Chumban Ek Dokyaliti

चुंबन – एक डोक्यालिटी | Chumban Ek Dokyality

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Chumban Ek Dokyaliti

जित्या शाळेत खूप हुशार होता. पण कॉलेज संपता संपता पार हुकला. एकतर सायन्स घ्यायचं का आर्ट्स ह्याच्यात एक वर्ष गेलं. पुढ एका राजकीय पक्षाच्या नादी लागला. जिल्हा प्रमुखाची सिगरेट आणून द्यायची, खुर्च्या आवरायच्या असे कामं करायचा. एक वर्षात त्याच्या लक्षात आलं की जिल्हा प्रमुखांनी सिगरेटचा ब्रांड बदलला पण आपल्या आयुष्यात काही बदल झाला नाही. पुन्हा अभ्यासात लक्ष देऊ म्हणून तयारीला लागला. पण होस्टेलवरच्या मित्रांकडून उधार पैसे कसे मिळवायचे ह्या विचारात त्याचा दिवस निघून जायचा.

जीत्याला गावाहून कधी मनीऑर्डर काय साधा फराळ आलेला पण कुणी कधी पाहिला नव्हता. त्याच्या घरच्यांची कुणाला काहीच माहिती नव्हती. काहीतरी भानगड असणार म्हणून मित्र पण विचारायचे नाहीत. जमेल तशी मदत करायचे. शिव्या द्यायचे. जीव पण लावायचे.

आता मात्र सगळ्यांना जित्याची माहिती घ्यायची वेळ आली. पोलिसांनी जीत्याला होस्टेल वरून उचलून नेलं होतं. सगळ्या मित्रांची कसून चौकशी चालू होती. काय केलं होतं जीत्याने? त्याचा आणि कॉलेज मधल्या एका मुलीचा कीस करतानाचा फोटो whats app वर फिरत होता. चेहरा नीट दिसत नसला तरी कपड्यावरून पोरांनी ती कॉलेजमधली विशाखा आहे हे ओळखल होतं. सगळीकडे बोंबाबोंब सुरु झाली होती. विशाखा एका राजकीय पक्षाच्या जिल्हा प्रमुखाची मुलगी. सगळ्या जिल्ह्यात राडा झाला होता. जीत्याला शोधायला खूप लोक येऊन गेले होते. पण जित्या नेमकं पोलिसांच्या हाती सापडला. पक्षाचे लोक म्हणत होते नशिबाने पोलिसांना सापडला. जिल्हाप्रमुखाला सापडला असता तर खांडोळी केली असती.

पोलीस इन्स्पेक्टरला जिल्हा प्रमुखाचा दहा वेळा फोन आला होता. एकदा तंगड तोडा त्या पोराचं म्हणून. एकदा जीभ कापा म्हणून. इन्स्पेक्टरने खूप समजवण्याचा प्रयत्न केला की हे सगळं आम्हाला शक्य नाही. पण जिल्हा प्रमुख ऐकायला तयार नव्हते. एवढी वर्ष त्यांच्या कार्यकर्त्यांना मुली घाबरत होत्या. आज त्यांच्याच मुलीचं एका कॉलेजच्या पोराने बळजबरी चुंबन (Chumban) घेतलं होतं. भरीस भर म्हणून कुणीतरी त्याचा फोटो पण काढला होता.

इन्स्पेक्टर दोन थोबाडीत ठेऊन देणार त्याच्या आत जित्याने खरखर सांगायला सुरुवात केली. मी घरचा गरीब आहे. मला परीक्षेची फीस भरायला पैसे नव्हते. मी नेहमी मित्रांकडून उधार घेतो. पण फीस एवढे पैसे द्यायला कुणी तयार नव्हतं. त्यात काही मित्र म्हणाले जिल्हा प्रमुखाच्या पोरीला भर रस्त्यात कीस करून दाखव. आम्ही पैसे देतो. माझ्यापुढ दुसरा काही इलाज नव्हता. शिक्षणाचा प्रश्न होता. पैसे मिळाले नसते तर शिक्षण सुटलं असतं. मी रस्त्यावर आलो असतो. मी डेरिंग केली. विशाखाला कीस केलं. इन्स्पेक्टरला दया आली. जीत्याच्या मित्रांचा राग आला. पण करणार काय?

जीत्याने त्याची गोष्ट एकदम भाऊक होऊन सांगितली. ऐकता ऐकता एका हवालदाराच्या डोळ्यात पाणी आलं. पत्रकार सुद्धा हैराण झाले. आजवर शिक्षणासाठी लोकांनी केलेल्या त्यागाची त्यांना माहिती होती. पण असा त्याग कुणीच केला नव्हता. एकदम भारी बातमी होती. दुसर्या दिवशी जिल्ह्यातल्या सगळ्या पेपरला पहिल्या पानावर जीत्याच्या पराक्रमाची बातमी आली. जिल्हाप्रमुख सकाळीच प्यायला बसला पेपर वाचून. आजवर पंधरा वर्षात त्यानी पन्नास मोर्चे काढले, पंचवीस बस फोडल्या पण एवढी मोठी बातमी कधी आली नाही. जित्याची बातमी पेपरवाल्यांनी गुन्हा म्हणून छापलीच नाही. शिक्षणासाठी एका तरुणावर काय वेळ आली असं लिहिलं.

एका दैनिकानी तर चुंबन (Chumban) किती वाजता आणि किती वेळ घेतलं हे सुद्धा लिहिलं. जणू काय त्यांच्या डोळ्यासमोर घडलं सगळं. हे वर्णन वाचून जिल्हाप्रमुख खूप संतापला होता. आधी त्याला वाटलं की ही गोष्ट फार कुणाला माहित नाही. पेपर वाल्यांनी ना फोटो छापलाय पोरीचा ना नाव आलंय लिहून. पण अचानक शेकडो लोक आपल्याला भेटायला का आलेत हेच त्याला कळत नव्हतं. बरं येणाऱ्या माणसाला पण काय बोलावं कळत नव्हतं. थेट तरी कसं म्हणणार ? जे झालं ते वाईट झालं.

आपल्याला काही माहित नाही असं पण दाखवायचं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत असं पण दाखवायचं होतं कार्यकर्त्यांना. ही तारेवरची कसरत होती. जिल्हाप्रमुख प्रत्येकाला विचारायचा कसं काय आला? पण प्रत्येकजण म्हणायचा सहज आलो. जिल्हाप्रमुख वैतागला. साले बिनकामाचे एवढे लोक आपल्या दारात आयुष्यात जमले नाही. आज काय झालं?

हळू हळू जिल्हा प्रमुखाच्या लक्षात आलं की whats app वरून फोटो सगळीकडे गेला. आता सगळ्यांना सगळं माहित झालं. त्यात पेपर वाले पोराच्या बाजूने बातम्या लिहायला लागले. बरं बातमी इतकी विस्तारानी की पोरगी कोण ह्याचा अंदाज यायला पण वेळ लागू नये. पण हळू हळू जित्याची चालाखी इन्स्पेक्टरच्या लक्षात आली. त्याच्या मित्रांनी अशी काही शर्यत त्याच्याशी लावलीच नव्हती. जीत्यानीच तशी पुडी सोडली होती.

इन्स्पेक्टरनी जीत्याला आता खरंच दोनचार थोबाडीत दिल्या. काल माझ्याशी खोटं का बोलला म्हणून विचारलं. जित्या म्हणाला साहेब माझा भाऊ सैन्यात आहे. बॉर्डर वर मेला. त्यानी मातीचं चुंबन (Chumban) घेतानाचा फोटो पाठवला होता. तो घेऊन मी पेपरवाल्याकड हिंडलो. पण एकानी माझ्या भावाचा मातीला ओठ टेकवल्याचा फोटो छापला नाही. आन परवा एका पोरीच्या गालावर मी ओठ टेकवले त सगळे बातम्या द्यायला लागले. ते पण पहिल्या पानावर. इन्स्पेक्टरनी ह्या वेळी खोटं बोलत नाही ना म्हणून रागात विचारलं. पण जित्यानी त्याच्या भावाचा फोटो दाखवला. त्याच्या भावाचा सैनिकाच्या वेशातला फोटो बघून एका पत्रकाराने तर फोटोला सलाम ठोकला. बाकीच्यांनी पण मनातल्या मनात फोटोला सलाम ठोकला.

मोठी बातमी होती. टीव्ही वाले पत्रकार होते ते. त्यांना असलं फोटो वालं लफडं आवडतं. न्यूज channel वर बातमी सुरु झाली. सैनिकाच्या फोटोला छापायला नकार दिला म्हणून तरुणाने शिकवला धडा. माध्यमांची इज्जत काढायला सुरुवात झाली. एका तासात बातमी सगळ्यांना बंद करावी लागली. कारण जित्याचा भाऊ म्हणून जो सैनिक दाखवत होते तो कॉलेजच्या नाटकातला पोरगा होता. त्यानेच पत्रकाराला जाऊन सांगितलं की भाऊ मी मेलो नाही. तो नाटकातला फोटोय. पत्रकाराची नौकरी जायची वेळ आली.

बातमी बघून जिल्हाप्रमुखाला हार्ट attack यायची वेळ आली. जिल्ह्यात आता जीत्याच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. कॉलेजचे पोरं तर पोलीस स्टेशनला चकरा मारायला लागले. अचानक काही देशभक्त पोरांचा मोर्चा पोलीस स्टेशनला आला. जीत्याला सोडून द्या म्हणून दुसर्या तालुक्याच्या कॉलेजमधले दोनशे मुलं आले होते. त्यांना वाटलं जित्या खरच सैनिकाचा भाऊ आहे. पण पोलिसांनी शेवटी दोन जणांना अशी लाठी मारली की सगळे देशभक्त पोरं थेट आपल्या तालुक्याला पळून गेले.

इन्स्पेक्टर आता जीत्याला अडकवण्याच्या तयारीला लागला. जीत्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे असं जिल्हाप्रमुखांप्रमाणे त्याला पण वाटू लागलं. पण आता जित्याची गोष्ट राज्यभर चर्चेचा विषय झाली होती. ह्या प्रकरणात खर काय ते शोधून काढायला एका वाहीनिनी एका स्त्री प्रश्नावर ज्वलंत बोलणारी एक स्त्री स्वातंत्र्य वादी बाई पाठवली.

भल्या भल्या पुरुषांना त त प प करायला लावणारी पत्रकार म्हणून मोहिनीची ओळख होती. आल्या आल्या ती जीत्याला भेटली. जित्या तिच्या पुढे ढसाढसा रडायला लागला. म्हणाला सरकारला माझ्यासारख्या तरुणांची समस्या कधी समजणार? बेरोजगारी डाव्या खिशात तर गरिबी उजव्या खिशात घेऊन फिरतो आम्ही.

कसे दिवस काढायचे. काय काय चिंता करायची? नौकरी कधी मिळणार ही का पोरगी कधी मिळणार ही? एकवेळ नौकरी नाही मिळाली तरी माणूस जगू शकतो हो. पण बायको नाही मिळाली तर कसं होणार? माझ्यासारख्यानी काय करायचं? आमच्या सारख्या एकाकी तरुणांची समस्या सरकारला माहिती तरी आहे का? आमच्या समोर लोक बाजारात बायकोचा हात धरून फिरतेत, बागेत प्रेमी जोडपे खुशाल मिठी मारून बसतेत. आमच्या जीवाचा काय तिळपापड होत आसल कुणाला अंदाज तरी हाये का? ह्याच्यावर सरकारनी कधी विचार तरी केलाय का?

आपल्यावरचा स्त्रीवादी शिक्का पुसून बाईला पण इमेज वेगळी करायला एक चान्स होता. जशीच्या तशी मुलाखत टीव्हीवर आली. जित्या अजून फेमस झाला. त्याच्या विचाराच्या पोरांचा एक लाखाचा फेसबुक ग्रुप झाला एका रात्रीत. जिल्हाप्रमुखाला फक्त बाराशे लाईक होते फेसबुकवर. जिल्हाप्रमुख पुन्हा क्वार्टर घेऊन बसणार एवढ्यात त्याला पक्ष प्रमुखाचा फोन आला. तो जित्या नावाचा पोरगा आपल्या पक्षात येईल का बघा. पोरगा कामाचा दिसतोय. तिकीट देऊ त्याला आपण.

हे ऐकून जिल्हाप्रमुखाने आणखी एक ग्लास मागवला. दुसरा ग्लास कुणासाठी असा त्यांच्या बायकोला प्रश्न पडला. जिल्हाप्रमुख म्हणाले जावई बापू येणार आहेत. त्यांनी पोलीस स्टेशनला फोन लावला. जीत्याला गाडीत थेट घरीच पाठवून द्या म्हणून सांगितलं. बायको हैराण होती. पण जिल्हा प्रमुखाच्या पोरीला मनातून आनंद झाला होता. तिचं प्रेम होतं जीत्यावर. दोघांनी मिळूनच हा सगळा प्लान केला होता. पोरीला माहित होतं आपल्या बापाला जावई नाही त्याचा बाप भेटला पाहिजे. तरच तो लग्नाला तयार होईल. आणि जित्या तसाच होता. आल्या आल्या जीत्यानी चिअर्स केलं. जिल्हाप्रमुख थोडे नाराज झाले. जावई पाया पडला नाही म्हणून. पण आता पाया पडून मोठं व्हायचे दिवस गेले हे त्यांच्या पण लक्षात आलं च होतं की ……

– Chumban Ek Dokyaliti

©️अरविंद जगताप

चुंबन – एक डोक्यालिटी – Chumban Ek Dokyaliti Source

चुंबन – एक डोक्यालिटी – Chumban Ek Dokyaliti ही कथा आवडली असल्यास शेअर करा.

चुंबन – एक डोक्यालिटी – Chumban Ek Dokyaliti – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share चुंबन – एक डोक्यालिटी – Chumban Ek Dokyaliti

You may also like

2 thoughts on “चुंबन – एक डोक्यालिटी | Chumban Ek Dokyality

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO