पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Krur Sultan
देवगिरीचा यादवकाळ हा अतिशय भरभराटीचा होता. तेथील प्रजा आनंदी होती. महाराष्ट्राच्या लोकमाता म्हणजेच भीमा, कृष्णा, गोदावरी, इंद्रायणी यांनी महाराष्ट्राची भूमी सुजलाम् सुफलाम् केली होती. सह्यगिरी देखील महाराष्ट्राचे रक्षण करीत होता. शेते पिकत होती. दूध-दुभते मुबलक होते. सगळी कोठारे धान्याने भरलेली होती. सण, उत्सव आले की सगळयांना अगदी जोश यायचा व सर्वजण मिळून एकत्र येऊन आनंद साजरा करायचे.
नाशिक, नेवासे नगरीमध्ये विद्येचा सुकाळ होता. सरस्वती विलसत होती. अलंकापुरीला वैभव प्राप्त झाले होते. संतवाणीने अज्ञानरूपी अंधःकार दूर होत होता. थोडक्यात असे म्हणावयास हरकत नाही की, महाराष्ट्राची भूमी ही पावन झाली होती.
महाराष्ट्राचे वैभव यादवकाळात शिखरावर पोहोचले होते. अगदी खऱ्या अर्थाने राजा रामदेवरायाचा काळ हा सुवर्णकाळ होता. साहित्य, कला, वैद्यकशास्त्र यातील प्रगती प्रशंसा करण्यासारखी होती. परंतु हे फार काळ टिकले नाही.
उत्तरेकडील शत्रू हा महाराष्ट्राच्या भूमीवर येऊन धडकला. देवगिरीवर शत्रूने आक्रमण केले. महाराष्ट्राची मंगल व पावन भूमी अफगाणी सैन्याने भ्रष्ट केली. दिल्लीचा सुलतान अल्लाउद्दीन खिलजी हा विंध्याचल तुडवीत महाराष्ट्राच्या भूमीवर चालून आला.
देवगिरीचा राजा रामदेवराय हा अत्यंत शूर होता. तो शत्रूला घाबरून पळून जाणारा नव्हता. राजा रामदेवराय हा निधडया छातीचा होता त्यामुळे त्याने शत्रूचा नक्कीच पराभव केला असता परंतु त्याच वेळी त्याचा पुत्र शंकरदेव हा मोठे सैन्य घेऊन घरभेदी असलेल्या शत्रूचा पराभव करण्यासाठी देवगिरीपासून खूप दूर गेला होता. त्यामुळे राजा रामदेवजवळ अगदी मोजके सैन्य होते. शत्रूने बरोबर या गोष्टीचा फायदा घेतला. राजा तरीदेखील डगमगला नाही. शत्रूचा पराभव करण्यासाठी त्याने खूप प्रयत्न केला. मर्द मराठयांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु शत्रूपुढे त्यांचा निभाव लागला नाही.
इकडे शंकरदेवाला ही बातमी समजली व तो लगेचच आपली मोठी फौज घेऊन पित्याच्या मदतीस आला. दोन्ही सैन्यात परत घनघोर युध्द झाले. खिलजीला आता आपला पराभव होणार हे दिसू लागले म्हणून त्याने दिल्लीहून मोठी कुमक आल्याची खोटी अफवा पसरविली. त्या बातमीने रामदेवरायाच्या फौजेचे धैर्य खचले व सैनिक माघार घेऊ लागले. रामदेवरायाचा विजय होणार असून देखील खोटया अफवेमुळे त्याचा पराभव झाला.
युध्दात पराभव झाल्यानंतर अल्लाउद्दीन खिलजीने रामदेवरायाकडून जबरदस्त खंडणी वसूल केली. त्याने रामदेवरायाचा खजिना पूर्ण रिकामा केला. नंतर त्याने देवगिरी लुटण्याचा हुकूम आपल्या सैन्याला दिला. मग काय, त्याच्या सैनिकांनी तेथू धुमाकूळ घालून सर्व स्त्रिया व मुले यांच्यावर अत्याचार केले. त्यांनी लुटून, जाळून देवगिरी नगरी उध्वस्त केली.
आपल्या प्रजेची अवस्था बघून राजा रामदेवराय फार दुःखी झाला परंतु त्याला काहीही करता येत नव्हते. अल्लाउद्दीन खिलजीने राजा रामदेवरायाकडून वार्षिक खंडणी देण्याचे करवून घेतले व तो दिल्लीकडे जाण्यास निघाला. तेथे गेल्यावर त्याचे मोठे स्वागत करण्यात आले. दिल्लीचा सुलतान आपण व्हावे म्हणून त्याने दिल्लीच्या आधीच्या सुलतानाची हत्या केली व तो दिल्लीचा सुलतान बनला व तो अजूनच क्रूर झाला.
खिलजीने राजा रामदेवरायाकडून खंडणी वसूल करण्यास सुरूवात केली. काही काळानंतर राजाला खंडणी देणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खिलजी खूपच चिडला व त्याने परत आपला सेनापती मलिक काफूरला सैन्य घेऊन देवगिरीवर चालून जाण्यास सांगितले. पुन्हा एकदा रामदेवराय व त्याचा पुत्र शंकरदेव यांनी अतिशय शर्थीने झुज दिली परंतु त्याच्या राक्षसी ताकदीपुढे देवगिरीचा निभाव लागला नाही. त्यामुळे राजा रामदेवरायाला कैद करण्यात आले. राजाचा अपमान करण्यात आला. इतकेच नाही तर त्याला अंधारकोठडीत टाकण्यात आले. काही काळानंतर नियमितपणे खंडणी देण्याचे राजाने आश्वासन दिले म्हणून राजाची सुटका करण्यात आली. परंतु रामदेवरायाचा अपमान झाल्यामुळे तो मनाने फार खचला होता व त्यामुळे काही दिवसातच त्याचा मृत्यू झाला.
रामदेररायाचा मृत्यू झाल्यावर त्याचा पुत्र शंकरदेव हा खूपच संतापला. त्याने दिल्लीच्या सुलतानाला खंडणी न पाठविण्याची जणू प्रतिज्ञाच केली होती. ते पाहून खिलजी परत सूडाने पेटला व त्याने परत एकदा मलिक काफूरला मोठे सैन्य घेऊन देवगिरीवर पाठविले.
शंकरदेवाने त्या फौजेशी निकराने झुंज दिली परंतु त्यात त्याला यश मिळाले नाही व दुर्दैवाने लढता लढता त्याचा मृत्यू झाला. शेवटी देवगिरीला कोणी वाली उरला नाही.
सुलतानशाहीने देवगिरी राज्याचे तुकडे पाडले. तेथे सुभेदारांच्या नेमणुका करण्यात आल्या व ते सुलतान स्वतःलाच सुलतान समजू लागले. त्यांच्या अत्याचाराला तेथील प्रजा खूप कंटाळली. प्रजेची ही अवस्था पाहून रामदेवरायाचा जावई हरपालदेव पुढे आला व त्याने प्रजेला धीर दिला. त्याने शत्रूला दहशत बसविली त्यामुळे काही काही का होईना प्रजेला धीर मिळाला. त्याने काही आक्रमकांना यमसदनास देखील पाठवले हे पाहून काही सुभेदार दिल्लीला पळून गेले.
दिल्लीला सुलतान अल्लाउद्दीन खिलजी याचा मृत्यू झाला. सिहांसनासाठी भांडणे सुरू झाली. या भांडणात मलिक काफूर मारला गेला व कुतुबुद्दीन दिल्लीचा सुलतान बनला. तो देखील अतिशय क्रूर होता. तो देखील काही सैन्य घेऊन देवगिरीवर चालून गेला. हरपालदेवाने देवगिरी वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु त्यांच्यापुढे त्याचे काही चालले नाही. शत्रूने त्याला ठार केले. देवगिरी परत लुटली गेली. देवगिरीची व्यवस्था पहाण्यासाठी परत जुलमी सरदारांची नेमणूक करून शत्रू दिल्लीला परतला.
परत एकदा त्यामुळे देवगिरीची अवस्था पूर्वीसारखीच दयनीय अशी झाली. ही परिस्थिती असताना दुसरीकडे सुलतानाने नेमलेले सरदार व त्यांचे शिपाई आपली स्वतःची चैन करण्यात मशगुल झालेले होते. त्यांनी प्रजेला अतिशय त्रास दिला. इतकेच नाही तर त्या सरदांरांनी दिल्लीच्या सुलतानाची सत्ता झुगारून दिली व ते स्वतःच सुलतान बनले.
अहमदनगरचा निजामशहा, विजामपुरचा आदिलशहा, बिदरचा बेरीदशहा, गोवळकोंडयाचा कुतुबशहा व एलिचपुरचा इमादशहा या सरदारांनी आपापली स्वतंत्र राज्ये स्थापन केली. या प्रदेशात अशा प्रकारे या प्रदेशात पाच सत्ता उदयास आल्या व त्यांनी हिंदू प्रजेला गुलामगिरीत ढकलले व त्यांच्यावर सत्ता गाजविण्यास सुरूवात केली. तेव्हा दिल्लीचे सिंहासन बाबराने बळकावले. दिल्लीत मोगल सत्तेचा उदय झाला जणू काही महाराष्ट्राच्या सुखाला ग्रहणच लागले होते.
क्रूर सुलतान | Krur Sultan हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
क्रूर सुलतान | Krur Sultan – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.