पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Shaktipeksha Ukti Shreshta
“स्वराज्याच्या जवळील जावळीचे खोरे येथील आदिलशहाचा सरदार चंद्रराव मोरे मरण पावला व तो निपुत्रिक असल्याने राज्याला वारस उरला नाही व त्यामुळे आदिलशहा ती जहागीर जप्त करील अशी दहशत निर्माण झाली. असे झाले तर चंद्रराव मोरे यांच्या विधवा पत्नीला दुसऱ्याच्या दयेवर जगावे लागेल म्हणून तिने मोरे घराण्यातील एका मुलाला दत्तक घेण्याचे ठरविले व यासाठी शिवरायांची मदत घेण्याचे ठरविले.
जावळीचे खोरे हे स्वराज्याच्या सीमेला लागून असल्यामुळे तेथील जहागीरदार जर आपल्याशी सलोख्याने राहणार असेल तर आपल्यासाठी ती एक चांगली बाजू होईल, असा दुरचा विचार करून फक्त सोळा वर्षाचे शिवराय आपल्याबरोबर घोडदळ, पायदळ घेऊन जावळीत निघाले. मोऱ्यांच्या विधवा पत्नीने एका मुलाला दत्तक घेतले. त्याचे नाव देखील परंपरेप्रमाणे ‘चंद्रराव’ असे ठेवले गेले. आदिलशहाने ‘चंद्रराव’ हा या घराण्याला दिलेला कायमचा किताब होता. तसे बघितले तर स्वराज्याच्या दृष्टीने ही जहागीर अत्यंत महत्वाची होती तरी देखील शिवरायांनी ती संधी नाकारली.
शिवराय वयाने लहान असून देखील मोऱ्यांच्या पत्नीने त्यांना नमस्कार केला व नजराणा भेट दिला. चंद्रराव वयाने मोठा होता तरी तो देखील शिवरायांच्या पाया पडला. तो हे जाणून होता की, शिवरायांनी दिलेल्या संरक्षणामुळेच आपण जहागिरीचे धनी झालो आहोत आणि ‘चंद्रराव’ हा किताब आपल्याला मिळाला आहे.
जेव्हा शिवराय गडावर आले तेव्हा त्यांना समजले की, आदिलशहाने स्वराज्याचा वैरी असलेल्या अमीन मिया याची कोंढाण्याचा सुभेदार म्हणून नेमणूक केली आहे व तो लगेच कोंढाण्याकडे येणार आहे. स्वराज्याचा हा कपटी, बेरकी, आक्रमक स्वराज्याच्या सीमेजवळ येऊन राहणार ही गोष्ट तशी गंभीर होती.
यावर विचार करून शिवरायांनी खेडेबारे गावच्या बापूजी मुद्गलांना बोलविले आणि सांगितले की, “बापूजी हा शत्रू येथे येणार आहे व हा शत्रू येथे येणे म्हणजे स्वराज्याला धोका आहे आणि म्हणून कोंढाणा हा आपल्याच हाती पाहिजे.” असे सांगून त्यांनी बापूजींना हे काम शक्तीपेक्षा युक्तीनेच केले पाहिजे व म्हणून त्यांनी त्यांना गुप्तपणे काही गोष्टी सांगितल्या व त्याप्रमाणे ते कामाला लागले.
गडावर सिद्दीअंबर हा गडकरी व काही फौज होती. बापूजी किल्लेदाराचा पाहुणा आहे असे सांगून गडावर गेले व तेथे त्यांनी प्रवेश मिळविेला. गडावरील पाहुण्याकडे बापू गेले. बापू बोलण्यात हुशार असल्यामुळे त्याच्या जिभेवर जणू साखर घोळत होती. त्यामुळे ते समोरच्याला बरोबर आपलेसे करायचे.
आता बापूजींचे किल्लेदार पाहुणे म्हणजे आबाजी होय. आबाजी बापूजींना म्हणाले, “बापूजी, तुम्हाला काय सांगणार! आम्हाला डोळयांत तेल घालून गडावर पहारा द्यावा लागतो. थोडा देखील वेळ आम्हाला मिळत नाही. पोटासाठी परक्याची चाकरी करावीच लागते आहे व आमचा जन्म व्यर्थच चालला आहे.”
बापूजींनी आबाजींचे असे दुःखी बोलणे ऐकले व ते त्यांना म्हणाले, “आबाजी, आपण दुःखी होऊ नका. कारण लोकांवरील अत्याचार थांबावे व त्यांना सुखाने दोन घास खाता यावे यासाठी आपले शिवाजी राजे स्वराज्याची स्थापना करण्यासाठी आपल्या जिवाचे रान करीत आहेत आणि अशा वेळेस आपण सगळयांनी त्यांना सर्व प्रकारे मदत करणे गरजेचे आहे व ते प्रत्येकाचे कर्तव्य देखील आहे. तुमच्यासारखी अतिशय विचारी व जाणती माणसे जर अशी दुःख करीत बसली तर काय उपयोग?”
आबाजींना विचारी म्हंटले म्हणून त्यांना खूपच बरे वाटले व ते म्हणाले, “बापूजी, तुमच्या मनात जे आहे तेच आमच्या देखील मनात आहे. परंतु आम्हाला ते या गडावर उघडपणे बोलता येत नाही.”
तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले, “आबाजी, तुम्ही काही काळजी करू नका. तुम्हाला खरंच आपल्या राजांविषयी आदर असेल तर मी प्रत्यक्ष शिवरायांना तुमच्या भेटीसाठी घेऊन येईन.”
ते ऐकून आबाजींना बरे वाटले व ते म्हणाले, “खरेच, असे होऊ शकते का?”
तेव्हा बापूजी त्यांना म्हणाले, “होय, परंतु त्यासाठी मला एखादी गुप्त वाट तुम्ही दाखवा, म्हणजे कोणालाही न कळता हे काम होईल.”
बापूजींचा हेतू बरोबर साध्य झाला. आबाजींनी त्यांना गडावर येण्याची गुप्त वाट दाखविली. तेव्हा ताबोडतोब बापूजी शिवरायांकडे आले व गुप्त रस्ता सापडल्याचे त्यांना सांगितले, तेव्हा त्याच रात्री बापूजी व आपले हत्यारबंद पाचशे मावळे यांना घेऊन शिवराय गडावर आले व गडावरील आदिलशाही फौजेला त्यांनी हुसकावून लावले आणि नंतर राजांनी गडावर आपले भगवे निशाण फडकावले. अशा प्रकारे कोंढाणा हा न लढाई करताच स्वराज्यात दाखल झाला.
शिरवाळच्या किल्ल्यातील अमीन मियाला कोंढाण्याबाबतीत जे घडले ते काहीच माहित नव्हते. तो आपण कोंढाण्याचे सुभेदार आहोत असे समजून अतिशय आनंदाने आपल्याबरोबर थोडीशी फौज घेऊन कोंढाण्याकडे निघाला. पुढे गेल्यावर वाटेत त्याला समजले की, कोंढाणा हा शिवरायांनी घेतला. तेव्हा तो खूप संतापला.
अमीन मिया आता परत शिरवळला निघाला तेव्हा शिवरायांनी त्याची ती वाट देखील अडविली होती. मिया अमीनजवळ अत्यंत थोडीशीच फौज होती व थोडी फौज शिरवळच्या किल्ल्यात होती. शिवरायांनी याचा फायदा घेतला व ते लगेच शिरवळला गेले. तेथे जाऊन शिवरायांनी अमीन मियाच्या फौजेला घालवून दिले व शिरवळच्या किल्ल्यावर देखील भगवा झेंडा फडकू लागला.
शिवरायांनी शिरवळचा किल्ला देखील ताब्यात घेतला त्यामुळे मिया अमीन विजापुरला निघून गेला.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ | Shaktipeksha Ukti Shreshta हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ | Shaktipeksha Ukti Shreshta – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.