पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Both | The Couple | The Two
ज्यांची मुल पाखरां सारखी बाहेर देशात उडुन गेलीत त्यांना हि कविता समर्पित.
मुलगी आमची युरोपात असते
आणि मुलगा यूएस मध्ये असतो
इथे मात्र आम्ही दोघेच असतो
जावई मुलासारखा वागतो
सुनेतही मुलीचाच भास होतो
इकडे या इकडेच या
दोघांचाही आग्रहच असतो
इथे मात्र आम्ही दोघेच असतो !
हीचे महिला मंडळ आहे
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो
मला कसलीच आवड नाही
मी एकटाच घरी बसतो
कारण आम्ही दोघेच असतो !
संध्याकाळी ती सिरीयल बघते
आणि मी फिरायला जातो
बिल्डिंगमागे सूर्य डुबतो
मग मी आपसूक घरी येतो
कारण आम्ही दोघेच असतो !
एकदा मुलाचा फोन येतो
एकदा मुलीचा फोन येतो
काळजीने चौकशी करतात
आमचाही उर भरून येतो
कारण आम्ही दोघेच असतो !
नव्या नवलाईन जाऊनही आलो
स्वच्छ सुंदर सगळे पाहूनही आलो
पण ते सगळ मात्र तेवढच
काही म्हणा, तिकडे जीव गुदमरतो
कारण आम्ही दोघेच असतो !
नाही तक्रार नाही कसलीच इथे
आणि नाही कसली तक्रार तिथे
नाही कसली अडचण सुखाची
पण इथली सगळी वर्षे आठवतो
कारण आम्ही दोघेच असतो !
भांडण तंटे आमचे खूप होतात
नसते तिला स्मरण नि मला आठवण
खरे तर काहीच नसते वादाचे कारण
मग आम्हीच आम्हाला समजावतो
कारण आम्ही दोघेच असतो !
खरोखर तिला कवठी चाफा आवडतो
तो एकाच फुलवाल्याकडे मिळतो
नेहमीच तो मिळतो असे नाही
पण तो आला कि मी नक्की आणतो
कारण आम्ही दोघेच असतो !
हल्ली कधी कधी ती भावुक होते
तुमच्याआधी मला जायचय म्हणते
मग मी म्हणतो, माझे कसे होणार ?
म्हणते कशी, तुम्ही असेच स्वार्थी !
मी जाणार त्याचे काहीच नाही
काळजी काय, तर माझे कसे होणार ?
लुटुपुटुचे असते हे तिचे नि माझे
यावर तीही मग हसते नि मीही हसतो
कारण आम्ही दोघेच असतो !
कारण आम्ही दोघेच असतो !