Sur left behind…! Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini

सूर राहिले मागे…! गानतपस्विनी, गानसौदामिनी, गानयोगिनी | Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini

स्वरलता निमाली. स्वर्गीय स्वर स्वर्गस्थ झाले. भरतभूमीचा आवाज लोपला. साक्षात संगीत पोरकं झालं. श्रीकृष्णाची बासरी वाजायची थांबली. आपल्यातील प्रत्येकानं काहीतरी गमावलं. उद्याची सकाळ लताविना उजाडेल. माझी तर ‘गॉडमदर’ (Godmother) गेली.

अजिबात आवाज करू नका. आज आपला आवाज गेलाय.

‘गाये लता गाये लता’ म्हणणारा आवाज कायमचा शांत झालाय.

तिची गाणी वाजत राहतील, पण ती स्वतः देहानं नसेल.

तिचा आत्मा तिच्या गाण्यात असणार व तिची गाणी आपल्या हृदयात असणार.

पेडर रोडवर ‘प्रभुकुंज’वरून जाताना सहज वर नजर टाकायची इतक्या वर्षांची सवय आजपासून सोडावी लागणार.

‘देव नाही देव्हाऱयात’चा अर्थ आज कळला.

तिचं मंजुळ, निर्मळ, खळखळून हसणं माझ्या एका कानात आहे. दुसरा कान तिच्या दैवी आवाजाकडे गहाण पडलाय.

लताबद्दल वेळोवेळी कुणी काय म्हणून ठेवलंय वाचा-

सज्जाद हुसेनः लता गाती है, बाकी सब रोती है।

बडे गुलाम अली खान ः कंबख्त कभी बेसुरीही नहीं होती।

ओ. पी. नय्यर ः साली ऐसी आवाज तो सौ साल में नहीं होगी।

आशा भोसले ः देवानं एक परफेक्ट नरडं तयार केलं आणि मग तो साचाच मोडून टाकला. मग दुसरी लता मंगेशकर कशी तयार होणार?

नौशाद ः लता गायची व आमचा सारंगीवादक कादरबक्ष याला रडूच फुटायचं.

पु. ल. देशपांडे ः आकाशात चंद्र-सूर्य आहेत व खाली जमिनीवर लता मंगेशकर आहे.

मीना मंगेशकर ः आम्ही सगळी मास्टर दीनानाथांची मुलं. आम्ही सगळेच गातो, पण लता ती लता.

मदन मोहन ः लहानपणी ज्योतिषानं माझं सर्व भविष्य अचूक सांगितलं होतं, फक्त लता मंगेशकर नावाचा दैवी सूर तुझ्याकडे गाईल हे सांगितलं नव्हतं.

अनिल विश्वास ः लता मंगेशकर (Lata Mangeshkar)आली आणि आम्हा संगीतकारांना देवदूत आल्यासारखं वाटलं.

शिरीष कणेकर ः दीदी, तुझा आवाज साथीला व सांत्वनाला नसता तर कबके मर चुके होते.

राज कपूरशी बेबनाव झाल्यामुळे (कारण ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’चे संगीत आग्रहानं हृदयनाथकडे सोपवल्यावर राज कपूरनं टोपी फिरवून ते लक्ष्मीकांत – प्यारेलालच्या झोळीत टाकलं) लतानं ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’साठी गायला नकार दिला. लक्ष्मीकांत बोंबलत राज कपूरकडे गेला व म्हणाला, ‘लता गाणार नसेल तर आम्ही संगीतच देणार नाही.

भरत व्यासप्रभृती पितृतुल्य व्यक्तींनी रदबदली केल्यामुळे लता नाइलाजाने गायला तयार झाली. तिनं एक अट घातली. रेकॉर्डिंगला राज कपूरचं तोंड दिसता कामा नये. स्वतःच्या चित्रपटाच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगला राज कपूर स्टुडियोच्या बाहेर उभा होता. आत लता जीव ओतून गात होती – ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’. गाण्यात लाड नाहीत, उफराव गाणं उरकून टाकलं असं कदापि नाही.

ती हॉस्पिटलमध्ये जायच्या दोन-तीन दिवस आधीच आम्ही फोनवर यथेच्छ गप्पा मारल्या होत्या. फोन ठेवता ठेवता ती म्हणाली, ‘भरलं ना पोट? मिळाला ना भरपूर मसाला?’

ती मूर्तिमंत गाणं जगली. रडगाणं तिनं आसपास फिरकू दिलं नव्हतं. ती चोवीस तास नर्सेसच्या पहाऱयात होती, पण कधी प्रकृतीविषयी चकार शब्द काढला नाही. एकदा तिचा आवाज ठणठणीत झाला. तो ऐकून मी उत्साहाने म्हणालो, ‘आवाजावरून तब्येत चांगली वाटत्येय.’

‘आवाजाला काय धाड भरल्येय?’ लता जोशात म्हणाली.

‘दीदी, हे वाक्य तुम्ही बोलू शकता’ मी म्हणालो व दोघंही हसलो.

एकदा मी तिच्याशी फोनवर बोलत असताना बाजूचा दुसरा फोन वाजला. ‘दुसरा फोन येतोय वाटतं? घ्या, मी मग बोलीन’

‘अहो दीदी’, मी जेरीला येत म्हणालो, ‘तुमचा फोन बंद करून मी भाजीवाल्याचा फोन उचलला हे बाहेर कळलं तर लोक मला दगडांनी चेचून मारतील.’

लता खुदकन् हसली.

दोन-तीन दिवसांत माझा तिला फोन असायचा. सकाळी 11 ही वेळ ठरलेली होती. साधारणपणे तेव्हा तिची कुठली ट्रीटमेंट चालू नसायची. एकदा फोनवर मी तिला म्हणालो, ‘दीदी, खरं सांगतो, तुमच्याशी बोलताना टेन्शन येतं, दडपण येतं, भीती वाटते.’

‘आपण असं करूया’ लता समजावणीच्या सुरात म्हणाली, ‘मी तुम्हाला आधी सांगत जाईन की आज टेन्शन घ्या, आज नको, आज घाबरा, आज नको. कशी वाटते कल्पना?’

सर्व टेन्शन दूर होऊन मला हलकं वाटलं, हसू आलं. ब्याण्णवव्या वर्षी ही विनोदबुद्धी?

‘दीदी, तरुणपणी तुम्ही अशाच विनोदी होतात का हो?’

‘नाही नाही, भलतीच तापट होते. एक घाव दोन तुकडे करून टाकायचे. एका भांडणानंतर मी संतापून जयकिशनला ‘तुम झाडू हो’ असं म्हणाले होते. बिच्चारा. त्याच्या शेवटच्या आजारात कल्याणजीभाईचा फोन आला होता – ‘जयकिशनला हॉस्पिटलात भेटून या. तो खूपच जास्त आजारी आहे. मी धावले. त्याला कावीळ झाली होती. दारूने ती बळावली होती.

अहो, रात्री जागा आली की आपण पाणी पितो ना, त्याप्रमाणे तो दारू प्यायचा. उशापाशी दारूचा ग्लास भरून ठेवलेला असायचा. मला बघितल्यावर त्यानं माझा हात घट्ट पकडला. मी पाहिलं. त्याचा हात पिवळा धमक पडला होता. तो मला म्हणाला, ‘लता, आता लवकर बरं होऊन बाहेर यायचंय. डोक्यात भरपूर नवीन चाली आहेत. खूपच काम करायचंय. त्यानंतर आठवडय़ाभरात जयकिशनचं निधन झालं.’

‘शंकरचं निधन झालं तेव्हा त्याच्या बायकोनं व मुलानं परस्पर त्याच्या शवाची विल्हेवाट लावली. चित्रपटसृष्टीत कोणालाच त्यांनी काही कळवलं नाही. राज कपूर भयंकर चिडला होता. ‘तो आर.के.चा संगीतकार होता. आम्ही त्याची शाही शवयात्रा काढली असती’ राज कपूर परत परत म्हणत राहिला.

‘कुठल्या नायिकेशी तुमचं सूत होतं?’ मी विचारलं.

‘मीना कुमारी.’ लता हरखून म्हणाली. ‘भारी स्वभावानं गोड होती. गीता दत्तशी माझी जिगरी दोस्ती होती. जुन्या काळची गायिका जोहराबाई अंबालावाले मला मुलीसारखी प्रेमाने वागवायची.’

‘महंमद रफी?’

‘रफीसाहेबांची एक गंमत सांगते. मला मेहंदी हसनच्या गजला भारी आवडायच्या. मी रेकॉर्डिंगला आले तरी मेहंदी हसनच्या गजला कायम गुणगुणत असायचे. एकदा मेहंदी हसन मुंबईत आला होता. त्याच सुमारास माझं रफीसाहेबांबरोबर एक द्वंद्वगीताचं रेकॉर्डिंग होतं.

रफीसाहेब मला म्हणाले, ‘आपके चहीते मेहदी हसन बंबई में पधारे है। मिल आइए उन्हे। आपको इतने पसंत जो है।’

लताला गंमत वाटली. हसू आलं. रफी चक्क जेलस झाला होता.

‘लेकीन आपको क्या प्रॉब्लेम है?’ लता हसू आवरत म्हणाली, ‘वो मुझे पसंत तो है। वैसे आप भी मुझे काफी पसंद है।’

मी बोलत असताना मागून कोणाच्या तरी बोलण्याचा आवाज येत होता.

‘कोणी आलंय?’

‘नाही, आमचा स्वयंपाकी. विचारतोय बिर्याणी करू का? आता कोण खाणार आहे बिर्याणी? मला बघायला येणारे डॉक्टर्स व वेढा घालून बसलेल्या नर्सेस यांनाच खिलवावी लागेल. मी खिचडीपुरती उरल्येय.’

आजारी बिछान्यावरून हा विनोद आला होता.

‘ज्या क्षणी डॉक्टर परवानगी देतील त्या क्षणी मी तुम्हाला फोन करून भेटायला बोलावीन. सध्या घरचेदेखील योग्य अंतर राखून माझ्याशी बोलतात.’

मला भरून आलं. वाटलं, देवानं माझ्यापासून हिरावलेल्या अमोल गोष्टींची दामदुपटीनं भरपाई केली होती. साक्षात लता मला ‘गॉडमदर’ म्हणून लाभली होती. त्याचा मी हक्कानं फायदा घेत होतो.

‘दीदी, आपलं द्वंद्वगीत गाण्याचं राहून गेलं.’ मी वात्रटपणे म्हणालो.

‘हो ना!’ लता तत्परतेनं सहमत झाली, ‘आता मला पूर्वीसारखं गायला कितपत जमेल शंका आहे. तुम्ही संभाळून घ्याल ना?’

‘ऑफ कोर्स! सुनील गावसकरबरोबर फलंदाजी करताना मी त्याला नेहमीच ‘शील्ड’ करायचो. तुम्ही ऐन भरात होतात तेव्हाही मी तुम्हाला संभाळून घेतलं असतं.’

लता ठसका लागेपर्यंत हसली. डॉक्टरांनी तिचं मीठ बंद केलं होतं. हसायला तर बंदी नव्हती? ती फोनवरून माझ्या कानात ‘अलिफ लैला’मधलं ‘बहार आयी खिली कलिया’ गायली होती आणि माझ्या मनात आलं की, आमची लता नव्वदी पार केल्यावरही कोणाहीपेक्षा चांगली गाते.

मागे एकदा तिच्या गाण्याच्या रिहर्सलला मी ताडदेवला शशांक लालचंदच्या स्टुडियोत गेलो होतो. मध्येच ती मला म्हणाली, ‘शिरीष, तिकडे नका बसू. तिकडे कोरसवाले बसतील. तिथे बसलात तर तुम्हाला गावं लागेल.’

‘गाईन की मी. घाबरतो की काय?’

‘तुम्ही कशाला घाबराल हो, मी घाबरते.’ मला म्हणाली.

कोरसवाल्यांसह मी कोरसमध्ये हसलो.

दिल्लीला लता ‘ऐ मेरे वतन के लोगो’ गायली त्या कार्यक्रमात शंकरनं शारदाला पेश केली. अपेक्षेप्रमाणे ती भयाण गायली. विंगेत लताच्या समोर राज कपूर शंकरला म्हणाला, ‘गेंडाबाबू (शंकरचे टोपण नाव), आदमी में गुन होने चाहिये.’

शंकर काय ते समजला. शारदा काही समजली नाही.

गाणं ‘चीप’ वाटतं असं म्हणून लतानं ‘संगम’मधलं ‘मैं क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया’ गायला सपशेल नकार दिला. राज कपूरचं धाबं दणाणलं. त्याला नायिकेसाठी योग्य आवाज हवा होता. तो लताचा होता. तो दिवसभर लताच्या घरात तिच्या नाकदुऱया काढत बसला होता. गाणं हेलनवर नाही, तर नायिका वैजयंतीमालावर आहे आणि चित्रीकरण अभिरूचीपूर्ण असणार आहे हे परोपरीनं समजावून राज कपूरनं लताला अखेर राजी केलं.

त्यानंतर ‘मैं क्या करू राम’ लता कशी गायली आपण सारेच जाणतो. ‘कदम बहेके बहेके’ (‘बँक मॅनेजर’- मदन मोहन), ‘तिरुलिल्ला तिरुलिल्ला’ (‘दामन’ – के. दत्ता), ‘हवा में उडता जाये’ (‘बरसात’- शंकर-जयकिशन), ‘बात बात पे रुठो ना’ (‘सीमा’- शंकर जयकिशन), ‘वो आये बहारे लाये’ (‘अफसाना’- हुस्नलाल-भगतराम), ‘मुझे मिल गया बहाना’ (‘बरसात की रात’ – रोशन) ही आणि अशी अनेक खेळकर, उडती व वेगवान गाणी लताच्या अष्टपैलुत्वाची गाती साक्ष देतील. लता म्हणजे फक्त दर्दभरी गाणी असं म्हणणाऱयांनी आपल्या अज्ञानाची साक्ष काढावी.

‘एक थी लड़की’ (संगीतकार विनोद, साल 1949) मधल्या ‘लारेलप्पा लारेलप्पा’नं लताचं नाव देशाच्या कानाकोपऱयात पोहोचवलं. (तसं ‘बरसात’नं पोहोचलंच होतं म्हणा.) या द्वंद्वगीतात लताबरोबर छाकटा गायक जी. एम. दुराणी आहे, पण पुढे तो लतासह गायलेला ऐकायला मिळाला नाही.

‘काय झालं?’ मी लताला विचारलं.

‘तो आगाऊ होता. शिवाय कुचेष्टेखोर होता. माझ्या बाबांनी दिलेली एक माळ शुभदायक म्हणून घालून यायची. तिच्यावरूनही तो मला डिवचायचा. छद्मीपणे म्हणायचा, ‘ही कसली फालतू माळ. लताच्या गळय़ात म्हणजे हिऱयाचा कंठा हवा. अंगातले कपडे एखाद्या महाराणीला शोभतील असे हवेत.’ मला त्याचं बोलणं रुचलं नाही.

मी त्याच्याबरोबर गाणंच सोडून दिलं. ‘लारेलप्पा लारेलप्पा’ माझ्याबरोबर विनोदनं आणलेला कुणी पंजाबी मुंडा होता. नंतर त्याचा ‘पोर्शन’ विनोदनं दुराणीच्या आवाजात ‘डब’ केला. आहे की नाही गंमत? नायिका मीना शोरीला गाण्याचं थोडंबहुत अंग होतं. तिला ‘लारेलप्पा’ गायचं होतं. विनोद म्हणाला, नथिंग डुइंग, लता गाणार. मी गायले.’

‘फाळणीनंतर मीना शोरी पाकिस्तानात गेली.’ मी म्हणालो, ‘तिथे तिचे हाल हाल झाल्याचे ऐकतो. लोकांचे कपडे शिवून ती पोट भरायची. शेवटी हॉस्पिटलच्या जनरल वॉर्डात ती बेवारशी गेली. मोतीलालसह पडद्यावर ‘ये शोख सितारे’ गाताना तिनं काय सुरेख अभिनय केला होता.’

‘एखाद् दुसरा अपवाद सोडला तर उज्ज्वल कारकीर्दीच्या आशेनं पाकिस्तानात गेलेल्या सर्व कलाकारांची अशीच वाताहत झाली. अपवाद केवळ नूरजहानचा. ती मुंबईत आली होती आणि ताजमहाल हॉटेलात उतरली होती तेव्हा ज्येष्ठतेचा मान राखून मी तिला भेटायला गेले होते. त्यांच्यात एकदम मिठी मारतात. ते कसेसेच वाटते…’

नूरजहानची सी.सी.आय.मध्ये प्रेस कॉन्फरन्स झाली होती. केरसुणीसारख्या लांबलचक खोटय़ा पापण्या लावून व चेहरा मेकअपच्या हौदात बुडवून नूरजहान आली होती. तिला आमच्या सिद्धार्थ आर्यने विचारले, -‘ मोहतरमा, तीन देशांतील तीन महान गायिका एका मंचावर याव्यात असं तुम्हाला वाटत नाही का?’

‘मैं कुछ समझी नहीं.’ नूरजहान खोटय़ा पापण्यांची खिडक्यांसमान उघडझाप करीत म्हणाली.

‘म्हणजे पाकिस्तानच्या तुम्ही, आमच्या लता मंगेशकर व बांगलादेशच्या रूना लैला’ आर्य म्हणाला.

नूरजहानचा चेहरा उतरल्याचंही कळलं. आवाजावर ताबा ठेवीत, शांत असल्याचा अभिनय करीत नूरजहान म्हणाली, ‘देखिये, मैं तो कुछ भी नहीं हूं, आपकी जुती के बराबर हूं. लेकिन खुदा के लिये लता का नाम किसी ऐरीगैरी के साथ मत लिजिये. लता आता अशा स्टेजला आहे, की तिनं आता ठरविलं की, ती कोणाकडे यापुढे बघणारच नाही तर तेही क्षम्य आहे. पण ती पूर्णपणे माणसात आहे. तिचे पाय जमिनीवर आहेत…’

ही रूना लैला लताला एका कार्यक्रमात भेटली. तिनं वाकून लताला नमस्कार केला. तक्षणी एक संगीतकार (‘मी तुम्हाला नाव सांगते पण तुम्ही ते लिहू नका,’ इति लता. ‘नाही लिहिणार.’ इति मी!) उत्स्फूर्तपणे म्हणाला, ‘देखो, सूरज इन्सान के पाँव छू रहा है.’ लता अवाक्ै झाली. ती माझ्यापाशी म्हणाली, ‘मी नक्कीच इन्सान आहे, पण ही सूरज कधी झाली?’

तो संगीतकार रूनावर लट्टू होता. शंकर शारदावर होता तसा.

‘दीदी, नूरजहानचा रूनावर इतका खुन्नस का होता माहित्येय?’ मी लताला विचारले, ‘रूना एका मुलाखतीत म्हणाली होती की, मला दोनच आवाज आवडतात- एक नूरजहानचा व दुसरा माझ्या कुत्रीचा!’

‘मग नाही का भडकणार ती?’ लतानं हसत हसत विचारले.

वाचकांचं ठाऊक नाही, पण लताला मी वेळोवेळी हसवलंय याचा मला सार्थ अभिमान आहे. (एका रेकॉर्डिंगला सतत हसत असणाऱया लताला सज्जादनं दटावलं होतं- ‘ठीक तरह से गाईये लताजी, ये नौशाद की धुन नहीं है.’ आठवतंय ना? लताला आठवत होतं आणि आठवणीनं पुन्हा हसू येत होतं.) एकदा मी तिला फोनवर म्हणालो, ‘दीदी, जगात दोनच असे आवाज आहेत जे ऐकताक्षणी ओळखता येतात.

‘कोणते?’ तिनं बालसदृश कुतूहलानं विचारलं.

‘एक अर्थातच तुमचा व दुसरा माझा. मी इकडून नुसतं हॅलो।़ म्हटल्यावर तुम्ही मी बोलतोय हे ओळखता की नाही? झालं तर मग. मेरा आवाजही मेरी पहेचान है.’

लता हसली.

एकदा तिला कुठलंसं गाणं आठवत नव्हतं.

‘मला जरा चाल सांगा. मग मला आठवेल.’ ती म्हणाली.

‘हेच तर तुम्हा लोकांचं चुकतं.’ मी म्हणालो, ‘मी संगीतकाराच्या चालीत कधीच गात नाही. प्रत्येक गाण्याला माझी स्वतःची स्वतंत्र चाल असते. त्यावरून तुम्हाला मूळ चाल कशी कळणार?’

‘फाजीलपणा करू नका. गुमान गाऊन दाखवा.’ लतानं मला झापलं.

मी देवाचा धावा केला, कुलदैवतेचं स्मरण केलं, टेलिफोन कंपनीची करुणा भाकली व ‘पिलपिली साहब’मधलं 1954 सालचं लता व शामिंदर यांचं संगीतकार शार्दुल ख्वाजा याचं ‘चाँद सितारों में कौन बुलाये रे’ गायलो. माझा आचरटपणा मला खरंच खरा वाटत नव्हता. पण लताला चाल कळली. तिने गाणं ओळखलं. यानंतर मला वाटलं, आता मी आरामात तलवार परजत पावनखिंड लढवू शकतो. बाजीप्रभू कणेकर!

माझ्याकडे जेऊन हात धुवायला ती वॉश बेसिनपाशी गेली, पण नळाला पाणीच नव्हतं. (मध्यमवर्गा ही तुझी कहाणी!) मी गडूनं तिच्या हातावर पाणी घालायला लागलो तसा तिनं झटकन हात मागे घेतला व ती म्हणाली, ‘असं दुसऱयाच्या हातावर पाणी सोडायचं नसतं. तुमची सगळी प्रॉपर्टी, इस्टेट त्या व्यक्तीला जाते.’

‘तसं असेल तर तुम्ही माझ्या हातावर पाणी घाला.’ मी तत्काळ म्हणालो.

लता हसली. पण तिनं खरंच माझ्या हातावर पाणी घातलं असतं तर मी आज किमान पेडर रोडवर राहिलो असतो. आज आमची लता असती तर माझ्या या उद्गारांवरही मनापासून हसली असती. प्रचंड ईर्षेला, हेव्यादाव्यांना, कटकारस्थानांना तोंड देऊन ती इतकी प्रसन्न व निर्मळ कशी हसू शकते या प्रश्नाचं उत्तर मला कधीच मिळालं नाही.

‘बरसात’नंतर लगेचच ‘रेकॉर्डिंग रूम’च्या दारात जयकिशननं मला लग्नाची मागणी घातली होती’ लता अनपेक्षितपणे मला म्हणाली, ‘मी गोंधळले, बावरले. मला काहीच सुचेच ना. मी नाही म्हणाले. माझ्या नकारानं जयकिशन नाही, पण राज कपूर जाम भडकला होता. ‘याच्याहून चांगला तुला कोण मिळणार आहे?’ तो माझ्या अंगावर ओरडला. जयकिशननं मात्र पुन्हा हा विषय कधीच माझ्यासमोर काढला नाही.’

तब्येतीत चढउतार झाले की फोनवर तिचा आवाज ओळखू न येण्याइतका बदलायचा. लताचा आवाज ओळखू येत नसेल तर राहिलं काय? अलीकडेच तिचा फोन आला होता.

‘कोण बोलतंय?’ तिचा बसकट, घोगरा, थकलेला आवाज न ओळखून मी विचारलं.

‘लता.’ पलीकडून उत्तर आलं.

माझ्या छातीत चर्रर्र झालं. वयाच्या कचाटय़ात साक्षात लताही सुटू नये? तिलाही निसर्गाचे नियम लागू पडावेत? तीही मर्त्य मानवात मोडत होती? तिच्या अमर सुरात देव शोधणारे आम्ही हडबडून जायचो. तिच्या गळय़ातून प्रत्यक्ष देवच बोलत होता ना इतकी वर्षे?

आशा भोसले हा एकमेव सन्माननीय अपवाद वगळता लताच्या काळातील सर्व गायक, गायिका, संगीतकार आधीच स्वर्गाच्या मैफिलीत दाखल झाले होते. लता तसं तोंडानं बोलून दुःखाचे कढ काढत नसली तरी तमाम सहकलाकारांचं जाणं तिला मानवत नव्हतं. त्यांच्याशिवाय चित्रपटसंगीत ही कल्पनाच तिला भावत नव्हती. नवीन संगीतकारांशी तिचे सूर जुळत नव्हते. त्यांच्या रचना गाण्यात तिला रुची नव्हती. त्यात काही आव्हानात्मक आहे असं तिला वाटत नव्हतं. बेसूर आवाज सुरात आणणाऱया गाण्याच्या मशीनसाठी तिचा जन्म झाला नव्हता. जिथं ‘मेलडी’ नाही तिथं लता काय करणार?

तिनं आमच्या संगीतापासून स्वतःच्याही नकळत फारकत घेतली होती. आजच्या तथाकथित संगीताचंही तिच्यावाचून काही अडत नव्हतं. ‘मेलडी’ नाही याचा अर्थ साक्षात ‘मेलडी’ असलेली लता आजच्या संगीतातून बाहेर पडली होती. उभयपक्षी ना खंत ना खेद. नाहीतरी नव्वदीत तिनं गावं ही अपेक्षाही निर्घृण होती. लता आणि तिच्याबरोबरच आमचाही काळ कधी सरला कळलंच नाही. कसं कळणार? आम्ही आजही रात्रंदिवस लता ऐकत होतो. आम्ही आहोत तोवर ऐकत राहणार. माझा एक समवयस्क मित्र गेली किमान साठ वर्षे मदन मोहनचं ‘अदा’मधलं लताचं ‘प्रीतम मेरी दुनिया में दो दिन तो रहे होते’ हे रात्री ऐकल्याशिवाय झोपत नाही. तो इतरही ऐकतो, पण शेवटचं हटकून ‘प्रीतम मेरी दुनिया मे.’

गळय़ात गांधार असतो म्हणजे नेमकं काय असतं ते लतामुळे आपल्याला कळलं. तिनं सूर लावला की संगीतातलं काही न कळणाऱया आमच्यासारख्यांचे डोळेही पाझरायला लागतात. ‘ओ मोरे सैयाजी’ (‘उडन खटोला’- नौशाद) परवा कितव्यांदा तरी ऐकताना माझ्या डोळय़ात असंच टचकन पाणी आलं. मी लगेच लताला फोन करून तसं सांगितलं.

‘काय हो तुम्ही पण!’ ती विनम्रपणे कमालीची संकोचून म्हणाली. जणू तिला पहिल्यांदाच ‘कॉम्प्लिमेंटस्’ मिळत होते.

एक दिवस अचानक तिचा मोबाईलवर फोन आला.

‘काय म्हणताय?’ मी हरखून जात विचारलं.

‘अहो, तुमचा लॅण्डलाइन लागत नव्हता. शेवटी मी तुमचा मोबाईल नंबर मिळवला.’ लता म्हणाली.

माझे कान सुखावले. जणू मी ‘अब गम को बना लेंगे जीने का सहारा’ ऐकत होतो. लतानं या वयात व या शारीरिक दुरवस्थेत माझा नंबर मिळवण्याचे कष्ट घेतले? मी अनुक्रमे थरारलो व गहिवरलो. माझ्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमाला येणं तिला शक्य नव्हतं. मीही हट्ट धरून बसण्याचा असमंजसपणा केला नाही. तिची अवस्था मला कळत होती. ती मला फोनवर म्हणाली, ‘तुम्हीच या ना माझ्याकडे. मी आशीर्वाद देईन.’

आज आशीर्वाद देणारे हात नाहीत.

ती एकदा मला सहज म्हणाली, ‘शिरीष, तुम्ही ए.सी. लावून घ्या.’

‘त्याला पैसे पडतात, दीदी.’ मी बोलून गेलो.

‘अरे हो, खरंच’ लता जीभ चावत दिलगिरीपर बोलली.

मला माझाच राग आला. लता पुढे आगाऊपणे बोलण्याची काही गरज होती? तिनं माझ्यासारख्या अतिसामान्य माणसाला त्याच्या गुणदोषांसकट पदरात घेतला होता. ‘जाओ चमका सुबह का सितारा’ (‘हैद्राबाद की नाजनीन’ – वसंत देसाई) माझ्या तोंडून ऐकण्याची अपार सहनशक्ती तिनं दाखवली होती. मला ऐकवलं नव्हतं. लताशी चांगली ओळख आहे म्हणून गाता येणं म्हणजे ब्रॅडमनशी चांगली ओळख आहे म्हणून फलंदाजी करता येण्यासारखं आहे.

थँक्स टू कोरोना, गेले अनेक महिने आम्ही आपापल्या घरात अडकून पडलो होतो. तिला कोणाला भेटायची परवानगी नव्हती. फोन आमच्यातील दुवा होता, दूत होता. तोही कधी कधी नर्स उचलायची. दिलीपकुमार व लता मंगेशकर (Lata Mangeshkar) ही माझी ‘सपोर्ट सिस्टम’ होती.

या दोन मजबूत खांद्यांवर माझी आयुष्याची झोपडी उभी होती. पहिला खांब आधीच निखळून पडला होता. दुसरा आज उन्मळून पडला. आता मी या ओसाड, रखरखीत वाळवंटात उघडा पडलोय. या गिधाडांनो, या. खुशाल माझे लचके तोडा. आता मला पंखाखाली घेणारं कोण आहे? आज आमची लता असती तर आमच्या वतीनं आमच्यासाठी गायली असती – ‘न हंसो हमपे, हम है जमाने के ठुकराए हुवे…’

एकदा मला फोन उचलायला वेळ लागला.

‘काय करत होतात?’ लतानं विचारलं.

‘माझा सकाळचा रियाज. मालकंस गात होतो.’

लता (Lata Mangeshkar) खळखळून हसली. मी गाण्याचा रियाज करणं म्हणजे चार पायांच्या गाढवानं संस्कृत श्लोकपठण करण्यासारखं होतं. या दुर्धर अखेरच्या आजारपणात नर्सेस व डॉक्टर्सच्या विळख्यात तिला हसवणं हे माझं कर्तव्य तर होतंच, पण त्याहीपेक्षा जास्त माझं पुण्यकर्म होतं, बरं, माझ्या पापपुण्याचा हिशेब होईल त्या ‘कयामत’च्या दिवशी या पुण्याचं पारडं जड ठरेल.

मी तिची दुर्मिळ पण लाजवाब गाणी तिला मोबाईलवर पाठवायचा नुसता सपाटा लावला होता. उदाहरणार्थ, ‘बांध प्रिती कलडोर’ (‘मालती माधव’ – सुधीर फडके), ‘बेदर्द जमानेसे’ (‘रिश्ता’- के. दत्ता), ‘मेरी बरबादियों पर’ (‘सब्जबाग’ – विनोद), ‘चांद मध्दम् आसमा चूप है’ (‘रेल्वे प्लॅटफॉर्म’ – मदन मोहन), ‘अब तो रातें कहाँ’ (‘यास्मिन’ – सी. रामचंद्र), ‘अल्लाह भी है, मल्लाह भी है’ (‘मान’ – अनिल विश्वास), ‘तेरी गली मे आयेंगे’ (‘फर्माइश’ – हुस्नलाल भगतराम), ‘ठंडी हवाए’ (‘नौजवान’ – एस. डी. बर्मन), ‘जब रात नही कटती’ (‘चंगेज खाँ’ – हंसराज बहेल), बहारों के झेलेमे’ (‘अन्नदाते’ – महंमद शफी), ‘उनको अपना बना के’ (‘मालकीन’ – रोशन)…

‘दीदी, मी एवढी भारी भारी गाणी तुम्हाला पाठवतो पण ती ऐकता का तुम्ही?’ मी विचारलं.

‘म्हणजे काय?’ लता उसळून म्हणाली, ‘एकूण एक ऐकते. पुनःपुन्हा ऐकते. तुम्हाला खोटं वाटेल, पण माझी अनेक गाणी मी रेकॉर्डिंगनंतर ऐकलेलीच नाहीत. मला अलीकडे जास्त करून कोणाची गाणी ऐकायला आवडतं सांगू?

‘सांगा – सांगा. नेकी और पूछ पूछ.’

‘नौशाद, अनिल विश्वास, सज्जाद, मदन मोहन, रोशन आणि शंकर-जयकिशन.’

लता परदेशी गेलेली असल्यानं नौशादनं ‘उडन् खटोला’मधील ‘मेरा सलाम ले जा’ सुधा मल्होत्राकडून गाऊन घेतलं. लता परतल्यावर नौशादनं साळसूदपणे पुन्हा लताकडून गाऊन घेतलं. लता म्हणते, ती आधी गायली होती हे मला कळलं असतं तर मी गायला तयारच झाले नसते.

‘तुम्हाला एक सांगू का’ लता तिच्या शैलीत म्हणाली, ‘नौशाद व अनिल विश्वास या दोघांना आपल्या चालीत एक ‘नोट’ बदललेली चालत नसे. ‘सौतेला भाई’मध्ये ‘जा मै तोसे नाही बोलू’ हे शास्त्र्ााsक्त ढंगाचं गाणं अनिलदानं सांगितलं, गाऊन दाखवलं, अगदी बरहुकूम तसंच मी गायलं. ते गायचेही चांगले. बंगाली पद्धतीचा स्वयंपाकही उत्तम करायचे. ते उघडेबंब बसून माटुंग्याच्या त्यांच्या घरात कढईत काहीतरी करतायत व मी शेजारी बसून बघत्येय असा फोटोही छापून आला होता.’

‘कोरोना’ काळात मी फक्त लता, लता आणि लता (Lata Mangeshkar) ऐकली. सगळंच ऐकलेलं होतं. पुन्हा ऐकलं. ‘मुश्किल है बहुत मुश्किल’ (‘महल’)चं सौंदर्य नजरेत भरलं. असेल मधुबाला अतिसुंदर, पण तिच्यावर चित्रित झालेल्या लताच्या गाण्यांइतकी नक्कीच नाही. ‘आयेगा आनेवाला’ (‘महल’) पासून ‘बेकसपे कदम किजिये’ (‘मुगल-ए-आझम’)पर्यंत व ‘वो तो चले गये’ (‘संगदिल’)पासून ‘न शिकवा है कोई’ (‘अमर’)पर्यंत व ‘वो दिन कहाँ गये बता’ (‘तरीना’)पासून ‘उनसे प्यार हो गया’ (‘बादल’)पर्यंत मधुबालाच्या तोंडचं लताचं कुठलंही गाणं ऐका, मधुबाला पराभूत होत्येय असंच प्रत्येक वेळेला वाटत आलंय. निदान मला तरी.

हे लताला सांगायला हवं होतं. ती हसत सुटली असती. तिचं हे निर्व्याज, निर्मळ, खळखळून हसणं रेकॉर्ड करून नायिकेच्या तोंडी टाकणं कोणाला सुचलं कसं नाही? नाही तरी एकदा रागाच्या भरात सी. रामचंद्र तिला ‘केवळ चांगला टेपरेकॉर्डर’ म्हणाले होतेच की. लता त्यावर माझ्याजवळ म्हणाली होती, -‘हो, पण कुठला टेपरेकॉर्डर? बुश, फिलिप्स की ग्रंडिक?’

‘दीदी, तुम्ही ओ.पी.कडे का गायला नाहीत?’

‘त्यानं बोलावलं नाही. मी स्वतःहून जाण्याचा प्रश्न नव्हता.’ लतानं दोन वाक्यांत ओ. पी. प्रकरण संपवलं, ‘खरं सांगू का, मला तो माणूस कधी आवडला नाही.’

ओ.पी. मला भेटला की प्रत्येक वेळी न चुकता छद्मीपणे विचारायचा – ‘क्या कहेती है वो पेडर रोड की दोन महारानीयाँ?’

लता (Lata Mangeshkar) पुन्हा मोकळीढाकळी हसली.

मागे दररोज रात्री साडेअकराच्या ठोक्याला लताचा फोन वाजायचा. उचलला तर कोणी बोलत नसे. एक चकार शब्दही नाही. हळूहळू लताला टेन्शन यायला लागलं. ती तिच्या नकळत या फोनची वाट पाहू लागली. डोक्यात संताप साठत होता. कोण हे धंदे करतंय? शेवटी एके दिवशी ठरल्याप्रमाणे फोन आल्यावर लताचा स्फोट झाला. तिनं तिला माहीत आहेत नाहीत त्या शिव्या घातल्या आणि फोन आदळला. फोन यायचा बंद झाला.

‘तो फोन ओ. पी. करीत होता.’ हातातील अंगठीशी चाळा करीत लता हळुचकन मला म्हणाली.

‘कशावरून?’ मी उसळून विचारलं, ‘तो तर एक शब्दही बोलत नव्हता.’

लतानं अर्थपूर्ण ‘पॉज’ घेतला व मग ती म्हणाली, ‘त्यानं आशाला सांगितलं की, तुम्हारी बहेन मुझे कैसी कैसी गालियाँ दे रही थी.’

यावर कसं रिऍक्ट व्हावं हेच मला कळेना. लता हसत होती.

लता (Lata Mangeshkar) चिमुरडी होती तेव्हा मास्टर दीनानाथ घरात कोणाची तरी संगीताची शिकवणी घेत होते. त्यांना थोडय़ा वेळासाठी बाहेर जावं लागलं. ते शिष्याला म्हणाले, ‘मी येतोच. मी शिकवलेलं तू गात रहा.’

शिष्य गायला लागला. कोपऱयात खेळत बसलेली लता पटकन म्हणाली, ‘बाबा असे नाही गात.’

‘हो का?’ शिष्य कुऱर्यात म्हणाला, ‘मग कसे गातात?’

लता (Lata Mangeshkar) गाऊ लागली. बाहेरून परतलेले मास्टर दीनानाथ दारातच थिजल्यासारखे दिग्मुढ होऊन उभे राहिले. मग ते आत गेले व माईला म्हणाले, ‘आपल्या घरात महान गायिका जन्माला आलीय. मी कसल्या शिकवण्या करतोय?’

माझं लताप्रेम व लतामय जीवन ज्ञात असलेल्या आशा भोसलेनं मला एक सॉलीड चपराक ठेवून दिली होती. त्याचं काय झालं, मी लताच्याच शेजारच्या फ्लॅटमध्ये राहत असलेल्या आशाशी गप्पा मारत बसलो होतो. माझ्या मागून दबक्या पावलांनी उषा आत आली आणि कोण आलं असावं याचा ती अंदाज घेत असावी. आशा तिला मोठय़ानं म्हणाली, ‘अगं, ये उषा ये. शिरीष कणेकर आलेत. मंगेशकरांना त्यांच्यापासून काहीच भीती नाही.

आशाच्या बोलण्यातली खोच कळून उषा हसली. मीदेखील हसलो. आशाताई आधीपासूनच हसत होत्या. लता जास्त आवडण्याला तिची हरकत नव्हती. ती म्हणाली असती, – शेवटी मोठी बहीण कोणाची आहे?’

आता लता जग सोडून गेली. तिनंच निर्माण केलेलं जग ती मागे ठेवून गेली. भैरवी संपली. ‘लता (Lata Mangeshkar), तू गात रहा’ हा रसिकांचा टाहो आता तिच्यापर्यंत पोहोचणार नाही. पहिल्यांदाच ती तिच्या रसिक चाहत्यांना निराश करणार आहे. त्यासाठी देवाला तिला वर न्यावं लागलं. आता तो एकटाच लता ऐकत बसेल. त्याला स्वतःच्या भाग्याचा हेवा वाटत असेल. पृथ्वीला पोरकं करून स्वर्ग आबाद करण्याची ही कसली दळभद्री देवकरणी?

माझी आई गेली तेव्हा मला काही कळत नव्हतं. आज माझी ‘गॉडमदर’ (God Mother) गेली तेव्हा मला काही कळून घ्यायचंच नव्हतं. तिची हजारो गाणी ती आपल्यासाठी मागे ठेवून गेल्येय. तिच्या अजर गाण्यांचे मधुघट माझ्या घरात व मनात ओसंडून वहातायत. अगदी मोजक्या लोकांना देव अमरत्व का देत नाही? तिच्या नव्वदीनिमित्तानं तिच्या गाण्यांचा कार्यक्रम करणाऱया ग्रूपनं कार्यक्रमाचं नाव समर्पक ठेवलं होतं – ‘तुम्हीसे सब शुरू और तुम्हीसे सब खतम’! मला भास होतोय की, ती स्वर्गातून संकोचून म्हणत्येय – ‘काय हो तुम्ही पण…’

लता स्वर्गात दाखल झाल्याची बातमी पोहोचताच संगीतकार तिथली रेकाँर्डिंग रूम ‘बुक’ करण्यासाठी धावले असतील. लतानं (Lata Mangeshkar) खाडकन धैवत लावल्याक्षणी देव, देवता, यक्ष, किन्नर आणि गंधर्व यांचे नेत्र पाण्यानं भरून आले असतील. आता माझे आलेत तसे. अलविदा, दीदी अलविदा…!

लताची सर्वोत्कृष्ट पंधरा हिंदी चित्रपट गीते

 1. ‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ (शिनशिनाकी बूबलाबू) – सी. रामचंद्र
 2. ‘उठाएं जा उनके सीतम’ (अंदाज) – नौशाद
 3. ‘बलमा जा जा जा’ (आराम) – अनिल विश्वास
 4. ‘जाते हो तो जाओ’ (खेल) – सज्जाद
 5. ‘साजन की गलिया छोड चले’ (बाजार) – श्यामसुंदर
 6. ‘आएगा आनेवाला’ (महल) – खेमचंद प्रकाश
 7. ‘सपना बन साजन आए’ (शोखियां) – जमाल सेन
 8. ‘उनको ये शिकायत हैं’ (अदालत) – मदन मोहन
 9. ‘कागा रे जा रे जा’ (वफां) – विनोद
 10. ‘रसिक बलमा’ (चोरी चोरी) – शंकर जयकिशन
 11. ‘हाय जिया रोये’ (मिलन) – हंसराज बहल
 12. ‘सारी सारी रात’ (अजि बस शुक्रिया) – रोशन
 13. ‘बांध प्रीत फुलडोर’ (मालती माधव) – सुधीर फडके
 14. ‘चले जाना नहीं’ (बडी बहेन) – हुस्नलाल भगतराम
 15. ‘ओ सजना, बरखा बहार आयी’ (परख) – सलील चौधरी

-©शिरीष कणेकर

सूर राहिले मागे…! गानतपस्विनी, गानसौदामिनी, गानयोगिनी | Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

सूर राहिले मागे…! गानतपस्विनी, गानसौदामिनी, गानयोगिनी | Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini– आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share सूर राहिले मागे…! गानतपस्विनी, गानसौदामिनी, गानयोगिनी | Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini

You may also like

2 thoughts on “सूर राहिले मागे…! गानतपस्विनी, गानसौदामिनी, गानयोगिनी | Ganatpaswini, Gansaudamini, Ganyogini

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock