पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Old is Gold : Chandrakant Ganpati from Shivaji Peth
डोक्यावर किरीट नसलेला, कुरळ्या केसांचा, छान मधोमध भांग पाडलेला, डोईवरचे देखणे कुरळे केस मधूनच चेहऱ्यावर लडीवाळपणे झेपावत असलेला, उजवा पाय खाली सोडून डाव्या पाय सिंहासनावर दुडपून त्यावर डावा हात ठेवलेला, मोठ्या ऐटीत लोडाला टेकून बसलेला असा आगळावेगळा गणपती आमच्या लहानपणी कोल्हापूरातल्या शिवाजी पेठेत आम्ही पहात होतो. सुमारे १५० वर्षे वय असलेल्या या गणेश मूर्तीस श्री. सरदेसाई यांचा ” चंद्रकांत गणपती ” असं म्हंटलं जायचं. जुन्या पिढीतील अनेक जण या गणपतीविषयी भरभरून बोलतात.” चंद्रकांत गणपती” म्हंटलं की,आज ही जुन्या काळातील आठवणी ताज्या होतात.
ही मूर्ती कागदाच्या लगद्यापासून बनवलेली होती. यासारखी जुनी मूर्ती अन्यत्र कुठेही असल्याचे ऐकिवात नाही. या “चंद्रकांत गणपती”बद्दल अनेक अख्यायिका त्या काळात कानावर यायच्या… आमच्या लहानपणी अशीच एक अख्यायिका सांगितली जायची की, गणेश चतुर्थी पासून अनंत चतुर्दशी पर्यंत सलग ११ दिवस या चंद्रकांत गणपतीचे दर्शन घेतले की, हमखास परीक्षेत यश मिळते. त्यामुळे आम्ही गल्लीतल्या सवंगड्यांना घेऊन ११ दिवस न चुकता या गणपतीचे दर्शन घ्यायचो. दुसरी अख्यायिका अशी की, गणेश चतुर्थी दिवशी चुकून चंद्रदर्शन झाले तर ११ दिवस चंद्रकांत गणपतीचे दर्शन घेतले की,विघ्न टळते. कुमारीकेंना हमखास वरप्राप्ती करून देणारा आणि तरूणांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून ही या चंद्रकांत गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी असायची.
बिनखांबी गणपती कडून पश्चिमेला रंकाळ्याकडे निघालात की, वरुणतीर्थ वेशीला अर्धा शिवाजी पुतळा आहे, तिथून अगदी हाकेच्या अंतरावर दौलू मास्तरांच्या शाळेसमोर श्री.सरदेसाई यांचा वाडा होता.याच वाड्याच्या दर्शनी भागात” चंद्रकांत गणपती”ची प्रतिष्ठापना केली होती.एका बाजूला रिध्दी, तर दुसऱ्या बाजूला सिध्दी अशा दोन्ही सुबक मूर्ती लक्ष वेधून घ्यायच्या. समोर मंडपात असंख्य काचेच्या रंगी बेरंगी हंड्या लावलेल्या असायच्या.तर गणपती समोर एका हंडीत पिवळाजर्द नाग असायचा. मूर्तीच्या सभोवताली मोठमोठ्या आरशांची मांडणी अशा पध्दतीने केली होती की, त्यामध्ये मूर्तीच्या २१ प्रतिमा एकाच वेळी पाहता यायच्या.रिध्दी आणि सिध्दीच्या मूर्ती इतक्या उठावदार व एकसारख्या होत्या की, इकडची तिकडं ठेवली तरी लक्षात येऊ नये.चंद्रकांत गणपतीचे रूप पहात रहावे असे होते. मूर्ती अत्यंत सुबक, रेखीव, उठावदार व मोहक होती.२१ गणपती पाहण्यासाठी सगळीकडे हिंडण्या ऐवजी सरदेसाईंच्या “चंद्रकांत गणपती” च्या २१ प्रतिमा पाहून २१ गणपतींचं दर्शन घेऊन पुण्य मिळाल्याचं समाधान पदरी पाडून घेण्यासाठी करवीरवासिय त्याकाळी खूप गर्दी करीत असत.
सध्या या मूर्तीची स्थापना करणारे श्री. सरदेसाई यांच्या पैकी कोल्हापूरात कुणीही रहात नाही.या चंद्रकांत गणपतीची प्रतिष्ठापना सुमारे १५० वर्षांपूर्वी श्री. वासुदेव वामन सरदेसाई व त्यांच्या पत्नी सौ.लक्ष्मीबाई यांनी तत्कालीन नव्या बुधवार पेठेतील ( पुढे शिवाजी पेठ असे नामांतर झाले) आपल्या वाड्यात केली. हे सरदेसाई रियासतकार गो.स.सरदेसाई यांच्या घराण्यापैकीच. हे घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील मावळंगचे. कोकणातून नोकरीच्या निमित्ताने आलेले. सरदेसाई घराण्यांत गणपतीची उपासना पूर्वीपासूनच चालत आलेली होती. गणपतीला कोकणात गावी जाण्यापेक्षा घरीच मूर्ती बसवावी,असा विचार करून त्यांनी या मुर्तीची प्रतिष्ठापना केली.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध मुर्तीकार (कै.) बेंद्रे यांच्याकडचा शिल्पकार ही मूर्ती बनविण्यासाठी मुंबईहून खास आला होता. २१ प्रतिमा दिसतील अशा प्रकारची आरशांची रचना करण्यासाठी मुंबईतील एका अभियंत्यांला पाचारण केले होते. आरसे व रंगीबेरंगी हंड्या बेल्जियमहून मागवल्या होत्या.
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी ही मूर्ती सर्वांना पहाण्यासाठी खुली करण्यात येत असे. कोल्हापूरातील दूधगांवकर वैद्य विधीवत पूजा आरती करीत. अनंत चतुर्दशी पर्यंत ही मूर्ती सर्वांना पहाण्यासाठी खुली असे. (कै) वासुदेव सरदेसाई यांची पुढची पिढी नोकरीच्या निमित्ताने मुंबई, पुणे तसेच परदेशी स्थायिक झाली. त्यांनी हा वाडा विकला, तेव्हा हया चंद्रकांत गणपतीचे काय करायचे,असा प्रश्न निर्माण झाला, त्यावेळी ( कै.) सखाराम बापू खराडे, ( कै.) आनंदराव साळोखे, (कै) जनार्दन सुर्यवंशी, (कै.)पी.जी.माने, (कै.)भिकशेठ पाटील, (कै) हिंदूराव साळोखे यांनी शिवाजी तरूण मंडळाच्या वतीने स्विकारली आणि शिवाजी मंदिरात प्रतिष्ठापीत केली, मात्र पुढे या मूर्तीची विधिवत पूजाअर्चा झाली नाही.
दुदैव हे की, शिवाजी पेठेतील नव्हे तर संपूर्ण शहराचे आकर्षण असलेल्या या चंद्रकांत गणपतीची पुढे हेळसांड झाली. अलिकडे ही मूर्ती शिवाजी तरूण मंडळाच्या सभागृहात ही दिसत नाही, सध्या तुळजा भवानी नगर, येथे (राधानगरी रोड) असल्याचे समजले. मात्र आजही गणेश चतुर्थी जवळ आली की, चंद्रकांत गणपतीविषयी आठवणी जाग्या होतात, शिवाजी पेठेतील जुने जाणते लोक चंद्रकांत गणपतीविषयी आस्थेने आणि आत्मियतेने बोलताना दिसतात.
-©सुनीलकुमार सरनाईक, कोल्हापूर
भ्रमणध्वनी : ९४२० ३५१ ३५२
( लेखक भारत सरकारतर्फे स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित असून ज्येष्ठ पत्रकार आहेत.)
जुनं ते सोनं: शिवाजी पेठेतील चंद्रकांत गणपती – Old is Gold : Chandrakant Ganpati from Shivaji Peth हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
जुनं ते सोनं: शिवाजी पेठेतील चंद्रकांत गणपती – Old is Gold : Chandrakant Ganpati from Shivaji Peth – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
2 thoughts on “जुनं ते सोनं: शिवाजी पेठेतील चंद्रकांत गणपती | Old is Gold : Chandrakant Ganpati from Shivaji Peth”