Bhas nakkich navta

भास नक्कीच नव्हता | Bhas nakkich navta

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Bhas nakkich navta

मी फारसा कुठल्या पार्टीला जात नाही, पण जवळच्या मित्रांचा आग्रह होता आणि तो मोडणे अशक्य होते त्यामुळे ‘मला कुणी ड्रिंकसाठी आग्रह करणार नाही कारण मी काही ड्रिंक्स करत नाही आणि मी फक्त नऊ वाजे पर्यंतच थांबेल’ या अटीवर जाण्यासाठी तयार झालो, खरे तर नऊ वाजता निघूनही घरी जायला ११ वाजणार होते आणि खुप उशीर होणार होता पण नाईलाज होता.

ठरल्या प्रमाणे सर्व एका शानदार हाॅटेल मध्ये एक एक करत जमा झालो. सर्व एकत्र जमा होऊन पार्टीला सुरवात होता होता आठ वाजून गेले. पेग वर पेग चढत गेले तशी पार्टी रंगात येऊ लागली, खुप दिवसांनी भेटलो होतो त्यामुळे खुप गप्पा झाल्या कुणी डान्स केला तर कुणी गाणे गायले कुणी किस्से सांगुन हसुन हसुन पुरेवाट केली नऊ वाजता मला निघायचे होते घड्याळात लक्ष गेले तर साडेदहा वाजून गेले होते.

आता बस्स…. आता निघायलाच हवे जवळपास ४० ते ४५ किलोमीटर प्रवास एकट्याने करायचा आहे रात्रीची वेळ आहे आणि रस्ता सुनसान आहे याची जाणीव होती त्यामुळे काळजी वाटू लागली. मित्रांना सांगण्याचा प्रयत्न करू लागलो पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हते. ‘ न पिण्याची तुझी अट मान्य केली ना! आता केव्हा निघायचे ते आम्ही ठरवणार’ .बोलू लागले. कसबस त्यांना पटवण्यात यशस्वी झालो तरीही पार्टी संपण्यास अजून एक तास लागलाच, दोन मित्रांना जवळच ड्राॅप करायचे म्हणून घेऊन निघालो.

जाता जाता त्यांना जवळच एका चौकात सोडले उतरताना गाडी सावकाश चालव, सुनसान रस्त्यावर कुठेही थांबवू नको आणि कुणाही अनोळखी माणसाला अथवा बाईला लिफ्ट देऊ नको असा अनाहूत सल्ला ही देऊन गेले.

आता मित्रांनी दिलेला सल्ला होता का दाखवलेली भिती होती हे काही कळाले नाही पण शहर अजून संपले नव्हते त्यामुळे बऱ्यापैकी रहदारी होती जसजसे शहर सोडून दूर जात होतो तशी रहदारी कमी होत गेली जसे शहर मागे गेले तसे एखाद दुसरीच गाडी दिसू लागली आता शहर खूप मागे गेले होते आणि हाय वे वर मी फक्त एकटाच होतो. पुढे जवळपास वीस पंचवीस किलोमीटर तरी कुठलेही मोठे शहर नव्हते काही गावे होती पण रात्रीची वेळ होती तेथे कुणीही नसणार याची जाणीव होती.

मी ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित करून कुठलेही दडपण घ्यायचे नाही ठरवून गाडी चालवू लागलो. या सुनसान रस्त्यावर कुणीही गाडी थांबवून लूटू शकतो याची जाणीव होती त्यामुळे काहीही झाले तरी गाडी उभी करायची नाही हे मनाशी पक्के केले. रस्ता सरळ होता गाडीचा प्रकाश दूरवर जात होता. दडपणामुळे एक्सिलेटरवरचा पाय दाबला जात होता गाडीचा वेग वाढला आहे हे लक्षात आल्यावर गाडी पुन्हा स्लो करत होतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला जंगल आणि अंधार होता गाडीचा प्रकाश अंधाराला चिरत गाडी वेगाने पुढे जात होती. पुढे अचानक वळण आले तसे गाडी जरा स्लो करून सफाईदार वळण घेऊन पुढे गेलो.

गाडीचा हेडलाईट पुन्हा रस्त्यावर पसरला तसे मनामध्ये चर् र….झाले एक आकृती त्या प्रकाशात रस्त्याच्या मधोमध दिसू लागली. गाडीचा वेग कमी केला एक माणूस हातवारे करून गाडी थांबवण्याचा इशारा करत आहे हे दिसू लागले, काहीही झाले तरी गाडी थांबवायची नाही प्रसंगी त्या माणसाला उडवून पुढे जायचे हे मनासी पक्के केले पण तरीही जसा तो माणूस गाडीच्या जवळ आला तसा मी करकचून ब्रेक दाबलाच त्याला उडवता उडवता त्याला लागूनच गाडी उभी राहिली. माणूस सुस्थितीत आणि सभ्य दिसत होता त्यामुळेच कदाचित ब्रेक दाबला गेला असावा ” साहेब प्लिज गाडी थांबवा इथे अॅक्सिडेंट झाला आहे जरा मदत करा ” त्याचा आवाज गाडीमध्ये घुमला.

मी घाबरतच बाजूला पाहिले तर खरोखरच अॅक्सिडेंट झाला होता एका कारने रस्त्याच्या कडेला झाडाला धडक दिली होती. कारच्या पुढच्या बाजूचा चक्काचूर झाला होता हे गाडीच्या प्रकाशात साफ दिसत होते. गाडीची काच खाली केली तसा तो माणूस बोलला ” साहेब गाडीमध्ये लहान मुल बेशुद्ध पडला आहे, त्याला लवकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्याचा जीव वाचेल, पुढचे दोघेही गेले आहेत पण त्यांची काळजी करू नका ते मी पहातो “.

मनातील भीती काहीसी कमी झाली, आपल्याला मदत करायची आहे या जाणिवेतून मी निर्धोकपणे गाडीतून उतरलो कारच्या जवळ गेलो मोबाईलच्या प्रकाशात गाडीत पाहिले मागील सीटच्या खाली एक पाच सहा वर्षाचे मुल पडले होते आणि पुढच्या सिटवरील दोघेही पुर्णपणे दबले गेले होते. त्यांना काढणे मला शक्य नव्हते आणि ते जिवंतही नाहीत याची खात्री झाली. बहूतेक ते या मुलाचे आई वडील असावेत. गाडीचा मागचा दरवाजा उघडला मुलाला उचलले मुलगा जिवंत आहे याची खात्री झाली त्याला उचलून माझ्या गाडीकडे नेले. गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी त्या माणसाकडे मदतीसाठी पाहिले तर तो जागेवरच नव्हता, कुठे गेला अंधारात? दिसला नाही म्हणून कसरत करत मीच दरवाजा उघडून त्याला मागील सिटवर झोपवले.

आता येथे थांबण्यात अर्थ नव्हता जवळच पाच सहा किलोमीटरवर हाॅस्पिटल होते ‘लवकर या मुलाला तेथे घेऊन जाऊ’ हा विचार करून गाडीत बसलो आणि त्या माणसाला आजुबाजूला पाहू लागलो तसा तो गाडीच्या बाजूला उभा असलेला आणि मला जायची खुण करत असताना दिसला मी जशी गाडी सुरू केली तसा हात जोडून उभा राहिला त्याच्या डोळ्यात काळजी आणि कृतज्ञतेची भावना दिसत होती.

मी वेगाने मुलाला घेऊन हाॅस्पिटल मध्ये जाण्यासाठी निघालो शहरात प्रवेश करताच पोलीस चौकी दिसली. पोलीस चौकी जवळ गाडी थांबवून गस्तीवरील पोलिसांना अॅक्सिडेंट आणि मुलाची कल्पना दिली एक पोलीस हवालदार माझ्याबरोबर हाॅस्पिटल मध्ये आले मुलाला हाॅस्पिटल मध्ये अॅडमिट केले गेले काही वेळातच डाॅक्टरांनी मुलाला चेक केले मुलाला मुकामार लागला आहे पण मुलगा व्यवस्थित आहे हे डाॅक्टरांनी सांगितले तसे बरे वाटले. पोलिसांना घटनेची मला माहीत असलेली माहिती दिली पण त्यांच्या चौकशीचा भाग असल्याकारणाने काही वेळ थांबावे लागेल असे त्यांनी सांगितले नाईलाज होता, घरी फोन करून उशीर होईल म्हणून सांगितले तसे खुप बरे वाटले.

काही वेळाने अॅम्बूलंसचा आवाज ऐकू येऊ लागला एक पोलीस गाडी आली मागोमाग अॅम्बूलंसही दाखल झाली, अॅम्बूलंसमधून दोन मृतदेह बाहेर काढून हाॅस्पिटलमध्ये नेण्यात आले. पोलीस गाडी मधून आलेले पोलीस इन्सपेक्टर माझ्याकडे आले माझी विचारपूस केली अपघाताबद्दल चौकशी केली मला माहीत असलेले पुन्हा त्यांना सांगितले मुलाला मदत केल्याबद्दल त्यांनी कौतुक केले.

मृतांची ओळख पटली आहे लवकरच त्यांचे नातेवाईक येतील तोपर्यंत तुम्ही देखील पाहून घ्या ओळखता का? त्यानंतर तुम्हाला जाण्याची परवानगी देतो बोलले. थोड्याच वेळात हवालदारांनी मृतांची ओळख पटवण्यासाठी मला एका रूम मध्ये बोलावले. दोन्ही मृतांना रूममध्ये स्ट्रेचरवर ठेवले होते. एका शवावरील चादर बाजूला केली ३० ते ३५ वयाच्या महिलेचा मृतदेह होता मी नाही ओळखत म्हणून मानेनेच खुणावले.

त्यानंतर दुसऱ्या मृतदेहावरील चादर बाजूला केली गेली, मी त्या मृतदेहाचा चेहरा पाहिला आणि हादरलोच… पायाखालची जमीन सरकली आहे असा भास (Bhas) झाला ज्या माणसाने गाडी थांबवली होती अगदी सेम त्याच्या सारखाच माणूस दिसत होता खर तर विश्वास बसत नव्हता, बहुतेक आपल्याला भास (Bhas) होत आहे असे वाटत होते, पोलिसाने ओळखता का? म्हणून विचारले पण मी नाही म्हणून सांगितले. पोलिसाला मनातले सांगितले असते तर त्याने विश्वास ठेवला नसताच पण खोटे सांगतो म्हणून आपल्यावरच संशय घेतला असता याची जाणीव होती.

मी रुमच्या बाहेर येऊन बाकावर बसलो जरासे पाणी प्यायलो आणि आपल्याला झालेला हा भास (Bhas) आहे दोघेही वेगवेगळे आहेत हे मनाशी पक्के केले. माझा फोन नंबर आणि पत्ता घेऊन आणि आपल्या चौकशीचे काम पूर्ण करून पोलीसांनी मला जाण्याची परवानगी दिली. खुपच उशीर झाला होता पहाटेचे तीन वाजून गेले होते, मी जाण्यासाठी निघालो.

हाॅस्पिटल मध्ये बसलो असताना एका रुग्णाच्या नातेवाईकाशी ओळख झाली होती, ते माझ्याच गावात रहात होते. जसा मी जाण्यासाठी निघालो तसे ते माझ्याजवळ आले आणि बरोबर येण्याविषयी विनंती केली मलाही सोबत हवी होतीच मी चला म्हणून सांगितले तसे त्यांनी त्यांचे सामान घेतले आणि माझ्या बरोबर निघाले. त्यांचे सामान मागील सिटवर ठेवले आणि मी गाडी सुरू केली काही वेळातच आम्ही आमच्या गावात पेहचलो जरा वेळाने त्यांनी गाडी थांबविण्याची विनंती केली त्यांचे ठिकाण आले होते.

मी गाडी थांबवली तसे ते उतरले आणि गाडीचा दरवाजा बंद केला मी ही निघायच्या तयारीत त्यांच्या कडे पाहिले, तसे ते काहीतरी सांगायचा प्रयत्न करत होते पण दरवाजा बंद असल्याने ऐकू येत नव्हते म्हणून मी गाडीची काच खाली केली तसे त्यांचे सामान गाडीत राहिले आहे असे त्यांनी सांगितले. ” अरे हो विसरोच”! असे बोलून मी मागचे दार उघडून त्यांचे सामान दिले. मनापासून धन्यवाद बोलून ते निघाले तसे मी ही गाडी चालू केली. पण लगेचच स्तब्ध झालो…….. गाडी थांबवली…. आणि विचार केला…….. तसे काहीतरी आठवले…… आपल्याला झालेला तो भास (Bhas) नक्कीच नव्हता (Bhas nakkich navta) याची खात्री झाली कारण गाडीच्या काचा बंद असूनही “साहेब प्लिज गाडी थांबवा इथे अॅक्सिडेंट झाला आहे जरा मदत करा ” हे स्पष्टपणे गाडीत कसे ऐकू आले?

संजय देशमुख
कर्जत

भास नक्कीच नव्हता | Bhas nakkich navta it हा कथा अवडला असल्यास शेअर करा.

भास नक्कीच नव्हता | Bhas nakkich navta – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share भास नक्कीच नव्हता | Bhas nakkich navta

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO