पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Ignore | Neglect
काही वर्षांपूर्वीची एक घटना आठवली. सिंधु….. माझ्या ऑफिसमधली मैत्रीण…. सिंधुचा एक वर्षापूर्वीच डिव्होर्स झाला होता आणि ती पुण्याहून मुंबईत वातावरण बदल म्हणून आली होती. वातावरण बदल म्हणजे तिच्या वैवाहिक आयुष्यात घडलेल्या दु:खद आठवणींचा तिला विसर पडावा आणि ती मानसिकरीत्या कणखर व्हावी म्हणून….
मुंबईत तिच्या आई-बाबांचं एक चार खोल्यांचं टुमदार घर आहे. तिथे सिंधु एकटिच राहायची. तिला अनेकांनी सल्ला दिला की, निदान कॉलेजमधल्या दोन- चार मुली ज्यांना परदेशातून शिक्षणासाठी आल्यामुळे निवाऱ्याची गरज असते त्यांना तरी पी.जी. म्हणून सोबत राहू दे…. पण, सध्या तरी सिंधुला स्वतःच्या मानसिक कक्षेत कोणाचीही लुडबुड नको हवी होती म्हणून तीनं एकटंच राहणं पसंत केलं.
मग आम्हीच तीन मैत्रिणी दर रविवारी म्हणजे सुट्टीच्या दिवशी जणू वार लावल्याप्रमाणे तिच्या नकळत तिला सोबत द्यायला तिच्या घरी जायचो. तरीही तिला तिच्या आयुष्यात एकटेपणा नक्कीच जाणवायचा. तिचा एकटेपणा दूर करण्यासाठी कुणी तिला कुत्र्याचं पिल्लू पाळण्याचा सल्ला दिला तर कुणी मनिमाऊ पाळण्याचा. पण मग ती ऑफिसला आल्यावर त्या पाहुण्यांना कोण सांभाळणार, त्यांचं खाणं पिणं कोण बघणार ?? म्हणून मग तो ही बेत मोडीत निघाला. मी पाहत होते तेव्हापासून तरी सिंधू स्वभावाने खूपच अबोल होती किंवा आयुष्यात घडलेल्या निराशाजनक अनुभवाने ती अबोल झाली होती, ते तिलाच ठाऊक.
एके रविवारी सहजच तिला जरा चेंज म्हणून तिला घराबाहेर काढली. थोडी खरेदी, खाणं-पिणं झाल्यावर सहजच मला एक गुलाबाचं रोपटं घ्यायचं होतं म्हणून आम्ही एका फुलझाडांच्या नर्सरीमध्ये गेलो. त्या नर्सरीमध्ये खूप तर्हेतर्हेची रोपटी होती. मला आवडलेलं असं एक रोपटं मी विकत घेतलं आणि आम्ही तिथून बाहेर निघत असतानाच नर्सरीच्या बाहेर कचराकुंडीत एक मोठं गुलाबाचं झाड प्लास्टिकच्या पिशवीमध्ये लावलेलं पण फेकून दिलेलं आम्हाला आढळलं .
पण मग ते असं कचऱ्यात का ठेवलंय हे मात्र आम्हाला समजलं नाही म्हणून आम्ही नर्सरीवाल्या दादाला विचारलं तर तो असं म्हणाला की, त्या झाडाला खूप खत पाणी देऊन पाहिलं मात्र त्यावर फूलंच येत नाहीयेत म्हणून ते “बांझ” झाड त्याने कचराकुंडीत फेकून दिलंय. आम्ही परत यायला निघालो पण येताना ते झाड सिंधूने नर्सरीवाल्या दादाची परवानगी घेऊन स्वत:च्या ताब्यात घेतलं. तिने ते झाड स्वत:च्या घरी आणलं आणि तिने ते झाड छान मोठाल्या मातीच्या कुंडीत लावलं. मला असं दिसलं की, सिंधू त्या गुलाबाच्या झाडामध्ये प्रचंड गुंतली होती. आता ती ऑफिसमध्ये आल्यावर देखील खूश दिसायला लागली.
काही दिवसांनी एका रविवारी माझं तिच्या घरी जाणं झालं. संध्याकाळचे पाच वाजले असतील. ती चक्क हातात कॉफीचा मग घेऊन गुलाबाच्या झाडाजवळ बसून त्या झाडासोबत मनसोक्त गप्पा मारत होती. हिला काय झालं आहे ? माझी पाचावर धारण बसली. सिंधूला खरंच सोबतीची अतिशय निकड आहे, तिला माणसांची, आपल्या माणसांच्या प्रेमाची गरज आहे असं मला वाटू लागलं. पण सिंधू मात्र अतिशय सौम्यपणे वावरत होती. ती येता जाता तिच्या त्या नव्या मित्राबरोबर अर्थात गुलाबाच्या झाडाबरोबर सहजपणे गप्पा मारत होती.
मधला काळ हा माझ्यासाठी बराच धावपळीचा गेला. त्यामुळे ऑफिस व्यतिरिक्त माझं लक्ष नाही म्हणता तसं जरा बाजूलाच झालं होतं. जवळजवळ दोन महिन्यांनी मात्र मी ठरवूनच सिंधूच्या घरी गेले. कदाचित यावेळी मलाच थोडा बदल हवा होता…. मी पाहिलं सिंधू ओघानंच तिच्या गुलाबाच्या झाडासोबत गप्पा मारण्यात मग्न होती पण यावेळी मात्र मला सिंधूबद्दल काळजी न वाटता एक सकारात्मक गोष्ट पाहायला मिळाली, सिंधूच्या गुलाबाच्या झाडावर चक्क पंधरा-वीस गुलाबाची फुलं डोलत होती तर झाडावर अगणित टपोऱ्या कळ्या लगडल्या होत्या. आजुबाजुला फुलांचा मंद सुगंध दरवळत होता. नर्सरीवाल्या दादाने कचराकुंडीत “बांझ” म्हणून फेकून दिलेलं ते झाड आज फुलांनी बहरुन गेलं होतं.
मला समजलं होतं, सिंधूची “स्पीच थेरपी” उपयोगी आली हाेती. झाडाला देखील मायेची, प्रेमाची जाण असते हे यातून लक्षात येत होतं. जर एक झाड एखाद्या प्रेमाच्या व्यक्तीच्या स्पर्शाने, सहानुभूतीने इतकं बहरत असेल तर नाती का बहरणार नाहीत ?? नात्यांना, माणसांनाही काय हवं असतं ?? आपल्या माणसांचं प्रेम, जाणिवा, संवेदना….. पण, अनेकदा आपण नात्यांमध्ये मग ते कुठलंही नातं असो बेबनाव, तिरस्कार का पाहतो ?? एकमेकांना समजून घेणं, एकमेकांच्या जाणिवा, संवेदना जपणं खरंच इतकं कठीण असतं का ?? आपलं थोडंही “दुर्लक्ष” एका नात्याची राखरांगोळी करत असेल तर, जर थोडं लक्षपूर्वक नात्यांचं संगोपन केलं, नात्यांनाही “वेळ” दिला तर काय हरकत आहे ??
अनेकदा आपण खूप वाचन करतो, मनन करतो पण आपण आपल्या वर्तुळातील, आपल्या परिघातील आपल्याच माणसांना, नात्यांना वाचायचा मात्र कंटाळा, दुर्लक्ष करतो….. अशा वेळी आपल्या अतिशिक्षित असण्याचा काय उपयोग ??
अगदी एका झाडाच्या बाबतीतही संवेदनशील असणार्या सिंधूच्या आयुष्यात नक्की काय घडलं होतं म्हणून ते नातं अर्ध्यावर विखुरलं होतं हे लक्षात येत होतं……
“दुर्लक्ष”….
-©सौ. आशा आशिष चव्हाण
दुर्लक्ष | Ignore | Neglect हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
दुर्लक्ष | Ignore | Neglect– आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.