पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Damadi Balbharti
अडीच-तीन वाजण्याची वेळ. बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एक सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे चिंचेचे एक विस्तीर्ण झाड होते. त्याच्याखाली दमडी निजली होती. त्या झाडाच्या वाकड्यातिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते. धुळीने धूसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळावरून गालांवर लोंबल्या होत्या. झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस असूनही दिसत नव्हते. गालांची तर नुसती हाडे दिसत होती. हाडकुळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या चोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती; कमरेला अर्धे-मुर्धे , विटके लुगडे गुंडाळले असते आणि तिने त्याचा कसाबसा काचा खोचला होता. तिने आपले दहा-बारा वर्षांचे पोरसवदा अंग जमिनीवर टाकून दिले होते. तिच्याकडे पहिले तर वाटावे, की ही केव्हाची गाढ झोपी गेली असावी. पण तसे नव्हते. तिने काही क्षणांपूर्वीच अंग टाकले होते. बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती.
आपल्या आजी बरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरण्यात गेली होती. तिच्या कमरेएवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती. सोनेगावजवळच्या वावरात त्या वेळी कुणी चिटपाखरूही नव्हते. तिच्या आजीच्या सप सप चालणाऱ्या विळ्याचाच आवाज त्या शांततेचा भंग करत होता. मधूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी. चांगले दोन-अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते. ते ओल्या गवताचे लवलवते भारे डोक्यावर घेऊ त्या दोघी निघाल्या होत्या. दोन-अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी जेलचे नाके दिसले, अन अखेर बाजार…
तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती. मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली. हातपाय धुऊन भाकरी खायला बसली. एवढेसे तुकडे चघळत ती भाकरी खात होती. ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी. जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती.
अर्रर्रर्र… केवढ्या भर्रर्रर्रदिशी धावतात या मोटारी ! अन फसदीशी पाणी उडवतात मेल्या… या भाजीवाल्या चालल्या. सोनेगावच्याच तर दिसतात या… हो तर काय ! ती नाही का गोप्याची माय… भल्ली भरली टोपली भेंड्यांनी ! हाऱ्याच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यान… जसे काय शिपाईच… त्या उडानखटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगिनी घेऊन तशा. अन त्या मोटारी तर अशा भारी… अवघा रस्ता भरून टाकतात; बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू… लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली निंबाच्या… रामा रामा… केवढा कलकलाट त्यांचा ! अडत्याशी झुंज घालतात जणू ! अहा ! काय न्यारा घमघमाट सुटलाय…
तिने मागे वळून पहिले. तिच्या पाठीशीच शेव-भजीवाल्याची राहुटी होती. शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने ! दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला. विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली. कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला. त्याने दोन पैसे दिले. कागदात मूठ भरून शेव घेतली. पलीकडेच चार हातांवर जाऊन तो खात बसला. दमडीने सावकाशपणे डोळे वळवले. आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पहिले व हळूच हात उचलून तोंडात घातला. तिच्या जिभेवर जणू शेवेचे तुकडे फिरत होते!
भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले. नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याचे ओघळ घळाघळा जाईतो ती ओंजळीने पाणी प्याली. फटकुरालाच हाततोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली. मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळांवर डोके ठेऊन झोपली. पाच मिनिटांतच तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली.
त्या स्वप्नात ती अखंड चालत होती. पावलामागून पाऊल टाकत होती. दृष्टीची झेप जाईल तिथवर तिला हिरवेगार गवतच दिसत होते. त्यातून वाट काढत, डोक्यावर जड, लांब भारा सावरत ती एकसारखी चालली होती. बरोबर आजी नव्हती, कुणीच नव्हते.
तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मजा ! तिच्या डोक्यावर गवत कुठे होते? काहीतरी लांब, पिवळे, कडक… गरम. त्याचाच सबंध भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता. अहाहा ! शेव ! खमंग, कुरकुरीत गरम शेव होती ती. तिच्या डोक्यावर होती. तिच्या हातानेच तिने धरली होती. त्यातली शेव खावी आपण. तिचा हात पुढे सरकला. पण लगेच भान आले, की डोक्यावरचा भारा दुसऱ्याच कोणाला द्यायचा असतो ना? त्या मुंडासेवाल्या बाबाला……. त्याच्याजवळ पैसे आहेत ना द्यायला.
दमडी (Damadi) निजली होती. एवढीही हालचाल होत नव्हती. तिच्या अंगावर चिंचेची पाने मधून मधून पडत होती. आकाशात ढगांची शिवाशिव चालली होती. वाऱ्याचे झोत येत-जात होते. मध्येच ऊन पडे, तर घटकेत वाटे, आता पाऊस कोसळणार. असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाने तिच्यावर बरसली. पण तिचा स्वप्नप्रवाह चालूच होता, ती पुन्हा चालत होती.
आता स्वप्नात एक थबथबलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता. पायांत गोळे आलेले… सगळीकडे अंधार. प्रत्येक पावलाबरोबर भोवताली सळसळणारे गवत. तेवढ्यातच तिला स्वप्नात आजी दिसली. तिच्या मागे जायचे ना? आजी तर फाटकातून आत चालली. चला चला. बंगल्यावर चंदी आहे वाटते ! दमडी फाटकातून आत शिरली. मागले दार उघडले गेले. दमडी (Damadi) भारा सावरीत गोठ्याकडे गेली. आजी भारे सोडत होती, तोवर दमडी (Damadi) गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली. पण तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली. रसरशीत निखारे पेटले होते. त्यांची ऊब तिच्या दृष्टीलादेखील जाणवत होती.
अरेच्या, कुणीतरी भाकरी भाजतंय वाटतं. अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता. तेवढ्यात तिच्यापेक्षा एखाददुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला, ‘ माझ्या भाकरीवर दूध पाहिजे, दूध !’ पाहूया तरी ! पण आजी तर फाटकातून बाहेर पडली, म्हणून दमडीही निघाली. आजी मागोमाग चालू लागली. अंधारातून….. गवतातून…..
आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले. सोनेगाव का ते? सोन्याचे गाव ! मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पायवाटेने वरवर चालली होती ती. मग शितळादेवीचे देऊळ लागले. पलीकडे मारुतीचे…… तो पाहा तो विठू, नारळ फोडतोय वाटतं तो तिथं… ‘मला दे की रे थोडं.’ ‘हो तर, तुझ्यासाठीच तर फोडतो.’ खोबऱ्याचा तुकडा, पांढरा स्वच्छ करकरीत. दाताखाली दाबला तर दूध निघतं नुसतं. दमडीने खोबरे घ्यायला हात चटकन पुढे केला. विठू म्हणत होता, ‘हो हो. हा सगळाच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे, दमडे. घे, सगळा घे, दमडे!’
पण त्याच वेळी ‘दमडे… दमडे…’ तिच्या आजीच्या हाका आल्या. भारे विकून, मीठ-मिरचीचा बाजार करून ती दमडीला (Damadi) उठवायला हाका मारीत होती. दमडी (Damadi) जागी झाली. पण डोळ्यांपुढे ते भाकरीचे, दुधाचे, खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते. क्षणभर पडल्या-पडल्याच ती आजीकडे पाहत राहिली. आजीने पुन्हा हाक मारली, ‘ दमडे, अशी काहून पाहतं ग? ऊठ नं आता?’ दमडी (Damadi) उठली. आपले भाकरीचे फटकूर झटकून घेतले व ती आता खरोखरच चालू लागली. शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली.
दीडदमडीचा चालत जीव तो… असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी…. आणि त्याच्या पुढल्याही.
क्रेडिट बालभारती