Khajan

ती सोनेरी मुलगी, खीर, आणि डॉक्टर | Khajan ani Wilson Disease

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Khajan ani Wilson Disease

गोऱ्यापान, सोनेरी केसांच्या त्या चौदा-पंधरा वर्षांच्या सुंदर मुलीचं सगळं शरीर एखाद्या लाकडाच्या ओंडक्यासारखं कडक झालेलं होतं. हात पाय वाकडे तिकडे होऊन एकाच पोझिशन मध्ये जणू घट्ट रुतून बसले होते. पाठ देखील वाकडी झाल्याने तिला सरळ स्ट्रेचर वर झोपता येत नव्हतं. थोडाही बोलण्याचा, हलण्याचा प्रयत्न केला, तर अख्ख्या शरीराला झटके येत होते. तिला नीट रडता देखील येत नव्हतं, पण वेदनेमुळे सतत डोळ्यातून पाणी झरत  होतं, त्यामुळे तिची उशी ओली झालेली होती. तिच्या आई-वडिलांनी तिचं स्ट्रेचर ढकलत आणलं होतं.

कालच ते इराकमधून तडक मुंबईमध्ये पोहोचले होते, तिथून तिला कारनं  पुण्याला आणलं होतं. वडील अशिक्षित कामगार, पण आई मात्र बगदाद विद्यापीठामधून सायन्स ची ग्रॅज्युएट. स्वतःच्या मुलीची अशी अवस्था पाहतांना आतून खचून गेलेल्या त्या माउलीनं त्यांच्या बरोबर आलेल्या तबरेझ नावाच्या भाषांतर करणाऱ्या एका इराकी विद्यार्थ्यांच्या मदतीनं मला तिच्या या “खजान” (Khajan) नावाच्या मुलीची कहाणी सांगितली.

पाच-एक महिन्यांपूर्वी शाळेच्या वार्षिक कार्यक्रमामध्ये नाच सादर करत असतांना खजान (Khajan) लंगडत असल्याचं तिच्या एका शिक्षिकेनं पाहिलं, आणि तिच्या आईला कळवलं. इराक मधल्या एका न्यूरॉलॉजिस्टनं तिची तपासणी केली, त्यात त्याला तिच्या डोळ्यात तपकिरी रंगाच्या “रिंग” दिसल्या. खजान (Khajan) ला विल्सन डिसीज (Wilson Disease) नावाचा अतिशय दुर्मिळ पण गंभीर आजार असल्याचं अचूक निदान त्यानं केलं.

यकृतामधल्या (लिव्हर) दोषामुळे शरीरात  कॉपर (तांबे) हा धातू साचत जातो. काही दिवसांत कॉपर ची रक्तामधली पातळी इतकी जास्त होते, कि त्याचे विषारी परिणाम सगळ्याच अवयवांवर व्हायला लागतात. पण सगळ्यात आधी लिव्हर आणि मेंदूचं अतोनात नुकसान होतं. ताबडतोब इलाज केला नाही, तर पेशंट काही आठवड्यांतच विकलांग होतो, आणि काही महिन्यांत सारा खेळ संपतो!

सर्वात वाईट गोष्ट म्हणजे याची  जी मुख्य दोन औषधं आहेत, त्या दोन्हींमुळे सुरुवातीच्या काळात पेशंटचा आजार वाढतो, कारण रक्तातील कॉपरची पातळी आधी वाढते मग कमी व्हायला लागते. त्यातलंही एक औषध अतिशय महाग.

खजानला (Khajan) पाहिलं औषध सुरु केलं गेलं, पण दुर्दैवाने तिला त्याचे इतके साईड इफेक्ट झाले कि तिच्या सगळ्या नसा खराब होऊन ती अगदी पलंगालाच खिळली. पॅरालीसीसचाच प्रकार होता हा. बोलणं कमी झालं, शब्दोच्चार समजेनासे झाले. मग डॉक्टरांनी दुसरं औषध सुरु करायचं ठरवलं. ते अमेरिकेतून इम्पोर्ट करायचं होतं.

खजानच्या (Khajan) आई-वडिलांनी त्यांचं घर, जमीन आणि एक छोटंसं दुकान होतं ते सगळं विकून टाकलं. एका छोट्याशा घरात ते भाड्यानं राहू लागले. काही दिवसांतच नवीन औषध त्यांच्या हातात आलं, आणि खजानला ते देण्यात आलं. पण एखाद्या दुःस्वप्नासारखं घडलं, खजानची अवस्था आणखीनच बिघडली. बोलणं, खाणं-पिणं सगळंच बंद पडलं. आता ती वाचणार नाही, फक्त लिव्हर ट्रान्सप्लांटेशन (यकृत प्रत्यारोपण) केलं तरच तिचा जीव वाचण्याची काही शक्यता आहे, पण त्यानंतर ही ती चालू-बोलू शकेल याची खात्री नाही असं त्यांना डॉक्टरांनी सांगितलं.

त्यांनी मग अनेक धार्मिक आणि इतर संस्थांकडे कर्ज आणि मदत मागितली, नातेवाईकांकडून पैसे उसने घेतले, आणि ते तडक भारतात आले. “भारतातले डॉक्टर आणि इलाज सगळ्या जगात सगळ्यात चांगले असल्याचं आम्हाला अनेकांनी सांगितलं होतं. अगदी अमेरिकेतूनही भारतात पेशंट इलाज करायला येतात असंही आमच्या डॉक्टरांनी सांगितलं. सगळेच इलाज, ऑपरेशन भारतात निम्म्यापेक्षाही कमी खर्चात,  जगात सर्वात स्वस्त होतात, असं कळल्यामुळे आम्ही भारतात येण्याचा निर्णय घेतला” खजानची आई मला सांगत होती.

खरंच आहे हे! विकसित देशांमध्ये वैद्यकीय खर्च तर आवाक्याबाहेरचा आहेच, पण अगदी स्पेशालिस्ट डॉक्टरांची अपॉइंटमेंट मिळायला महिने महिने लागतात, ऑपेरेशनसासाठी अनेक महिने वाट पाहावी लागते. Urgent केस असेल तर भेटेल त्याच्या हाती निमूट ऑपरेशन करून घ्यावं लागतं. यामुळेच भारतात गेली पंधरा एक वर्षं अख्ख्या जगातून पेशंट इलाजाकरिता येतात.

मला एकदा माझ्या लहानपणी एका काकांनी रोजसारखी ताटात प्रसादाची खीर वाढली. मी काही ती संपवली नाही. माझी मावशी आश्चर्यानं म्हणाली “अरे खीर कशी काय टाकून देतोस?” काका ताबडतोब म्हणाले “कारण याला  रोज विनासायास मिळते ना? ज्याला खीर बघायलाही मिळत नाही अशा एखाद्याला दे, त्याला नक्की आवडेल”. भारतातल्या वैद्यक व्यवसायाचीच ही गोष्ट आहे जणू!

खजानची (Khajan) आम्ही परत कसून तपासणी केली. शरीरावर जणू मांसच  राहिलं नव्हतं! रक्तही कमी. . मी खजानच्या (Khajan) आई-वडिलांना तिची गंभीर परिस्थिती समजावून सांगितली. तिसरं, स्वस्त एक औषध चालू करून वाट पाहावं लागेल, बराच वेळ लागू शकतो हेही सांगितलं. कुठल्याही गोष्टीची मी “गॅरंटी” देऊ शकत नसल्याचंही स्पष्ट सांगितलं. 

तिची आई म्हणाली “डॉक्टर, आम्हाला तिचं ऑपरेशन नकोय. बाकी तुमची मुलगी आहे असं समजून जे तुम्हाला योग्य वाटतं ते तुम्ही करा. ती बरी व्हावी म्हणून आमचा जीव तीळतीळ तुटतो, पण सगळं काही तुमच्या हातात नसतं, हे आम्हाला समजतंय. आम्ही डोळे बंद करून तुमच्यावर विश्वास ठेवतोय, पुढे जे होईल ते आमचं नशीब!” .

आता मात्र केसची सगळी जबादारी माझ्यावर अली होती. नातेवाईकांनी, पेशंट्सनी पूर्ण विश्वास ठेवला, वाईटाचा दोष, संशय डॉक्टरवर नाही असं सांगितल्यावर डॉक्टर पूर्ण मनमोकळेपणाने निर्णय घेऊ शकतात. कायद्याची भाषा, संशय, धमक्या असे सुरु झाले, कि सगळेच डॉक्टर “बॅकफूट” वर इलाज करतात.

आम्ही तिचे इलाज सुरु केले. खरंतर खजानच्या (Khajan) आईला या आजाराविषयी अनेक डॉक्टरांपेक्षा जास्त माहिती होती, पण तिनं कधीही उद्धटपणे प्रश्न विचारले नाहीत, कि आमच्या निर्णयांना आक्षेप घेतले नाहीत. जेवढी अवघड केस तेवढा तो डॉक्टर जास्त अनुभवी बनतो. माझ्या विद्यार्थ्यांनी, इतर सहकाऱ्यांनी खूप मदत केली.

खजानला घरच्यासारखी वागणूक दिली. प्रेमानं, सहानुभूतीनं दिलेली औषधं जरा जास्तच चांगला इफेक्ट करतात! त्यात जर पेशंटचा डॉक्टरवर पूर्ण भरवसा असेल, तर फारच उत्तम.. मृत्यूच्या दाट, भीतीदायक छायेतून  खजान हळूहळू बाहेर पडली. जगण्याची आशा, परत  उभं राहण्याची जिद्द  तिच्या चेहऱ्यावर दिसू लागले. काही दिवसांनी ती घोट घोट पाणी प्यायला लागली, उठून उभं राहायला लागली. अजून नीट खाता, बोलता येत नव्हतं. कडकपणा हळूहळू कमी होत होता.

व्हिसाची मुदत संपल्यानं त्यांना इराकला परतावं लागलं. पण तिथूनही विडिओ कॉल करून तिच्या पालकांनी तिचे इलाज चालू ठेवले. त्यानंतर दोनदा खजान आईवडिलांसोबत भारतात येऊन गेली.  त्यांच्या शेवटच्या भेटीनंतर काही महिन्यांतच मला एक हातानं लिहिलेलं पत्र मिळालं.

खजाननं (Khajan) स्वतः इंग्लिश मध्ये लिहिलं होतं: “मी आता कॉलेज मध्ये प्रवेश घेतलाय. तुमच्यासारखं डॉक्टर व्हायचंय मला!” . तिच्या आईनं खाली अरबीत लिहिलं होतं: “डॉक्टर, तुम्ही माझ्या आयुष्यात उजेड परत आणला. माझी सोन्यासारखी मुलगी मला परत मिळवून दिलीत. तुमच्यासाठी आम्ही सगळे रोज अल्लाहकडे दुआ मागतो”. मला माझा देव पावला होता!  आता गेली तीन वर्षं खजान (Khajan) एकदम छान  आहे. तिला लिहिलेल्या उत्तरात मी आवर्जून लिहिलं: ” तुझ्या जगण्याचं सगळं श्रेय केवळ तुझा आईच्या जिद्दिलाच आहे”.

जादू, दैवी, अद्भुत म्हणता येतील अशा घटना भारतात वैद्यक शास्त्रात रोजच शेकडो वेळा घडतात. मरणाच्या दाढेतले लहानमोठ्या वयाचे रुग्ण केवळ आपल्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांमुळे, बुद्धिमतेमुळे उठून चालायला लागतात, हसत घरी जातात. हे रोजच, भारतातल्या प्रत्येक खेड्यात, शहरात, प्रत्येकच दवाखान्यात घडत असतं. अगदी सरकारी दवाखान्यात देखील! पण यातील काही थोड्या वाईट घटनाच सगळ्यांना दाखविल्या जातात, त्यांचीच सतत  चर्चा होते. चोवीस तास, वर्षभर राबणाऱ्या डॉक्टरांनी वाचवलेले लाखो जीव कुणालाच दिसत नाहीत. आजची खजानची (Khajan) ही कहाणी भारतातल्या अशाच शेकडो अनामिक मृत्युंजय डॉक्टरांना अर्पण!

©️डॉ. राजस देशपांडे, न्यूरॉलॉजिस्ट पुणे

ता. क. : विल्सन्स डिसीज (Wilson Disease) वर भारतात अनेक उत्तम तज्ज्ञ आहेत, आणि हा आजार पूर्ण बरा होऊ शकतो.

Khajan ani Wilson Disease Source

Khajan ani Wilson Disease ही कथा आवडली असल्यास शेअर करा.

Khajan ani Wilson Disease – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share Khajan ani Wilson Disease

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO