As Apta was gold

आपटा सोनं होतं म्हणून..! | As Apta was gold ..!

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

As Apta was gold ..!

शालूने भाकरीच्या फडक्यात दोन भाकरी अन् लाल मिरचीचा ठेचा बांधून सुभाषच्या पुढ्यात ते फडकं धरलं..सुभाषने कपाळावर किंचित आठ्या आणतच विचारले..’ डबा कुटं गेला..? आज फडक्यात भाकरी देतीया..’

‘ सांच्याला ती बी मिळायची न्हाय..’

‘ म्हंजी..? ‘

‘ म्हंजी तेच…उद्या दसरा (Dussehra) हाय न्हवं..वर्साचा सणसूद..पण घरात पळीभर तेलसुदीक न्हाय..’

‘ सुभाषने क्षणभर शालूकडे नजर रोखून पाहिले.. तीच नजर खाली उतरवत भाकरीच्या फडक्यावरं स्थिरावून त्याने ते गठुडं मस्तकी लावलं..’ शाले..काय बी काळजी करु नगं..आपल्या पोटाची चिंता त्या परमेशराला..निगलं मारग कायतरी..’

आपलं संकटं देवावर सोडून सुभाष रोजंदारीवर चालता झाला.. शालू बराच वेळ त्याच्या पाठमोरी आक्रुतीला न्याहाळत होती..तसं तिच्या नवर्याने तिला अन् लेकरांना कधीच उपाशी झोपू दिले नव्हते..काहीबाही करुन तो घरची चूल कायम पेटती ठेवायचा..घरचं एकरं दोन एकरं पाण्यावाचून तडफडतं पडलेलं होतं..

पाऊसपाणी चांगला झाला तर कापूस ,तूरी पिकवून देणंदारी मिटायची..शालूही तान्ह्या लेकरांना सोबत घेऊन खूरपण-टुरपणं करायची..रस्त्यावर पडलेलं गुराढोरांचे शेणं उचलून गौर्या थापायची..नवर्याच्या खांद्यावरचं प्रपंचाचं ओझं हलकं करण्यासाठी ती पडेलं ते कामं करायची..यंदा पाऊसपाणी चांगला झाला होता..पिकं जोमदार होती..रुबाबात डौलतं होती..भरलेलं रानं पाहून सुभाष आणि शालू हरखून गेले होते..कितीतरी वर्षानंतर जमीनीची ओटी भरघोस उत्पनाने भरणारं होती..

पण दुधात विरजण पडावं तसं झालं.. ऐन वख्ताला आभाळं फाटलं अन् हातातोंडाशी आलेला घास डोळ्यांदेखत पाण्यात वाहून गेला..ही अस्मानी-सुल्तानी उभयतांच्या चांगली अंगवळणी पडलेली होती..त्यामुळे ओल्या दुष्काळातही त्यांच्या डोळ्यांतलं पाणी आटून गेलं होतं..उत्पन्न जरी चांगलं झालं तरी बाजारात निराशा होई..क्वचित प्रसंगी सर्वकाही जुळून येई..पण तेव्हा पिकं जोमदार नसे..हे बेभरवशी जगणं उराशी बाळगून आयुष्याची गाडी हाकायचे कामं सुभा-शालू नेटानं करत होते..

अंगावर घेतलेलं कामं झटपट आटोपून सुभासह बाकीचे सोबती टुकडा भाकरं खाण्यासाठी झाडाखाली बसले..सुभाषने फडक्याची गाठ सोडून ठेचा आणि भाकरी बरोबर असहायता तोंडी लावली.. आजच्या दिवसाचे फार फार तर दोन-तिनशे हाती लागणारं होते..तेवढे तर तेल अन् बेसनासाठीच जाणार होते..जेवणं आटोपून सोबती निघाले.. पण सुभाला विचारात गढलेलं पाहून राघू म्हणाला..’ आरं सुभा..कुटं हरवलायसा..घरला जायाचं न्हाय व्हयं..? ‘

भानावर येत सुभानं फडकं बांधलं..घोटभर पाणी बळचं घशात ओतलं..त्या पाण्याच्या रेट्यानं तोंडात फिरणारा घास घशाखाली गेला..

पांडाने हटकलं..’ सोनं आणाय येतायं का रं..? ‘

‘ कुठं गावात व्हयं..? ‘ सुभानं विचारले

‘ गावात धा रुपडं घालवण्यापरीस मोरमळ्यात जावू की…त्या कोंडीबाजीजाच्या पांदीत भली दोन-तीन झाडं हायती..आपट्याची..घेऊ तीथनचं..वाईचं लांब हाय..पण तेवढ्याचं पैशात पोरास्नी खायला नेता येयीलं..’

सुभाबरोबर बाकीच्यांनीही होकारार्थी माना हलवल्या..सायकलवर आलेला पांडा आपली सायकल हातात धरुन गुमानं गप्पा करत चालू लागला..

मोरमळ्यातली पांदी विविध प्रकारच्या झाडांनी नटलेली होती..तिथे आपट्याची मोठीभारी झाडं होती..गावात दहा रुपयांना आपट्याची (Apta) एक पेंढी खपतीयं म्हटल्यावर सुभाषला छान कल्पना सुचली..त्याने आपट्याची पाने (Bauhinia Racemosa Leaf) तोडून शेजारच्या गजबजलेल्या गावात विकायचे ठरवले..तसा बेत त्याने सोबत्यांना बोलून दाखवला.. शेजारचा गाव नाही म्हटलं तरी पाच किमी दूर होता..एवढ्या लांब ओझं न्यायचे म्हटलं तर डोक्याचं पार भरीत होणार होतं..सोबत्यांचं नाही , हो चालू होतं..शेवटी सुभा बेत पक्का करुन म्हणाला..’ मैतरांनो..ह्ये सोनं न्हाय ईकलं तर घरी सणासुदीला चूल ईझलेली र्हाईलं..’

‘ माजा नाविलाज हाय..’ सुभानं एकवार आपट्याच्या (Apta) झाडाला मनोभावे नमस्कार केला..मनोमन विणवनी केली..माफी मागितली..’ देवा..मला माफी करं..चार-आठ दिसानं परत झाडं हिरंगारं व्हईलं..पर आज माज घरं उपाशी र्हाईलं..’ आजची येळं भागिवणं जिकीरीचं हाय..’ सुभा झाडावर चढला..छोट्या फांद्या, पाने जमेलं तसं तोडू लागला..त्याची धडपड पाहून बाकी सोबत्यांनीही त्याला हातभार लावला..चांगलं जोरकस ओझं बांधल्यावर सुभाचा चेहरा खुलला..

एवढं ओझं लांब नेणं अवघड जाईल म्हणून पांडाने आपली सायकल सुभाला देऊ केली..

‘ म्या सायकल न्हेल्यावरं तू घरला कसा जाणार हाईस रं पांडा..? ‘

‘ का पाय काय झिजलं हाईत व्हयं आमचं..? ‘

‘ तर तरं…’ राघूनेही पांडाच्या हो त हो भरला..

‘ मंग लेकानो ओझं बांधू लागा की मला..’

‘ वाह रे पठ्ठे.. सायकल तर सायकल बी द्या..अन् ओझं बी बांधू लागा..’

सर्वांनी आनंदाने सुभाला ओझं बांधून दिले आणि हसत-खेळत घरं जवळं करु लागले..

एव्हाना सुभा गावात पोचला होता..मुख्य चौकात आल्यावर सभोवतालची गर्दी पाहून सुभाला खूप बरं वाटलं..एका फुलवाल्याने सुभाला त्याच्या शेजारी ‘ सोन्याचं ‘ दुकानं मांडायला सांगितले.. उद्देश एकच..सोनं घ्यायला आलेलं गिर्हाईक फुलंपण घेईलं..अन् फुलं घ्यायला आलेलं गिर्हाईक सोनं घेईलं..सणामुळे खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली होती..सुभाही मोठ्याने ओरडून गिर्हाईक आकर्षित करत होता..’ धा रुपे..धा रुपे…सोनं झालं सस्तं…आजच घ्या…उद्या शिळं व्हईलं..थोडं र्हायलं..संपत आलं..चला बीगी बीगी..’

सुभा पोटतिडकीने गिर्हाईकांची आळवणी करत होता..त्याची बोलण्याची शैली लोकांना आवडू लागली..कारण ते बोलणं त्याच्या निकडीमुळे उत्स्फूर्तपणे आतून बाहेरं पडतं होतं..तासदीड तासात सुभा सोनं विकून मोकळा झाला..पहिल्यांदा त्यानं कपड्याचं दुकानं गाठलं..तान्ह्या लेकींना , बायकोला मनाजोगते कपडे घेतले..किराणा भरला..त्याच्या दोस्तांसाठी मिठाई घेतली..एक नारळं ,अगरबत्ती घेतली..तो आपट्याच्या झाडाला नारळं फोडणार होता..त्याच्यामुळं तर आजचा सण साजरा होणार होता..

सुभा लगबगीनं घरी आला..बायको लेकीला मांडीवर घेऊन थोपटतं होती..सायकलला अडकवलेल्या पिशव्या पाहून किंचित हसत शालूने एका हाताने पोरीची मान सांभाळत दुसर्या हाताने पाचही बोटं ओवाळून कडाकडा मोडली..मनातच म्हणाली..’ किती वं मायेचा माजा नवरा..’ सुभा तिचा खुललेला चेहरा पाहून सर्वकाही समजला..’शाले..परसंगी स्वता गाहाण र्हाईलं.. पर उपाशी न्हायं झोपू देणारं..’

‘आवं..कारभारी.. धडधाकट असताना गाहाणं कशाला र्हायाचं..कष्टाला आवक मागायची…देव देतुयाच…! ‘

सुभा समाधानानं हसत बाहेर पडला..सायकलं परत करायला जायचं होतं..दोस्तांना मिठाई द्यायची होती..

शालूने हळूच पोरीला खाली गोधडीवर टाकले..पिशव्यातीलं एक एक सामान बाहेर काढले..कपडे बघितले.. काठापदराची साडी पाहून तिला कोण आनंद झाला..किराणा ,कपडे तर भारीच होते..पण शालू अजून काहीतरी शोधत होती…तिने सायकलवरुन जाणाऱ्या आपल्या नवर्याला थांबवत विचारले..

‘ होय ओ..किराणा..तरकारी..लेकीचे कपडे..बायकोची साडी समदं हायं..तुमची कापडं कुठं हायेतं..? ‘

सुभा कचाट्यात सापडला होता.पण त्याने वेळ मारून नेली..कसनुसं तोंड करत..जीभेचा शेंडा दातांमध्ये धरत , डोक्यावर हात मारत सुभा लटकेचं म्हणाला..

‘ अगं शाले…कापडं इसारलो बगं दुकानातचं..ह्यो गेलो अन् ह्यो आलो..’

असं म्हणून सुभा सायकल परत करायला निसटला..

शालूने दिर्घ श्वासं घेतला..अन् मनाशी पक्कं केलं..’ दरयेळला बरं यांचीच कापडं इसारत्यात..?आवं..कारभारी म्या बी तुमचीच शाली हायं..दिवाळी ला नवी कापडं तुम्हास्नी.. तेबी माज्याकडनं..बगाच तुमी…!! ‘

आपटा सोनं होतं म्हणून..! | As Apta was gold ..! -©️ नामदेव सुखदेव गवळी

आपटा सोनं होतं म्हणून..! | As Apta was gold ..! हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

आपटा सोनं होतं म्हणून..! | As Apta was gold ..! – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Sharआपटा सोनं होतं म्हणून..! | As Apta was gold ..!

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO