पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Bajiprabhuna Virgati
आदिलशहाने आता शिवरायांपुढे हात टेकले होते, कारण रोजच काही तरी नवीन घटना घडत होत्या त्यामुळे तो फारच काळजीत पडला होता. यासाठी काय करावे असा प्रश्न त्याच्यासमोर निर्माण झाला होता.
आदिलशहा अशा परिस्थितीत असतानाच त्याच्याकडे कर्नूलगडचा सरदार सिद्दी जौहर हा दाखल झाला. त्याने आदिलशहाला विश्वास दिला की, “तुम्ही काळजी करू नका. काहीही झाले तरी मी त्या शिवरायांना पकडल्याशिवाय गप्प बसणार नाही. मग त्यासाठी मला कितीही वेळ लागला तरी चालेल. शिवराय ज्या किल्ल्यावर असतील तेथेच त्यांना वेढा घालतो आणि मग गडावरचा दाणागोटा संपला तर त्यांना आपल्याला शरण यावेच लागेल.”
जर शिवराय पन्हाळयावर असतील तर ते पूर्णपणे अडकणार; कारण त्या गडाला चोरवाटा देखील नाहीत व भुयार देखील नाही. मग ते निसटून कोठे जाणार? विशाळगडाशिवाय दुसरा गड नाही म्हणून त्या गडाला देखील वेढा घालीन. तुम्ही बघाच मग ते माझ्या कचाटयात कसे अडकतात ते. आपण त्यासाठी दिल्लीच्या औरंगजेबाची देखील मदत घेऊ कारण त्याला देखील शिवरायांनी त्रास दिलेला आहे.”
आदिलशहाला सिद्दी जौहरच्या बोलण्यामुळे खूप धीर आला व आनंद देखील झाला. कारण सिद्दी जौहर हा अतिशय कठोर शिस्तीचा आणि जे तो बोलतो ते तो करून दाखवतो असा होता म्हणूनच आदिलशहाने लगेचच ‘सलाबतजंग’ हा किताब देऊन त्याचा गौरव केला. त्याने सिद्दीला भरपूर फौज, शस्त्रास्त्रे, दाणागोटा दिला. त्याशिवाय औरंगजेबाची मदत मिळविण्यासाठी त्याला निरोप देखील पाठविला. सिद्दी जौहर हा मान-सन्मान मिळाल्यामुळे खूपच खुश झाला होता. सिद्दी प्रचंड फौज, भरपूर शस्त्रात्रे, दारूगोळा आणि हुशार सरदार बरोबर घेऊन पन्हाळगडाकडे निघाला.
पन्हाळगडावर शिवरायांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी लगेच योजना तयार केली व त्याप्रमाणे त्यांनी आदिलशहाच्या फौजेची विभागणी व्हावी, या हेतूने सरसेनापती नेताजी पालकर यांच्याबरोबर भरपूर फौज देऊन त्यांना आदिलशाही मुलखाची धूळधाण करायला पाठविले.
सिद्दी जौहर मोठया फौजेबरोबर कोल्हापुरावर चालून येत आहे, असे शिवरायांना समजताच त्या प्रचंड मोठया फौजेसमोर मैदानावर लढायला आपले बळ कमी पडणार असे लक्षात येताच त्यांनी कोल्हापूर ठाणे मोकळे करून आपली सर्व फौज पन्हाळगडावर आणली.
सिद्दीच्या आता आपोआपच कोल्हापूर ताब्यात आले. त्यानंतर त्याने पन्हाळगड व विशाळगडाला वेढा दिला. तेव्हा पावसाळा देखील सुरू झाला होता. असे तीन महिने होत आले तरी सिद्दी गडाला वेढा देऊन वाट पाहात होता. त्यात भर म्हणून राजापुरचे इंग्रज अधिकारी लांब पल्ल्याच्या तोफा आणि भरपूर तोफगोळे घेऊन सिद्दीच्या मदतीला आले, तर औरंगजेबाने आपले मामा शाहिस्तेखानाला मोठी फौज देऊन स्वराज्यामध्ये धुमाकूळ घालायला दक्षिणेत पाठवले. शाहिस्तेखानाने बरोबर त्याप्रमाणे दक्षिणेत येऊन मुलूख जाळीत, लुटालूट करीत धुमाकूळ घातला आणि शेवटी त्याने पुण्यात येऊन शिवरायांच्या लाल महालात मुक्काम ठोकला.
सिद्दी जौहरचा पन्हाळयाचा वेढा उठण्याची कोणतीच चिन्हे दिसत नव्हती. गडावरील दाणागोटा आणि गुरांचा चारा आत संपत आला होता. आता काहीतरी हालचाल करायलाच पाहिजे असे ठरवून शिवरायांनी एका रात्री अतिशय गुप्तपणे आपल्या हेरांना गडावरून निसटून जाण्यासाठी एखादी चोरवाट कुठे मिळते का ते पाहण्यासाठी बाहेर पाठविले. त्याप्रमाणे ते हेर पुन्हा गडावर आले व त्यांनी शिवरायांना त्याची माहिती दिली.
शिवरायांनी रात्री आपल्या विश्वासू सहकाऱ्यांबरोबर विचार विनिमय करून कसे निसटून जायचे, याची युक्ती सांगितली. ही युक्ती पार पाडणे अतिशय कठीण होते परंतु त्याशिवाय दुसरा कोणताही उपाय नव्हता.
दुसऱ्या दिवशी शिवरायांचे वकील शिवरायांच्या सही-शिक्क्याचे पत्र आणि शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरून सिद्दी जौहरच्या छावणीकडे गेले व त्याला राजांचे पत्र दिले.
सिद्दीने ते पत्र वाचले तेव्हा त्याला व त्याच्या फौजेला फार आनंद झाला. आता आपली मोहिम यशस्वी होणार याची त्यांना खात्री वाटली. शिवरायांनी त्या पत्रात लिहिले होते की, ‘आमच्याकडून खर तर खूप मोठी चूक झाली आहे. आम्ही खरे तर आपल्यासारख्या हुशार सरदारापुढे केव्हाच शरण यायला पाहिजे होते. आपणास त्यामुळे उगीचच त्रास झाला. परंतु आता झाले ते झाले. आपण आता ते विसरून जावे. जर आपण शपथेवर आमच्या सुरक्षिततेची खात्री देत असाल तर उद्याच रात्री आम्ही आमच्या काही साथीदारांसह शस्त्रे खाली ठेवून, हात बांधून आपल्यासमोर हजर होऊ आणि गड आपल्या स्वाधीन करून आपल्या बरोबर विजापुर दरबारात येऊ.”
शिवरायांचे ते पत्र वाचून सिद्दीला मनातून खूपच आनंद झाला परंतु तसे न दाखविता शिवरायांच्या वकिलांना तो म्हणाला, “आम्ही रक्ताची शपथ घेऊन सांगतो की, आमच्याकडून किंवा इतरांकडून शिवरायांना कोणत्याही प्रकारची इजा अथवा दगा होऊ देणार नाही.”
सिद्दीचे हे बोलणे खोटे आहे हे राजांच्या वकिलांनी ओळखले होते परंतु त्याने तसे न भासविता ते सिद्दीचा निरोप घेऊन गडावर परत आले.
फाजलखानाने सिद्दीला सावध करण्याचा प्रयत्न केला पण त्याने सांगितले की, ‘मी अफजलखान नव्हे. आम्ही सर्व विचार करूनच मोहिमा आखतो. आता फक्त तुम्ही बघत राहा की आम्ही त्या शिवरायांची कशी फजिती करतो ते.’
शिवराय आता हात बांधून शरण येणार ही बातमी कळताच सिद्दीच्या फौजेला खूप आनंद झाला होता. कारण त्यांनी चार महिने पावसात मनात सारखी भीती धरून घालवले होते. दोन घास देखील त्यांनी कधी सुखाने खाल्ले नव्हते म्हणून फौज फार कंटाळली होती. त्यातच आता शिवराय शरण आल्यावर आपल्याला विजापुरात परत जाता येणार यामुळे सर्व सैनिक खाणे-पिणे, नाच-गाणे यामध्ये मशगुल होते त्यामुळे गडाचा वेढा सैल झाला व शत्रू गाफिल झाला.
शत्रू गाफिल आहे हे बघताच पाच-सहाशे मावळे आणि बाजीप्रभू यांच्यासह शिवराय गडावरून गुपचूप बाहेर पडले.कोणी घोडयावरून तर कोणी पायी निघाले. शिवरायांच्या चेहऱ्याशी साम्य असलेला शिवा न्हावी वेषांतर करून शिवाजीराजे बनला होता. शिवराय घोडयावरून निघाले आणि शिवराय बनलेला शिवा न्हावी पालखीत बसून निघाले. ते पुढे-पुढे सरकत आणि पहारे चुकवत निसरडया उताराजवळ आले व एक-एक जण सावधगिरीने खाली उतरून विशाळगडाच्या वाटेला लागले.
सिद्दीच्या एका माणसाने राजांची पालखी व मावळयांना वाटेत बघितले व तो लगेच त्याच्याकडे गेला. त्याने त्याला सावध करीत सांगितले, “शिवराय पालखीत बसून विशाळगडाकडे पळून चालले आहेत.”
शिवरायांना माहितच होते की, ही बातमी सिद्दीपर्यंत पोहोचणारच आहे म्हणूनच त्यांनी वेषांतर केले होते. शिवराय व बाजीप्रभू व इतर मावळयांसह एका आडवाटेने विशाळगडाकडे अतिशय वेगाने निघाले.
शिवराय पालखीत बसून पळाले हे सिद्दीला समजले. सिद्दीने लगेचच आपला जावई मसूदला काही फौज देऊन शिवरायांच्या पाठीमागे पाठविले. मसूद धावत गेला आणि पालखीत बसलेल्या राजांना काही वेळातच पकडून घेऊन आला.
पालखीतून उतरलेल्या राजांना सिद्दीने तंबूत नेऊन गादीवर बसवले व तो म्हणाला, “काय राजे, आज तुम्हाला माझ्या रूपाने शेरास सव्वाशेर भेटला की नाही?”
तितक्यात एक हेर सिद्दी जौहरकडे पाहात म्हणाला, “खाविंद, हे काही खरे शिवराय नाहीत. हा तर शिवा न्हावी शिवरायांसारखा वेष केलेला.”
ते ऐकताच सिद्दी खूपच खजील झाला. ही गोष्ट जर बेगम साहेबांना समजली तर आपले काही खरे नाही, असा विचार करून त्याने परत आपल्या जावयाला खऱ्या शिवरायांना पकडून आणण्याचा हुकूम दिला.
मसूद लगेचच मोठी फौज घेऊन शिवरायांच्या पाठलागावर निघाला. तेव्हा शिवराय व मावळे दमून गजापूरच्या खिंडीजवळ आले होते. तेवढयात त्यांना सिद्दीचे सैन्य पाठलाग करीत आहे असे समजले. तेव्हा शिवराय म्हणाले, “आता दुश्मन जवळ आलेला दिसतो व त्याची फौज देखील मोठी आहे. आपली फौज फार तर पाच-सहाशे. त्यातही ती धावपळ करून थकलेली आहे. परंत तरी देखील आता प्राणपणाने लढण्याशिवाय गत्यंतर नाही.”
ते ऐकून मावळे आणि बाजप्रभूने शिवरायांना पुढे जाण्याची विनंती केली व सांगितले, “लाख मरोत; परंतु लाखोंचा पोशिंदा जगो, अशी म्हण आहे. आमच्यासारखे अनेक सेवक मिळतील; पण स्वराज्याचा तारणहार शेकडो वर्षातून फक्त एकदाच जन्म घेतो. आपण घाई करा महाराज आणि काही मावळे घेऊन विशाळगडाकडे जा. गडावर पोहोचताच तोफांचे तीन बार उडवा. तोफांचे आवाज कानी पडेपर्यंत आम्ही आमच्या छातीचा कोट करून लढू आणि शत्रूला ही खिंड ओलांडू देणार नाही.”
शिवराय अतिशय जड अंतःकरणाने काही मावळयांना बरोबर घेऊन विशाळगडाकडे निघाले.
शिवराय गेल्यावर मावळे आणि बाजीप्रभू खिंड लढवण्यासाठी उभे राहिले. त्यातील काही मावळे खिंडीच्या वरच्या बाजूला गेले. तेवढयात दोन-दोन करीत गनिम मावळयांवर चालून आले.
खिंडीच्या वर असलेल्या मावळयांनी ‘हर हर महादेव’ अशी गर्जना केली व मोठ-मोठे दगड घेऊन त्यांनी शत्रूच्या अंगावर टाकायला सुरूवात केली. शत्रूची डोकी फुटून ते रक्तबंबाळ होत होते. बाजी व मावळे हे जीव खाऊन लढत होते. पराक्रमाची शर्थ करीत खिंडीत पाय रोवून पहाडासारखे उभे होते. भराभर शत्रूची मुंडकी उडवत प्रेतांचा खच पाडत होते. काहीजण लढता लढता स्वःत देखील कोसळत होते. तेवढयात बाजीचा भाऊ एका बाणाने धरणीवर कोसळला. परंतु तरी देखील बाजीप्रभू मात्र प्राणपणाने लढतच होते. ते बघून मावळे जोरदार लढू लागले होते. शत्रूच्या माना ते सपासप कापत होते.
बाजीप्रभू देखील रक्ताने न्हाऊन निघाले होते परंतु तरी देखील त्यांच्या हातातील तलवार त्यांनी सोडली नाही. त्यांचे सर्व लक्ष तोफेच्या आवाजाकडे होते. आता ते भोवळ येऊन जमिनीवर कोसळणार इतक्यात धडाम, धडाम असा तोफांचा आवाज आला. शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचले हे जाणून बाजीप्रभूंनी सुखाने आपले प्राण सोडले.
शिवराय विशाळगडावर सुखरूप पोहोचून बाजीप्रभू व मावळयांची वाट बघत होते. इतक्यात काही मावळे वीर धावतच गडावर आले. बाजीप्रभूंना वीरगती प्राप्त झाली हे समजताच शिवरायांना खूपच वाईट वाटले. बाजीप्रभूंच्या पावन रक्ताने गजापूरची खिंड पावन झाली व तेव्हापासून त्या खिंडीचे नाव ‘पावनखिंड’असे पडले.
शिवरायांनी गजापूर खिंडीत ज्यांनी शौर्य गाजविले होते अशा मावळयांना बक्षिसे देऊन त्यांचा गौरव केला. जे लोक जखमी झाले होते त्यांच्या उपचाराची व्यवस्था केली. मावळयांच्या कुटुंबियांना दिलासा दिला. यानंतर शिवराय बऱ्याच दिवसांनी माँसाहेब आणि कुटुंबियांना भेटण्यासाठी राजगडाकडे गेले.
बाजीप्रभूंना वीरगती | Bajiprabhuna Virgati हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
बाजीप्रभूंना वीरगती | Bajiprabhuna Virgati – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.