Credit to Shravanbala

क्रेडिट श्रावणबाळाचं | Credit to Shravanbala

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Credit to Shravanbala

प्रसंग-१

सासू-सासरयांचं प्रवासाला निघणं पाचेक दिवसांवर आलंय त्याची आठवण करायला म्हणून अनितानं नवरयाला फोन लावला,

“हॅलो अजय, आई-अप्पांची तिकिट्स बुक केलीस का? ते हैराण होतील हं उशीर झाला तर “

“अर्रे, लक्षातच नाही आणि मी रमी ग्रुपच्या मित्रांना प्राॅमिस करून बसलो,’उद्याच्या ट्रीपला तुम्हाला जाॅईन होतो’ म्हणून ! जरा तुझ्या आॅफिसच्या नेहेमीच्या एजंटला सांगून बुक करून टाक नं !”

नविन नविन लग्न झालं होतं ‘बाॅल’ आपल्याच कोर्टात येऊन पडला हे लक्षातच नाही आलं अनिताच्या !

दुसरया दिवशी सकाळी लवकरच ट्रीपला निघून गेला अजय. अनिता आॅफिसला जायच्या आधी तिकिटस् सासू-सासरयांच्या हातात ठेवत असतानाच अजयचाही फोन आला आणि

मग माय-लेक गप्पात रमले.

“ट्रीपला गेलाय तरी आपल्या बुकींगची व्यवस्था करूनच ! सग्गळं कसं लक्षात ठेवून प्लॅन केलेलं असतं अजयचं !बाहेर गेलाय तरी बारीक लक्ष असतं.”

सासरयांजवळ अजयबद्दल कौतुकाने बोलतांना लागलेला सासूबाईंचा मधाळ सूर आॅफिसला जायला निघालेल्या अनिताच्या कानावर पडला अन् हिरमुसून गेली ती

नाही म्हटलं तरी !

सहाजिकच होतं,

तिने करून दिलेल्या आठवणींचं महत्त्व आणि केलेल्या बुकींगने कावड तर बॅलन्स झाली अजय-श्रावण बाळाची

पण..कावडीखालचा खांदा उपेक्षितच राहून गेला.

प्रसंग-२

“शुभदा मामी एकदम साॅल्लीड आहे ही गिफ्ट ! खूप आवडली.”

जय ने, शुभदाच्या नणंदेच्या मुलाने एकदम खूश होऊन पावती देऊन टाकली.

“अरे, एकापाठोपाठ एक मिटिंग्ज लागल्यामुळे येऊ शकला नाही शशीमामा बर्थडे ला पण त्याचं गिफ्ट सिलेक्शन एकदम भारी असतं हं !तुला विश करायला फोन येईलच त्याचा “

शुभदाच्या सासूबाईंची एकदम ठाशीव प्रतिक्रिया गेलीच नि सूरात लेकाबद्दलचा अभिमान ठासून भरलेला !!

खरंतर शुभदा खूप थकलेली असूनही गिफ्ट खरेदी करण्यापासून, स्वत:च्या लेकीला शाळेतून आणून तयार करण्यापासून ते सासू-सासरयांना नणंदेकडे बर्थडे सेलिब्रेशनला नेऊन आणण्यापर्यंतच्या सग्गळ्या जबाबदारयांची कावड पडलीच नं तिच्या खांद्यावर ! अगदी ‘वन्संना मदत करण्यासह !!

श्रावणबाळ मात्र एका फोन काॅलवर क्रेडिट घेऊन गेला.

प्रसंग-३

सकाळी देव-पूजा करतांना ताम्हन धुवायला म्हणून तात्या वळले नि धाडकन खालीच कोसळले. बॅंक हाॅलिडे असल्याने सुदैवाने त्यांची सून नेहा आणि नात दोघी घरात होत्या. दोघीनी मिळून पटकन तात्यांना बेडवर नेलं. नेहाने लगबगीने डाॅक्टरांना फोन लावला. पाठोपाठ ही गोष्ट नवरयाच्या कानावर घालावी म्हणून त्यालाही फोन लावला. बावरलेल्या तात्यांना नि सासूबाईना सावरायला

पटकन सरबत करून देऊन होतंय तोवर डाॅक्टरांचं आगमन झाल्याने त्यांची सरबराई !!

त्यानंर डाॅक्टरांनी केलेलं निदान , औषधाच्या गोळ्यांच्या वेळा हे सगळं समजाऊन घेण्यात, सुटसुटीत सुट्टी जायच्या ऐवजी नेहाचा अर्ध्याच्यावर दिवस एकदम व्यस्त गेला.

साधारण दीडेक तासात ‘तात्या’ पडल्याची बातमी नेहाच्या दोन्ही नणंदांपर्यंत पोचलीच.

पहिल्या सगळ्या गोष्टींची उस्तवार होऊन नेहा थोडा आराम करायला जाणार इतक्यात, गोळ्यांसाठीचा प्लॅनर आणि डाॅक्टरांनी दिलेल्या एकप्रकारच्या दुर्मिळ गोळ्यांसकट नवरोबा अन् आपापल्या सोई-सवडी नुसार नणंदा अन् जव्वळचे तीनेक नातेवाईक समाचाराला हजर !

“तात्या, सगळ्या गोळ्या ‘day and time wise’ अरेंज करून तुमच्या सहज हाताशी लागतील अशा ठेवल्यायत”

नेहाच्या नवरोबाचं हे म्हणणं ऐकून नणंदेची प्रतिक्रिया आलीच लगेच,

“दादा, तू कम्माल आहेस ! तुझी सिस्टिम आणि प्लॅनिंग म्हंजे तात्यांच्या औयधोपचाराची काळजीच नाही”,

भावा-बहिणीचे हे संवाद नवरयाच्यावतीने कावड हाकणारया अाणि

कीचनमध्ये सर्व आल्यागेल्यांचं करण्यात व्यस्त असलेल्या नेहाला

ऐकू येत होते. पण..

सक्काळपासूनच्या धावपळीच्या अन् मॅनेजमेंटच्या साध्या ‘पोचपावती’ ला आतुरलेले तिचे कान मात्र वंचितच राह्यले.

श्रावणबाळाची कथा नि बाळही वर्षानुवर्ष लोकप्रिय आहेत. घराघरात श्रावण बाळ निपजतील तर आनंदच आहे.

पण…..

कथेतल्या श्रावण बाळाचं लग्न झाल्याचं ऐकिवात नाही अन् प्रत्यक्षातल्या श्रावणबाळांचं लग्न लागल्याशिवाय त्यांच्या आयांना चैन पडत नाही.

अन् मग

बायकोच्या खांद्यावरून कावड हाकून ‘श्रावण-बाळा’चं क्रेडिट (Credit to Shravanbala)

मिरवणारा वर्ग सहज तयार होतो.

अपवाद असतीलही, परंतु अशा “श्रावण-सौं”ची बाजू मांडाविशी वाटली म्हणून हे लेखन !!

क्रेडिट श्रावणबाळाचं | Credit to Shravanbala – अनुजा बर्वे

क्रेडिट श्रावणबाळाचं | Credit to Shravanbala हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

क्रेडिट श्रावणबाळाचं | Credit to Shravanbala – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share क्रेडिट श्रावणबाळाचं | Credit to Shravanbala

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO