G. A. Kulkarni

जी ए कुलकर्णी | G. A. Kulkarni

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

G. A. Kulkarni

मराठीत कथा हा वाङ्मयप्रकार ज्यांना आवडतो त्या वाचकांसाठी जी ए कुलकर्णी (G. A. Kulkarni) हे नाव नवीन नाही. जी ए तसे ’कल्ट’ लेखक आहेत. ज्यांना जी ए लेखक म्हणून नाही आवडत त्यांना जीएंच्या कथेत एकसूरीपणा, नियतीशरणता, मानवी जीवनातील अपरिहार्य दुःखांचं माजवलेलं अवास्तव स्तोम जाणवत राहतं, तर ज्यांना जी ए आवडतात त्यांच्यासाठी ते जातिवंत कोलंबीयन ब्लॅक कॉफी सारखे असतात. साखर, दूध कशाचीही भेसळ नसलेलं, ओठ, तोंड, घसा भाजीत, पार पोटापर्यंत एक अखंड कडवट पेटती अग्निरेषा नेणारं पेय, ज्याची चव एकदा कळली की मग तुम्हाला परत परत त्याचेच घुटके घ्यावेसे वाटतात, आणि मग दुसरं कुठलंही पेय गुळमट तरी लागतं नाही तर बेचव तरी.

मी स्वतः जी ए पहिल्यांदा वाचले ते दहावीत असताना. माझ्या मावसभावाने काजळमाया हे जीएंचं पुस्तक मला भेट म्हणून दिलं. त्यातली पहिली गोष्ट वाचली आणि पुस्तक बंद करून पेटीत ठेवून दिलं. जीएंच्या गूढ, कायम दुःखाने, निराशेने काळवंडलेल्या व्यक्तिरेखा काही त्या काळात मला झेपण्यासारख्या नव्हत्याच. पण त्यांची लिहिण्याची शैली मात्र खोलवर भिडून गेली. जीएंचीच आवडती उपमा वापरायची तर एखाद्या जुन्या पेटीत नीट घडी करून ठेवलेली आजीची गर्भरेशमी पैठणी उलगडली की तिच्या पदरावरची अस्सल जर कशी आपले डोळे क्षणभरच, पण लखकन दिपवून जाते, तशी.

त्यानंतर बरीच वर्षे जी. ए हातातही घेतले नाहीत. पुढे कधीतरी वयाच्या विशीत मुंबईत काम करत असताना काजळमाया संपूर्ण वाचून काढलं, तेव्हा मात्र जी. ए. कुलकर्णी ह्या माणसाने जे वेड लावलं ते आजतागायत टिकून आहे. त्यानंतर त्यांची सगळीच पुस्तके वाचून काढली आणि मुद्दाम विकत घेऊन संग्रही ठेवली. तरी मला वाटतं की तिन्हीसांजेला जीए कधी वाचू नयेत. त्यांच्या त्या सगळ्या शापित व्यक्तिरेखा अतृप्त आत्म्यांसारख्या मनाच्या सांदीकोपऱ्यात येरझाऱ्या घालत राहतात. विचारांची नसती जळमटं लोंबकळायला लागतात मग. एक विचित्र उदासी मनाला वेढून राहते मग आणि त्यातून बाहेर येणं कठीण होऊन बसतं.

तरीसुद्धा कधितरी एखाद्या दुखऱ्या, हळव्या संध्याकाळी असा एखादा क्षण येतो जेव्हा पुल हसवू शकत नाहीत, दुर्गाबाई रिझवू शकत नाहीत, गोनीदा शांतवू शकत नाहीत आणि बोरकर तृप्तवू शकत नाहीत. जेव्हा नवीन काही वाचायचा मूड नसतो आणि जुनं खुणवत नाही. जेव्हा मानवी जीवनाचं चिरंतन दुःख जळता निखारा बनून मनावर डाग देतंच कितीही दूर ठेवलं तरी. जेव्हा ते दुःख कुरवाळावंसं वाटायला लागतं, तेव्हा मी हमखास परत परत जी ए (G. A. Kulkarni) ना शरण जाते.

पारवा ह्या त्यांच्या सुरवातीच्या कथासंग्रहातली एक कथा, निरोप, ही का कोण जाणे मला फार आवडते. पुनरपि, तुती, कैरी, बळी, स्वामी ह्यांसारख्या जी एंच्या प्रसिद्ध कथांमध्ये ह्या कथेचा समावेश नाही, पण तरीही मी मनाच्या एका विशिष्ट स्थितीत असताना ही कथा परत परत वाचते. मला वाटतं कुठलीही संवेदनशील, विचारी व्यक्ती भरभरून जगताना मृत्यूचा विचार करतच असते आणि मृत्यूनंतर काय हा ही विचार आपण सर्वांनी कधी ना कधी तरी मनाला स्पर्शू दिलेलाच असतो.

ही कथा नेमकं तेच सांगते. ह्या कथेत कथा नायिका विजू जो शेवटचा निरोप घेते तो प्रसंग आपल्या सर्वांवरच कधी न कधी येणार आहे, आणि तो निरोप घेताना, होत्याचे नव्हते होतानाची घालमेल, काही अपुरे राहिलेले हिशेब, काही जुन्या जखमा, काही अर्धवट विणलेल्या आठवणी ह्या विजूला अस्वस्थ करून जातात. जी माणसे आयुष्यातून काही ना काही कारणामुळे बोटांच्या फटीतून निसटणाऱ्या पाण्याच्या थेंबांसारखी निपटून गेली ती वेशीपलीकडे तरी परत भेटतील का अशी भाबडी आशा तिला वाटत राहते.

ती माणसं तिला दिसतातही, पण त्यांचे डोळे कोरे असतात. त्यांच्या आठवणींचा जमाखर्च त्यांनी निरोपाच्याच क्षणी चुकता केलेला असतो. विजूला एकदम चटका बसल्यासारखं जाणवतं की ‘नंतर कधीतरी नानू, आई, माधव… सारी भेटतील, पण ती अशी, आंधळ्या सावल्यांसारखी’, आणि मग तिच्याही मनातला ‘सुखदुःखांच्या तारांचा जिवंत गुंतावळा बटन दाबल्यासारखा एका क्षणात विझतो’ आणि तिचा निरोप त्या क्षणी पूर्ण होतो.
मी ही कथा अनेकदा, अक्षरशः शेकडो वेळा वाचलेली आहे, पण प्रत्येक वेळेला जेव्हा विजू टांग्यात बसते तेव्हा ते निरोपाचं दुःख मलाही होतं, आणि तरीही ती कथा मी परत परत वाचते. कदाचित वेशीपलीकडे कधी तरी पाऊल टाकायचं आहे ही जाणीव गेल्या दोन वर्षात परत एकवार प्रकर्षाने जाणवतेय म्हणून असेल.
G. A. Kulkarni -©शेफाली वैद्य

जी ए कुलकर्णी|G. A. Kulkarni हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

जी ए कुलकर्णी|G. A. Kulkarni – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share जी ए कुलकर्णी | G. A. Kulkarni

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock