Mobile
पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Mobile

श्री भ.रा.नाईकसर,किर्लोस्करवाडीच्या शाळेतले माझे मुख्याध्यापक. माझ्या बाबांचे मित्र. आम्हा कुटुंबियांचे हितचिंतक. माझं सांगलीतलं वास्तव्य आणि शिवाय ते साहित्य प्रेमी म्हणून इतक्या वर्षांनंतरही आमचा संपर्क राहू शकला. त्यांच्याशी आकस्मिक झालेल्या भेटी आणि त्या अल्पकाळात होणाऱ्या चर्चा म्हणजे माझ्यासाठी सत्संगच असायचा. नकळत प्रकाश दाखवणारा.. विचारांना नेमकी दिशा देणारा..!

एक दिवस अशीच अचानक दारावरची बेल वाजली. दारात नाईकसर. दुटांगी स्वच्छ शुभ्र धोतर.वर नेहरुशर्ट. वयोमानामुळे दिसणाऱ्या थकावटीपेक्षा चेहऱ्यावरचं प्रसन्न सात्विक हसूच नजरेत भरायचं.

“पंधरा मिनिटे वेळ आहे ना रे तुला? की गडबडीत आहेस?” आत येण्यापूर्वीच त्यांनी विचारलं.

“तुमच्यासाठी वेळ नाही असं होईल कां सर?” मी हसतमुखानं स्वागत केलं.

” माझ्याकडे मोबाईल नाहीय ना रे. त्यामुळे तुला आधी कल्पना देता आली नाही. इथं सिटी हायस्कूलमधे संस्थेच्या मीटिंगसाठी आलोय रे. मी आपला वेळेत आलो खरा,पण सगळे जमायला अजून अर्धा तास तरी लागेल.नवी पिढी. नवे नियम. तथास्तु म्हणायचं न् पुढं जायचं. मग हा वेळ सत्कारणी लावावा म्हणून म्हटलं थोडावेळ तुझ्याशी बोलून जावं. तुझं घर जवळच आहे म्हणून आलो.भेटलास बरं झालं.”

मी बाहेरुन आरतीला सर आल्याचं सांगून चहा करायला सांगितलं.

“चहाबिहा कांही नको. आत्ता तेवढा वेळही नाहीय. आणि ती चहा करत बसली तर मी जे सांगणार आहे ते तिला कसं ऐकायला मिळेल? तिलाही बोलाव. कालच मला अस्वस्थ करून गेलेला प्रवासातला एक अनुभव सांगायचाय.नव्या पिढीची खूप काळजी वाटते रे. सगळं बोललो की मन थोडं हलकं होईल माझं.”

सर त्यांचं मन हलकं करून गेले आणि पुढे कितीतरी वेळ आम्ही मात्र ते बोलले त्याचाच विचार करीत राहिलो. तो त्यांचा अनुभव त्यांच्याच शब्दात…

“मी चार दिवसांसाठी पुण्याला गेलो होतो.काल सकाळी लवकरच्या बसने परतीच्या प्रवासाला निघालो.स्वारगेटला बसमधे फारशी गर्दी नव्हती. तरीही मी रिझर्वेशन केलं होतंच. मात्र हळुहळू बस भरू लागली.तरीही माझ्या शेजारची सीट रिकामीच होती.

कंडक्टरने बेल वाजवली तेवढ्यात पाठीवरची सॅक सावरत एक तरुण मुलगा बसमध्ये घुसला. धापा टाकत भिरभिरत्या नजरेने एखादी सीट रिकामी आहे का याचा तो अंदाज घेत होता.मी खूण करून त्याला बोलावले. तो झपाझप पुढे आला.सॅक वर ठेवून माझ्याजवळच्या सीटवर बसला. हातातला टाइम्स सीटसमोरच्या होल्डरमधे अडकवला. थोडा वेळ रिलॅक्स झाला.

मी काही विचारणार तेवढ्यात त्याने खिशातून मोबाईल काढला.आणि एकामागोमाग एक फोन करत राहिला. आधी बायकोला मग गावाकडच्या आई-बाबांना आणि मग सगळ्या मित्र-मैत्रिणींना. बस सुरू झाली होती. हा मात्र आपल्याच नादात.

मला त्याच्याशी बोलायचं होतं त्याच्या फोन वरच्या गप्पातून मला समजलं यानुसार तो आयटी कंपनीत पुण्याला नोकरीला. बायकोही तिथेच जॉब करणारी. याला अमेरिकेला जायचा चान्स आलेला होता.दोन दिवसांनी प्रस्थान.जाण्यापूर्वी आई-बाबांना भेटावं म्हणून तो सातारला निघालेला. नेमका माझ्या शेजारी आलेला.

त्याच्या या नव्या विश्वाबद्दल बरंच कांही जाणून घ्यायची मला उत्सुकता होती.पण त्याचा-माझा संवादच होत नव्हता.कंटाळून मग मी त्याला तो फोनवर बोलत असतानाच समोरचा पेपर घेऊ का असं विचारलं त्याने माझ्याकडे पाहून होकारार्थी मान हलवली आणि पुन्हा मोबाईलमधे गुंतला.मी तो पेपर घेतला खरा पण माझं पेपरमधे लक्षच लागेना.पेपर घडी करून ठेवून दिला.

सातारा स्टॅन्ड यायला पंधरा-वीस मिनिटं होती पण याला उतरायची घाई. त्याने मोबाईलवरचं बोलणं आवरतं घेतलं. उतरायची तयारी म्हणून वर ठेवलेली सॅक खाली घेतली. खिडकीबाहेर बघत अंदाज घेतलान्.आणि चुळबुळत बसून राहिला. आता सातारा स्टँड आलं की हा उठून जाणार.पुन्हा कधी भेटायचा प्रश्नच नाही. त्यामुळे माझ्या मनातलं मनातच रहाणार. मग मात्र मनातला संकोच बाजूला सारून मी त्याला म्हंटलं, ‘तुला राग येणार नसेल तर मला एक गोष्ट बोलायचीय.बोलू? ‘ त्याने संभ्रमित नजरेने माझ्याकडे पाहत ‘ काय ‘म्हणून विचारले.

‘ गेले जवळजवळ पावणेतीन तास तू तुझ्यापासून कितीतरी दूर असणाऱ्या पाच-पंचवीस जणांबरोबर भरभरून बोलत होतास पण तुझ्यापासून वीतभर अंतरावर असणाऱ्या माझ्याशी मात्र तू एकही शब्द बोललेला नाहीयेस हे लक्षात आलेय कां तुझ्या?”

तो चमकला.काय बोलावं त्याला सुचेचना.

” मला तुझ्या क्षेत्राबद्दल, तू केलेल्या संघर्षाबद्दल,तुमच्या पिढीपुढील आव्हानांबद्दल बरंच काही उत्कटतेनं जाणून घ्यायचं होतं. पण आपण दोघे जवळ असून सुद्धा दोन धृवावरच राहिलो ‘

तो कसनुसा हसला.’ साॅरी ‘ म्हणाला.एकदा माझ्याकडे चोरट्या नजरेने पाहून त्याने नजर चुकवली.आता मलाच त्याच्याशी कांही बोलावंसं वाटेना.तो जुलमाचा रामराम झाला असता.संवाद नाही.थोडी वाट पाहून त्याने मागे डोके टेकून डोळे मिटून घेतले,पण त्याची अस्वस्थता त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती.तो वेगळ्याच विवंचनेत असणंही साहजिक होतंच.

घरापासून सहा महिन्यांसाठी दूरदेशी निघाला होता तो. ही सोपी गोष्ट नव्हती. मग स्वतःच्या माणसांशीच बोलणार ना तो.माझ्यासारख्या ति-हाईताशी कां बोलावं त्यानं?मी ते स्वीकारलं. अगदी मनापासून स्विकारलं.खिडकीबाहेर पहात राहिलो.पण तो स्वस्थ नव्हताच.

” काका….तुम्ही मोकळेपणाने बोललात. थँक्स फॉर दॅट.”

“जाऊ दे. मी उगीच बोलून गेलो. फार महत्त्वाचं नाहीय अरे ते”मी त्याला दिलासा दिला.पण त्याने नकारार्थी मान हलवली. “महत्त्वाचं आहे.आज तुम्ही मला भेटला नसतात तर माझी चूक मला कधीच समजली नसती.माझ्या हातून एक फार भयंकर गुन्हा घडलाय काका…” स्वतःचीच समजूत घालावी तसा तो बोलू लागला.. “दोन वर्षांची छोटी गोड मुलगी आहे आमची. तिचा गुन्हेगार आहे मी.आम्हा दोघांचा जीव की प्राण आहे ती.

घरी येताना माझी बायको घरातलीच एक होऊन येते. पण मला मात्र ते कधीच जमत नाही. कितीही प्रयत्न केला तरी कामाचे विचार रात्रंदिवस माझ्या मनात ठाण मांडूनच बसलेले असतात. मला यायला कितीही उशीर झाला तरी माझी छोटी मुलगी माझी वाट पहात टक्क जागी असते.मी दारातून आत गेलो की धावत हात पसरुन माझ्याकडे येते.तिला उचलून घ्यायचं,तिचा पापा घ्यायचा की मगच ती झोपायला जाणार.तिचा हा नित्य नेमच. अगदी साधी गोष्ट पण तिच्यासाठी खूप मोलाची.पण ते मला कधी समजलंच नव्हतं.काल जाण्यापूर्वीची बरीच कामं हातावेगळी करीत घरी यायला रात्री मला अकरा वाजून गेले होते.

बायको दार उघडायला पुढे आली तर तिच्या मागोमाग पेंगुळलेले डोळे घेऊन आमची चिमणीसुद्धा.नेहमीसारखी ती हात पसरून दुडदुडत धावत आली.तेवढ्यात माझा मोबाईल वाजला. मी तो तत्परतेने अटेंड केला, कारण तो महत्त्वाच्या सूचना देणारा, माझ्या बॉसचाच होता.मी तिला उचलून न घेता फोनवर बोलू लागताच तिने माझ्या पायाला घट्ट मिठी मारली. कपाळाला आठ्या घालून मी तिचे हात सोडवून तिला दूर केलं.तिने भोकाड पसरलं.

बायको तिला उचलून घेत आत जाऊ लागली तरीही कासावीस नजरेने माझ्याकडे पहात ती चिमुरडी पाय झाडत रडतच होती. या क्षणी मला वाटतंय, जाणवतंय.मी फोन होल्ड करुन तिला उचलून जवळ घेऊन तिचा पापा घ्यायला हवा होता. क्षणभरच गेला असता त्यात पण मी ते केलं नव्हतं.मला सुचलंच नव्हतं.त्याची गरजच वाटली नव्हती.आज वाटतेय. तुमच्या बोलण्यातून तिव्रतेने ते जाणवतेय.खूप गिल्टी वाटतंय मला तिच्याबद्दल.. आणि.. तुमच्याबद्दलही.आय एम एक्स्ट्रीमली सॉरी…!!”…. त्याचा आवाज भरुन आला तसा तो बोलायचा थांबला.

मला काय बोलावं समजेना. ऐकून मीही अस्वस्थ झालो होतो. सातारा येताच तो माझे आभार मानून निघून गेला खरा पण तेव्हापासून माझ्या मनात मात्र ठाण मांडून बसलाय. जोरदार वळण घेऊन बस सातारा स्टॅन्ड मधून बाहेर पडत असताना कोपऱ्यावरच ऊंचावर टांगलेल्या मोबाईलच्या भल्यामोठ्या जाहिरातीने माझे लक्ष वेधून घेतले होते.’ We connect the people ‘ हा त्या जाहिरातीतला कंपनीचा दावा आपणच खोटा ठरवतोय का? हा प्रश्न मला त्रास देत राहिलाय. आत्ता तुझ्याशी सगळं बोललो. बरं वाटलं.”

सर आवर्जून येऊन सहजच हे सगळं बोलून गेले ते मला अस्वस्थ करुनच.

©अरविंद लिमये, सांगली

मोबाईल | Mobile हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

मोबाईल | Mobile – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share मोबाईल | Mobile

You may also like

9 thoughts on “मोबाईल | Mobile

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO