My Nishu

माझी निशू…| My Nishu (Nishigandha Wad)

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

My Nishu (Nishigandha Wad)

सर्वपित्री अमावास्येला माझ्या पोटात दुखू लागले. डॉ. ललिता देवधर यांच्या ठाण्याच्या प्रसुतिगृहात मी ह्यांचे सोबत गेले. ‘कळा थांबण्याचे इंजेक्शन देऊ का?’ त्यांनी विचारले ( कारण सर्वपित्री अमावास्या ) मी म्हणाले, “नको, माझं बाळ जगात येऊ पाहातंय. त्याला त्याच्याच इच्छेने जन्मूदे. “आणि दुपारी १ वाजून ८ मिनिटांनी १९६९ ला माझी दुसरी मुलगी जन्मली.

पहिली प्राजक्ता म्हणून हिचे नाव मी हौसेने निशिगंधा ठेवले. नाकेली, मोठ्या मोठ्या पाणीदार डोळ्यांची माझी निशू लहानपणापासून इतकी धिटुकली होती की सा-यांची लाडकी होऊन जाई. बालवर्गात तिच्या गाड बाई तिला ‘टमाट्या’ म्हणत कारण थोडी पळाली तरी गाल लालेलाल ! हेडगुरुजी पाटील यांच्याबरोबर डबा खाणारे पिल्लू एकच ! निशू माझी [My Nishu (Nishigandha Wad)].

निशू लहानपणापासून इयत्ता २ री ते ७ वी बालनाट्याचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक प्रत्येक आंतरशालेय स्पर्धेत फक्त निशूचेच असे. नंदादीपच्या वीर कथाकथन स्पर्धेचा पहिला क्रमांक केवळ निशूचाच इयत्ता ६वीत तिला अभिनयाची राष्ट्रीय शिष्यवृत्ती मिळाली नि तिचे जग बदलले. इयत्ता ७वी त ‘दुर्गा झाली गौरी’त विदूषक होती. इयत्ता ९वीत तिने अमोल पालेकरांचे एक नाटक केले नि दहावीत मोरुची मावशी. त्याचा रोजच प्रयोग असे. तिची एंट्री येई तो रंगपटात ती अभ्यास करी. इतके करुनही ती एस् एस् सीला बोर्डात पहिल्या पन्नासात होती. नाटकाची ती राष्ट्रीय शिष्यवृत्ती श्रीमती सुलभा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तिने बीए पर्यंत टिकविली. अकरावीत मोहन वाघांकडे ती काम करु लागली. ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘मदनबाधा’ अशी नाटके. अश्विनीची (भावे) परीक्षा असली की ‘वासूची सासू’ चे प्रयोग निशूच करुन देई.

निशू रुपारेल कॉलेजमधून १२वीला बोर्डात तिसरी आली तेव्हा आजोबा म्हणाले, ‘नंद्या, तुला लॉटरी लागली!’ किती कौतुक प्रि. प्रधान सरांनी केले. निशिगंधा त्यावेळी आत्माराव भेंडे यांच्याकडे ‘आव्हान’ ही दूरदर्शनची मालिका करीत होती आणि एकच वाहिनी असल्याने निशू प्रचंड लोकप्रिय झाली होती ८८-८९ या काळात. या सर्वात लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ‘आव्हान’ साठी तिने आठ अँवॉर्ड्स पटकावली याचवेळी चतुरस्त्र अभिनेत्रीचे नाट्यदर्पणचे सुहासिनी मुळगावकर परितोषिकही तिने पटकावले.

१९९० मध्ये बीए पहिल्या वर्गात ऊच्च श्रेणीत पास झाल्यावर ती मला म्हणाली, “आई आता वडवड थोडी थांबवते. फक्त नाटक, मालिका, चित्रपट करते. अभ्यास नि कलाक्षेत्रात दमछाक झाली गं.” किती खरे होते ते ! आम्ही पहात होतो ना !

निशिगंधाच्या आयुष्यात आता एक देखणा युवक आला होता. निशूवर त्याचे फार प्रेम होते. एकनिष्ठ उपासक अगदी. ‘ताईचे झाले की मगच!’ निशूचे उत्तर ठाम. तो दीपक देऊलकर. ताईचे लग्नही प्रेमलग्नच. ९ मार्च १९९३ ला ताईचे लग्न झाले आणि घरी परतताना, ती म्हणाली, ‘आई, आता मी पण लग्न करते पुढल्याच महिन्यात.’ किती रडलो आम्ही. दोन्ही चिमण्या एक महिन्याच्या अंतराने भुर्रर्र उडाल्या.

निशूने लग्न गोव्यास मंगेशीच्या मंदिरात केले. का? आईस खर्च नको. १९९० ते २००० या दशकात तिने ५० मराठी चित्रपट केले. काही हिंदीही केले. पण निशूने कधीही लांडे कपडे वापरले नाहीत. ‘फॅमिलीने एकत्र बसून बघावे असेच चित्रपट मी करने’ हा पक्का उसूल मला ती सांगे, “आई, माणसे विचारुन बघतात. पण खरं सांगू का? आपला हात जेवढा पुढे जातो ना तेवढाच दुस-याचा जातो. लक्षात ठेव, तू दिलेल्या संस्कारांचं बळ माझ्या पंखात आहे. माझ्या स्वातंत्र्याचा गैरअर्थ मी कोणासही काढू देणार नाही. “ निशूने आपले बोल खरे केले. दीपकने तिला मोलाची विश्वासू साथ दिली. इंडस्ट्रीत विश्वास फार महत्त्वाचा ना !

१९९९ मध्ये ती म्हणाली, “आता आई होते.” नि ईश्वरी १८ डिसेंबर १९९९ ला जन्मली. निशूने सुखविधान. ईश्वरी यवढी सुंदर निपजली नि तेवढीच संस्कारी.

निशूचे पती दीपक देऊलकर नि निशू दोघं सारख्याच मोहमयी व्यवसायात. दीपक संगीत मराठीचा चॅनल हेड आणखीही काही चॅनल त्याच्याकडे आहेत पण परस्परांतला विश्वास अनमोल !

निशूचे नाव इंडस्ट्रीत फार चांगले आहे. नो गॉसिप्स.

इ.स. २००३ मध्ये तिने मुंबई विद्यापीठाची ‘नाट्यशास्त्र’ विषयातली पीएचडी मिळवली. त्याबद्दल तिचा दिल्लीत सत्कार केला गेला. तिचे ३ चित्रपटही ३ दिवस दिल्लीत दाखवले गेले.

इ.स. २०१३ मध्ये कोलंबो विद्यापीठाने तिला दुसरी पीएच् डी दिली. ती १००० व्याख्याने ‘महिला सबलीकरण’ या विषयात दिल्याबद्दल ‘वूमन एपॉवरमेंट’ या विषयात.

आता ती शांताबाई शेलेकेच्या कवितांवर तिसरी पीएच् डी करत्येत तिची सामाजिक जाण खोलवर अंतरात रुजली आहे. कुणाला शिकायला आर्थिक आधार दे. कुणाची पडकी घरे बांधायला मदत कर… सारखे अबोलपणे चालूच असते. या साठी महाराष्ट्र शासनाने महात्मा गांधी पुरस्कार देऊन २०१६ त तिचा गौरव केला. आई बापांना ती विठो-रखुमाई मानते. ताईवर मनापासून प्रेम करते. ईश्वरी तिचे सर्वस्व आहे.

आपल्या सासूचा प्रेमाने सांभाळ करणारी निशू सासूला काळजाचा तुकडा वाटते. आई बापाला नित्यनेमाने पेन्शन देते निशू म्हणते, ‘माझ्या हातांना ही सवय राहू दे.’ आम्हाला तिचा मोठा मानसिक आधार आहे. जरा खुट्ट झाले तरी धावत येणार पोर !

निशिगंधाची एक आठवण ! विश्वकोशाच्या अठराव्या खंडाचे प्रकाशन कोल्हापुरात होते. कोल्हापूरचें महाराज आलेले म्हणाले, “विजयाबाई ह्या खंडाच्या प्रमुख संपादक आहेत.

अभिनंदन! पण आम्ही त्यांस ओळखतो ते रुपेरी पद्यावरल्या सालंकृतं, सोज्जवळ अभिनेत्रीची अर्थातच निशिगंधाची आई म्हणून !”

किती धन्यता वाटली मला. निशूची सात पुस्तके प्रकाशित झालीयत दोन पुस्तकांना राज्य पुरस्कार ! फुलपंखी आणि इवलू टिवलू.

साडेतीन वर्षांची असताना दूरदर्शनवर ‘चिमणीचं पिल्लू म्हणून ‘स्टार्ट’ झालेली निशू आता चांगले बस्तान कलाक्षेत्रात बसवून आहे. ती आमचा आधार, ताईचा विश्वास नि दिपक, ईश्वरीचा विसाव्याचा थांबा !

-©डॉ. विजया वाड

माझी निशू…| My Nishu (Nishigandha Wad) हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

माझी निशू…| My Nishu (Nishigandha Wad) – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share माझी निशू…| My Nishu (Nishigandha Wad)

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO