मला तर बाई सगळं कसं...🙄 - Mala Tar Bai Sagla Kasa

मला तर बाई सगळं कसं…🙄 | Mala Tar Bai Sagla Kasa

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Mala Tar Bai Sagla Kasa

या वाक्यानं सुरुवात करून पुढं नीटनेटकंच, लख्खच, खलबत्त्यातलंच लागतं..! असं काहीतरी कौतुकानं जोडणाऱ्यांचा मेंदू काढून नळाखाली खळखळ धुवावासा वाटतो!

स्वच्छता कुणाला आवडत नाही? पण सारखीच झाडलोट करायची, कानकोरण्याच्या जुडग्यातल्या चपट्या टोकदार काडीनं घराचे कानेकोपरे खरवडायचे, मशीन असतानासुद्धा हातानं कपडे चोळून चोळून धोपटायचे असले शौक कसे काय परवडतात?? एकवेळ हेही परवडलं पण आज काहीच काम नाही म्हणून ‘डबे घासायला’ काढून, बसलेल्या गांजण्या उठवणारी जात तर भयंकर!!

स्वयंपाक, धुणीभांडी, केरवार करायला यायलाच पाहिजे नो डाऊट! बेसिक गरजा आहेत त्या आपल्या. त्यामुळं पोरापोरींना ते येणं मस्ट! पण त्यात एवढं एक्सपर्ट होण्याची काय गरज? उठल्यापासून जे घरकामं उपसायला घ्यायची, ‘अस्संच तस्संच’ च्या अट्टाहासानं दुपारपर्यंत त्यात वेळ घालवायचा, ‘हे सगळं झाल्याशिवाय मला जेवणच नाही जात’ म्हणायचं आणि मग दमले म्हणून दोन तीन तास झोपा काढायच्या… पुन्हा संध्याकाळी सगळे घाट रिपीट.. कशाला?? मागच्या पिढ्या यातच मेल्या.

ह्या गोष्टी सोडून बाकीचं लै काय काय येत असतं आपल्याला.. घरची कामं पटापट आवरून कधी नसला मूड तर बाजूला ठेऊन आपल्यातल्या कलाकाराला मोठं व्हायची संधी दिली तर नाही का चालणार? नुसतंच म्हणायचं, “मला पण काहीतरी करायचंय! पण घरातल्या कामांमुळं, पोरामुळं अज्जिबात वेळ नाही मिळत!”कसा मिळेल?? एक दिवस राहिली फरशी पुसायची तर राहूदे की काय बिघडत नाही.. या गोष्टी आवडतच असतील आणि यासाठीच आपला जन्म झालाय हे मनाशी पक्कं असेल तर शुभेच्छा! पण जर कळतंय की ह्या ‘उठारेटीत वेळ घालवण्यात पॉईंट नाही’ आपल्याकडं माणूस म्हणून दुसऱ्याही क्षमता आहेत तर झटावं ना त्यासाठी! सोडून द्यावेत हट्ट! पण नाही.

रोज घालायच्या चड्ड्या बनियन सॉक्सच्या बारीक घड्या घालून काय मिळवायचं असतं काय माहीत! ‘द ग्रेट इंडियन किचन‘ नावाचा मल्याळम पिक्चर बघितला परवा! डान्सर सूनेनं चुलीऐवजी गॅसवर भात शिजवला, मिक्सरमध्ये चटणी वाटली तर चालत नाही सासऱ्याला.. ‘याला चव नाही’ म्हणतो. एवढी लाडाची असेल तुझी जीभ तर तूच कर ना! एकतर ती करियर साठी धडपडतेय तर तिला तुम्ही नोकरीची परमिशन देत नाही! तिनं चोवीस तास घरात राबायचंय! तुम्ही जेवून उठल्यावर सांडलेलं खरकटं भरण्यापासून सगळं तिनंच बघायचंय!

कॅमेरा पुन्हापुन्हा बेसिनमधल्या भांड्यांच्या ढिगावर फिरत राहतो.. आपल्या किचनचा ‘ग्रेटनेस’ टिकवण्यासाठी किती बायका खपल्यात याची जाणीव करून देत राहतो! त्यामुळं घरातल्या बाकीच्यांनीही चोचले बाजूला ठेवून, स्वतः हातभार लावून ‘आहे तस्संच चालवून घेणं’ही तितकंच महत्वाचं! नोकरी करणाऱ्या बायकांची तर दया येते कधीकधी. मीही गेलेय त्यातून. आत्ता वाटतं कसं निभावलंय आपण? दिवसभर मेंदू थकवायचा आणि घरी आल्यावर ‘काहीतरी चमचमीत’ च्या फर्माईशीसाठी पुन्हा राबत राहायचं. झोपेपर्यंत किडुकमिडुक कामं करत राहायचं..

‘घरातली कामं’ हा विषयच बोअर! ‘एक्सेलच्या बारीक बारीक चौकड्या भरत बसणं लाखपटीनं बरं त्यापेक्षा’, असं खूपदा वाटलंय मला!ज्या घरात काहीही करण्याचं स्वातंत्र्य असतं त्यापेक्षा जिथं ‘काहीही न करण्याचं स्वातंत्र्य असतं’ ते घर मला माझं वाटतं! खूप पसारा करतो बिल्लू.. प्रत्येकवेळी नाही उचलावासा वाटत.. ‘सगळं कसं जिथल्या तिथं’ असायला म्युझियम नाहीये हे..घरय माझं!

व्हॅक्युम क्लिनर आज नाही फिरवायला जमला पण तेवढ्या वेळात थोडं व्हिडीओ एडिटिंग झालं..आनंद आहे! संध्याकाळी काहीतरी लिहावंसं वाटतंय पण स्वयंपाकही करायचाय अशावेळी ‘चकुल्या’च बेस्ट! भांडी घासायची मशीन असली तरी आधी भांडी धुवून मग त्यात लावायला लागतात. अतिबोअर काम! दिवसातनं एकदाच या पाट्या टाकायच्या!

बाकी कपाटं लावणं, कूट-खोबरं बारीक करणं, भाज्या निवडणं असल्या फालतू कामांना अज्जिबात प्रायोरिटी न देता ती बिल्लूला बघत जमतील तशी करायची. घरकामांशी संबंधित माझा कामधंदा असता आणि त्यातून आनंद मिळत असता तर जीव ओतून केली असती मी ही कामं. पण तसं नाहीये ना..त्यापलिकडं दुसरंही काहीतरी आवडतं मला..येतं!

आत्ताही किचनमध्ये पसाराय.. बाथरूम घासायचंय.. पण आधी हा लेख पूर्ण झाला पाहिजे! पुढं शिकावं म्हणतेय..ऍडमिशनसाठी एक वेबसाईट चेक करायचीय तीही लगेच करते. त्याशिवाय समोर “ळ” आकारात पडलेली पँट उचलाविशी नाही वाटणार…❤️

गौरी सागांवकर देशमुख

मला तर बाई सगळं कसं…🙄 – Mala Tar Bai Sagla Kasa हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

मला तर बाई सगळं कसं…🙄 – Mala Tar Bai Sagla Kasa – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share मला तर बाई सगळं कसं…🙄 – Mala Tar Bai Sagla Kasa

You may also like

One thought on “मला तर बाई सगळं कसं…🙄 | Mala Tar Bai Sagla Kasa

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock