पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Jayant Moghe
शाळेतली गोष्ट आहे. १० वीच्या वेळेची. परिक्षेचं आणि परिक्षेमुळे वातावरण तापायची सुरुवात झाली होती. शाळेत प्रिलीम चालू झाल्या. तसा मी बर्यापैकी गुण मिळवायचो. (ज्याचा आता पश्चात्ताप होतो. उगाच ओझं वाढतं अपेक्षांचं. असो.) पण दोन विषय मला कध्धीच झेपले नाहीत, एक म्हणजे भुगोल, दुसरं म्हणजे भुमिती. हे दोन्ही विषय मला भुईसपाट करायचे. प्रिलीमला मला भुमितीत ५०% मिळाले आणि घर नागासाकी झालं. सर्वांना त्याची झळ लागली. त्यात ५०% म्हणजे फाऊल धरु लागण्याची सुरुवात झाली होती तेव्हा. काय करावं अशी चर्चा चालू असताना मोघे आजोबांकडे पाठवायचा निर्णय घेण्यात आला.
जयंत मोघे( Jayant Moghe ), म्हणजेच मोघे आजोबा. आमचं नातंही तसंच होतं, आजोबा-नातवाचं. शाळेच्या जवळंच त्यांचं घर होतं. त्यामुळे ‘इमर्जन्सी’ आली की नेहमी धावत धावत त्यांच्याकडे जायचो. आमच्या घरातील प्रत्येक कार्यक्रमाच्या लिस्टमधल्या पहिल्या नावांमध्ये मोघे आजी-आजोबांचं नाव असायचंच. रिटायर झाल्यानंतर त्यांच्याच भाषेत सांगायचं तर दंडाचं मांस खायला ते रोह्यात आले. बर्याच वर्षांनंतर वेळ घालवण्यासाठी म्हणून ते गणित शिकवू लागले. ‘ब्रिलिअंट’ तर ते होतेच गणितात पण त्यांच्याकडे ना शिकवण्याचीही हातोटी होती. त्यांनी कधी औपचारिकपणे शाळेत वगरे शिकवलं नाही कधी पण तरीही एखाद्या शिक्षकाप्रमाणेच किंवा त्याहूनही जास्त आत्मियतेने शिकवायचे ते. खरा हाडाचा शिक्षक होता तो.
वयोपरत्वे ऐकू कमी यायचं त्यांना, त्यामुळे असेल किंवा घडण कोल्हापुरची होती त्याने असेल पण आवाज एकदम खणखणीत. मी त्यांच्याकडे भुमितीमधलं माझं रिकामं मडकं घेऊन जाऊ लागलो. मला जमायचं नाही आणि आवडायचंही नाही. १ महिना होता फक्त परिक्षेला. ते मला प्रत्येक गणित अन् गणित सोडवायला लावायचे. ४० गणितांमधली परिक्षेला येऊ शकणारी २० महत्त्वाची गणितं बाजूला काढण्याची पध्दत त्यांना वर्ज्य होती. हळुहळु अख्खं पुस्तक माझ्या हाताखालचं झालं. मला भुमिती आवडू लागली. प्रमेयांबद्दलचा द्वेष दूर होऊन प्रमेयांबद्दलची प्रणयाची भावना जोर धरु लागली. मला दहावीला सर्वांत जास्त गुण भुमितीत मिळाले. नापास होतो की काय अशी भिती वाटणार्या विषयात पैकीच्यापैकी मिळाले होते.
दोन वर्षानंतर त्यांनी रोहा सोडलं. ते कोल्हापूरला कायमचे स्थायिक झाले. नंतर फोनवरून बोलणं व्हायचं. खणखणीत आवाजाला हळुहळु आलेलं कापरेपण जाणवू लागलं. कोल्हापूरला नेहमी बोलवायचे. दरवेळी घरी बोलणं व्हायचं. येणार्या सुट्टीमध्ये रिझर्वेशन करुन जाऊ असं ठरायचं. दोन महिन्यांपुर्वीच आईचं आणि माझं बोलणं झालं की नोव्हेंबरचा अटेंप्ट झाल्यावर जाऊ म्हणून. ट्रेन पण ठरली. आणि थोड्याच दिवसांत फोन आला, आजोबा गेले…
काही योग फार दुर्दैवी असतात. तसाच हा आजचा दिवस. आज शिक्षक दिन आणि आजच आजोबांना जाऊन बरोब्बर तेरा दिवस झाले. शिक्षक दिन आयुष्यभर सलत राहिल आता. बाकीच्या गोष्टींबाबत बोलण्याची माझी मुळीच पात्रता नाही, पण आजोबा, एक गोष्ट मी नक्कीच सांगु शकतो की तुम्ही नावाप्रमाणे जिंकून गेलात, एक शिक्षक म्हणून, गुरू म्हणून, पण जाताना ह्या चेल्याला हरवलंत, कायमचं….
-©मोहित
जयंत | Jayant हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
जयंत | Jayant – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.