पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Shivray-Mavale Shapathvidhi
शिवरायांचे क्षात्रतेज हे जास्त तळपू लागले होते. त्यांची न्यायनिष्ठुरता, सचोटी, धैर्य हे गुण पाहून सर्व लोकांच्या मनात स्वराज्याविषयीच्या आशा जागृत होऊ लागल्या होत्या. त्यामुळे सर्वांचे प्रेम, सहकार्य व विश्वास त्यांना मिळू लागला होता.
शिवरायांनी मावळयांसह स्वराज्यासाठी एक अनुकूल असे वातावरण निर्माण केले होते. त्यामुळे एके दिवशी शिवराय मावळ खोऱ्यातील तरूण सवंगडयांना घेऊन सहयाद्रीच्या खोऱ्यातील रोहिडेश्वराच्या मंदिरात आले. तेव्हा पाटील, देखमुख ही मंडळी देखील तेथे आली. शिवराय शिवलिंगासमोर नतमस्तक झाले आणि त्यांनी महादेवाला अतिशय मनोभावे नमस्कार केला व नंतर ते आपल्या सर्व सहकाऱ्यांना उद्देशून म्हणाले, “हे पहा मित्रांनो, माझे पिता शहाजीराजे यांनी जेव्हापासून या जहागिरीचा कारभार हाती घेतला तेव्हापासून येथील प्रजा पूर्वीपेक्षा सुखात आणि निर्भयपणे जगत आहे. परंतु ही जहागिरी कायम आपल्याकडेच राहील, याचा काय भरोसा? लहरी असलेला सुलतान ती आपल्याकडून कधीही काढून घेईल म्हणजेच परत मागचेच दिवस येणार.
प्रजेवर अन्याय, अत्याचार सुरू होणार. अशा वेळी फक्त परमेश्वराचा धावा करण्यापलीकडे आपण काहीही करू शकणार नाही. आपण प्रयत्न केल्याशिवाय परमेश्वर देखील आपल्याला मदतीला येणार नाही. ज्याप्रमाणे श्रीरामप्रभूंनी वानरसेना उभी केली, भगवान श्रीकृष्णांनी गोकुळातील लोकांना एकत्र केले आणि तेव्हाच त्यांनी त्या अत्याचारी राजांचा पराभव केला. त्याचप्रमाणे आपण आज जर एकत्र आलो आणि जिवावर उदार होऊन त्याग करायला तयार झालो, तर आपण आपल्या मुलुखातून जुलमी, अत्याचारी सत्ताधीशांना नेस्तनाबूत करून लोककल्याणकारी अशा स्वराज्याची स्थापना करू शकू. असे स्वराज्य स्थापन व्हावे अशी श्रींची इच्छा आहे. जर आपण एकत्र येऊन अशा कार्याला वाहून घेतले तर महादेव आपणास आशीर्वाद देईल व तो सदैव आपल्या पाठीशी उभा राहील. आपण जर या कार्यासाठी तयार असाल तर हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी पडेल ते कष्ट व कोणताही त्याग करण्यास मागे-पुढे पाहणार नाही, अशांनी पुढे यावे आणि श्रींच्या समोर शपथ घ्यावी. कोण तयार आहे बोला?”
शिवरायांचे हे कळकळीचे बोलणे सर्वांच्या हृदयापर्यंत जाऊन पोहोचले. सर्वजण लगेचच श्रींच्यासमोर उभे राहात म्हणाले, “राजे, श्रींचे राज्य स्थापन करण्यासाठी आपण आमचे प्राण मागितले तरी आम्ही देण्यार तयार आहोत. या कार्यासाठी आम्ही आपण जे सांगाल ते करण्यासाठी तयार आहोत. त्यासाठी कोणताही त्याग करण्याची आमची तयारी आहे.”
ते ऐकून शिवरायांना अतिशय गहिवरून आले. त्यांनी प्रत्येकाकडून श्रींच्या पिंडीवरील बिल्वपत्र उचलून ‘स्वराज्य-स्थापनेसाठी मी माझे जीवन समर्पित करीत आहे’ अशी शपथ वदवून घेतली. माँसाहेबांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांचे मन भरून आले.
आदिलशाही दरबारात शिवरायांविषयी वेगळाच समज झाला होता. आदिलशाहीतील शहाजीराजांसारख्या अग्रगण्य सरदाराचा मुलगा असा रानोमाळ का फिरतो? दऱ्या-खोऱ्या का तुडवतो? आपल्या वडिलांच्या जहागिरीत आरामात जगण्याचे सोडून असा उन्हातान्हात का फिरतो? त्या सरदारांना स्वराज्याचे स्वप्न पाहणारे ते जिवाचे रान करणारे शिवराय कसे समजणार होते?
शत्रू हा अतिशय बलाढय होता. शिवाय त्याच्याकडे लाखोंचे सैन्य होते. त्याच्यापुढे टिकाव धरण्यासाठी आपल्याकडे देखील बलाढय अशी सेना हवी, हत्यारे हवी, दारूगोळा हवा, भरपूर धन हवे. हे सर्व कसे मिळवायचे? याची काळजी शिवरायांना लागली होती. परंतु त्यांच्याकडे दूर विचार करण्याची दृष्टी होती म्हणून त्यांच्या मनात गनिमी युद्धाने लढायचे असे होते. तेव्हा असे देखील म्हटले जात की, ज्याच्याजवळ गड असे त्यांच्याच हाती राज्य असे. म्हणून शिवरायांनी प्रथम गड ताब्यात घेण्याचे ठरविले. कारण त्यांच्याकडे कोणताच किल्ला नव्हता.
शिवरायांनी त्यासाठी प्रथम तोरणा गड घेण्याचे ठरविले. हा तोरणा गड अतिशय बुलंद व अवघड होता त्यामुळे आदिलशहाचे याकडे लक्ष नव्हते. एके दिवशी शिवरायांनी आपल्या मावळयांसह या गडावर आगमन केले व तेथे त्यांनी आदिलशहाचे निशाण काढले व आपला भगवा झेंडा फडकावला. तेथे त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले. गड त्यांच्या ताब्यात आला.
गडावर तोरणाईचे मंदिर होते. तेथे शिवरायांनी देवीची प्रार्थना करून तिचा आशीर्वाद घेतला. यानंतर शिवरायांनी गडावर दारूगोळा, हत्यारे, यांचा भरणा केला. काही पडझड झालेल्या बुरूजांची दुरूस्ती केली. तोरणा गडावर त्यांनी स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावला, हे ऐकून जिजाऊंना खूपच आनंद झाला.
तोरणा गडाच्या बुरूजांच्या दुरूस्तीचे काम करताना एका बुरूजात भरपूर असे धन सापडले. खरोखर ही तर जगदंबेचीच कृपा म्हणावी लागेल. स्वराज्याची उभारणी करण्यासाठी या धनाचा उपयोग करण्याचे शिवरायांनी ठरविले.
शिवराय जेव्हा लाल महालात परत आले तेव्हा सर्वांना खूप आनंद झाला. काही सुवासिनींनी त्यांच्या पायांवर पाणी घातले. सौभाग्यवती सईबाईंनी हातावर साखर ठेवली. शिवरायांनी माँसाहेबांना वाकून नमस्कार केला. तेव्हा माँसाहेबांना अतिशय आनंद झाला होता व त्यांनी शिवरायांना आशीर्वाद दिला व त्या म्हणाल्या, “राजे, आपण योग्य तेच केले. आई जगदंबेने तुम्हाला हत्तीचे बळ दिले आहे. योग्य वेळी योग्य कार्य हाती घ्या.”
शिवरायांनी त्या दिवशी रात्री आपल्या सहकाऱ्यांबरोबर भोजन केले. त्यानंतर गडावरील सापडलेल्या धन-संपत्तीविषयी माँसाहेबांशी विचार-विनिमय करून त्याचा उपयोग कसा करायचा ते ठरविले. त्या धनातून दारूगोळा व इतर साधन-सामग्री खरेदी करून बाकी धन मोठया कार्यासाठी राखून ठेवण्याचे ठरले.
तोरणा गडावरून थोडे अलिकडे मुरंबदेवाच्या डोंगरावर एक बळकट किल्ला बांधण्याचे शिवरायांनी ठरविले होते. त्याप्रमाणे गडाच्या बांधकामास सुरूवात झाली. किल्ला अतिशय वेगाने बांधून तयार झाला. गडावर भगवे निशाण फडकावले. राजवाडा, कचेरी अशी बांधकामे पूर्ण होताच गडावर काही राखीव फौज ठेवली. शिवरायांनी या गडाचे नांव ‘राजगड’ असे ठेवले आणि हाच गड स्वराज्याच्या राजधानीचा गड बनला.
शिवराय-मावळे शपथविधी | Shivray-Mavale Shapathvidhi हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
शिवराय-मावळे शपथविधी | Shivray-Mavale Shapathvidhi – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.