मोठे उखाणे - Mothe Ukhane

Mothe Ukhane

मोठे उखाणे (जानपद)- Mothe Ukhane

पूर्वीच्या काळात बायका खूप लांबलचक उखाणा घेयचे. अश्या लांबलचक उखाण्यांना जानपद (Janpad) उखाणा म्हणतात.

खाली काही मोठे उखाण्यांची यादी आहे.

सासरचा गाव चांगला
गावामध्ये बंगला
बंगल्याला खिडकी, खिडकीत द्रोण
द्रोणात तूप, तुपासारखं रूप
रूपासारखा जोडा, चंद्रभागेला पडला वेढा
चंद्रभागेची पाच नाव, नावेत बसावं
आणि.. रावांनी देहू, आळंदी, पंढरपूर फिरवावं.


हंड्यावर हंडे सात, त्यावर ठेवली परात, परातीत होते सातू, सातूचा केला भात,भातावर वरण, वरणावर तुपाची धार, तुपासारखं रूप, रूपासारखा जोडा, जोड्यात हलगडी, हलगाडीत बलगडी, बलगडीत पिंजरा, पिंजर्यात रघु, राघूच्या तोंडी उंबर… रावांचं नाव ऐकलंत ना, मग काढा रुपये शंभर.


खंडाळ्याच्या घाटात गार गार पाण्याचा झरा,
तेथे नेहमी शिवाचा पहारा,
कर्जत पासून कोकण पट्टी ला भार लागला सारा,
कल्याण कॅम्पात निर्वासी भरला सारा,
घाटकोपरला बिजली च्या तारा,
दादरला नेहमी पोलिसांचा पहारा,
कॉफर्ड मार्केट ला ट्राम (रेल्वे) धरा,
राणीच्या बागेत विश्रांती करा,
भायखल्याला जाताना चढ लागला सारा,
मार्कटच्या घड्याळात वाजले बारा,
चांभारगोदीत बोटी आल्या तेरा,
बोरी बंदरला गादीचा आगार झाला,
चौपाटीला सुटला मंजूल वारा,
साहेबाच्या बंगल्याची निरनिराळी त-हा
………………चे नाव घ्यायला रुपये लागतात एकेशे तेरा.


बाग लावला परोपरी, आत झाडे तरोतरी,
आंब्याला लागल्या कैऱ्या, उंबर लागले पिकायला,
कडवट आंबट, संत्री मुळमट,
काशीमागून फणस, लिंब, डाळिंब आले रसा, चला जाऊ ऊसा,
कुठेतरी नौकरी करा, साडी माझी पैदा करा,
बसेन तोवर बसेन, नाहीतर जाईन माझ्या माहेरा,
माझं माहेर बेगमपुरी, मला दिले मोठ्या घरी,
गळ्यात काय मोहनमाळ, गळ्यात चंद्रहार,
अंगात चोळी लाल, त्याची हरभऱ्याची गाठ,
काय सांगू संपत्तीचा थाट, वाड्यात वाडे सात वाडे,
बोलवायला गेला मोहन माळी, आधी वाढते मैसूर पाक,
पुन्हा वाढते केशरी भात, पुन्हा वाढते तिखट भात.
बारा प्रकारच्या बारा भाज्या, आवटीची शेंग, कवटीची शेंग
मुळा, कांदा, टाकून, बनवत रहा, अळूची पाने तळून,
स्टीलच्या ताटात चौपदरी चपातीची घड़ी
निरशा दुधातली बासुंदी घ्यावी थोडी,
अमेरीकी खीर, गोड सुधारस केला बाई,
लिंबू पिळायची आठवण नाही
…………………. नाव ऐकतात दिशा दाही.


सारवलेल्या अंगणात, सुंदर रेखाटली रांगोळी,
नाव घेते ऐका, आता माझी पाळी,
सुन कुणाची ………ची,
लेक कुणाची ……….ची,
राणी कुणाची भ्रताराची, भरतार म्हणे का ग रुसली,
मणी, जोडवे, बिछवे, पैंजण घाला हिला कुणी,
कडे, तोडे, पाटल्या, गोठ माझे भारी,
पैठणची पैठणी मागवा, जरतारी वजरटीक ठुशी,
मोहनमाठ गळा, जमलाय माझ्या सख्याचा मेळा,
सुवासिनीचं लेणं मंगळसूत्र काळी पोत,
सासर माहेरचं जमलं गणगोत,
कुडकं, बुगडी, वेल, कुडी ,
स्वारीच्या जीवावर नेसते रेशमी साड्या,
भांगात बिंदी, खोप्यावर गुलाबाचं फूल,
कानात माझ्या मोतीपावळ्याचं डूल,
वजरटीक, गळ्यात घातली ठुशी,
ह्यांच्या खुशीतच माझी खुशी,
पोहे हार, कोल्हापुरी साज,जळगावची वाकी
……………. च्या संसारात कुठली हौस राहिली नाही बाकी.


झुल झुंबराचं, फुल उंबराचं,
ऐंशी द्रोण नउशे झारी,
वाजत-गाजत रुकवत गेला पाटलाच्या आळी,
पाटील म्हणतात नाव घ्या, नाव कुठ फुकट,
हळदीच्या वाट्या, कुंकाच्या चिट्या,
पानाचं पुंड, दाळीचं वड,
भात भाताची, कढी ताकाची,
वडी लाखाची, लेक कुणाची आई बापाची,
सुन कुणाची सासू सासऱ्याची,
राणी कुणाची भ्रताराची,
नाजूक पोळ्या साजूक तेलच्या,
ऐंशी सांडगा, नपुसगिरी पापड,
जिऱ्या साळीचे तांदूळ दोन्ही आणे बरोबरी,
बर्फी, बुंदी, जिलभी न्यारी,
साखर, सुजी तिनशे पुरी,
चांदीची घंगाळी आंघोळीला,
नकीचं धोतर नेसायला,
चंदनाचा पाट बसायला,
सान निवळीची, खोड बडोद्याचं,
वरती गंध कोशिंबिरी, पाची पकानानं भरलं ताट,
समया जळत्यात तीनशे साठ,
पान नालगावचं, सुपारी कोकणाची,
कात लोकरचा, चुना भोकरचा,
लवंग काशीची, विलायची बीड,
मी हसले घरात मला पुसलं रंग महालात
केजच्या कचेरी खांदला आड,
त्याला बाजूबंदी छंद
…………… चं नाव घेते गलका करा बंद.


नाव मोठं भारी, शहापुरात केली न्याहरी.
पाण्याचे काढले तिकीट, मुंबई घेतलं पाकीट, .
पाकिटात पाकिट दाटल, जालन्यात घेतलं पुतळ्याचं गाठलं.
पुतळ्याच्या गाठल्याची हौस बीडात घेतली वजरटीक सौंस.
वजरटीकीचा गोंडा लाल, कुसुंबात घेतला चप्पलहार,
चप्पलहाराला लागत्यात रुपय हजाराच्या वर,
माजलगावात घेतला एकदानी सर,
एकदानी सराची खुशी, तुळजापुरात घेतली तुशी,
ठुशीला पडल्या जाळ्या, पंढरपुरात घेतल्या कातर बाळ्या,
कातरबाळ्याची घडमोड, कुडूवाडीत घेतला बुगड्याचा जोड,
बुगड्याच्या जोडीचा इनकार, झुबं फुलाचा शिनगार,
झुबं फुलाचं मोती, नथ केली राती,
नथीचा फासा, औरंगाबाद मोरणीचा ठसा,
औरंगाबाद मोरनीचा पैका, पाथरीत गा-हाणे ऐका,
जोडवे केले रोषीनं, तोडे केले खुशी,
रोष मोठा वाईट, नगरी निघाली चैनाची साईट,
चैनाचा जोड दिसतो सुना, मामजी इंग्रजी छड्या आणा,
इंग्रजी छडीची घडणावळ, मामंजी नाजूक गोप आणा,
सर्व दागिन्याचा केला मोठेपणा, आकड्याचा केला खोटेपणा,
शहरना शहर पाहिलं, कमरेच्या साखळीचं ध्यान नाही राहिलं,
गल्ली ना गल्ली पाहिली, मंगळसुत्राची आठवण नाही राहिली,
मामाजी गेले सोलापूर, सोलापूरहून आणल्या साड्या,
साड्याला दिला रंग ……………..नाव घ्यायला सभा झाली दंग.
काळी चंद्रकला नेसते खेचून, ९ भार जोडवी पायात ठसून,
ही कशाची खूण ……….. यांची सून,
त्याचं मला हसू,……….माझी सासू,तिने आणला खाऊ ……….माझी जाऊ
………. माझा भाऊ, त्याने आणली माहेरची कणसं
………… चं नाव घ्यायचा असाच यावा चान्स.


हळदीकुंकू लेते सुवासिनीच्या मेळ्यात,
गुलाबाचे फूल माळ्याच्या मळ्यात,
नऊ तोळ्याचा हार, आत्याबाईच्या गळ्यात,
आत्याबाईच्या पोटचे, भाऊजीच्या पाटचे, मुख्यमंत्र्याचे मित्र
………….च्या जीवावर लेते मणी मंगळसूत्र.
काळी चोळी विणकर पुण्याची,
ती होती बरी मी नव्हते घरी,
चांदीचे कपाट, सोन्याचा हात,
आत उघडून बघते जिऱ्या-साळीचा भात,
भातावर तूप, तुपसारखं रुप, रुपासारखा जोडा,
चंद्रभागेला पडला वेढा……… चं नाव घेते वाट माझी सोडा.
झुल झुंबराचं, फुल उंबराचं, बोलणं पिंपळाचं,
पोळी गव्हाच्या, बहीण भावाची,
लेक कुणाची, आई-बापाची,
सुन कुणाची, सासू-सासऱ्याची,
राणी कुणाची, चतुर भ्रताराची,
नाव कोण घेते ………बाईची लेक,
नाव कोण घेते बहीण………. ची,
नाव काय घेती………. राव,
कोण हाय शहाणी ……….राणी.


हंड्यावर हंडे ठेवले सात,
पाण्याला जाताना शिजत घातला भात,
पाणी शेंदता-शेंदता तोल की गेला,
काय सांगू तुम्हाला धनीन हात दिला,
माहेरच्या आठवणीनं डोळं डबडबलं,
खरं सांगते तुम्हाला धनीन डोळं पुसलं,
सुंदर कर्तृत्ववान धनीचा मला वाटतो अभिमान
………… चं नाव घेते तुमचा मान राखून /
………… नी दिले मला सौभाग्याचं दान.
सरसर जात होते, माडीवर पहात होते,
खिडकी लागली मानेला, रुपये दिले पानाला,
केशर चुना व कात, लवंगा मुठीत,
वेलदोडे ओटीत………….बसले दाटीत,
कशी जाऊ पान सुपारी वाटीत.
इरुद्या, कोयऱ्या कूट जोडवी,
पायी साखळ्याचंकडं, पायझुबे दंड,
हाती पाटल्याचं फासं दाटले,
हिरकणीला ५०० रु. आटलं,
तांदळाचं मणी, सरपदर दोन्ही,
थोरलं डोरलं, धाकलं डोरलं
थोरल्या डोरल्याला वाघ नक्या,
वाघनकीला मोत्याचा घास,
सरीमाळचा बंदोबस्त चक्री बुगड्या,
कुलुपी गेट, झुबं फुलाचं,
मोडलं कोड, सरजाची नथ मला दंड,
ठशी गरसुळीचे गोंड रेशमांनी आवळलं
…………… नावाला चंद्र, सूर्य मावळला.


कण-कण फुगली, मन-मन माती,
उतरल्या भिंती चितरले खांब,
आत्याबाईच्या पोटी जन्मले राम, राम गेले शेतात,
शेतातून आणल्या करडी, करडीत झाल्या आरडी,
आरडीचं केलं तेल, तेल ठेवलं शिक्यावर,
शिक तुटलं, मडकं फुटलं, वगळ गेला परसदार,
परसदाराचा पैका नाव कोण घेते ऐका,
नाव कोण घेती एक ……….ची लेक, र
नाव कोण घेती गहीण ……….ची बहीण,
नाव कोण घेती कंथनी ………ची पुतणी,
नाव कोण घेती काशी ………ची मावशी,
नाव कोण घेती तानी ………रावांची राणी,
आंबा मोहरला पानोपानी,
त्याला लागल्या कैऱ्या,
कैऱ्याला आला पाड,
आंबा झाला ग्वाड.
आंब्याचा केला रस,
जेवायला केली आरास,
आराशीला काढली रांगोळी
…………. बसले जेवायला,
साता जन्माचे सौभाग्य माझ्या भाळी.
मांडवाच्या दारी उभी होते सुवासिनीच्या मेळ्यात,
नवरत्नाचा हार आहे आजीबाईच्या गळ्यात,
मामंजीच्या मंदिलाला मोत्याचा तुरा,
आत्याबाईच्या पोटाला जन्मला हिरा,
परसदारी होती तुळस, तिथे सापडला कळस,
पायी पैंजणी, भार कंबरी,
कमरपट्टा गोफ, वर निऱ्याचा चोप,
माझा बसायचा झोक, मला आलं हसू,
मी हसले गालातल्या गालात,
मला विचारलं रंग महालात,
रंग महालाची हवा काय?
रंगीत पाट बसायला,
दिल्लीचा आरसा पहायला,
इतकं शहाणपण किती, पुण्याचा कारभार हाती,
मातीच सोनं, सातताळ माडी, खाणला आड,
लावलं रामफळाचं झाड, त्याला आले मोती
……………..च नाव घ्यायला अवघड किती.


माळ्याच्या मळ्यात गुलाबाचे फुल फुलते,
नवरत्नाचा हार गळ्यात घालते,
अंथरल्या छड्या, पितांबराच्या घड्या,
पाच खिडक्या, रंगीत दार,
तिथ खेळत तान्हं बाळ, तान्ह्या बाळाची सुपारी,
सुपारीला पैका ……..चं नाव घेते सर्वजण ऐका.
कौलारु माडी, काचेचे आरसे लावा त्याला,
हाजाराची पैठणी मला,
त्यांना गुलाबी सदरा मुंबईहून पार्सल केला,
घडीच्या चोळीला चाटी केला,
कारलं, डोरलं वर सुवर्णाची सर वजरटिकी मोती चार,
इरद्या कोयराला दिला इसार,
त्याला इसाराची खूण दावा,
चंद्रभागेला चलतात नावा,
आधी आळंदीला जावा, मग शिंगणापूरला जावा,
शिंगणापूर गेले, महादेवाचे दर्शन केले,
आनंद झाला फार, जरीच्या पदराची हवा लागे गार,
नसेल कुसूम पुरी जन्मले शिखर पार्वती
लावा चंदन ज्योती, चंदन ज्योतीला तेल नव्हते घ्या पाणी,
त्यांनी घेतल्या तरी, आई पाडली, शाळा केली, पुरी माझी शाळा,
एच-एस-सी त्यांची शाळा, एच-एस-सी ला सुख,
बी-एस-सी ला दुःख, पुस्तकाला वास येतो गाईच्या खुराकाचा,
वास येतो मधुर, तुम्ही घ्या पोथी, मी करते निवड,
राम गेले वनवासाला, राज्य दिले भरत
…………….नाव घेते तुमच्या सगळ्याकरिता.


झुल झुंबराचं, फुल उंबराचे,
कडी ताकाची, वडी लाखाची,
लेक कुणाची आई बापाची,
सुन कुणाची सासू सासऱ्याची,
राणी कुणाची भ्रताराची,
नाजूक तेलच्या, साजूक पुन्या,
चौरंग टाकले, टाकले पाट
…………….. बसले पुजेला समया लावल्या तीनशे साठ.


संबूच्या शिखरावरी पाऊस पडतो झीरीमिरी,
परका झाल्या बरोबरी,
सुटली नानापरी,
कोकणची भोरडी खडी काढण्या केल्या इलायावरी,
गोळा केलं नदीवरी,
खळं केलं सुर्यातळं,
मोडाया सांगितल्या कोकणच्य़ा नारी ,
हात्तीवर हौदा, उंटावर झारी,कळस घ्यायला निघाली
….. रावांची स्वारी, तर पाहतात मिळून नगराच्या नारी.


काळी डीचकी कंगोर्‍याची,
आंत भाजी लिंबोर्‍याची,
ईन मोठी ठकोर्‍याची,
कुंकू लेती बारदानी ,
बारदानीचा आरसा,
आरसा मागं परसा,
परसांत होती केळं,
केळीला आल्या तीन कळ्या,
तीन कळ्यांची बांधली माडी, माडीवर होती तुळस,
तुळशीची करतें सेवा
…….रावांचा न माजा जोडा जन्माला जावा.


नांव घ्या म्हणता,
जीव माझा नेणतां,
नेणत्याची कोवळी बुध्दि,
ताक म्हणून वाढलं दूध,
दुधावरली साय,
तूप लावूनी केली चपाती मऊ,
चपाती वरला भजा,
आनंदान जेवला राजा,
निरीचा बघा थाट,
ब्रह्मदेवाची गांठ,
गांठ सोडावी राहुनी उभा,
कपाळी शोभा कुंकवाची बघा,
बघा लल्लाटी खाली हळदीची दाटी, हळदीचा पिवळा रंग,
कंबरपट्ट्याची कडी,
गरसुळी गाती ,
आयना डाव्या हाती,
मुख न्याहाळीत होती,
हातांत सुवर्णाचा चुरा
…..रावांच्या मंदीलाला सोन्याचा तुरा.


चांदीच घंगाळ अंघोळीला,
जरीकाठी धोतर नेसायला,
चंदनाचा पाट बसायला,
सान (सहाण) येवल्याची,
खोड बडोद्याच,
केसरी गंध लेयाला,
बारा मोसंब्या खायला,
सोन्याच ताट जेवायला,
नासिकचा गडवा पाणी प्यायला,
असे जेवणाचे विलास,
रांगोळ्याचा थाट,
उदबत्यांचा घमघमाट,
जाईपत्री जाईपुरची,
लवंग सातारची,
कात बडुद्याचा,
चुना लोनाळचा,
पानपुडा पुण्याचा,
वेलदोडा मुंबईचा,
खाल्ली पान,
रंगली तोंड,
भरगच्च गादी,
रंगारंगान भरला कळस
….रावांच्या नावावर मी करीत नाही कसलाच आळस.


चौरंगावर बसायले,
तांब्याचा घंगाळ अंग ध्वायले,
जरीचे धोतर नेसायले,
केसरी गंध ल्येयायले,
केसरी गंध परोपरी कुसुमबरीचा आहे थाट,
पांची पक्क्वांनांचा घमघमाट,
डबे पडले तिनसे साठ,
एक डबा धानुरचा,
सुपारी चांदुरची,
लवंग कुर्‍हयाची,
पान उमरावतीची,
सुपारी धामनगावची,
चुना तयगावचा,
अडकित्ता नागपूरचा, ओवा आरवीचा,
बाईलेला ठसा,
ठसा सांगाडे मोती,
चाळीसगावचा कारभार
….. रावांचे हाती.


एक होती नगरी,
नगरीत होत तळ,
तत होता खांब,
त्याला होता कंदिल,
शिपायान बांधला होता मंदिल,
तत होता वाडा,
वाडयात होता पाडा,
पाडयाजवळ होता घोडा,
वाडा होता चौसोपी,
चौसोपीत होत देवाळ,
तत होता महादेव,
महादेवाम्होर होता नंदी,
तत होत पुजेच,
तित होत सवळ,
सवळ्याजवळ होती खुंटी,
खुंटीवर होती चोळी,
…. सांगत्यात राणीसाहेब महाराजांना संभाळून घ्या …. माझी भोळी.

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO