Conductor

कंडक्टर | Conductor

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Conductor

कंडक्टर (Conductor) ….खरंच हे ग्रेट आहे

आज बऱ्याच दिवसांनंतर बार्शी ते पांगरी असा एस. टी. चा प्रवास केला. अख्खा संसार डोक्यावर, तर कुणी खांद्यावर घेऊन चाललेली अनेक नानाविध माणसं इथे मला पाहायला आणि अनुभवायला मिळतात. आजचाही अनुभव असाच काहीसा होता. अहमदपूर डेपोच्या गाडीत बार्शीहून बसलो. रविवार असल्याने गाडी हाऊसफुल्ल झालेली. त्यातच गाडीच्या दारातून माणसंच पुढे जात नव्हती. मला वाटले, आता कंडक्टर येऊन तणतण करतोय की काय; पण झाले उलटेच!

त्या दरवाज्यातून काका, मामा, दादा थोडी जागा द्या! असं म्हणत एक ऐन पंचविशीतले कंडक्टर गाडीत चढले.गाडी तर माणसांनी भरून वाहत होती. अशात कंडक्टर सीट तरी थोडीच रिकामी राहणार? तिथेपण एक आजीबाई, आजोबा आणि ताई बसलेल्या! कंडक्टरला बघून त्या उठू लागल्या. तेवढ्यात कंडक्टर बोलले, “बसा आज्जी, मी उभा राहतो”.

मी पण दरवाज्याजवळच एक हात अँगलला धरून उभाच होतो. साहेब पांगरीला किती तिकीट हाय ? मी विचारले. मशीनवर बटने दाबून लगेच तिकीट फाडून ते म्हणाले, “द्या तेवीस रूपये”! माझ्याकडे तर बरोब्बर बावीस रूपयेच होते. एक रूपया शोधून सापडेना! तेव्हा कंडक्टर मला म्हणाले, “राहू द्या, नसला तर मी भरतो”!

त्यांच्या या उत्तराचे मला फार कौतुक वाटले. खरं म्हणजे कंडक्टरची नोकरी अंगाचा खुळखुळा आणि डोक्याचे दही करणारी; अशातही संयम ठेऊन आनंदाने कार्य करणाऱ्या एका युवा कंडक्टरला पाहून मी सुखावलो. एकूणच प्रवाशांना मदत करण्याची त्यांची वृत्ती वीस किलोमीटरच्या प्रवासात जाणवली. इथून तिथून माझ्यासोबतच उभे राहिलेले कंडक्टर साहेब घारीत एक जागा झाल्यावरच बसले. पांगरीत गाडी आल्यावर मी उतरताना “साहेब, एक सेल्फी काढू द्याल का, तुमच्या सोबत” असे विचारल्यावर गाडीतले सर्व प्रवासी माझ्या तोंडाकडे टकामका बघायला लागले!

मी सर्वांना सांगितले, “असे कंडक्टरच देशाला कंडक्ट करत आहेत. मला यांच्याबद्दल अभिमान वाटतो, म्हणून सेल्फी काढतोय!” सेल्फी काढताना प्रवाशांनी वाजवलेल्या टाळ्या आणि कंडक्टर साहेबांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून प्रवासाचा शीण निघून गेला. गाडीतून खाली उतरून दरवाजा ढकलला, तोच दरवाज्या शेजारील खिडकीतून कंडक्टर साहेबांना आनंदाश्रू पुसताना पाहिले. आजवरच्या माझ्या जीवन प्रवासात असाच आनंद देत-घेत आलोय म्हणूनच या प्रेमाचा हकदार झालोय!

भारत महासत्ता होईल तेव्हा होईल, पण आजवरच्या भारताच्या जडणघडणीत एस. टी. ड्रायव्हर, कंडक्टर आणि ट्रक ड्रायव्हर, क्लीनर्सचे खूप मोठे योगदान आहे. आजही रोज अर्ध्याहून जास्त ग्रामीण भारत यांच्याच जीवावर इकडून तिकडं अन् तिकडून इकडं फिरतोय. परंतु चतुर्थ श्रेणीतल्या या लोकांना हिरो म्हणायला अजूनही आमच्या सिस्टीमचा ईगो कमी नाही झालेला!
तुटपुंज्या पगारावर रोज हजारो माणसांचे बोलणे खायचे, खड्ड्यांतून गाडीचे हेलखावे खायचे, जर हिशोबात काही गोंधळ झाला, तर वरिष्ठांच्या कारवाईचे ओझे पण वाहायचे आणि यातूनही प्रवासी देवो भवः म्हणायचे! खरंच हे ग्रेट आहे.

विषय एक रुपयाच्या मदतीचा नव्हता, ती करण्यामागच्या वृत्तीचा होता.
विषय सीटवर बसण्याचा नव्हता, तर बसलेल्यांना न उठवण्याचा होता.
विषय हक्काच्या जागेचा नव्हता, तर हक्काची जागा गरजूंना दिल्याचा होता.
विषय तिकिटाचा नव्हता, तर ते तिकीट हातात देताना केलेल्या स्मितहास्याचा होता.
विषय सेल्फीचा नव्हता, तर आपल्यासाठी कष्ट उपसणाऱ्या नोकरदारांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा होता.विषय फक्त कंडक्टरचा नव्हता, तर एका माणसाच्या माणुसकीचा होता!

कंडक्टर | Conductor हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

कंडक्टर | Conductor – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share कंडक्टर | Conductor

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.