पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Sohala Chakolyancha
काही पदार्थ हे भुकेसाठी असतात.
पण काहींचा मात्रं सोहळा होतो.
माझ्या आयुष्यात “चकोल्यांचं” असच काहीसं स्थान आहे.
मिरजेत आमचं एकत्र कुटुंब. तीन भाऊ आणि त्यांची कुटुंबं गुण्यागोविंदानं एका मोठ्या घरात नांदत होती.
कालांतरानं त्यांनी स्वतंत्र संसार थाटले पण शेजारी-शेजारीच.
सण-समारंभाची एकत्र जेवणे, पदार्थांची देवाण -घेवाण ,हे साहजिकच सुरू झालं.
माझी थोरली काकू पंढरपूरची. ती चकोल्या फारच छान करायची.
साहजिकच धाकट्या दोन्ही जावाही तिच्याकडून चकोल्या करायला शिकून त्यात एक्सपर्ट झालेल्या.
तिन्ही जावा आणि त्यांच्या आम्ही तिन्ही मुली यांचा “चकोल्या” म्हणजे अगदी जीवाभावाचा पदार्थ..
पण आमच्या घरातील एकाही पुरुष जातीच्या व्यक्तीला “चकोल्या” हा पदार्थ आजिबात आवडत नसे.
कुणी त्याला “चिखल” तर कोणी “आंबोण” म्हणत असे.
यावर या जावांनी एक मस्त तोडगा काढला होता.
जिचा नवरा गावाला गेलेला असायचा ती आपल्याघरी “चकोल्यां”चा घाट घालायची.
उरलेल्या दोन्ही घरांतील महिला मंडळाचे जेवण त्या दिवशी तिथे असे..
थंडीतला किंवा भुरुभुरू पावसाळी सर्द दिवस…!!
दुपारी पाऊण-एकची वेळ .
आम्ही मुली शाळेतून घरापर्यंत आलेल्या असू.
घराचा आसमंत जिरे,खोबरे,लसूण घातलेल्या झणझणीत आमटीच्या सुवासाने दरवळून गेलेला असे..
आम्ही एकमेकींकडे पाहून आनंदाने ओरडायचो “चकोल्या”
या चकोल्यांच्या “सरप्राईज” नं आमच्या आनंदाला पारावर राहिलेला नसायचा..
छोट्या आनंदांनी आयुष्यावर जीव ओवाळून टाकायचा तो काळ होता.
पटापट कपडे बदलून आम्ही “चकोल्यां”चं घर गाठत असू..
भल्या मोठ्या पितळी पातेल्यात मेथीच्या दाण्याच्या खमंग फोडणीत तूरडाळीचं वरण,मीठ,लाल तिखट,गोडा मसाला,धणे-जिर्याची पूड,चिंचेचा कोळ,गूळ आणि सुकं खोबर,जिरं नि लसणाचं वाटण पडून आमटी उकळ्या मारू लागलेली असायची.
मग त्यातली थोडी आमटी बाजूला काढून ठेवली जायची.
पातेल्यातील आमटीत कणकेच्या पोळ्यांचे कातण्याने चौकोनी तुकडे करून टाकले जात.
हे कापण्याचं नि तुकडे आमटीत घालण्याचं काम आम्हा मुलींच्या अत्यंत आवडीचं!
तुकडे आमटीत पडले की असा काही घमघमाट सुटायचा की पोटालाही संदेश मिळून पोटातलं आम्ल आणि तोंडातला लाळरस प्रकाशाच्या वेगानं स्त्रवू लागत..
“केंव्हा होणार चकोल्या” या सततच्या आमच्या प्रश्नानं आमच्या आया बेजार होऊन जात..
“चला ताटं घ्या”…
स्वयंपाकघरातील फरशीवरच आम्ही मुली ताटं मांडायचो.
तुपाचं तामलं पुरायचंच नाही, म्हणून तुपाचा मोठा डबा घेतला जायचा.
सगळ्या ताटांसमोर मोकळी-ढाकळी मांडी घालून बसायचो.
काकू किंवा आई नॅपकिननं ते भलंमोठं चकोल्यांचं जड पातेलं गॅसवरून उतरवून कसरत करत आणून फरशीवर ठेवे.
हे पातेलं म्हणजे “सेंटर ऑफ अॅट्रॅक्शन”….
त्याच्याभोवती गोल करून बसलेली आमची पंगत..
काकू मोठ्या ओगराळ्याने प्रत्येकीच्या ताटात ताटभरून चकोल्या घाले आणि वरून भरपूर तूप!
तूप नको किंवा कमी घाल ,असं कोणी म्हटलं की ” तुपाने चकोल्या पचतात..भरपूर तूप खावच लागतं यांच्याबरोबर…” असा युक्तीवाद…!!
हे तुपाचं शास्त्र किती शास्त्रीय आहे,हे माहीत नाही..
पण त्यातून आमच्या आयांच्या मायेचं अमृत मात्रं पाझरायचं ,हे नक्की..
शिवाय भरपूर तुपामुळे चकोल्यांचा स्वाद चौपट वाढायचा..
त्याकाळी चमच्याचा वापर निषिद्ध असावा..
आम्ही त्या तुपात लोळणार्या प्रचंड गरम चकोल्या हाताने कालवून हाताच्या बोटांनीच खात असू.
ताटातील चकोल्या कडेकडेने न भाजता कशा खायच्या याचं प्रशिक्षणही आम्हाला मिळे.
मऊ-मुलायम रेमासारख्या चकोल्या आणि ती खमंग आमटी यांचा पहिला घास असा काही जिभेला सुखावत असे की ज्याचं नाव ते!
पहिलं वाढप संपलं की दुसरं वाढप होई..
दुसर्या वाढपाची चव पहिल्यापेक्षा उतरलेली असे..खाण्याचा वेग मंदावलेला असे…
कारण पोटोबांची भरायला सुरूवात झालेली असे.
आता गप्पांना सुरूवात होई.
गावातील कोण कुणाबरोबर पळून गेली, कोणत्या सासु-सुना कशा भांडतात वगैरे गावगप्पा चकोल्यांइतक्याच खमंग रंगत असत..
चकोल्या या थंड आजिबात चांगल्या लागत नाहीत त्यामुळे पातेल्यातील चकोल्या संपल्याच पाहिजेत, हा दंडक असे.
पातेल्यातील, ताटातील चकोल्या नि पोटातली भूक संपली संपली की या खाद्ययात्रेची सांगता विशिष्ट पद्धतीने होई..
आम्ही मुली ताट शब्दश: चाटत असू.
ताटाला लागलेले तूप आणि आमटी चाटल्याने अशी काही लागे की त्यापुढे इंद्राच्या राजवाड्यातील पक्वान्नेही फिकी पडतील..
हाताची बोटेसुद्धा या सुगंधात कितीतरी काळ दरवळून जात..
तुडुंब भरलेली पोटे जागची उठू देत नसत.
कसेतरी मागचे आवरून आम्ही स्वयंपाकघरातच पथार्या पसरत असू.
मग पुन्हा गप्पांचा फड,चेष्टा मस्करी…
या सार्या सोहोळ्यात न्हाऊन ताज्यातवान्या झालेल्या आम्ही दुपारची चहा-कॉफी करून पुढच्या चकोल्यांची वाट पहात आपापली घरे गाठत असू..
काळ थांबत नसतो.
थोरल्या दोन्ही बहिणी लग्न होऊन आपापल्या घरी निघून गेल्या.
त्या माहेरपणाला आल्यावर “चकोल्यांची पार्टी” न चुकता होत असे.
कालांतराने माझंही लग्न झालं.
सासरी घरातल्या पुरुषांनासुद्धा चकोल्या आवडतात,ही आनंदाची बातमी एके दिवशी समजली.
पण इथल्या चकोल्यांचं नाव “डाळफळ” असं होतं.
त्यांचं इथलं रूपही वेगळं होतं.
इथे कांदा, मेथीची भाजी ,टोमॅटो घालून आमटी बनवली जायची.
कणकेत ओवा,हिंग,हळद घालून गोल पुरीच्या आकाराची फळं बनवली जायची.
बाकी कृती चकोल्यांसारखीच..
सासुबाई ही डाळफळं फार सुंदर करायच्या..
तेंव्हापासून मला सासरची डाळफळं जास्त आवडू लागली.
कुकरी बुक्स,टी.व्ही .शोज यांतून चकोल्यांच्या डाळफळ,वरणफळ, डाळढोकळी,शेंगोळ्या सारख्या अनेक रुपांची ओळख झाली.
भाज्यातील व्हिटॅमिन्स,कणकेतील पिष्टमय पदार्थ, डाळींतली प्रथिने ,तुपातील स्निग्ध पदार्थ यांतून बनणारा हा परीपूर्ण आहार खरच खूप पौष्टिक आहे.
भारतात चकोल्यांच्या रूपातला हा पदार्थ जगातील इतर भागांत अजून वेगळ्या घटकांशी संग करून नूडल्स,पास्ताचं रूप धारण करतो…
पण ही चकोल्यांची पाश्चिमात्य गोरीगोमटी रूपं नवीन पिढीला आकर्षून घेण्यात मात्रं यशस्वी झाली आहेत…
माझ्या मराठमोळ्या चकोल्या इथेमात्रं मागे पडल्यात..!!
पण म्हणतात नां ,” चार दिवस सासुचे, चार दिवस सुनेचे “
माझ्या चकोल्यांचे,डाळफळांचेही दिवस येतील, सार्या जगात त्यांना नाव मिळेल नि पुन्हा एकदा त्यांचा सोहळा साजरा होईल…
नीला महाबळ गोडबोले
सोलापूर…
सोहळा चकोल्यांचा | Sohala Chakolyancha हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
सोहळा चकोल्यांचा | Sohala Chakolyancha – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.