लपलेला आहे अशा लोकांनी भात सोडणे किंवा वजन वाढते म्हणून त्याला त्यागणे म्हणजे ऑस्ट्रेलियाने स्लेजिंगचा त्याग केल्यासारखं होईल.

भारतीय माणसाने आमटी भाताला नाही म्हणणे म्हणजे आमटीभाताचा घोर अपमान, म्हणजे स्टीव्ह बकनरने सचिनला नॉट आऊट देण्यासारखं आहे. बकनरने सचिनला खोटं आऊट देऊन आपलं नाव राखावं आणि आपण आमटीभात जेवून आपलं.

मी एक भारतीय आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत आणि देशातल्या प्रांतागणीक विविधतेने नटलेल्या भाताच्या परंपरांचा मला अभिमान आहे.

उत्तरेला काश्मीरी पुलाव (Pulav) पासून ते दक्षिणेकडील तामिळ रस्सम (Rasam) भाता पर्यंत, द्वारकेच्या गुज्जू कढी खिचडी पासून ते ओरिसा, बंगालच्या माछ भातापर्यंत, महाराष्ट्रातल्या केशरी भाता पासून ते हैदराबादेलतल्या बिर्याणी पर्यंत, कर्नाटकातल्या भिसीब्याळी अन्नम (Bisi bele bath) पासून ते लखनवी बिर्याणी पर्यंत भाताच्या सर्व परंपरांची आणि विविधतेने नटलेल्या परंपरांची मला आवड आणि अभिमानही आहे.

भारतात शेतीचं युग असल्यापासून आद्य पिकांमध्ये असलेलं धान्य सर्वार्थाने तांदूळच असेल. अनेक वर्षं चुलीवर शिजत असलेला भात गॅसवर आला आणि पेज हा पदार्थ गायब व्हायला सुरुवात झाली.

कुकर ह्या प्रकाराने भात शिजवण्याची पद्धत क्रिकेट मधल्या टी ट्वेंटीसारखी करून ठेवली आहे. मॅच चालू होऊन कधी संपते हे कळतही नाही. एरव्ही सोय म्हणून मान्य आहे पण निवांत असू तेव्हा गॅसवर खरी ‘कसोटी’ म्हणजे कुकर शिवाय भात लावायला हवा.

अस्सल भाताची मजा त्यात आहे. खरंतर तांदूळ शिजवायला ठेवून त्याचा अप्रतिम सुगंध हळूहळू स्वयंपाकघरात पसरायला हवा. पण कुकर फिल्डिंगला येतो आणि त्याला ह्या सुगंधाचा कॅच काही पकडता येत नाही. तो कायम ड्रॉपच होतो.

भाताची एक गम्मत आहे. भात हा एकटा कधीच नांदत नाही. तो जेव्हा एकटाच असतो तेव्हा त्याचं रुक्ष पिंड होतं. पण त्याच्या मुदीला गोडंवरणाची, लिंबाच्या फोडीची, आणि वरून तुपाच्या धारेची साथ मिळाली आणि एखाद तुळशीपत्राचं टॉपिंग मिळालं की त्याचा नैवेद्य होतो, पण वरणभात तुप आणि लिंबू 🍋 किंवा लिंबाचं लोणचं म्हणजे स्वर्ग सुखच. रिष्ता वही है किंतू सोच नई है.

गोडंवरण भात म्हणजे हृषीकेश मुखर्जींचा सिनेमा असेल तर नाॅनव्हेज बिर्याणी ही वेबसिरीज आहे. रसिक माणूस या दोन्ही गोष्टी एकत्र एन्जॉय करू शकतो. जो एकावरच अडून राहतो त्याचं आयुष्य अगदीच निरस आणि एकसुरी ठरतं.

वरण, आमटी, रस्सा, रस्सम, कालवण, कढी, सांबार, पिठलं हे भाताचे शाश्वत सोबती आहेत. त्यांना कुणीही भाता पासून वेगळं करू शकत नाही, त्यांनी भाताची साथ शेवटपर्यंत देणं अलिखित नियम आहे. डाळीच्या प्रमाणासोबत त्या दोघांचं नातं घट्ट होत जातं. कधीकधी आमटीची माया पातळ होते आणि भाताच्या उदार फटींमधून द्रव पदार्थ ताटभर पसरतो. सुखाच्या आठवणीं सारखी डाळच शिल्लक राहते. अशावेळी त्यांचा संसार अर्ध्यावरती डाव मोडल्याचा भास होतो. भातुकलीच्या खेळामधल्या राजाराणी सारखा.

चिंचं, गूळ, आमसूल, आगळ, कढिलिंबं, मिरच्या, कैरी, शेगटाच्या शेंगा, क्वचित वांगी, टोमॅटो खरे टेस्टमेकर्स आहेत. नागपुरात वांगी भात अतिशय आवडता आहे त्यांच्यामुळे गेमला एलिगन्स आहे. ही व्यंजनं ज्याला आवडत नाहीत, त्याचं आयुष्य फोल आहे.

जीरा राईसमधलं तडतडलेलं जिरं, दही बुत्तीमधली उडदाची डाळ, पुलावातलं तमालपत्र, कढी खिचडीमधली लवंग, काश्मिरी पुलावामधले काजू इत्यादी इत्यादी जेवणाच्या कहानणीमधले ट्विस्टस आहेत, ते शोधून ज्याला एन्जॉय करता आले त्याचं खाद्य जीवन आनंदी आणि परीपूर्ण ठरतं.

आमटी आणि भाताचा संसार मला उमा महेश्वरांच्या संसारसारखा वाटतो. जेवणाने कितीही वेगवेगळे अवतार घेतले तरी सरतेशेवटी संध्याकाळी भात आमटी बरोबर पानात समोर आला की पोटात अगोदरच शांतता नांदायला लागते, आणि व्वा तोंडातून आपसूकच येतो

मऊ भात किंवा गरगट्ट भात ह्या बरोबर मेतकुटाने वेळ मारून नेता येते. थोडा ओव्हर रेटेड. बाकी परफॉर्मन्स फक्त वेळ मारून नेण्या इतकाच.

भाताची खरपुडी म्हणजे अगदी कव्हर ड्राइव्ह. सायीच्या दुधाची किंवा सायीच्या दह्याची साथ मिळाली की सोनेपे सुहागा असतो. मग त्याबरोबर तोंडी लावायला कही लागतंच असं नाही

फोडणीचा भात हा नाईट वॉचमन असतो. आदल्या रात्रीचा त्याचा गेम दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सेशनपर्यंत आरामात चालतो. शेंगदाणे आणि सांडगी मिरची हे दोघे नॉन स्ट्रायकिंग एन्डला असले की, चुरचुरीत फोडणीच्या भाताचा गेम विशेष बहरतो वगैरे.

खिचडीची तुलना कशाशीही होऊ शकत नाही. कमी वेळात अगदी मनसोक्त खाता येईल आणि तृप्ततेचा आनंद देऊन जो रोल दिया है उसको निभानेका फर्ज वो बहोत अच्छे तरिकेसे अदा करती है. आणि कढीची साथ असेल तर स्वर्गसुखाचा आनंद देण्यात कसूर करत नाही.

पोट व पिच बिघडलंय आणि विकेट पडताहेत अश्या सिच्युएशनमध्ये पिचवर उभं राहायलाच हवंय, कंटाळा आलाय आणि तरीही एक बाजू सांभाळायची आहे, अचानक घरी कोणीतरी आलंय आणि आस्कींग रेट वाढला आहे, किंवा अगदी हौस म्हणून साग्रसंगीत टेक्निकल आणि निवांत बॅटिंग करायची आहे- अश्या सगळ्याला पर्याय फक्त राहुल द्रविड आणि खिचडी हाच असू शकतो. साथीला भाजलेला पोह्याचा पापड, सांडगी मिरची, एखादी कोशिंबीर असली तर नुसती इनिंग सांभाळली जात नाही तर फॉलोऑन मिळालेली अख्खी मॅच जिंकली जाऊ शकते.

रात्रीच्या जेवणात भातापेक्षा सूप सलाड घेणाऱ्या लोकांचं मला कौतुक वाटतं. आणि त्यांना समाधान असतं डाएट सांभाळल्याचं. (सूप आणि सलाड लोकं रात्रीच्या जेवणात ‘घेतात’. हे केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी की आम्हीं तुमच्यापेक्षा वेगळे आहोत.तुम्ही मात्र भात ‘जेवता’).

एकंदरीतच आमटी भाताचं पोटभर जेवण म्हणजे उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म असतं. दाल रोटी खाओ, प्रभू के गुण गाओ ही अध्यात्माची पहिली पायरी असली तर कोन नाय कोनचा, डाळ भात लोनचा, हे जीवनाचं गुह्यतम गुढ ज्ञान आहे.

क्षोत्रं चक्षु: स्पर्शनंच रसनं घ्राणमएवच ह्या सर्वांना सोबत घेऊन जो हे ज्ञान प्राप्त करतो त्याला संसारात काहीच कमी राहत नाही.

इतिश्री आमटीभात पुराण संपूर्णम्

क्या भात है!! | What a rice !! हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

क्या भात है!! | What a rice !! – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Shar क्या भात है!! | What a rice !!

You may also like

4 thoughts on “क्या भात है!! | What a rice !!

    1. माफ करा, हा लेख कोणाचा आहे हे आम्हाला माहीत नाही. जर तुम्हाला लेखक माहित असेल तर कृपया आम्हाला कळवा. आम्ही निश्चितपणे अधिकृत व्यक्तीला क्रेडिट देऊ. धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO