weaning
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Weaning

खरं म्हणजे मी त्या अत्यंत सुदैवी आयांपैकी एक आहे ज्यांची मुलं समोर येईल ते न तक्रार करता खातात! माझी मुलगी आणि मुलगा दोघेही लहान होती तेव्हा मी ज्या छोट्या छोट्या गोष्टी पाळल्या त्याचा फायदा मला आज होताना दिसतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

साधारण विनिंग (weaning) च्या पिरियड पासून सांगायचं झालं तर आपण बाळांना खिमट, पेज, खीर वैगरे देत असतोच. परदेशात मुलांना मीठ,साखर काहीही नसलेल्या फक्त प्लेन प्युरे खायला घालतात असं मी ऐकलं होतं. पण आपल्याकडे आपण असं करत नाही. त्यामुळे सुरुवातीला खिमट देताना त्यात मीठ, किंचित हिंग, हळद व मीठ, साखर, तूप घालून सुरुवात केली.

त्या आधी अर्थातच मामाच्या मांडीत बसून खिरीचे उष्टावण करून घन आहाराची सुरुवात झाली. मग दिवसातल्या चार वेळा विभागून घेतल्या एक वेळ खीर/नाचणी पेज, दुसऱ्या वेळी खिमट, तिसऱ्या वेळी उकडलेलं सफरचंद/बटाटा किंवा पपई/आंबा/चिकू /खरबूज यासारख्या मऊ फळांचा गर आणि चौथ्या वेळी भाताची पेज किंवा कणकेची/मुगाची/रव्याची /राजगिरा/लाह्यापीठ /तांदूळ यांची खीर किंवा मग वरण भात मऊ कुस्करून.

यात अनेक प्रयोग करत राहिले. कधी टोमॅटो-बीट सूप,पालक सूप,डाळींचे व भाज्यांचे सूप, खिमट मध्ये रोज एक भाजी घालणे (अगदी शेपू,गवार, दोडका,दुधी, घोसाळी,चवळी, करडई,अंबाडी सगळंच!) या वेळा अर्थातच बदलू शकतात मुलं एक वर्षाची झाली आणि खिमट प्रकार बंद करून पोळी /भाकरी कुस्करून आमटी किंवा वरण यातून सुरू केले. यात घरात जी भाजी केली असेल त्याचा एक घास मिक्स करायचा. भाताचे वेगवेगळे प्रकार करून दिले. मुलं दीड वर्षाची झाल्यावर आमच्या सारखंच त्यांचंही ताट वाढायला सुरुवात केली. अगदी नखभर चटणी, लोणचं, एखादा चमचा कढी, आमटी, सार जे असेल ते.

Cerelac नावाचा प्रकार मी कधी वापरला नाही त्यामुळे त्याबद्दल काही सांगू शकत नाही. मुलं 2 वर्षांची झाली आणि मी त्यांना हाताने जेवायला प्रोत्साहन देऊ लागले. त्यांनीच चिऊ काऊ चे घास करायचे आणि मी गोष्टी सांगत त्यांनी ते हाताने खायचे. सुरुवातीला मला मदत करावी लागली पण फक्त 15 दिवस.

मुलं एखाद्या गोष्टीला नको म्हटली की मी मारहाण, आक्रस्ताळेपणा न करता ‘ठीक आहे’ म्हणून माझं ताट घेऊन जेवायचे. बेताब मधल्या सनी पाजी च्या आवाजात त्यांना सांगायचे ‘खाना है तो येही खाना है, नही खाना है तो भी येही खाना है’

आईला आपण जेवणासाठी ब्लॅकमेल करू शकत नाही हे त्यांना तेव्हाच समजून गेलं.

काहीतरी अमिषाच्या बदल्यात किंवा आई वडिलांवर उपकार म्हणून नव्हे तर आपल्याला गरज आहे म्हणून जेवायचं हे त्यांच्या मनावर बिंबल पाहिजे. वेगळं काहीही करून दिलं नाही, अपवाद फक्त आजारपणाच्या दिवसांचा.

मुलं शाळेत जायच्या वयाची झाली तशी त्यांना भाजी आणायला आणि किराणा दुकानात घेऊन जायला लागले. धान्य पेरणी पासून ते अन्न ताटात येईपर्यंत काय काय घडतं हे त्यांना थोडं समजेल अशा भाषेत सांगत गेले. डाळी, मसाले ओळखणं, भाज्या ओळखून सॉर्ट करून फ्रीजमध्ये ठेवणे,किराणा भरायला मदत करणे यात मुलांना सहभागी करून घेतले. मग हळूहळू पदार्थ बनतात कसे,त्यांना बनवता येण्यासारखे कोणते पदार्थ आहेत हे त्यांना समजावलं. त्यांना किचन मध्ये मनोसक्त वावरू दिलं.

आई आपण गुळपोळी करायची का’ अस मुलाने मे महिन्यात विचारलं तेव्हा त्यांना पदार्थांचे ‘स्वभाव’ सांगावे लागले. म्हणजेच कोणता पदार्थ उष्ण असतो कोणता थंड किंवा मैद्या सारखे न्यूटरल कोणतेही गुण नसणारे पदार्थ.

त्यासाठी अगदी सोपा उपाय म्हणजे आपले सण असतात तेव्हा केले जाणारे पदार्थ, सिझनल फळं आणि भाज्या. त्यामुळे दिव्यांच्या अवसेला केलेले दिवे, नागपंचमीला करतात ती दिंड, नारळी पौर्णिमेला केला जाणारा नारळीभात, दहीहंडी चा गोपाळकाला, गुढीपाडवा असताना केलं जाणारं श्रीखंड याची सांगड त्यांना सहज घालता आली.

मात्र काही गोष्टी मी आवर्जून फॉलो करते त्या अशा:

★ सगळ्या भाज्यांचे पराठे करून मिळणार नाहीत. भाकरी सोबत खायच्या पालेभाज्या /भाज्या यांची पहिल्यापासूनच सवय लावली (वय वर्ष 2 चे असल्यापासून)

★ भाकरी पोळी सोबत गुळाचा छोटा खडा व तूप एखाद्या दिवशी भाजी कमी पडलीच तर तोंडी लावायला घट्ट वरण, त्यावर तिखट मीठ तेल व कांदा.

★ चटणी (तीळ,जवस,खुरासनी,शेंगदाणे)टाकायची नाही. मुळात अन्न पानात टाकायचं नाहीच.

★ घरात sauce, जॅम,बिस्किटे यांच्या अगदी छोट्या बाटल्या /पॅकेट्स आणायच्या. आता असं झालंय की मोठे पॅक आणले तरी जास्त वापरलं जातच नाही.

★ महिनाभर पानात जे येईल ते खाल्लं की मग मॅगी खाऊ शकता.

★ पोळी सोबत चीज /जॅम/दही असल्याशिवाय न जेवणारी मुलं बघितली आहेत. तो प्रकार मी टाळला कारण प्रत्येक गोष्ट दरवेळी घरात असेलच असं नाही.

★ 15 दिवसातून एकदा मुलांनी मेनू ठरवायचा आणि आईला तो करायला बाबांनी व मुलांनी मदत करायची.

★ चिवडा, चकली, लाडू(रवा नारळ,बेसन,नाचणी, कणिक पोहे,डिंक, अळीव हिरवेमुग -उडीद इत्यादी), ड्रायफ्रूट,फळं, अंडी दिसतील अशा ठिकाणी तर फरसाण, शेव (घरात असलंच तर) न दिसेल अशा ठिकाणी ठेवायचं.

★ मुलांनी दूध घेतलं नाही तर ठीक आहे. मागे लागायचं नाही. पण हेल्थ ड्रिंक्स नाही!

★ दुधा ऐवजी ड्रायफ्रूट, चिक्की,कुठलीही वडी किंवा लाडू,फळं यापैकी काहीही खा.

★ Preservatives बेस्ड अन्न मुळातच फार कमी आणलं जातं माझ्या घरात याचं कारण आता मुलं देखील लेबल्स वाचतात.आणि वेगवेगळ्या नावांखाली दडलेली साखर व केमिकल्स त्यांच्या लक्षात येतात.

★ हॉटेलिंग पूर्वी महिन्यातून एक दोनदा व्हायचं पण आता पूर्णच बंद आहे.

★ घरचं कढवलेलं तूप आणि शेंगदाणा तेल रोजच्या आहारात हवेत, तिळाचे तेल लोणच्या साठी तर ऑलिव्ह तेल पास्ता,हमस करण्यापुरते वापरते.

★ मधल्या वेळचा खाऊ लाडू,शंकरपाळी, फळ,वड्या, घरी केलेले केक्स, धिरडी,ऑम्लेट,शेंगदाणे-गूळ, फुटाणे, चुरमुरे, किंवा मोड आलेली कडधान्य.

★ नॉनव्हेज आवडतं पण तेही महिन्यातून एकदा होतं माझ्याकडे. आता कोविड काळात बुचरी मधून किंवा बाहेरून आणायला नको वाटतंय.

★ रात्री बहुतेक वेळा माझ्याकडे वन डिश मिल असतं(उकडशेंगोळे, खिचडी-सार/कढी/ताक, वरण फळं, थालीपीठ, सिंधी कढी-भात व एक साईड डिश, वडा भात, गोळे भात, राजमा पराठा/भात, मिक्स डाळींचे डोसे इत्यादी )

★ फॅड बस्टर्स : किवी ,ड्रॅगन फ्रुट, avocado एकदम भारी पण बोर,जांभळं चिंच ‘लो प्रोफाइल’ असं काही मुलांना सांगायची वेळ आली की पूर्ण गैरसमज दूर होईल असं सांगायचं. उदा:आपल्या एंझाईम्स ला पिढ्यान्पिढ्या काय चालतं, स्थानिक अन्न खाण्यात आपला, शेतकऱ्याचा आणि स्थानिक व्यापाऱ्यांचा काय फायदा असेल ते सांगण्याचा प्रयत्न करते.

★ पाण्याच्या इनटेक कडे व शारीरिक हालचाल होतेय ना भरपूर याकडे लक्ष ठेवते.

★ आता ‘जंक फूड’विषयी :

शक्यतो घरी करण्याच्या भानगडीत पडत नाही. (त्यामुळेच फोटू टाकता येत नाही) त्यामुळे आपोआपच खाण्यावर नियंत्रण राहतं.

Weaning -© गौरी साळवेकर

महिन्यातून एकदा किंवा दोनदा बाहेर खातो किंवा मागवतो.

विनिंग | Weaning हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

विनिंग | Weaning – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share विनिंग | Weaning

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO