पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Concomitance | Company
रात्री 12.30 ची वेळ….
गंगापूर बस स्टॅन्ड वर ती एकटीच बसलेली.. वय बावीस तेवीस तरी असेल. अंगावर पिवळ्या रंगाचा तंग पंजाबी सूट. अंगभर घट्ट लपेटून घेतलेली ओढणी. त्यातूनही उठून दिसणारं तारुण्य. जवळ फक्त एक छोटी हॅन्डबॅग. अशा अवेळी आडजागी थांबावं लागल्यामुळे चेहऱ्यावर दिसणारी स्पष्ट भीती..
बाजूला तीच्याकडे पाहून मध्येच गळा काढणारं काळं कुत्र… त्याला पाहून केबिन मधून ए हाड करणारा सावंत…एवढीच काय ती स्टॅन्डवर जाग.. हातगावाहुन येणारी शेवटची बस गेली की तो देखील झोपायला मोकळा..
खरं तर बस येते टायमावर.. आजच लेट झाला. फार नाही जेमतेम पंधरा मिनिट… पण डोळे जड झाल्यावर एकेक मिनिट युगासमान वाटत असतो. इतक्यात डाव्या गेटमधून बस शिरली आतमध्ये… केवळ एका पॅसेंजरला सोडून रवाना देखील झाली…
आदित्यने उतरून बस स्टॅन्डवर एक नजर टाकली… ओळखीचं कुणी भेटणं शक्य नव्हतंच अशा मध्यरात्री.. पण बाहेर एक देखील रिक्षा नव्हती. घर तसं जवळच होतं. जेमतेम एक किलोमीटर. म्हणजे पंधरा वीस मिनिटाचा रस्ता. पण अगोदरच चार तास बसमध्ये बसून पार खुळखुळा झालेला. त्यामुळे चालणं जाम जीवावर आलं होतं. पण नाईलाज होता..
निघण्याआधी एक सिगारेट तरी मारू.. थोडी तरतरी येईल म्हणून त्याने एक कश मारला.. डोकं मस्त हलकं झालं. सिगारेट संपल्यावर त्याने ती पायाखाली चूरडली. आणि निघणार इतक्यात त्याला तीने पाठून आवाज दिला.
अहो ऐका ना… तुम्ही गावाच्या दिशेने जाताय ना? मला पण गावात जायचं आहे.. मला सोबत कराल का?
आदित्यने एकवार तीच्याकडे पाहिलं.. एवढ्या अपरात्री एकटीच तरुणी म्हणजे भूत हडळ वगैरे नसेल ना? त्याच्या मनाने उचल खाल्ली. हडळच असेल, म्हणूनच एवढी सुंदर दिसते आहे.. त्याने तीच्या पायाकडे पाहिलं. पाय तरी सरळच दिसत आहेत… कपडे पण पिवळ्या रंगाचे आहेत… म्हणजे भूत नाही दिसत. भुतं नेहमी पांढऱ्या कपड्यात असतात ना.
ती खाकरली तसा तो भानावर आला. सोबत कराल ना मला?
आदित्य : हो हो चला.. पण तुम्हाला गावात नेमकं कुठे जायचं आहे?
ती : तुम्ही कुठे राहता?
आदित्य : देवीच्या मंदिराच्या बाजूच्या गल्लीत..
ती : मला पुढच्याच गल्लीत जायचं आहे.
आदित्य : बरं चला… पण चालत जावं लागेल. आता रिक्षा वगैरे काही मिळेल असं नाही वाटत.
ती : हो चालेल की फार तर पंधरा मिनिट लागतील..
दोघं बसस्टॅन्ड बाहेर पडले..
आदित्य : तुझं.. सॉरी तुमचं नाव काय?
ती : सॉरी कशाला? अरे तुरे केलं तरी चालेल.. मी रेशमा…
आदित्य : आणि मी आदित्य…
आदित्यने न विचारताच नाव सांगितलं तीला.
आदित्य : तू एकटीच का बसलेली बस स्टॉपवर?
रेशमा : काय करणार? बरं नाही, अर्जंट भेटायला ये असा आईचा फोन आला. म्हणून मिळेल त्या बसने आले शिवापूरवरून..एकटीने पुढे चालत जायला धीर होईना म्हणून थांबले होते. म्हटलं शेवटच्या बसमधून येईलच कुणी. त्याच्या सोबतीने जायचं गावात म्हणून थांबले होते. नशिबाने तू भेटलास..नाही तर धीर करून निघणार होतेच.
आदित्य : मी भरवशाचा वाटतोय का? तीच्या थोडं जवळ येत त्याने विचारलं.
तसं ती अंग चोरून चटकन बाजूला झाली. ए लांब रहा हा माझ्यापासून. नाहीतर ओरडेन मी..
आदित्य : ओरड. बघू कोण येतं तूझ्या मदतीला?
आता मात्र रेशमाच्या तोंडून शब्द येत नव्हता. आपण फसलो असं काही क्षणापुरतं तीला वाटून गेलं..
तीची अवस्था पाहून आदित्यला हसू आलं. तीचा घाबरलेला चेहरा पाहून तो सॉरी बोलू लागला… आपल्याला तसला कुठलाही धोका नाही ह्या जाणीवेने तीला हायसं वाटलं. अजून थोडा लटका राग होताच मात्र..
आदित्य : तूझ्या घरी अजून कोण कोण राहतं आई शिवाय?
रेशमा : तुला काय करायचं आहे? रागाचं नाटक पुढे चालू ठेवत ती म्हणाली.
आदित्य : सांग की.. आणि तुला आधी कधी गावात पाहिल्याचं आठवत नाही.
रेशमा : गावातल्या सगळ्या मुलींना ओळखतॊसच जणू तू.
आदित्य : हो ओळखतॊच. आणि त्या पोरीदेखील मला ओळखतात..
रेशमा : हा… सिनेमाच हिरोच नाही का तू?
आदित्य : नाही दिसत का मी हिरो सारखा?
रेशमा : तू गावात राहत असशील असं वाटत नाही तुझ्या कपड्याकडे पाहून..
आदित्य : मी नोकरीसाठी बाहेर असतो.. महिन्यातून एकदा घरी येतो आई तात्यांना भेटायला. तुला कधी पाहिलं नाही मी आधी. सांग की तूझ्याबद्दल..
बोलता बोलता रस्ता कसा संपला कळलंच नाही. रस्त्यावर अंधार असला तरी स्वच्छ चांदणं पडलं होतं. दोघं एकमेकां बरोबर बोलत बोलत पोचले देखील…आदित्यचं घर आलं.
हे बघ माझं घर आलं. आदित्य रेशमाला म्हणाला.
पण इतक्यात त्याच्या लक्षात आलं, रेशमाचं घर पुढच्याच गल्लीत आहे म्हणाली होती ती. तीला एकटं कसं जाऊ द्यायचं?
आदित्य : चल मी तुला सोडायला येतो घरापर्यंत..
रेशमा : नको जाईन मी. म्हणत ती निघाली देखील.
आदित्य : अगं थांब रेशमा. त्याने पाठून आवाज दिला.
त्याचा आवाज ऐकून तात्यानी दार उघडलं.
तात्या : अरे कुणाशी बोलतोय?
आदित्य : तात्या ती रेशमा… पुढच्या गल्लीत राहणारी….
तात्या : तू ये घरात.. गेली असेल ती.
आदित्यने वळून पाहिलं. बाहेर आता खरंच सामसूम होती. एवढ्या लवकर रेशमा गेली सुद्धा याचंच त्याला नवल वाटलं.
घरात येऊन त्याने हात पाय धुतले, थोडं पाणी प्यायलं आणि गादीवर अंग टाकलं. रात्री रेशमाचीच स्वप्नं पडली. हे वेगळं सांगायला नकोच.
डायरेक्ट सकाळी त्याला जाग आली.. आई तात्या चुलीजवळ बसून हळूहळू काही बोलत होते..
तात्या : आदित्यला रात्री ती दिसली म्हणे?
आई : अरे देवा… तरी मी तुम्हाला सांगत होते. त्याला सांगा मुद्दाम पौर्णिमेचं गावात येऊ नकोस.
तात्या : पण त्याला सांगून पटलं असतं का? पौर्णिमेला ती दिसते कुणाकुणाला असं..
आदित्य : ती दिसते म्हणजे? म्हणजे काय तात्या?
तात्या : अरे घाबरू नको लेकरा.. ती बऱ्याच लोकांना दिसते अशी अवस पौर्णिमेला. पण ती काही करत नाही .. ती गावापर्यंत सोबत करते रात्रीची.. पण कुणाला त्रास नाही देत..
आदित्य आता मनातून खूप घाबरला होता.
आदित्य : ती म्हणजे कोण?
आई : अरे पोरा गावात असं बोललं जातं कुणी एक बाई रात्री वेगवेगळ्या रूपात कुणाकुणाला दिसते. ती कुणाला त्रास नाही देत. पण कुणी तीची आगळीक केली तर मात्र त्याची काय खैर नसते. तू नाही ना काही तीला त्रास वगैरे दिलास? माझा तूझ्यावर विश्वास आहेच म्हणा.
नाही नाही मी काही नाही केलं.. मी काही नाही केलं. आदित्य स्वतःशीच बडबडत अंथरुणात येऊन पडला..
आपण एका सुंदर मुलीला सोबत करतोय ह्या भ्रमात होतो.. रात्रभर तीच्या सोबत स्वप्नं रंगवली आणि प्रत्यक्षात एका भुतानेच आपल्याला सोबत (Concomitance | Company) दिली.. नुसत्या विचारानेच आदित्यला फणफणून ताप भरला.
समाप्त
-© राजेंद्र भट
सोबत | Concomitance | Company हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
सोबत | Concomitance | Company – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.