पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
नोबेल – Nobel Kavita
अंधार गडद होत जाताना
आकाशाचा फळा
चमचम चांदण्यानी जावा भरत…
तसे शिक्षकाच्या खात्यात
जमा होत जातात विद्यार्थी .
किती तरी भावी डाॅक्टर,
इंजिनियर ,व्यापारी, नेते,
पत्रकार व गुंडसुद्धा
खूप लहान
असतात त्याच्या धाकात
समोर बसलेले……..
त्याच्या चष्म्याचा नंबर बदलत जातो हळुहळु
तसे,अनेक चेहरे अस्पष्ट होत जातात…….
मात्र प्रार्थनेसारखे शांत ,
फंडाच्या रकमेसारखे आजारी,
वेतनवाढीसारखे गुणी,
व इन्स्पेक्शनसारखी उपद्रवी मुले लक्षात राहातात सेवापुस्तकातल्या
स्पष्ट नोंदींसारखी….
पुढे मागे भेटत राहातात,
अनोळखी वळणांवरुन
देत राहातात आवाज.
भर गर्दीत ,
समारंभात,
संमेलनात…………कुठेही.
“हे माझे सर बरं का !”
आपुलकीनं सांगतात लेकीला..
गच्च भरलेल्या बसमधे
हात धरुन करतात आग्रह
खिडकीपाशी बसण्याचा.
“नमस्कार करते हं !” म्हणत
नवर्यालाही लावतात वाकायला.
तेव्हा अधोरेखित होतो त्याचा पेशा….
असं कसलं गारुड करतो तो पोरांवर ?
अाणि स्वीकारत राहातो …..
आयुष्यभर..
एखाद्या बुजर्या आवाजाला दिलेल्या हिमतीचा….जनस्थान पुरस्कार !
कविता शिकवतांना फुटलेल्या हुंदक्याची……….फेलोशीप !
सुंदर हस्ताक्षरासाठी दिलेल्या शाबासकीची……..साहित्य अकादमी !
पाठीवरुन मायेनं हात फिरवल्याबद्दलचे……ज्ञानपीठ !
अन् फळ्यासमोर चोख भूमिका बजावल्याचे………….नोबेल !!!!
– अन्वर मिर्झा