पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
The Price of the Wife
रात्री फार उकडत होतं. किशोर फार दिवसांनी रात्री पाय मोकळे करायला बाहेर पडला. शेजारच्या ब्लाॅकमधला अरुण भाटिया त्याला वाटेत भेटला. दोघे गप्पा मारत चालू लागले. अरुण म्हणाला,” किशोर, परवा दिवशी पहाटे मी आणि शर्मिला बाहेर जाणार आहोत. मुलं सासुरवाडीला ठेवणार आहोत. फक्त जरा घराकडं लक्ष ठेव. वहिनी असतातच ना घरात..”
” हो.. पण मध्येच कुठं निघाला आहात?” किशोरनं विचारलं.
” अरे, जरा बदल म्हणून शर्मिलाला घेऊन जातो आहे. तापोळा, भिलार महाबळेश्वर. चार पाच दिवस नाही आता” अरुण म्हणाला.
” मध्येच कसं काय ठरवलं? तुमची प्राॅपर्टीची कामं झाली की नाही? बाबांना जाऊन तीन आठवडे झाले ना!!!” किशोर म्हणाला.त्याचा सूर ओळखून अरुण हसला. बाबांना जाऊन तीन आठवडे झाले आणि हे काय बायकोला घेऊन हिंडायला निघाला हा…अशा सुरात किशोर बोलला ते समजलं अरुणला.
” अरे, झालंय ते. आता एक सही केली की काम झालं. पण बाबांच्या आजारपणात शर्मिलाची फार ओढाताण झाली रे. सतत त्यांचं औषध पाणी, पथ्य, माणसांचं येणं जाणं. फार करावं लागलं तिला. नुसता पैसा असला तर होतं असं नाही. सेवा करायची तर माणूस हवं. बाबा गेले नी ते पंधरा दिवस पुन्हा भरलेलं घर. सगळी क्रियाकर्मं घरच्या बाईवर किती लोड येतो कामाचा. आता सगळं आवरलं तर थोडं तिलाही निवांतपणा देऊया. माझ्या बाबांचं तिनं चार महिने सारं केलं.. मी चार दिवस तिच्यासाठी दिले तर बिघडलं कुठे?”अरुण म्हणाला.
किशोर घरी आला. अनुराधानं अंथरुणं घातली होती. मोबाईलवर काहीतरी वाचत पडलेल्या अनुराधानं त्याच्याकडं एकदा पाहीले नी पुन्हा मोबाईल मध्ये वाचण्यात बुडून गेली. आताशी अनुराधा असंच करते. आपल्याशी कमीत कमी बोलते आहे. संवादच काय विसंवाद सुध्दा बंद केले आहेत तिनं. पूर्वी ती नव्हती अशी. समरसून करायची सारं. आपणच तिला हाडतुड करायचो. पण ते मनावर न घेता पुन्हा काही बोलायला यायची. काहीतरी सांगायची. पण आताशी हे सारं टाळते असं वाटतं.
” अनु….” त्यानं हाक मारली. तिनं मोबाईल बाजूला केला.
” हं…बोला.” त्यातला अलिप्तपणा त्याला बोचलाच थोडा.
” आत्ता बाहेर अरुण भाटिया भेटला होता. शर्मिला आणि तो बाहेर जाणार आहेत. चार पाच दिवस. जरा लक्ष ठेव घराकडं म्हणत होता”
“बरं” असं म्हणून अनुराधाने पुन्हा मोबाईल घेतला.
” का जाणार आहेत विचारलं नाहीस”
” मला माहीत आहे.. शर्मिलानं सांगितलं आहे मला. बाबांच्या आजारपणात, ते गेल्यावर तिला झालेल्या दमणूकीतून जरा बदल म्हणून ते जाणार आहेत.” अनुराधा कोरडेपणाने म्हणाली. परत तिनं मोबाईल मध्ये डोकं घातलं आणि किशोरला फार एकाकी वाटू लागलं
गेल्या वर्षीची अनुराधा आठवली त्याला. कशी रसरशीत होती. सगळं हौसेने करायची. आईच्या आजारपणात तिनं खरोखर शिस्तीनं केलं होतं तिचं. आई इतकी रडली होती..अनु मी फार त्रास दिला तुला, पण काही मनात न ठेवता किती प्रेमानं केलंस माझं. सतत तिला आईच्या उशा पायथ्याशी थांबावं लागायचं. अनुराधा आपल्या बेडरूममध्ये येतच नव्हती. सतत आईच्या सेवेत रुजू. आईच्या औषधांच्या वेळा, जेवणातलं पथ्यपाणी, येणारी जाणारी माणसं..त्यांचं अगत्य..काही काही कमी केलं नाही तिनं. चार दिवस ताई माहेरी आली नी मग थोडी उसंत मिळाली तिला.
. ताईला तिची कुचंबणा समजत होती. सतत आईच्या भोवती रहाताना आपलं बायको म्हणून किशोरकडं दुर्लक्ष होतं आहे असं तिचं वाटणं.. मुलांवर कधीतरी होणारी चिडचिड, तिची दमणूक. मधूनच आईचं दुखण्यामुळं चिडचिड करणं यांचा अनुराधाला त्रास व्हायचा. ते जाणवताच एक दिवस तिनं जेवताना विषय काढला.
” वहिनी, तू आराम कर थोडा. दादा सोबत कुठंतरी जाऊन ये तासभर. जरासा विरंगुळा होईल तुला.किती करावं लागतं तुला. खरंच जाऊन या. मी आहे आईजवळ.” असं तिनं सांगितलं.
बिचारी अनुराधा… त्यादिवशी स्वयंपाक करताना तिनं किशोरला व्हाॅटस्अपवर मेसेज केला,”आपण कुठंतरी जाऊन येऊया का जवळच्या जवळ”
किशोरला ते इतकं मुर्खपणाचं वाटलं. लग्नाला वीस वर्षं झाली आहेत आणि अनुराधा बाहेर जाऊ म्हणतेय. त्यानं उत्तर द्यायची सुध्दा तसदी घेतली नाही. अनुराधा खूपवेळ उत्तराची वाट पहात होती. किशोरनं लक्षही नाही दिलं.
दोन दिवसांनी सगळ्यांसमोर तिच्यावर कडाडला,” कशाला मला व्हाॅटस्अपवर मेसेज करतेस गं? इकडं जाऊया नी तिकडं जाऊया..”
अनुराधा इतकी वरमली. त्यांच्यातील पर्सनल गोष्ट किशोरला अशी चारचौघात बोलायची काय गरज होती.. मग तिनं ओठ घट्ट मिटले. दोन महीन्यात आई गेली. किती ताण आला होता अनुराधावर. आईचे दिवसकार्य झाल्यावर पंधरा दिवस ती माहेरी निघून गेली. किशोर तिच्या फोनची वाट पहात होता. पण ना तिनं फोन केला ना मेसेज. कितीदा ती आॅनलाईन दिसायची पण मेसेज बाॅक्स मोकळाच असायचा. मग त्यानंच फोन केला. अनुराधा बोलली पण त्या बोलण्यात जीव नव्हता. कोरडं कोरडं होतं ते बोलणं. परत आली पण तिनं एकंदरीत किशोरपासून अलिप्त राहणं पसंत केलं
आज अरुण भेटला नी हे सारं किशोरला आठवलं.आपण अनुराधा वर अन्याय केला काय? त्यादिवशी तासभर नेलं असतं तर काय बिघडलं असतं? आणि तिच्या मेसेजेस बद्दल पट्कन सगळ्यांसमोर बोलायला नको होतं ..तिला लग्न करुन आणलं म्हणजे तिनं काहीही तक्रार न करता आपल्या माणसांची सेवा करायलाच हवी आणि आपल्याकडंही काहीही मागायचं नाही.. आपल्याला काहीही सांगायचं नाही अशी आपण अपेक्षा ठेवली. तिला समजून घ्यायला फार उशीर झाला का!!!
एखादी गोष्ट कधीच न मिळण्यापेक्षा उशिरा मिळाली म्हणून बिघडत नाही..हे मनाची समजूत काढायला ठिक वाटतं पण ते सगळीकडं लागू होत नाही. माणूस आहे तोवरच त्याला समजून घ्या. त्याची कदर करा. नाती जपा, ती कौटुंबिक असोत, मित्र मैत्रिणींसोबत असोत, सहकाऱ्यांसमवेत असोत किंवा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसोबत असोत.कदर करा.वेळेत करा. कारण नंतर उरतो तो फक्त पश्चाताप.
कधी कधी आयुष्य तो पश्चाताप करायला ही वेळ देत नाही नी नंतर त्याला अर्थ रहात नाही. खूपदा माणूस तुमचं वागणं, जिव्हारी लागेल असं बोलणं सहन करत असतो कारण त्यांची काहीतरी विवशता असते. कधी आर्थिक, कधी मानसिक, कधी शारीरिक. पण एकदा का अंतःकरणातील झरे आटले की परतीची वाट उरत नाही आणि त्यावेळी जो उशिराचा परीणाम होतो तो फार भयंकर होतो… वेळीच सावरा आणि नाती फुलवा. थोड्याशा प्रेमाच्या फुंकरीनं मोठ्या मोठ्या जखमा भरून येतात…ती फुंकर घालायला उशीर करु नका!!!
अज्ञात लेखकास सादर समर्पित..
बायको ची किंमत | The Price of the Wife हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
बायको ची किंमत | The Price of the Wife – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “बायको ची किंमत | The Price of the Wife”