Swaraswamini

स्वरस्वामिनी | Swaraswamini (Asha Bhosle)

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Swaraswamini (Asha Bhosle)

यदाकदाचित तुम्ही जर मुंबईत असाल आणि तेसुद्धा कलानिकेतन, केसन्स किंवा इन स्टाइलच्या आसपास असाल, जर तुम्ही कोलकत्यात असाल आणि मीरा बसू अथवा कुंदहारच्या नजीक असाल, जर तुम्ही पुण्यात असाल आणि टिळक रोडवर नीलकंठ प्रकाशनच्या जवळ असाल, तर तिथे किंवा अगदी मंडईत गेलेले असाल, तर तिथे तुम्हाला भुईमुगाच्या शेंगा अथवा गुलाबी पेरूची खरेदी करताना एक व्यक्ती सहज भेटू शकते. त्या व्यक्तीने जगभरातील तमाम स्वरमंचांवरून रसिकांच्या मनाचा ठाव अगणित वेळा घेतलेला आहे हे सांगूनही खरे वाटणार नाही इतक्या साधेपणाने, सहजपणाने तुम्ही त्या व्यक्तीपर्यंत पोहोचू शकता. ती व्यक्तीही तुमच्याशी दिलखुलासपणे बोलेल. खळाळून हसेल आणि आयुष्यात तुमचा तो दिवस सार्थकी लागून जाईल. हो, तुम्ही ओळखलंय, त्या स्वरस्वामिनीचे नाव आहे ‘आशा भोसले.’ (Asha Bhosle)

वयाच्या दहाव्या वर्षी माइकसमोर कारकीर्द सुरू केलेल्या आशाताई (Asha Bhosle) आजही गात आहेत. वयाची ८७ वर्षे (८ सप्टेंबर २०२०) पूर्ण करत आहेत. म्हणजे कारकिर्दीचीही ७६ वर्षं. या ७६ वर्षांत त्यांनी स्वाभिमानाची, अस्तित्वाची आणि अस्मितेची लढाई लढलेली आहे. काल-परवापर्यंत नियतीने केलेले आघात सोसले आहेत; पण त्यातूनही स्वतःला शाबीत करीत आजही त्या प्रसन्नमुखे उभ्या आहेत. नियतीला वाकुल्या दाखवत. ‘मला गाण्यात करिअर करायचं नव्हतं. संसार, मुलं-बाळं यात रमून जायचं होतं,’ हे उद्गार आहेत ७६ वर्षे श्रोत्यांना आपल्या गाण्याचा भरभरून आनंद देणाऱ्या या सुहास्य स्वरस्वामिनीचे (Asha Bhosle) .

मी भाग्यवान! मला त्यांना बऱ्याच वेळेला भेटता आलंय. त्यांचा खास फोटोसेशन करता आलाय. ऑगस्ट १९९३ सालची ही आठवण आहे. आशा भोसले (Asha Bhosle) साठ वर्षांची पूर्तता करणार होत्या. वय हे शरीराला असतं. ‘आशा भोसले’ या स्वराला वय कसे असेल? ‘साप्ताहिक सकाळ’साठी त्यांची मुलाखत घ्यायचे ठरले. प्रसिद्ध लेखिका सुलभा तेरणीकर या मुलाखत घेणार व मी आशाताईंचे (Asha Bhosle) फोटो काढणार, असे संपादक श्री. सदा डुंबरे यांनी आम्हाला सांगितले. त्याप्रमाणे आशाताईंची वेळ घेतली. त्या दरम्यान त्यांच्या ‘साठाव्या’ वाढदिवसानिमित्त सर्वच वर्तमानपत्रे व मासिकांनी मुलाखतींचा दणका उडवला होता. प्रत्येकालाच त्यांची मुलाखत व फोटो हवे असल्याने आशाताई (Asha Bhosle) खूप उत्साही असूनही जरा कंटाळलेल्या होत्या.

मी, माझा भाऊ हेमंत व सुलभाताई असे डेक्कन क्वीनने मुंबईस पोहोचलो. ‘प्रभुकुंज’वर जाण्याचा आमचा तो पहिलाच अनुभव होता. चित्रपट संगीतातील आमची दोन आराध्य दैवते ‘प्रभुकुंज’च्या त्या पहिल्या मजल्यावर विराजमान होती. कित्येक वेळा पेडर रोडवरून जाताना ‘‘प्रभुकुंज’मध्ये जायला मिळाले व त्या स्वरांची भेट झाली तर…’ अशी स्वप्ने मी पाहिली होती. त्यापैकी एक स्वप्न आज पूर्ण होणार होते. आशाताईंबद्दल, त्यांच्या कारकिर्दीबद्दल आम्हाला बरीचशी माहिती होतीच; पण सर्व काही सुरळीत पार पडेल ना? त्या कशा वागतील? फोटोसाठी सहकार्य करतील ना? असे अनेक प्रश्न मनात येत होते.

त्यांनी दिलेल्या वेळेवर आम्ही ‘प्रभुकुंज’वर पोहोचलो होतो. बेल वाजवताना मनात धाकधूक होती. बेल वाजवली. दरवाजा उघडला आणि साक्षात ‘आशा भोसले’ (Asha Bhosle) यांनी दरवाजा उघडून आमचे स्वागत केले. ज्या आवाजाच्या साथीने शाळा-कॉलेजचे विश्व भारून गेलेले होते, जो स्वर ऐकल्याशिवाय आमचा एक दिवसही जात नव्हता, तो दैवी स्वर समोर उभा होता आणि स्वागतही करीत होता. आम्ही आत स्थिरावलो.

त्यांच्या घरेलू वागण्यामुळे थोड्याच वेळात आमचे अवघडलेपण एकदम नाहीसे झाले. चहा व प्राथमिक बोलणी झाल्यावर मी त्यांना कसे फोटो हवे आहेत हे सांगताना – कृष्णधवल, रंगीत पारदर्शिका व रंगीत फोटो असे तीनही काढणार आहे असे सांगून टाकले. (तेव्हा डिजिटल तंत्रज्ञान नव्हते ना!) त्या वेळी चाललेल्या सततच्या धावपळीमुळे आशाताईंचे (Asha Bhosle) डोके दुखत असल्याचे त्यांनी सांगितले. माझ्या मनात परत धाकधूक; पण ‘इतक्या लांब तुम्ही आला आहात, मग काम तर झालेच पाहिजे,’ हे त्यांनीच सांगितले. आमच्यादेखतच त्यांनी ब्रुफेन ४०० ही गोळी घेतली. मी कॅमेरा व लाइट्सच्या तयारीला लागलो. एक एक करून मी स्टुडिओलाइट स्टँडवर लावले व कॅमेऱ्यात फिल्म्स भरल्या.

काही वेळाने आतमध्ये जाऊन आशाताई (Asha Bhosle) अनेक साड्या घेऊन बाहेर आल्या व त्यातून आम्हाला साड्यांचे सिलेक्शन करायला सांगितले. एक गुलाबी नक्षी असलेली व एक हिरव्या जरी-काठाची अशा दोन साड्या आम्ही निवडल्या. त्याबरोबरच ‘मेक-अप अगदी सौम्य असा करा,’ असेही मी त्यांना सांगितले. ‘आलेच हं मी साडी नेसून,’ असे म्हणून त्या त्यांच्या रूममध्ये गेल्या.

या मधल्या वेळात दिवाणखान्याच्या समोरच्या बाजूचा छतापासून जमिनीपर्यंतचा असलेला भरजरी पडदा मी बाजूला केला. बाहेर बऱ्यापैकी मोठी अशी बाल्कनी. मला अत्यानंद झाला. पेडर रोडच्या बाजूच्या त्या बाल्कनीमध्ये समोरच्या पांढऱ्या-शुभ्र इमारतीवरून परावर्तित होऊन येणारा सुंदर प्रकाश पसरला होता. तिथे फोटो टिपले, तर मला स्टुडिओलाइटची गरजच नव्हती. लायटिंगचे माझे काम निसर्गानेच केले होते. मग मला आशाताईंच्या (Asha Bhosle) भावमुद्रा ‘क्लिक’ करण्यावर जास्त लक्ष देता येणार होते. मी आत येऊन लाइट्स आवरून ठेवले. फक्त कॅमेरे व एक मोठा रिफ्लेक्टर तेवढा बाहेर ठेवला.

हिरव्या काठापदराची साडी नेसून आशाताई (Asha Bhosle) बाहेर आल्या. हातात हिरव्या काचेच्या व त्यांच्या कडेने हिऱ्याच्या बांगड्या, गळ्यात मोती व पोवळ्याचा सर, बोटात एकच मोठा हिरा असलेली अंगठी, त्याला मॅचिंग कानातली कुडी. आणि मंदसा मेक-अप. येऊन पाहतात तर मी लाइट्स आवरलेले. त्या आश्चर्याने म्हणाल्या, ‘अहो, हे काय, सर्व सामान तुम्ही ठेवून दिले? आता माझी डोकेदुखी कमी झाली आहे. काढू या फोटो आपण.’

मी त्यांना ‘बाहेरील बाल्कनीत फोटो घेऊ या,’ असे सांगितले. त्यावर त्या परत म्हणाल्या, ‘तुम्ही मला बरं वाटत नाहीये म्हणून तडजोड तर करत नाही ना?’ त्या काही दिवसांत मुंबईतल्या फोटोग्राफर्सनी त्यांच्या-त्यांच्या स्टुडिओमध्ये भरपूर लाइट्स वापरून आशाताईंचे फोटो काढलेले असल्याने, त्या बाहेरच्या उजेडात फोटो चांगले येतील का, अशी त्यांना शंका आली. मी बाल्कनीतील उपलब्ध प्रकाशात उत्तम फोटो येतील अशी ग्वाही त्यांना दिल्यावर त्या रिलॅक्स झाल्या. आता वेदनेचा लवलेशही नसलेला त्यांचा तो प्रसन्न चेहरा. माझं काम अजून सोपं झालं होतं. मी परत एकदा खात्री दिल्यावर मात्र बाल्कनीतील छोट्या स्टूलवर त्या येऊन बसल्या.

मी भराभर फोटो टिपत होतो. मोठा सिल्व्हर रिफ्लेक्टर धरून माझा भाऊ उभा होता आणि सुलभाताई अधून मधून त्यांच्याशी संवाद साधत होत्या. माझ्या अपेक्षेपेक्षा पटापट आशाताई चेहऱ्यावरचे भाव बदलत होत्या. कधी हातातल्या गॉगलशी खेळत, तर कधी एखादी एकदम गंभीर मुद्रा देत, तर कधी एकदम कॅमेरा लेन्समध्ये बघत त्या संवाद करत होत्या. मध्येच एखादी तान घेत एखाद्या गाण्याची ओळ गुणगुणत होत्या. माझ्यासकट माझे ‘कॅमेरा शटर’ पण स्लो झाल्याचा भास मला होत होता.

जास्त आनंद पण कधी कधी पचत नाही माणसाला! पहिल्या साडीतील फोटो झाल्यावर परत एकदा त्या साडी बदलून आल्या. आता त्यांनी गुलाबी रंगात नक्षी असलेली आणि काठावर निळ्या व गुलाबी रंगाचे डिझाईन असलेली सिल्कची साडी नेसलेली होती. त्या सौम्य रंगसंगतीने त्यांचा वर्ण फारच खुलून दिसत होता. पदराला खांद्याच्या जवळ मुखवट्याच्या आकाराचा चांदीचा नेटकेपणाने लावलेला आकर्षक ‘ब्रूच’, हातात ‘ओम नमः शिवाय’ अक्षरं असलेलं ब्रेसलेट, त्यांचा कमीतकमी मेक-अप, केसात खोवलेलं मोठं रंगीत फूल…. परत एकदा फोटोसेशन सुरू झाला.

जवळजवळ सर्व प्रकारचे भाव माझ्या कॅमेऱ्यात बंदिस्त झाल्यावर मी थोडा थांबलो. त्यांनी मला विचारले ‘आता काय?’ मी म्हणालो, ‘आशाताई… ये है रेशमी जुल्फों का अंधेरा न घबराईये… या गाण्यात तुम्ही हसता. ते हसणं मला फोटोत हवंय.’ यावर त्या म्हणाल्या, ‘तू तयार झाल्यावर सांग.’ मी तर तयारच होतो. मी तसे सांगितल्यावर पुढच्याच क्षणी त्या हुकमीपणे गाण्यातल्याप्रमाणेच खळाळून हसल्या. माझे काम झाले होते. सुमारे तासभर चाललेला फोटोसेशन दिवाणखान्यातील दीनानाथ मंगेशकरांच्या फोटोफ्रेमसमोर उभे राहून आशाताईंचा फोटो क्लिक करण्याने संपला. इतक्या कमी वेळात संपलेला हा पहिलाच फोटोसेशन आहे, असेही त्यांनी मला सांगितले. आणि याच्या सगळ्यांच्या कॉपी मला नक्की आवडतील हेही सांगण्यास विसरल्या नाहीत. मग परत एकदा चहा व खाण्याची एक राउंड झाली. आणि आम्ही तृप्त मनाने पुण्याच्या दिशेने निघालो.

साप्ताहिकाचा अंक प्रसिद्ध झाल्यावर तो अंक व सर्व फोटोंच्या कॉपीज त्यांना पाठवल्या. ते फोटो पाहून त्यांनी त्यांचे पुण्यातील एक मित्र नीलकंठ प्रकाशनचे श्री. प्रकाश रानडे यांच्याकडे फोन केला व माझ्यासाठी निरोप ठेवला. तो निरोप म्हणजे मला त्यांच्या ‘प्रभुकुंज’मध्ये साजऱ्या होणाऱ्या ६०व्या वाढदिवसाचे आमंत्रण होते. माझा विश्वासच बसेना; पण ते खरे होते.

आठ सप्टेंबर १९९३ला परत एकदा आम्ही तिघे ‘प्रभुकुंज’वर धडकलो. सर्व घर फुलांनी भरून गेले होते. ‘प्रभुकुंज’च्या त्या मजल्यावर उत्सवाचे वातावरण होते. प्रत्येक पाहुण्याचे स्वागत स्वतः आशाताई (Asha Bhosle) करीत होत्या. आज त्यांच्याबरोबरच सर्व मंगेशकरही उपस्थित होते. सर्वत्र लगबग सुरू होती. इतक्यात सौ. भारती मंगेशकर यांनी माझी चौकशी केली. मी टिपलेले फोटो घरात सगळ्यांनाच आवडल्याचे त्यांनी सांगितले. चला, आपण केलेल्या कामाचे सार्थक झाले असे वाटत असतानाच आशाताई माझ्याजवळ आल्या व म्हणाल्या ‘तुम्ही काढलेले फोटो मला खूप आवडले. म्हणून हे खास तुमच्यासाठी!’ असे म्हणत त्या दिवशी ‘एचएमव्ही’ने प्रकाशित केलेला त्यांच्या गाण्यांच्या अकरा कॅसेट्सचा संच त्यांनी मला भेट म्हणून दिला. माझी अवस्था वर्णनापलीकडची झाली. आशाताईंचे ते प्रेम व विश्वासाबरोबरच तो कॅसेट्सचा संच आजही माझ्या संग्रहाची शान आहे.

नंतर त्यांच्या कार्यक्रमात किंवा इतर कार्यक्रमात मी आशाताईंची असंख्य प्रकाशचित्रे टिपली. प्रत्येक वेळी त्यांच्यातील नवनव्या ऊर्जेची अनुभूती मला येत गेली. सर्व संकटांवर मात करून जगणे म्हणजे काय याचा उलगडा त्यांच्याकडे बघताना होत गेला. त्यांच्यातील माणूसपण अनुभवता आले. काही वर्षांपूर्वीची आठवण. १३ मे २०१२ या दिवशी त्या वारजे येथील माई मंगेशकर रुग्णालयाच्या एका विभागाच्या उद्घाटनासाठी आल्या होत्या. त्या भेटण्याची शक्यता वाटल्यामुळे मी त्यांचे मला आवडलेले एक कृष्ण-धवल प्रकाशचित्र मोठ्या आकारात फ्रेम करून घेऊन गेलो. त्या कार्यक्रमातही त्यांनी त्यांच्या रसरशीत शैलीने जान ओतली. काही अप्रतिम नकलाही केल्या.

कार्यक्रमानंतर मी ती फ्रेम देण्यासाठी आत गेलो. तो फोटो कधीचा आहे हे त्यांना आठवणे अवघड होते. मी प्रभुकुंज येथील वीस वर्षांपूर्वीच्या फोटोसेशनची आठवण करून देताच एक क्षणही न दवडता त्या मला म्हणाल्या, ‘पाकणीकर, तेव्हाचा फोटो तुम्ही मला आत्ता देताय?’ मी म्हणालो, ‘आशाताई, वीस वर्षांत माझ्यात खूपच बदल झालाय; पण तुमच्यात काहीच नाही. म्हणून तेव्हाचा फोटो आत्ता देतोय.’ यावर त्या मनापासून खळाळून हसल्या. मधली वीस वर्षे पुसली गेली.

खरंच आहे. वय हे सर्वसामान्यांना असतं. असामान्य कलावंताचं वय मोजायचं नसतं. त्यांची कलाही अजरामर असते. तर मग ‘आशा भोसले’ (Asha Bhosle) या स्वराला ‘जरे’चा स्पर्श तरी होईल का?

©सतीश पाकणीकर

स्वरस्वामिनी | Swaraswamini हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

स्वरस्वामिनी | Swaraswamini – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share स्वरस्वामिनी | Swaraswamini

You may also like

3 thoughts on “स्वरस्वामिनी | Swaraswamini (Asha Bhosle)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock