पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Bakul
मांडवीच्या तटी शोभे
पवित्र तीर्थ चाफळ ।
समर्थांच्या ध्यानि मनी
श्री राम मूर्ती शामल ।।
राऊळाच्या अंगणात
मोहरलेला बकुळ ।
वृक्षावरी शोभतसे
पुष्प नाजूक कोमल ।।
मंद गंध भुलवितो
खुळावतो आसमंत ।
वेदनेस विसरवी
बकुळा तुझी संगत ।।
हार विविध गुंफीता
सदा तूच सोबतीस ।
मनी अधिर तू नि मी
राम कंठी अर्पिण्यास ।।
कुरळ काळ्या कुंतली
गजरे नित माळले ।
साज तोच आठविता
सुगंधित मन झाले ।।
ओंजळीत उचलुनी
भाव मनीचे कथीले ।
बकुळा रे आप्तसख्या
आसवात भिजविले ।।
वियोगात ध्यास एक
आठवणी दाटतात ।
येई सख्या एकदाच
थकलेल्या ओंजळीत ।।
-©पुष्पा पेंढरकर
07।04।2022