पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Nonverbal Communication/Conversation without words
त्या दिवशी कुठेतरी जात होतो. असाच पैदल. इतक्यात एक गाडी वेगाने एका दुचाकिवाल्याला लगटून गेला. अगदी दोन इंच जवळून. भडकून दुचाकीवाला भांडायला आला. गाडीची काच वर होती. त्याने अंगठा आकाश्याच्या दिशेने उडवत ‘पियेला है क्या ‘ अश्या अर्थाची खूण केली. आता गाडीवाल्याने काच खाली केली. दोघांचं पेटणार होत. मला त्या गाडीवाल्याने ‘क्या बोला वो’ अस विचारलं. मी काही नाही तुमचं गाडी चालवण्याचे कौशल्य बघून तुम्हाला थम्स अप दिलं आहे असं सांगितलं.
गाडीवाला निवळला. त्यानें सुद्धा हसून दुचाकीवाल्याला अंगठ्याने थम्स अप दिलं , दिलगिरी व्यक्त केली आणि निघून गेला. दुचाकीवाला सुद्धा शांत झाला त्याने सुद्धा मोठ्या मनाने माफी दिली आणि काही हरकत नाही अश्या अर्थाचा हात केला. एरवी अर्थाचा अनर्थ होतो पण तेंव्हा नेमका अनर्थाचा अर्थ झाला.शारीरिक आणि मानसिक हिंसा टळली. दोघांचं शब्देविण संवाद झाला.
असा अनेकदा शब्देविण संवाद घडतो. मुलगा जेवण चिवडत असताना आईला नेमकं कळतं आणि आई भातावर मुलाच्या आवडीची सोलकढी वाढते किंवा हळूच पानावर गरम गरम बटाट्याची कचऱ्याची फोड वाढते. आणि जेवण एकदम ताल पकडते. मुलगा काही सांगत नाही आई काही विचारत नाही पण संवाद घडतो.
दोन मित्र कुठेतरी भणंग भटकत असतात. पाऊस सुरू होऊ लागतो. एक मित्र दुसऱ्याकडे फक्त बघतो आणि दोघजण चहाच्या टपरी च्या दिशेने सरकतात. लोकल गाडीत गर्दी असते. कुणा उभ्या राहिलेल्याचे पाय भरून आलेले असतात. ते जाणवून एकजण उतरायचे नसतानाही हळूच उठतो आणि बसायला जागा करून देतो. मधल्या दोघांना कसं कळत माहीत नाही पण ते दोघे रिकाम्या जागेवर बसत नाहीत.त्या प्रवाश्याला जायला जागा करून देतात. तो नुकताच जागा मिळालेला प्रवासी आभाराच हसतो. तिघेही जण आभार स्वीकारतात. शब्देविण संवाद घडतो. फक्त संवाद नाही तर सुसंवाद.
आजीने खूप दिवसाने नातवाला बघितलं असतं. नेमकं घरात खायला सुक काही नसत. आजी चक्क टोमॅटो च्या चकत्या करते त्यावर साखर भुरभुरावते आणि नातवा समोर धरते. नातू आनंदाने ते खाऊ लागतो. आजी नातवाला प्रेमाने कुरवाळत रहाते. तिच्या हातावरच्या प्रत्येक सुरुकुत्यामध्ये अथांग प्रेम भरलेल असत. डोळे किंचित ओलावले असतात. बोलत कुणीच नाही शब्देविण संवाद मात्र धबधबा कोसळावा तसा कोसळत असतो.
-©केदार अनंत साखरदांडे
शब्देविण संवादू | Nonverbal Communication/Conversation without words हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
शब्देविण संवादू | Nonverbal Communication/Conversation without words – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “शब्देविण संवादू | Nonverbal Communication/Conversation without words”