16 Songs of Bhondla
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Bhondla

‘सूर नवा ध्यास नवा’ मध्ये अवधूत गुप्तेने लोकांना एक प्रश्न विचारला. गुजरात्यांचा गरबा तर आपल्याकडे काय असतं. कोणत्याही स्पर्धकाला उत्तर देता आलं नाही. मग प्रेक्षकांना विचारल्यावर दोन तीन जण भोंडला (Bhondla) म्हणली. मग भोंडल्याचं एखादं गाणं (Songs of Bhondla) कोणतं हा दुसरा प्रश्न विचारल्यावर शुकशुकाट पसरला. मग एका काकूंनी ‘एक लिंबू झेलू बाई’ हे गाणं म्हणलं पण तेही अर्धवट. हे गाणं एकट्या अवधूत गुप्तेनी सलग गायलं. नंतर परीक्षणात तो म्हणाला की इतरांचे सण साजरे करताना आपण आपलं विसरत चाललो आहोत. हा आपला ठेवा आहे आणि हे आपल्याला जपलंच पाहिजे. हे भान आपली ‘बनाना’ आणि ‘अॅपल’ पिढीला घडवण्याऱ्या आपल्या लोकांना कळेल तो सुदीन.

अवधूत गुप्तेना या सगळ्यासाठी आपला सलाम 👌🏻👌🏻

भोंडल्याची १६ गाणी | 16 Songs of Bhondla

भोंडला (Bhondla), भुलाई, हादगा (Hadaga) अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जाणारा नवरात्रोत्सव आणि त्यातील लोकगीते काळाच्या ओघात लुप्त होत चालली आहेत ,घरातल्या मोठ्या व्यक्ती ,आजी यांना ती सारी लोकगीते अगदी तोंडपाठ होती ,परंतु त्याची कुठेही नोंद न घेतल्याने संस्कृती, गाणी सारे काही विरून जाते आहे .
चला तर मग अशा दुर्मिळ लोकगीतांचे संकलन आपल्याकडे असणे गरजेचे नाही का ??…….तीच परंपरा तीच गाणी आता आपल्या स्मार्ट वहीमध्ये …अर्थात आपल्यास्मार्टफोन मध्ये …आपली मैत्रीण गावाकडची असो कि शहरातील ,सर्वानीच जपावा हा अनमोल ठेवा …

लोकसंस्कृती आपण जपली तरच पुढच्या पिढीत त्याचे संक्रमण होऊ शकते ,त्यामुळे आपल्या आई ,बहीण ,जावा ,मैत्रिणी सगळ्यांना सुपूर्त करूयात हा “नवरात्रीचा अमूल्य ठेवा” …


भोंडल्याची १६ गाणी | 16 Songs of Bhondla

ऐलमा पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडून दे, करीन तुझी सेवा
माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी, पारवं घुमतय पारावरी
गोदावरी काठच्या उमाजी नायका, आमच्या गावच्या भुलोजी बायका
एविनी गा तेविनी गा
आमच्या आया तुमच्या आया, खातील काय दुधोंडे
दुधोंडयाची लागली टाळी ,आयुष्य दे रे भामाळी
माळी गेला शेता भाता, पाऊस पडला येता जाता
पड पड पावसा थेंबोथेंबी, थेंबोथेंबी आडव्या लोंबी,
आडव्या लोंबती अंगणा
अंगणा तुझी सात वर्षे, भोंडल्या (Bhondla) तुझी सोळा वर्षे
अतुल्या मतुल्या चरणी चातुल्या,
चरणी चारचोडे, हातपाय खणखणीत गोडे
एकेक गोडा विसाविसाचा, साडया डांगर नेसायच्या
नेसा गं नेसा बाहुल्यांनो, अडीच वर्षे पावल्यांनो


श्रीकांता कमलाकांता असं कसं झालं.
असं कसं वेडं माझ्या नशिबी आलं

वेडयाच्या बायकोने केले होते लाडू
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतले

वेडयाच्या बायकोने केला होता चिवडा
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
केरकचरा म्हणून त्याने बाहेर फेकला

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या करंज्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
होडया होडया म्हणून त्याने पाण्यात सोडल्या

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या चकल्या
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
बांगडया बांगडया म्हणून त्याने हातात घातल्या

वेडयाच्या बायकोने केले होते श्रीखंड
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
क्रीम क्रीम म्हणून त्याने तोंडाला फासले

वेडयाच्या बायकोने केल्या होत्या शेवया
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
गांडूळ गांडूळ म्हणून त्याने फेकून दिल्या.

वेडयाची बायको झोपली होती
तिकडून आला वेडा त्याने डोकावून पाहिले
मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकले


नणंदा भावजया दोघी जणी
घरात नव्हतं तिसरं कोणी
शिंक्यावरचं लोणी खाल्लं कोणी
मी नाही खाल्लं वहिनीनी खाल्लं
आता माझा दादा येईल गं
दादाच्या मांडावर बसेन गं
दादा तुझी बायको चोरटी
असेल माझी गोरटी
घे काठी घाल पाठी
घराघराची लक्ष्मी मोठी


कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून || धृ ||
काय रे मागतोस बाळा तुला देते मी आणून
आई मला चंद्र दे आणून, त्याचा चेंडू दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||1||
आई मला विंचू दे आणून त्याची अंगठी दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून….||2||
आई मला साप दे आणून त्याचा चाबूक दे करून
असलं रे कसलं मागणं तुझं जगाच्या वेगळं
कृष्णा घालितो लोळण, आली यशोदा धावून…||3||


एक लिंबू झेलू बाई दोन लिंबं झेलू
दोन लिंबं झेलू बाई तीन लिंबं झेलू
तीन लिंबं झेलू बाई चार लिंबं झेलू
चार लिंबं झेलू बाई पाच लिंबं झेलू
पाचा लिंबांचा पाणोठा
माळ घाली हनुमंताला
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळं तोडी
कमळाच्या पाठीमागे लपली राणी
अगं अगं राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारिक वाळू
तेथे खेळे चिल्लारी बाळू
चिल्लारी बाळाला भूक लागली
सोन्याच्या शिंपीने दूध पाजले
पाटावरच्या गादीवर निजविले
निज रे निज रे चिल्लारी बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले की नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्टया पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी


अक्कण माती चिक्कण माती , खळगा जो खणावा
अस्सा खळगा सुरेख बाई, जातं ते रोवावं
अस्सं जातं सुरेख बाई, रवा-पिठी काढावी
अश्शी रवा-पिठी सुरेख बाई करंज्या कराव्या
अशा करंज्या सुरेख बाई तबकी भराव्या
अस्सं तबक सुरेख बाई शेल्याने झाकावं
अस्सा शेला सुरेख बाई पालखीत ठेवावा
अशी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी
अस्सं माहेर सुरेख बाई खायला मिळतं
अस्सं सासर द्वाड बाई कोंडोनी मारीतं
अस्सं आजोळ गोड बाई, खेळायला मिळतं


अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता बत्ता
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता ॥१॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता वाटी
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चाटी ॥२॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होती भाकर
भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा प्रभाकर ॥३॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चेंडू
भुलोजीला लेक झाला नाव ठेवा बंडू ॥४॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता चष्मा
भुलाबाईला लेक झाली नाव ठेवा सुषमा / रेश्मा ॥५॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता रुपया बंधा
भुलोजीला लेक झाली नाव ठेवा चंदा ॥६॥

अडकीत जाऊ खिडकीत जाऊ खिडकीत ठेवला अडकित्ता
भुलाबाईला मुलगी झाली, नाव ठेवलं स्मिता ॥७॥

अडकित जाऊ खिडकीत जाउ खिडकीत होता पाटा
भुलोजीला लेक झाला साखर खडी वाटा,
बाणा बाई बाणा, स्वदेशी बाणा, गाणे संपले खीरापत आणा ॥५


भोंडल्याची १६ गाणी | 16 Songs of Bhondla

कारल्याचा वेल लाव गं सुने ,लाव गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल लावला हो सासुबाई लावला हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥१॥

कार्ल्याचा वेल वाढू दे ग सुने वाढू दे ग सुने
मग जा तू आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याचा वेल वाढला हो सासुबाई वाढला हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा ॥२॥

कार्ल्याला फूल येउ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फूल आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥३॥

कार्ल्याला फळ येऊ दे गं सुने येउ दे गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याला फळ आलं हो सासुबाई आलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥४॥

कार्ल्याची भाजी कर गं सुने कर गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी केली हो सासुबाई केली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥५॥

कार्ल्याची भाजी खा गं सुने खा गं सुने
मग जा आपुल्या माहेरा माहेरा
कार्ल्याची भाजी खाल्ली हो सासुबाई खाल्ली हो सासुबाई
आता तरी जाऊ का माहेरा माहेरा ॥६॥

आपलं उष्टं काढ ग सुने काढ ग सुने
मग जा तू आपल्या माहेरा माहेरा
माझं उष्टं काढलं हो सासुबाई काढलं हो सासुबाई
आता तरी जाऊ का मी माहेरा माहेरा

आणा फणी घाला वेणी जाऊ द्या राणी माहेरा माहेरा
आणली फणी घातली वेणी गेली राणी माहेरा माहेरा ॥७॥

काही भागात
कारल्याचा वेल ,त्याची पाने गोल गोल
तुला न्यायाला कोण कोण आलं.
….
(अशी सुरुवात आहे )


आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे सोमवार । शंकराला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे मंगळवार । देवीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे बुधवार । बृहस्पतीला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे गुरुवार । दत्ताला नमस्कार।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शुक्रवार । अंबाबाईला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार?
आज आहे शनिवार । शनिला नमस्कार ।

आज कोण वार बाई । आज कोण वार ?
आज आहे रविवार । सुर्याला नमस्कार ।


अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासरा
सासर्‍याने काय आणलं ग बाई ?
सासर्‍यानं आणल्या पाटल्या
पाटल्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥१॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल सासू
सासूने काय आणलंय गं?
सासुने आणले गोट
गोट मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥२॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल दीर
दीरानं काय आणलं ग बाई ?
दीरानं आणल्या बांगड्या
बांगड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥३॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल जाऊबाई
जावेनं काय आणलं ग बाई ?
जावेनं आणली नथ
नथ मी घेत नाहीं, सांगा मी येत नाही,
चारी दरवाजे लावा ग बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥४॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नणंद
नणदेने काय आणलंय गं?
नणदेने आणल्या तोरड्या
तोरड्या मी घेत नाही, सांगा मी येत नाही
चारी दरवाजे लावा गं बाई, झिप्रं कुत्र सोडा ग बाई ॥५॥

अरडी गं बाई परडी, परडी एवढं काय गं
परडी एवढं फूल गं, दारी मूल कोण गं?
दारी मूल नवरा
नवर्‍याने काय आणलंय गं?
नवर्‍याने आणलं मंगळसूत्र
मंगळसूत्र मी घेते, सांगा मी येते
चारी दरवाजे उघडा गं बाई, उघडा गं बाई
झिपर्‍या कुत्र्याला बांधा गं बाई, बांधा गं बाई ॥६॥


सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे
कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासरा पाहुणा आला गं बाई
सासऱ्याने काय काय आणले गं बाई
सासऱ्यानी आणल्या पाटल्या गं बाई
पाटल्या मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे …

कोण कोण पाहुणा आला गं बाई
नणंद पाहुणी आला गं बाई
नणंदेने काय काय आणले गं बाई
नणंदेने आणला पोहेहार गं बाई
पोहेहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे …

कोण कोण पाहुणा आला गं बाई
दीर पाहुणा आला गं बाई
दिराने काय काय आणले गं बाई
दिराने आणले गोठ गं बाई
गोठ मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे

कोण कोण पाहुणा आला गं बाई
सासू पाहुणी आला गं बाई
सासूने काय काय आणले गं बाई
सासूने आणला राणीहार गं बाई
राणीहार मी घेत नाही
सांगा मी येत नाही
चारी दारं लावा गं बाई
झिपरं कुत्रं सोडा गं बाई
सासरच्या वाटे कुचूकुचू काटे
माहेरच्या वाटे नारळ फुटे …

कोण कोण पाहुणा आला गं बाई
नवरा पाहुणा आला गं बाई
नवऱ्याने काय काय आणले गं बाई
नवऱ्याने मंगळसूत्र आणले गं बाई
मंगळसूत्र मी घेते
सांगा मी येते
चारी दारं उघडा गं बाई
झिपरं कुत्रं आवरा गं बाई


हस्त हा जीवनाचा राजा
पावतो जनांचिया काजा
तयासी नमस्कार माझा ।।

दहा मधले आठ गेले
हस्ताची ही पाळी आली
म्हणोनी त्याने गंमत केली ।।

ज्याच्या योगे झाला चिखल
त्याही चिखलात लावल्या केळी ।।

एकेक केळ मोठालं
भोंडल्या देवा वाहिलं


माझ्या सुंद्रीचं लगीन
वराडी कोण कोण येणार, माझ्या सुंद्रीचं लगीन

भाऊ म्हणे मी भाऊ, आणीन नवरा पाहून
माझ्या सुंद्रीचं लगीन

बहिण म्हणे मी बहीण, करवली मी होईन
माझ्या सुंद्रीचं लगीन

बाप म्हणे मी बाप, खर्चीन हुंडा लाख
माझ्या सुंद्रीचं लगीन

आई म्हणे मी आई, करीन लग्नात घाई
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलता म्हणे मी चुलता, येईन जेवणापुरता
माझ्या सुंद्रीचं लगीन

चुलती म्हणे मी चुलती, येईन वरातीपुरती
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावसा म्हणे मी मावसा, बसेन दागिन्यासरसा
माझ्या सुंद्रीचं लगीन

मावशी म्हणे मी मावशी, फराळाचे माझ्यापाशी
माझ्या सुंद्रीचं लगीन

मामा म्हणे मी मामा, येईन सर्व कामा
माझ्या सुंद्रीचं लगीन

भट म्हणे मी भट, धरीन अंतरपाट
माझ्या सुंद्रीचं लगीन

भटीण म्हणे मी भटीण, सगळ्याच पोळ्या लाटीन
माझ्या सुंद्रीचं लगीन


सासरच्या जाच सांगणाऱ्या ह्या मुली सासरची बढाई सुद्धा तेवढीच रंगवून सांगायच्या.

भुलाबाई भुलाबाई सासरे कसे गं सासरे कसे?
कचेरीत बसले हे वकील जसे गं वकील जसे ॥१॥

भुलाबाई भुलाबाई सासू कशा गं सासू कशा?
कपाळभर कुंकू पाटलीन जशा गं पाटलीन जशा ॥२॥

भुलाबाई भुलाबाई पुतणे कसे गं पुतणे कसे?
हातामध्ये घडी मास्तर जसे गं मास्तर जसे ॥३॥

भुलाबाई भुलाबाई जाऊ कशी गं जाऊ कशी?
हातामध्ये लाटणं स्वयंपाकीण जशी गं स्वयंपाकीण जशी ॥४॥

भुलाबाई भुलाबाई दीर कसे गं दीर कसे?
डोळ्यावर गॉगल डॉक्टर जसे गं डॉक्टर जसे ॥५॥

भुलाबाई भुलाबाई नणंद कशी गं नणंद कशी?
हातामध्ये घडी मास्तरीन जशी गं मास्तरीन जशी ॥६॥

भुलाबाई भुलाबाई पती कसे गं पती कसे?
जटातून गंगा वाहे शंकरजी जसे गं शंकरजी जसे ॥७॥

भुलाबाई भुलाबाई आपण कशा गं आपण कशा?
शंकराच्या मांडीवर पार्वती जशा गं पार्वती जशा ॥८॥

भुलाबाई भुलाबाई मुल कसे गं मुल कसे?
वाकड्या सोंडाचे गणपती जसे गं गणपती जसे ॥९॥


माहेरचा बडेजाव सांगणाऱ्या स्त्रीला मुद्दाम हिणवणारे हे गाणे :-

‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’

‘माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला साखळ्या ।’

‘असल्या कसल्या साखळ्या बाई फुलाच्या पाकळ्या ॥’

‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’

‘माझ्या ग माहेरच्यांनी दिल्या मला पाटल्या ।’

‘असल्या कसल्या पाटल्या बाई हाताल्या दाटल्या ॥’

‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’

‘माझ्या ग माहेरच्यांनी दिले मला गोट ।’

‘असले कसले गोट बाई हत्तीचे रोट॥’

‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’

‘माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बिंदी ।’

‘असली कसली बिंदी बाई कपाळाला चिंधी ॥’

‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’

‘माझा ग माहेरच्यांनी दिला मला हत्ती ।’

‘असला कसला हत्ती बाई उधळतो माती ॥’

‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?

‘माझ्या ग माहेरच्यांनी दिला मला गडी ।’

‘असला कसला गडी बाई, मिजास बडी ॥’

‘तुझ्या ग माहेरच्यांनी काय काय दिलं ?’

‘माझ्या ग माहेरच्यांनी दिली मला बाई ।’

असली कसली बाई तिला रीतच न्हाई


आड बाई आडोणी,
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली सुपारी,
आमचा भोंडला (Bhondla) दुपारी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली मासोळी
आमचा भोंडला (Bhondla) संध्याकाळी ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडली कात्री
आमचा भोंडला (Bhondla) रात्री ।।

आड बाई आडोणी
आडाचं पाणी काढोणी।
आडात पडला शिंपला
आमचा भोंडला (Bhondla) संपला


भोंडल्याची १६ गाणी | 16 Songs of Bhondla

जीवनाचे सार या भोंडल्या (Bhondla) किंवा हादग्या (Hadaga) मधे सांगितले आहे.
हस्त नक्षत्र परतीचा कधीही कुठेही न सांगता येणारा जोरदार पाऊस हत्ती सारखा ज्याला समोर ठेवून मुलींचे महिलांचे गाणे हसत खेळत म्हंटले जाते यामागे खूप खूप मोठ्ठे अनुभव जगण्यास छानसे संदेश दिलेले आहेत म्हणुनच भोंडला (Bhondla) हादगा (Hadaga) हे मुलींनी महिलांनी खेळत संस्कृति वाढवत ठेवली पाहिजे.

भोंडल्याची १६ गाणी | 16 Songs of Bhondla – शेअर करा.

भोंडल्याची १६ गाणी | 16 Songs of Bhondla – आपल्या कडे भोंडल्याची अजून गाणी असतील तर कंमेंट मध्ये शेयर करा किंवा आपण येथे आपली फाईल अपलोड करू शकता.

You may also like

One thought on “भोंडला | Bhondla

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock