पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
पाणी – Pani Kavita
पुढील कवितांमध्ये पाणी हा शब्द 26 वेळा आढळतो आणि त्यातील वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे वेगवेगळे अर्थ प्रकट होतात ..!
पाणी – Pani Kavita
नयनामध्ये येता ‘पाणी’
अश्रू तयाला म्हणती,
कधी सुखाचे, कधी दुःखाचे,
अशी तयांची महती..!
चटकदार तो पदार्थ दिसता,
तोंडाला या ‘पाणी’ सुटते,
खाता खाता ठसका लागून
डोळ्यांतून मग ‘पाणी’ येते..!
धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,
म्हणती अविरत भरते ‘पाणी’..
ताकदीहूनी वित्त खर्चिता
डोक्यावरूनी जाते ‘पाणी’ ..!
“वळणाचे ‘पाणी’ वळणावरती”
म्हण मराठी एक असे,
“बारा गांवचे ‘पाणी’ प्यालाय”
चतुराई यातुनी दिसे..!
लाथ मारूनी ‘पाणी’ काढणे,
लक्षण हे तर कर्तृत्वाचे,
मेहनतीवर ‘पाणी’ पडणे
चीज न होणे कष्टाचे..!
उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,
‘पाण्या’त पाहणे गुण खोटा..
‘पाणी’दार ते नेत्र सांगती,
विद्वत्तेचा गुण मोठा..!
शिवरायांनी कितीक वेळा,
शत्रूला त्या ‘पाणी’ पाजले..
नामोहरम करून, अपुले
मराठमोळे ‘पाणी’दाविले..!
टपोर मोती दवबिंदूचे
चमचम ‘पाणी’ पानावरती,
क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,
अळवावरचे अलगद ‘पाणी’..!
कळी कोवळी कुणी कुस्करी,
काळजाचे त्या ‘पाणी’ होते..
ओंजळीतूनी ‘पाणी’ सुटता,
कन्यादानाचे पुण्य लाभते..!
मायबाप हे आम्हां घडविती,
रक्ताचे ते ‘पाणी’ करूनी..
विनम्र होऊन त्यांच्या ठायी
नकळत दोन्ही जुळती ‘पाणि’
आभाळातून पडता ‘पाणी’
तुडुंब, दुथडी नद्या वाहती,
दुष्काळाचे सावट पडतां
सारे ‘पाणी पाणी’ करती..!
अंतीम समयी मुखात ‘पाणी’
वेळ जाणवे निघण्याची..
पितरांना मग ‘पाणी’ देऊनी,
स्मृती जागते आप्तांची..!
मनामनांतील भावनांचे,
‘पाण्या’ मध्ये मिसळा रंग..
प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,
चेहऱ्यावरती उठे तरंग..!!
पाणी – Pani Kavita Source
पाणी जीवन आहे

6 thoughts on “पाणी | Water”