पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Afzal Khanacha Mrityu
खरोखर धन्य आहेत ते शिवराय ज्यांनी एका परस्त्रीला एवढा सन्मान देऊन तिच्याविषयी जो आदरभाव दाखवला त्यामुळे स्त्रियांचा मान अजूनच वाढला. आता कोणीही स्त्रियांकडे वाकडया नजरेने पाहात नव्हते.
कल्याणचा खजिना स्वराज्यात आला तेव्हा त्या संपत्तीचा उपयोग शिवरायांनी स्वराज्यासाठी केला. त्यांनी अनेक गडांची दुरूस्ती केली, प्रत्येक गडावर पुरेशी शिबंदी ठेवून शस्त्रसाठा केला, सैन्यात वाढ केली आणि कोंढाणा किल्ला परत जिंकून घेतला.
तसेच शिवरायांनी कोकणात मोहिमा काढल्या. किनारी प्रदेश जिंकून त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला. भिंवडी, कल्याण, लोहगड, मंगलगड आदी नवीन किल्ले स्वराज्यात आले. समुद्रात लढण्यासाठी आपले आरमार असावे; म्हणून शिवरायांनी अनेक युद्धनौका बांधून घेतल्या. दर्यासारंगांची त्यावर नेमणूक झाली. समुद्रात स्वराज्याचे शक्तिशाली आरमार शत्रूवर जरब बसविण्याचे काम करू लागले.
खारेपाटण, रत्नागिरी आदि प्रदेश आदिलशहाच्या ताब्यात होता. राजांनी तो देखील जिंकून स्वराज्यात सामील केला. तेथील समुद्रात ‘विजयदुर्ग’ किल्ल्याचे बांधकाम सुरू केले. स्वराज्याने आता चांगलेच बाळसे धरले होते.
आदिलशहाचे विजापुरात निधन झाले. तेव्हा त्याची पत्नी ‘बडी बेगम’ हिने आपल्या मुलाला तख्तावर बसविले आणि त्याच्या नावाने तिने स्वतः राज्यकारभार पाहाण्यास सुरूवात केली. तिने व तिच्या मुलाने जेव्हा शिवरायांच्या शौर्याच्या गोष्टी ऐकल्या तेव्हा त्या दोघांचेही अवसान गळाले. तिने शिवरायांचा तर धसकाच घेतला होता. परंतु तरीही तिने उसने अवसान आणून शहाजीराजांना पत्र लिहिले की, “तुमच्या मुलाला आवरा; नाहीतर त्याचे पारिपत्य करायला आम्ही तयार आहोत.”
शहाजीराजांनी यावर उत्तर पाठविले की, “माझा मुलगा आता स्वतःच निर्णय घेऊ लागला आहे. तेव्हा काय करायचे ते तुम्हीच बघा.”
शहाजीराजांच्या या उत्तराने बेगम फारच चिडली. शिवरायांचा बंदोबस्त याविषयी विचार-विनिमय करण्यासाठी तिने दरबार भरविला. तेव्हा दरबारात मनसबदार, सरदार इ. सर्वजण हजर होते. सर्वत्र शांतता पसरली. आदिलशहाची स्वारी तख्तावर विराजमान झाली. एका सेवकाने एक तबक आणले त्यात एक विडा होता. तेथे पडद्याच्या आत बेगम बसली होती ती तेथूनच ओरडली, “बादशाही मुलखातील गड एकामागून एक व सुभ्यामागून सुभे बळकावणाऱ्या त्या शिवरायांना पकडून जो कोणी बादशाही तख्तासमोर हजर करेल त्याने या तबकातील विडा उचलावा. बोला, येथे कोणत्या वीराच्या अंगी हा विडा उचलण्याचे सामर्थ्य आहे?”
बेगमचे बोलणे ऐकून दरबारात बारीकशी कुजबूज सुरू झाली. कोणी म्हणत होते की, ‘शिवराय जादूच्या मंत्राने शत्रूला हवेतच गायब करतात.’ दुसरा म्हणाला, ‘शिवराय एकाच वेळी अनेकांना दिसतात.’ मग आपण कसे पकडणार त्या शिवरायांना.’
तितक्यात एक सरदार म्हणाला, “शिवराय फार हुशार आहेत. एकाचवेळी अनेक शिवराय दिसत असतील तर मग कोणाला पकडायचे! त्यांना पकडणे एवढे सोपे नाही. त्यासाठी आपला जीव कोण धोक्यात घालणार?”
बेगम आतून ही सगळी कुजबूज ऐकत होती त्यामुळे तिचा खूपच संताप झाला. ती सगळयांवर ओरडत म्हणाली, “काय हे, हा दरबार काय बाजारबुणग्यांनी भरला आहे का? एकही पुरूष पुढे येत नाही. अरे, त्या शिवरायांना पकडून बादशहासमोर हजर करण्याची कोणातच हिंमत नाही का?”
मोठया बेगमचे ते अपमानाचे बोलणे ऐकून दरबारात थोडीशी चलबिचल सुरू झाली. इतक्यात एक मुसेखा नावाचा सरदार म्हणाला, “त्या शिवरायांना मी पकडून आणेन परंतु…”
बेगम परत संतापाने म्हणाली, “तुम्ही आत्तापासून पण, परंतु करत आहात तर मग तुम्ही काय शिवरायांना पकडणार! निघून जा येथून.”
दरबारातील प्रत्येकजणच पण, परंतु असे म्हणत होता त्यामुळे बेगमसाहेबांचा खूप संताप होत होता. तेवढयात एक अगडबंब शरीराचा, उंचापुरा, राक्षसी ताकद असलेला, पराक्रमी परंतु कपटी असा ‘अफजलखान’ नावाचा सरदार उठून उभा राहिला व त्याने तबकात ठेवलला विडा उचलला व तो गर्वाने म्हणाला, “खाविंद, मी त्या शिवरायांना पकडून तुमच्या समोर आणेन.”
त्याबरोबर त्या सर्वांनी टाळया वाजवून त्याचे अभिनंदन केले. बादशहाला खूप आनंद झाला व त्याने आपल्या गळयातील कंठा काढून खानाच्या गळयात घातला व त्याला शुभेच्छा दिल्या.
दरबार संपल्यावर बडया बेगमने खानाला जवळ बोलवून सांगितले, “खाँसाहेब, आता आमच्या सगळया इच्छा-अपेक्षा तुमच्यावर आहेत. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शिवरायांना जिवंत पकडून आमच्यासमोर हजर करा. हीच आता आमची इच्छा आहे.”
खान घरी आला तेव्हा त्याच्या दोन्ही बेगम रडत होत्या. त्याने त्यांना रडण्याचे कारण विचारले तेव्हा एक बेगम म्हणाली, “अहो, तुम्ही त्या शिवरायांना धरायला जाणार आहात म्हणून आम्ही रडतोय.”
तेव्हा तो म्हणाला, “मग तर तुम्हाला आनंद व्हायला पाहिजे. त्या शिवरायांना पकडणे काही इतके अवघड नाही. मी त्यांना दरबारात पकडून हजर करतो की नाही ते आता तुम्ही बघाच.”
ते ऐकून दुसरी बेगम म्हणाली, “अहो, ते शिवराय जादू करतात आणि पकडणाऱ्याला आकाशात गायब करतात.”
तेव्हा खान संतापून म्हणाला, “लोक काहीही अफवा पसरवतात. तुम्ही बघाच आता, ते शिवराय मला पाहताच कसे शरण येतील ते.”
अफजलखानाला अहंकार निर्माण झाला होता. शिवरायांना कसे पकडावयाचे ते त्याने मनाशी ठरविले. आदिलशाही सरदारांना शाही फर्माने रवाना झाली. त्यामुळे प्रत्येक सरदार आपल्या फौजेला घेऊन विजापुरच्या पंचक्रोशीत सैन्याचा तळ ठोकू लागला. असे करता-करता मोठी फौज जमा झाली.
घोडदळ, पायदळ, खेचरे, बैल, उंट, तोफा, बंदुका, दारूगोळा, दाणागोटा, तंबू, शामियाने, डेरे, धन-संपत्ती याची तर गणतीच नव्हती. दहा-बारा मैलांचा परिसर छावण्यांनी व्यापून गेला होता. खानाबरोबर अंकुशखान, खानाचा मुलगा फाजलखान व इतर अनेक लढवय्ये सरदार असा सगळा लवाजमा तयार होता.
खानाचे सैन्य कूच करू लागले. खान रात्री एका अलिशान शामियानात पडून मनातल्या मनात स्वप्न बघत होता- की ‘शिवरायांना मी असे पकडीन’, वगैरे. तेवढयात त्याला बातमी मिळाली. “फतेहलष्कर हाथी मर गया.”
या बातमीमुळे खान फारच हबकून गेला. तो विचार करत होता की, खास निशाणाचा हत्ती असा अचानक कसा मेला? हा तर अपशकुन आहे! आता खान मनात खूपच अस्वस्थ झाला त्यामुळे त्याला रात्रभर झोप लागली नाही.
खानाच्या मनात शिवरायांविषयी खूप व्देष भरला होता त्यामुळे त्याच्या मनात अत्यंत दुष्ट विचार घोळत होते. त्याने ठरविले की, वाटेने जाताना सगळया परिसराचा विध्वंस करीतच जायचे आणि ‘चलो तुळजापूर’ असे त्याने फर्मान सोडले.
खान तुळजापुरकडे येत आहे असे समजताच सर्व तुळजापूर घाबरून गेले. मंदिरातील देवीची मूर्ती सुरक्षित जागी हलविण्यात आली. तेथे येऊन खानाच्या फौजेने अतिशय धुमाकूळ घातला आणि सर्व मोडून-तोडून विध्वंस केला. त्यानंतर खानाने ‘पंढरपूरला’ जाण्याचे फर्मान सोडले. या सर्व गोष्टी राजांपर्यंत पोहोचत होत्या. माँसाहेबांचा जीव अगदी कासावीस होत होता.
खानाने पंढरपूरमध्ये देखील नासधूस करून धुमाकूळ घातला. तेथून नंतर ते वाईकडे निघाले. ही बातमी राजगडावर पोहोचली. स्वराज्यावर हया आलेल्या संकटामुळे सर्वजण काळजीत पडले. काही दिवसांपूर्वीच शिवरायांची पत्नी सईबाईसाहेब यांचा मृत्यू झाला होता. सर्वजण या घटनेतून सावरलेही नव्हते तोच हे खानाचे संकट स्वराज्यावर कोसळले होते. माँसाहेबांना देखील आता चिंता वाटत होती. तरीदेखील अशा परिस्थितीत शिवराय माँसाहेबांना धीर देत म्हणाले, “आजपर्यंत त्या खानाने अनेक अपराध केले आहेत आणि आता त्याच्या पापांचा घडा भरत आला आहे. आम्ही त्यांना मराठयांच्या तलवारीचे पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला माहित आहे की, खानाच्या तुलनेत आमची ताकद कमी आहे परंतु तरीदेखील जगदंबा आमच्या पाठीशी आहे. तीच यातून काहीतरी मार्ग दाखवेल. तुम्ही काळजी करू नका. बाळ शंभूराजांना घेऊन तुम्ही राजगडावरच रहा. आपले फिरंगोजी येथे असतीलच. आता आम्ही प्रतापगडावर जातो व तेथेच त्या खानाला बोलवून मराठयांचा हिसका दाखवतो.”
इकडे आदिलशहाने मावळातील पाटील, देशमुख यांना वतनदारांकडे फर्माने पाठविली होती आणि त्यात त्याने अफजलखानाच्या पाठीशी उभे राहून मदत करण्यासाठी धमकावले होते. ‘जर शिवरायांना मदत केली तर तुमच्या घरादाराची राखरांगोळी करण्यात येईल.’ असा दम देखील दिला होता आणि सांगितल्याप्रमाणे वागलात तर वतनवाडी इनाम मिळेल.’ असे अमिष देखील दाखवले होते.
परंतु तरीदेखील त्याकडे मावळातील वतनदारांनी लक्ष न देता ते सर्वजण शिवरायांना येऊन मिळाले व त्यांनी आदिलशहाच्या फर्मानाची होळी केली. आपल्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढून राजांच्या पाठीशी राहण्याचा निश्चय केला. बाजीप्रभू, माणकोजी दहातोंडे, कान्होजी जेधे, तानाजी, नेताजी पालकर, रघुनाथ कोरडे, गोमाजी नाईक या तेथे जमलेल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यात त्यांनी खानाच्या समाचाराचा गुपित बेत ठरविला व सर्वजण आनंदाने तयार झाले.
सर्व डावपेच कसे खेळायचे हे ठरवून शिवराय माँसाहेबांचा आशीर्वाद घेण्यासाठी आले. कपटाने स्वराज्याला छळणाऱ्या त्या खानाचा शेवट राजांच्या हातून व्हावा, असा आशीर्वाद त्यांनी शिवरायांना दिला.
माँसाहेब काळजीत पडलेल्या बघून शिवराय त्यांना दिलासा देत म्हणाले, “माँसाहेब, आपण चिंता करू नका. तो खानच स्वतः आमच्याकडे चालत येईल, आणि लढताना जर काही विपरीत घडले तर स्वराज्याचे रक्षण करा. बालशंभूराजांच्या नावे स्वराज्याचा कारभार चालवा.” शिवरायांचे ते बोलणे ऐकून माँसाहेबांचे हृदय भरून आले. शिवरायांच्या हातावर त्यांनी दही दिले व त्यांना निरोप दिला.
शिवराय आणि सर्व मावळयांच्या फौजा हे प्रतापगडावर पोहोचले. हे खानाला समजताच तो नाराज झाला कारण दऱ्याखोऱ्यात जाऊन लढणे हे फारच अवघड वाटत होते. त्यामुळे शिवरायांनाच वाईला बोलवून घ्यावे. जर ते आलेच तर आयतेच आपल्या जाळयात सापडतील. असा विचार करून खानाने आपला वकील कृष्णाजी भास्कर याला प्रतापगडावर शिवरायांकडे पाठवले.
कृष्णाजी भास्कर गडावर आले तेव्हा शिवरायांनी त्यांचे व्यवस्थित आदरातिथ्य केले. तेव्हा कृष्णाजी भास्कर यांनी त्यांच्यासमोर खानाचा प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, “महाराज, तुमच्या पराक्रमावर खानसाहेब खूप खुष आहेत. तुमच्या पराक्रमाचे आणि शौर्याचे ते नेहमी कौतुक करतात. परंतु काय करणार! बादशहाची मर्जी सांभाळण्यासाठी त्यांना तुमच्यावर चालून यावे लागले. जर आपण त्यांना वाईमध्ये येऊन भेटलात, आदिलशहाने जिंकलेले गड, किल्ले परत करण्याचे आश्वासन दिलेत, तर खान तुमच्या केसाला देखील धक्का लावणार नाहीत. उलट तुम्हाला अतिशय सन्मानाने बादशहाकडे घेऊन जातील व तुम्हाला सरदारकी मिळवून देतील.” कृष्णाजी भास्करांचे ते गोड बोलणे ऐकून शिवरायांनी ओळखले व ते म्हणाले, “बादशहाच्या मुलखाला आम्ही एवढा त्रास देऊन देखील तुमचे खानसाहेब आम्हाला माफ करतात म्हणजे ते किती मोठया मनाचे आहेत, नाही? परंतु मागे कर्नाटकातील कस्तुरीजंग राजाला शपथ घेऊन अभय दिले. तो बिचारा गड सोडून खानसाहेबांच्या छावणीत आला तेव्हा खानाने विश्वासघाताने त्याची मान छाटली हे आपणास आठवतच असेल.”
कृष्णाजी भास्करांनी सांगितले, “महाराज, तुमच्याबरोबर खानसाहेब असा विश्वासघात करणार नाहीत.”
तेव्हा शिवराय म्हणाले, “ठीक आहे. परंतु खानसाहेबांची एवढी मोठी फौज आणि त्यांची प्रचंड ताकद पाहून आम्हास भीती वाटते. आता तर आमची झोपच उडाली आहे. खाण्यावरील वासना उडाली आहे. त्यांचे नुसते नाव ऐकले तरी आमच्या काळजाचे पाणी-पाणी होते. नको, आम्हाला ते जमणारच नाही.”
शिवराय पुढे म्हणाले, “खान आम्हाला आमच्या वडिलांसारखे आहेत. माझ्यासारख्या घाबरलेल्या व मार्ग चुकलेल्या मुलाला सन्मार्गावर आणण्यासाठी दोन उपदेशाच्या गोष्टी सांगणे हे वडिलांचे कर्तव्य नाही का? तेव्हा त्यांनी आपले मन मोठे करून मुलाला भेटण्यासाठी प्रतापगडावर यावे. आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणेच वागू. अगदी त्यांचे बोट धरून बादशहाच्या पुढे हजर होऊ. आम्ही जिंकलेले सर्व गड, मुलुख त्यांना परत देऊ. आपण वडिलांना मुलाकडे आणाच. जर त्यांना गडाची भीती वाटत असेल तर गडाच्या पायथ्याशी आम्ही मोठा शामियाना उभारून त्यांचे मोठे स्वागत करू. ते आम्हाला जेव्हा शामियानात भेटतील, तेव्हा आम्ही त्यांच दुःख बाहेर काढू; म्हणजे आमची भेट यशस्वी होईल.”
खरे तर कृष्णाजी भास्कर इतके मुरब्बी होते तरीदेखील त्यांना देखील शिवरायांचे बोलणे खरे वाटले. खरोखरच शिवराय खूप घाबरल्यामुळे ते खानापुढे शरणागती पत्करतील. हे त्यांना सर्व खरे वाटले. शिवरायांनी आपण खानाला खरोखर भीत आहोत ही भूमिका इतकी व्यवस्थित निभावली की कृष्णाजी भास्कर राजांच्या मनातील खरे विचार ओळखू शकले नाहीत व त्यांनी शिवरायांचे म्हणणे मान्य करून ते खानाला कसे सांगायचे ते ठरवून शिवरायांची निरोप घेतला.
शिवरायांनी पुढची बोलणी करण्यासाठी आपले वकील गोपीनाथजी यांना कृष्णाजी भास्करांबरोबर पाठवून दिले. ते दोघेही छावणीत आले तेव्हा कृष्णाजी भास्कर यांनी खानाला शिवराय कसे घाबरले आहेत व ते आपणास घाबरून सर्व गड, किल्ले परत देण्यास कसे तयार आहेत हे सांगून खानाला शिवरायांची भेट घेण्यास तयार केले.
शिवरायांचे वकील गोपीनाथ यांनी देखील खानाची स्तुती करून त्याला पूर्णपणे गाफील केले. खरोखरच खानाला शिवराय आपल्याला कसे घाबरले आहेत याची खात्री झाली. यानंतर शिवरायांनी दिलेले मौल्यवान भेटी खानाला दिल्या. नंतर भेटण्याची तारीख, वेळ हे ठरविण्यात आले.
वकिलांनी खानाच्या छावणीत मिळवलेली सर्व महत्त्वाची गुपित अशी माहिती शिवरायांना सांगितली. त्याचबरोबर भेटीचा दिवस आणि वेळ सांगितली. शिवरायांनी लगेचच भेटीच्या ठिकाणी आवश्यक ती तयारी करण्यास सांगितले.
खान ज्या मार्गावरून येणार होता तेथे साफसफाई करून तोरणे, कमानी उभारण्यात आल्या. पायथा आणि गडाच्या मध्यावर नेमकी जागा बघून तेथे मोठा शामियाना उभारण्यात आला. शिवराय आपला सर्व माल एकदमच खरेदी करणार आहेत मग येथे बसून गिऱ्हाईकाची वाट बघत बसण्यापेक्षा गडावरच गेलेले बरे, असा विचार करून गडावर आलेले सर्व जवाहिरे आपले जवाहिराचे पेटारे उघडून गडावर बसले. शिवरायांच्या सरदाराने त्यांनी सांगितले की, आम्ही तुमचा सर्व माल खरेदी करणार आहोत तेव्हा त्या मालाची योग्य अशी किंमत तुम्ही ठरवून ठेवा.
आता शिवराय आणि खानसाहेब यांच्या भेटीचा दिवस जवळ आल्यामुळे सगळयाची धावपळ चालली होती. आपला सगळा माल एकदम खपतोय म्हणून जवाहिऱ्यांनी आपले मौल्यवान जवाहिर भरलेले पेटारे शिवरायांच्या सरदाराच्या हवाली करून ते राजांचा पाहुणचार घेण्यात मग्न झाले.
आपले सगळे सैन्य घेऊन खान जावळीच्या खोऱ्यात बसला. आता काय लढाई होणार नाही. आता फक्त खाण्याची-पिण्याची मजा करायची असेच सर्व सरदार व सैनिकांना वाटत होते. शिवरायांनी या गोष्टीचा फायदा घेतला. ज्या दिवशी भेट होणार होती त्या दिवशी त्यांनी खानाच्या सर्व सरदार व सैनिकांसाठी मोठया प्रमाणावर मेजवानीचे साहित्य व अतिशय उंची असे मद्याचे शेकडो बुधले पाठवून दिेले. त्याचा बरोबर पाहिजे तसाच परिणाम झाला. खानाचे सरदार आणि सैनिक भेटीच्या वेळी भरपूर खाऊन-पिऊन, धुंद होऊन छावणीत लोळू लागले होते
खानाने आपली फौज छावणीत ठेऊन फक्त पालखीचे चार भोई, दोन-तीन सेवक आणि दहा शूर हाशम सैनिक यांना बरोबर घेऊन भेटीला यावे असे ठरवण्यात आले होते. शिवाय त्यांना शामियानापासून थोडे दूर उभे करावे असे देखील ठरले होते.
शिवरायांनी भेटीच्या आदल्या दिवशी रात्री कान्होजी, नेताजी वगैरे मंडळींना नेमून दिलेल्या कामगिरीवर पाठविले होते. आपल्या वीरांना बरोबर घेऊन हे वीर आपल्या जावळीच्या दाट रानात लपून बसणार होते. जेव्हा भेट होणार तेव्हा तोफेचा बार उडाला की हे वीर त्यांच्या कामगिरीस सुरूवात करणार होते. त्याप्रमाणे ते सगळे वीर मावळे झाडीत लपून दुसऱ्या दिवशीची वाट पाहात बसले होते.
शेवटी तो भेटीचा दिवस उजाडला. खान पालखीत बसून शामियानाकडे निघाला. तेथे आल्यावर काही अंतवरावर हाशमांना उभे करून खानाने शामियानामध्ये प्रवेश केला. शामियान्याचा थाट बादशाही शमियान्यालाही लाजवेल असा होता. तो सर्व थाट बघून खान देखील आश्चर्यचकित झाला. तो आपल्या वकीलाला म्हणाला, “शिवराय खरे तर एका सरदाराचे पुत्र आहेत तरी देखील ते एक बादशहा आहे असेच स्वतःला समजतात.”
तेव्हा कृष्णाजी भास्कर म्हणाले, “नाही खानसाहेब तसे नाही. आपले स्वागत चांगले व्हावे म्हणून शिवरायांनी हे केले आहे.”
शिवराय खानाच्या भेटीसाठी तयारी करीत होते. त्यांनी अंगात एक अतिशय सुबक असे विणीचे चिलखत घालून त्यावर अंगरखा घातला. खाली सुरवार घातली. डोक्यात जिरेटोप घालून त्यावर मंदील बांधला. त्यांनी कमरेला शेला बांधला. गळयामध्ये मोत्याचा कंठा घातला. खबरदारी म्हणून त्यांनी एका हाताच्या अस्तनीत बिचवा; तर दुसऱ्या हाताच्या बोटात वाघनखे घातली. कटयार आपल्या शेल्यात लपवून ठेवली. अशी सर्व तयारी करून शिवरायांनी माता जगदंबेचे दर्शन घेतले आणि ते घोडयावर स्वार झाले व शामियानाकडे निघाले.
शामियानाकडे आल्यावर शिवरायांनी वकीलांना डोळयांनीच सांगितले की, तेथे उभा असलेला हाशम थोडा दूर उभा करावा. तेव्हा खानाला वाटले की, या घाबरट शिवरायांना लोक शूर कसे काय समजतात?”
तेव्हा वकिल म्हणाले, “खानसाहेब शिवराय राजे शूर आहेतच परंतु ते आता तुम्हाला भेटण्यासाठी येत आहेत तर त्यांचे शौर्य दाखविण्यासाठी नाही. शिवरायांनी ठरल्याप्रमाणे फक्त आपल्या दोन अंगरक्षकांना बरोबर आणले होते.
खानाने विचार केला की, ‘कोणी नसले तरी चालेल कारण आपण आपल्याजवळ लपविलेली कटयार तर आहे. त्या शिवरायांना अलिंगन देताना तीच कटयार त्यांच्या काळजात खुपसून त्यांना ठार मारता येईल. त्यांच्याकडे फौज देखील नाही. त्यामुळे एका हाशमाचा घोडा घेऊन त्यावर स्वार होऊन आपल्याला निसटता येईल आणि जर शिवरायच ठार झाले तर त्यांची फौज कशाला लढायला येईल. आता बरोबर ते शिवराय माझ्या ताब्यात येतील.’
शिवराय आपली पावले अतिशय सावधतेने टाकत शामियानामध्ये आले. कृष्णाजी भास्कर त्यांना म्हणाले, “यावे राजेसाहेब.”
शिवरायांची आणि खानाची नजरभेट झाली. शिवरायांच्या पाठोपाठ जिवा महाला आणि संभाजी कावजी येतच होते.
खान शिवरायांपासून चार पावले उभे राहून स्मितहास्य करीत म्हणाला, “शिवाजीराजे, काय तुमचा थाट? एखादा बादशहा देखील तुमच्यापुढे फिका पडेल. परंतु दुसऱ्यांचे मुलूख बळकावून राजा बनलेल्याला कोण राजा म्हणत नाही.”
ते ऐकून शिवराय सडेतोडपणे म्हणाले, “खानसाहेब, खरे तर बादशहाच्या ताब्यातील मुलूख कोणी त्यांना बक्षीस दिलेला नाही; तर त्यांनी आमच्याच पूर्वजांवर अत्याचार, जुलूम करून बळकावलेला आहे. त्यांना तुम्ही अभिमानाने बादशहा, खुदावंत असे म्हणता; आणि आम्ही आमच्याच पूर्वजांचा बळकावलेला मुलूख थोडा-फार जिंकून घेतला तर तुम्ही आम्हाला दोष देता? खानसाहेब, आम्ही तुमचे प्रेमाने स्वागत केले ते तुम्हाला वडिलांसारखे समजून, बादशहाचा सरदार म्हणून नाही.”
शिवरायांच्या त्या उत्तराने खान मात्र निरूत्तर झाला. जर आपण अजून काही बोललो तर ही हातात आलेली शिकार निसटून जाईल त्यापेक्षा गोड बोलूनच सर्व करावे लागेल. असा विचार करून खान म्हणाला, “हे शिवाजीराजे, आम्ही फक्त आमचे कर्तव्य म्हणून तसे बोललो. काय करणार, आम्ही हुकमाचे ताबेदार असल्यामुळे बादशहाचा हुकुम पाळावा लागतो. त्यांनी आम्हाला सांगितले आहे की, तुम्ही जर आमच्या अटी मान्य करून आमच्याबरोबर विजापुरच्या दरबारात यायला कबूल झालात तर तुम्हाला आम्ही बादशहाकडे घेऊन जाऊ. परंतु जर तुम्हाला ते मान्य नसले तर तुम्हाला धरून आणण्याचा हुकूम बादशहाने दिलेला आहे. पण तुमचे धैर्य, बाणेदारपणा यावर आम्ही खूपच खुश आहोत आणि तुमच्या स्वागताने आम्ही भारावून गेलो आहोत. जर तुम्हाला विजापुरला येणे कमीपणाचे वाटत असेल तर आपण एखादा दुसरा मार्ग काढू. बर जाऊ दे. तुम्हाला आम्ही बंगळूरमध्ये लहान असताना पाहिले होते. आता तुम्ही केवढे मोठे झाला आहात. या, आमच्याजवळ एकदा प्रेमाने भेटा तरी.” असे म्हणून खानाने आपले दोन्ही हात पसरले. शिवराय देखील खानाजवळ गेले. तेव्हा त्या अवाढव्य खानाच्या देहापुढे शिवराय अगदी लहान दिसत होते. खानाने अलिंगन देण्याचा बहाणा करून शिवरायांना मिठी मारली; आणि त्या दुष्ट खानाने शिवरायांची मान आपल्या बगलेत दाबली. आता खानाने लपवून ठेवलेली कटयार काढली व राजांच्या कुशीत घाव घातला त्याबरोबर राजांनी घातलेल्या चिलखतावरून कटयार खरखरत खाली आली.
शिवरायांची मान दाबल्यामुळे त्यांचा श्वास कोंडू लागला तरीदेखील प्रसंगावधान राखून त्यांनी आपल्या हातातील वाघनखे खसकन खानाच्या पोटात खुपसली. दुसऱ्या हातातील बिचव्याने खानाचे पोट फाडले. खानाच्या पोटातील आतडी खाली लोंबू लागली.
तेवढयात खान ओरडला, “दगा..दगा..या खुदा.. मुझे बचाओ..दुश्मन..काटो दुश्मन को.”
खानाच्या ओरडण्याने सय्यद बंडा आत आला व त्याने आपल्या हातातील तलवार शिवरायांवर उगारली तितक्यात जिवा महालाने वरच्यावरच बंडाचा हात कापला व दुसऱ्याच क्षणी त्याला ठार केले. तितक्यात खानाचा वकिल कृष्णाजी भास्कर तलवार घेऊन शिवरायांवर धावून आला परंतु क्षणातच त्याला देखील ठार केले.
खान कसा तरी दोन्ही हातांनी आपले रक्तबंबाळ झालेले पोट धरीत बाहेर आला. त्याला बघताच पालखीचे भोई त्याच्याजवळ आले व त्यांनी त्याला पालखीत टाकले व ते पालखी घेऊन पळतच सुटले. ते बघून संभाजी कावजींनी लगेच त्यांचा पाठलाग करून एका घावातच त्या भोयांचे पाय सपासप कापले व त्यामुळे पालखी खाली आपटली.
खान शुध्दीवर होता आणि विव्हळत होता. त्याच्याकडे संभाजी कावजीचे लक्ष जाताच तो म्हणाला, “काय रे नराधमा! काफरांचा संहारकर्ता म्हणून मिरवतोस काय? थांब, अजून तुझी शिक्षा पूर्ण झालेली नाही. मी तुझे मुंडकेच कापतो.” असे म्हणून त्याने संभाजीचे एका घावातच मुंडके तलवारीने तोडले.
खानाला ठार केल्यानंतर शिंगवाल्याने जोराने शिंग फुंकले त्यामुळे गोलंदाजांना इशारा मिळाला व गडावरील तोफांनी गर्जना केल्या. तो आवाज सगळीकडे घुमला व त्या आवाजाने झाडीत लपलेले सर्व मावळे खानाच्या छावणीवर तुटून पडले.
खानाच्या फौजेला वाटले की, खान यशस्वी झाला म्हणून तोफांची सलामी झाली. त्यामुळे खानाची फौज अजूनच गाफील झाली व त्यात ते सर्वजण मद्य घेऊन धुंद झालेले असल्यामुळे सर्व मावळे त्यांच्यावर तुटून पडले. खानाचे सर्व हाशम जिवाच्या आकांताने ओरडू लागले. हत्ती, घोडे बिथरून पळू लागले. गर्द झाडांमुळे पळून जाण्यासाठी त्यांना वाट देखील दिसत नव्हती. मावळयांनी सर्व वाटा बंद केल्या होत्या. त्यामुळे सापळयात अडकलेल्या खानाच्या फौजेचा पराभव झाला.
खानाचे जे लोक शस्त्रे टाकून शरण आले होते त्यांना जीवदान मिळाले. खानाचा मुलगा फाजलखान मात्र जीव वाचवून पळाला.
विजयी झालेले वीर मावळे गडावर परत आले. गडावर नौबती वाजू लागल्या. सगळीकडे आनंदी-आनंद झाला. संभाजी कावजीने भाल्याच्या टोकावर अडकवलेले खानाचे मुंडके सर्वांना दाखवले.
खानाचा वध झाला ही गोष्ट जवाहिऱ्यांना समजली तेव्हा त्यांनी नेताजीकडे खरेदी केलेल्या मालाचे पैसे मागितले. त्यावर नेताजींनी त्यांना सांगितले, ‘तुम्ही बादशहाचे सावकार. तुम्ही युध्दासाठी बादशहाला कर्जाऊ रक्कम दिली म्हणजे तुम्ही आमच्या शत्रूला मदतच केली म्हणून तुम्ही देखील आमचे शत्रूच झाले. तुमचा जीव वाचला हे भाग्याचे आहे, असे समजा आणि विजापुरला निघून जा.’
ते बोलणे ऐकून जवाहिर गुपचुप तेथून निघाले व त्यामुळे त्यांच्याजवळ असलेले प्रचंड जड-जवाहिरही स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले.
शिवरायांचा विजय झाला, ही बातमी ऐकून माँसाहेब धन्य झाल्या. शिवराय व माँसाहेबांची भेट झाली तेव्हा त्यांनी आपल्या वीरपुत्राला जवळ घेतले व त्या म्हणाल्या, “शिवबा, आम्ही आज धन्य झालो. तुमच्या सारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला आला, हे आमचे परमभाग्यच आहे. नेहमी असेच विजयी होत राहा आणि स्वराज्याचे सुराज्य करा, हा आमचा तुम्हाला आशीर्वाद!”
त्यानंतर शिवरायांनी वाई, सुपे, शिरवळ, सासवड इत्यादी ठाणी जिंकली. खानाच्या छावणीत असलेली भरपूर सामुग्री स्वराज्यासाठी मिळाली. हत्ती, घोडे, उंट, तोफा, बंदुका, तलवारी, दारूगोळा, दाणागोटा, भरपूर धन, अशी अमाप संपत्ती प्राप्त झाली.
शिवरायांनी गडावर दरबार भरविला. लढाईत ज्यांनी पराक्रम गाजविला, त्यांचे कौतुक करून शिवरायांनी त्यांना शाबासकी दिली. त्यांना मोठमोठी बक्षिसे देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. जे लढाईमध्ये धारातीर्थी पडले, त्यांच्या कुटुंबियांना जमिनी बक्षिस दिल्या. यामुळे शिवरायांची किर्ती सर्वदुरवर पसरली.
अफजलखानाचा मृत्यू | Afzal Khanacha Mrityu हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
अफजलखानाचा मृत्यू | Afzal Khanacha Mrityu – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.