पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Hide and seek
संध्याकाळी सहाची वेळ.. लहानसहान मुलामुलींनी आणि त्यांच्या आई बाबानी बाग भरून गेलेली. कुणी झोपाळ्यावर मुलांना झोके देतंय, तर कुणाची मुलं घसरगुंडीवर घसरताना खूप मोठा पराक्रम करत असल्यागत आईबापाला ओरडून ओरडून बोलावतायत. मध्येच एखादं कार्ट धावता धावता पडतं आणि भोकाड पसरतं.. तर एखाद्या कोपऱ्यात एखादं तरुण जोडपं एकांत अनुभवतोय… एखाद्या बाकड्यावर चार पिकली पानं विसावा घेत आहेत..
बागेच्या अगदी शेवटच्या टोकावर एक गोंडस छोकरा एकटाच बसलाय सर्व गंमत जम्मत बघत. त्याचं वय नऊ दहा तरी असेल. अंगात पिवळं टी शर्ट, खाली हिरवी हाफ पॅन्ट.. पांढरे शुभ्र दात. कपाळावर खेळणाऱ्या अवखळ बटा आणि गालावर पडणारी छानशी खळी. एखादा माणूस हसत हसत पळवून नेईल त्याला.
एक तरुण मुलगा, वय असेल वीस बावीसच्या आसपास, केव्हाचा त्याला न्याहाळतो आहे. ह्या मुलासोबत कुणीच नाही आलेलं बागेत, हे एवढ्या वेळच्या निरीक्षणातून त्याच्या लक्षात आलं आहे. आजूबाजूचा अंदाज घेत तो हळूच त्या मुलाजवळ जाऊन बसतो.
तरुण : हाय
छोटा मुलगा : हॅलो
तरुण : मी बसलो तर चालेल ना तूझ्या बाजूला?
छोटा मुलगा : हो
तरुण : तुझं नाव काय रे?
छोटा मुलगा : बंटी.. आणि तुझं नाव काय?
तरुण : मी? (थोडं विचार करून) मी… माझं नाव…. (खूप वेळाने आठवल्यासारखं किंवा सुचल्यासारखं) माझं नाव प्रसाद. तू एकटाच आला आहेस का बंटी?
बंटी : हो मी रोज एकटा येतो.
प्रसाद : तुझ्या घरचे एकटे सोडतात तुला?
बंटी : माझ्या घरी फक्त आई आहे. ती कामावर जाते.. मला बाबा नाहीत ( बंटी थोडा हिरमूसला होऊन बोलतो)
प्रसाद : ओह सॉरी हं… बरं मग तू ह्या मुलांबरोबर का नाही खेळत?
बंटी : मला नाही आवडत.
प्रसाद : आपण खेळायचं लपाछपी किंवा पकडापकडी?
बंटी : हो….
बंटीला खूप आनंद होतो. आपण लपाछपी खेळूया..
प्रसाद : बरं मी लपतो तू मला शोधायचं.
बंटी : चालेल. पण जास्त लांब नाही हं जायचं लपायला…
प्रसाद : हो.. बरं तू डोळे मीट हं. मी लपतो आहे.. नीट हं.. हे बघ बोटं किलकिली करून बघतोय तू. नो चीटिंग.
बंटी : रेडी? रेडी?
रेड्डी… म्हणत प्रसाद एका झाडामागे जाऊन लपतो.
इथे तीथे शोधून पण बंटीला प्रसाद सापडत नाही… त्यामुळे तो आता रडवेला होतो.. काका कुठे लपला आहे तु? बंटी प्रसादला शोधत शोधत बोलतो. अचानक प्रसाद झाडामागून येऊन बंटीला भो करतो.
आता मी लपणार..तूझ्यावर राज्य.. बंटी फर्मान काढतो.. आणि बाकड्याखाली लपून बसतो. प्रसादने त्याला पाहिलं आहे तरी मुद्दाम सापडत नसल्यासारखं करतो. अचानक बंटी पाठून येऊन धप्पा देतो..
आजूबाजूने जाणारी लोकं प्रसादकडे वळून वळून बघत जातात… कदाचित त्यांना प्रसादचा संशय येत असावा.
दोघं दमून थोडा वेळ बाकड्यावर बसतात.
प्रसाद : चल आपण आईसक्रिम खायचं?
बंटी : माझ्याजवळ पैसे नाहीत..
प्रसाद : अरे मी देतो ना तुला आईसक्रिम.
बंटी : नको आई रागावेल. तीने सांगितलं आहे अनोळखी माणसाकडून काही घ्यायचं नाही खायला प्यायला.
प्रसाद : आता मी अनोळखी कुठे? झाली ना आपली ओळख? मी माझं नाव सांगितलं. तू तुझं… आपण एकमेकांसोबत खेळलो. खूप मजा मजा केली. अजून काय पाहिजे?
बंटी : बरं चालेल..
दोघं जायला निघतात.. पण मुख्य गेट मधून बाहेर न जाता बागेच्या मागील बाजूने नदीच्या अंगाने बाहेर पडतात. बाहेरच्या बाजूला कुठलाच आईसक्रिमवाला नाही की फारशी वर्दळ देखील नाही. अंधार पडायला लागल्यामुळे रस्ता देखील सुनसान आहे.
ह्या रस्त्याने का आलो आपण? इथे आईसक्रिमवाला नाही… कुणीच नाही इथे थोडं पुढे गेल्यावर आहे एक आईसक्रिमवाला.. तिकडे त्या दिव्याखाली आहे. चल म्हणत तो त्याला अक्षरश: खेचत घेऊन जातो.
संध्याकाळपासून पोराचा काहीच पत्ता नाही. रात्रीचे दहा वाजत आले. त्या माऊलीचा जीव खालीवर होऊ लागतो. ती त्याला सगळीकडे शोधते. पण कुठेच सापडत नाही.. शेवटी शेजारच्या काकांना घेऊन ती पोलीस स्टेशनवर येते कंप्लेंट घेऊन. पण चोवीस तास झाल्याशिवाय तक्रार नोंदवता येत नाही त्यामुळे हताश होऊन ती घरी येते.
रात्र अशीच सरते. दिवस कसातरी रेटत, मुलाला सगळीकडे परत परत शोधत ती पोलीस स्टेशनला येते. आता तीची तक्रार नोंदवली जाते. सगळीकडे मुलाचा फोटो पाठवला जातो.
तीन दिवस असेच जातात..शेवटी पोलीस स्टेशन वरून तीला फोन येतो, तुमच्या मुलाशी मिळतं जुळतं वर्णन असलेल्या मुलाची बॉडी सापडली आहे नदीत. एकदा येऊन खात्री करून घ्या.
तो आपला मुलगा नसेलच असं मनाला समजावत ती बॉडीची ओळख पटवायला जाते.
बॉडी पाण्यामुळे फुगलेली… तरी आईला ओळख पटते लेकराची. तीच्या हंबरड्याने भिंती देखील हादरून जातात. सर्व सोपस्कार आटपून बॉडी तीच्या ताब्यात दिली जाते.
पण पोलीस तपास तर व्हायलाच हवा ना…
त्या बागेत इन्स्पेक्टर चौकशीसाठी येतात. सगळेजण एकच सांगतात. हा बागेत एकटाच बसला होता.. एकटाच बोलत होता स्वतःशीच. एकटाच लपाछपी खेळत होता. मग अंधार पडल्यावर एकटाच बोलत बोलत बाहेर पडला. नदीच्या दिशेने गेला. कट्यावर त्याला उभं राहिलेलं देखील पाहिलं एक दोघांनी. पण सहज उभा असेल म्हणून कोणी त्याला हटकलं नाही. आज त्याची बॉडी फुगून वर आली तेव्हा समजलं त्याने आत्महत्या केली असावी.
प्रसाद एक मनोरुग्ण असावा.. म्हणूनच बागेत एकटाच बोलत होता… एकटाच खेळत होता… त्याच भरात त्याने आत्महत्या केली असावी. पोलीस ह्या निष्कर्षापर्यंत आले. काहीही असलं तरी वीस वर्षाचा हातातोंडाशी आलेला तरुण मुलगा अकाली जाणं धक्कादायकच त्या आईसाठी…
बरेच दिवसांनी आज बंटी परत बागेत आला. त्याला एकट्याला पाहून एक आजीबाई त्याच्या सोबत बोलायला येतात….
एवढा गोड मुलगा एकटाच का बसलाय इथे? मी बसू का तूझ्या बाजूला.. आजी विचारतात.
हो बसा ना आजी… बंटी बोलतो
आणि त्यांच्या गप्पा चालू होतात..
बागेतील लोकं आपसात बोलत असतात… बघा त्या आजी कशा एकट्याच बोलत आहेत. हसत आहेत…
समाप्त
राजेंद्र भट
लपाछपी | Hide and seek हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
लपाछपी | Hide and seek – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.