Passed two classes MBA!

दोन इयत्ता पास एमबीए! | Passed Two Classes MBA !

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Passed Two Classes MBA !

तासभर झोपल्याने मी परत माणसात आलो. छताकडे बघत तसाच पडून राहिलो. छतावर वा बाजूच्या गुलाबी रंगाच्या भिंतीवर कुठेही अबोध हायरोग्लिफ भाषेत कोरलेले नव्हते. त्या कुठलेही चित्र नसलेल्या, नक्षीकाम नसलेल्या भिंती बघून खरच हायसे वाटले. त्या सरळ साध्या भिंती बघून फार वर्षांनी वर्तमानकाळात परततोय, असे वाटत होते.

इजिप्तमधील कार्नाक मंदिर (Karnak Temple) बघून आणि थकून परतलो होतो. कोणाबरोबर गप्पा मारल्या असत्या, तर जरा बरे वाटले असते. कार्नाकवरून पायी पायी परतताना युसूफच्या दुकानात डोकावलो. युसूफ ऐवजी दुसराच कोणीतरी सफेद दाढीवाला बसला होता. अतिशय दुर्मुखलेल्या चेहऱ्याचा. त्याच्याशी बोलण्यात भाषेचा अडथळा तर होताच, पण त्याहूनही जास्त त्याच्या काजळ चोपडलेल्या डोळ्यांचा आणि त्याच्या भकास चेहऱ्याचा होता. या व्यक्ती बरोबर थोडा जर वेळ काढला असता, तर जेवढा नव्हतो तेवढाही मी मरगळलो असतो. मी त्याच्या ‘अस्सलाम वालेकूम’ला कोरडेपणाने उत्तर देत हाॅटेलवर परतलो.

चालून थोडा दमलो होतो. पाणी प्यावे म्हणून बाटलीतले पाणी पिलो, तर पाणी एकदम मचूळ! पाण्याला काही चवच नव्हती‌. इजिप्तमध्ये बाटलीबंद पाण्याशिवाय दुसरे पाणी पिऊ नये, हा महत्वाचा सल्ला मी अनवधानाने विसरलो होतो. बाटलीतील पाणी कार्नाक मंदिरातील पवित्र तळ्यातले होते. इजिप्तमध्ये नळानी आलेले पाणी सुद्धा ऊकळल्याशिवाय पिऊ नये, असा अलिखित नियम आहे. काही शहरे याला अपवाद आहेत, पण ती चेतेश्वर पुजाराने मारलेल्या षटकारांपेक्षा कमी!

तहान तर लागलेली, पण माझ्या हाॅटेलमध्ये रूम सर्विस नव्हती. आपल्याला काहीही हवे असले, तर एक लाकडी जिना उतरून खाली रिसेप्शनला जावे लागायचे. मी गेलो. महम्मद नावाचा एक पोरगा दिवस-रात्र एकटाच तिथे असायचा. मला इजिप्तमध्ये भेटलेला हा दहाव्वा महम्मद! रिसेप्शन शेजारी एक ‘फिल्टर्ड वाॅटर’ असा फलक लावलेले भलेमोठे लोखंडी कपाट होते. त्यात ‘वाॅटर’ असायचे, मात्र ते ‘फिल्टर्ड’च असेल, याचा अजिबात भरवसा नव्हता.

महम्मदला मी पाण्याची बाटली कुठे मिळेल, ते विचारले.

‘दुकान थोडे दुर आहे. तुम्ही कशाला तसदी घेता? मी रूमवर पाठवतो’

हे तर फार छान. मी परत खोलीत जाऊन मोबाईल चाळत बसलो. आज सायंकाळी मला कुठेही भटकायचा मुड नव्हता. मानसिक थकवा होता आणि थकीत कामे बरीच होती. आराम करत पुढचा प्रवास आखायचा होता, ऊद्या बघायच्या ‘लक्सोर मंदिर’च्या अभ्यासाची उजळणी करायची होती. ऑफिसच्या काही महत्त्वाच्या इमेल्सना उत्तर द्यायचे राहिले होते. इथे व्हाॅटसऍप जास्त वापरात नाही. सगळेजण फेसबुक बरोबर मिळणारा ‘मेसेंजर’ वापरतात. यामुळे माझाही व्हाॅटसऍप तर जवळजवळ दुर्लक्षित झाला होता, दोन तिनशे तरी संदेश वाचलेले नव्हते. ही सगळी कामे आटोपत संध्याकाळ घालवावी, रात्री नऊ – साडे नऊला बाहेर पडावे, जेवावे आणि नंतर झोपावे असा शुद्ध सात्विक विचार होता.

दारावर टक टक झाली. बाहेरून कोणीतरी शुद्ध इंग्रजीत विचारले, ‘मे आय कम इन सर?’ चकितच झालो. गादीवर मुरगाळून पडलेलो होतो, तसा आडवा पडूनच आवाज दिला, ‘येससस…’ दरवाजा हळूच उघडल्या गेला. दरवाजात एक चार फुटी मुलगा हातात पाण्याची बाटली घेऊन उभा होता. ‘युवर वाॅतर बाॅतल, सर!’ हे पोरगं चांगले इंग्रजी बोलत होते! चेहरा तर इजिप्शियन वाटत होता, पण बोलणे आणि वागणूक एकदम युरोपियन. इजिप्तमध्ये इंग्रजी शिष्टाचार कोणी पाळत नाहीत. गुड मॉर्निंग, प्लिज, थॅन्क्स, साॅरी वगैरे शब्द वापरायची पद्धतच नाही. कोणी तसे वापरलेच, तर इतर लोक बावचळतात. बोलणाऱ्याकडे ‘कुठून आले ह्ये ध्यान’ अशा नजरेने बघतात. अशा लोकांमध्ये हा एटिकेट्सावतार कसा काय जन्मला, हे समजत नव्हते.

‘ट्वेल्व्ह पौंड सर’

१२ पौंडाला म्हणजे साठ रूपयाला एक लिटर पाण्याची बाटली तशी महागच. पण इजिप्तमधल्या आजवरच्या अनुभवाने ही लुटमार अगदीच किरकोळ होती. एखाद्या दरोडेखोराने धाडसी दरोडा घालून घरातील फक्त पोळपाट-लाटणे लुटण्याएवढे किरकोळ!

‘टेन पौंड फाॅर बाॅतल अॅंड टू पौंड फाॅर माय सर्विस, सर!’ त्याने न विचारता मला हिशोब दिला. मला कौतुक वाटले. पोरगा प्रामाणिकपणे आपली कमाई सांगत होता. त्याने बाटलीच बारा पौंडाची, असे सांगितले असते तरी मी आक्षेप घेतला नसता. वरून ‘बक्षिस’ मागितली असते, तरी त्यात मला काही वावगे वाटले नसते. मी पंधरा पौंड दिले. त्याने पॅंटच्या खिशातून काही चुरगळलेल्या नोटा काढल्या आणि त्यातून एक एक पौंडांच्या ३ नोटा काढून मला दिल्या. तिन्ही नोटा फाटक्या होत्या! माझी व्हिसाची मुदत संपली असती, तरी त्या नोटा मला इजिप्तमध्ये खपवता आल्या नसत्या! मग त्या विटक्या आणि घामट नोटा त्यालाच परत देत मी म्हंटले, ‘राहू दे तूला’

अजिबात आढेवेढे न घेता, पॅन्टच्या खिशात त्या नोटा टाकत, नम्रपणे झुकून तो म्हणाला –

‘थॅंक्यू सर. आपणास काहीही हवे असेल, तर मला फक्त आवाज द्या. मी हजर असेन’ माझी कौतुकाची पातळी अजून वर गेली. ‘नाव काय रे तुझे?’ ‘अहमद’ ‘तु या हाॅटेलमध्ये काम करतोस?’ ‘नाही सर. इथे समोरच माझे ऑफिस आहे!’

ही बटूमुर्ती फार तर आठ दहा वर्षांची असेल. याचे कसले ऑफिस? मनात होते, ते ओठांवर आले. ‘तुझे ऑफिस?’ ‘येस्सर’ माझ्या परवानगीची वाट न बघता, त्याने माझ्या खोलीतील बाल्कनीचा दरवाजा उघडला आणि समोर चौकातील एका कोपऱ्याकडे बोट दाखवत तो म्हणाला, ‘मी तिथेच असतो. गरज वाटेल, तेव्हा इथूनच आवाज द्या’

एक हात तुटलेली एक प्लॅस्टीकची खुर्ची. मागच्या बाजूला भिंतीत फळी ठोकून दोन तीन बरण्या ठेवलेल्या होत्या. वरती पाच फुटांवर एक प्लॅस्टीकचा कपडा बांधलेला होता. हे ऑफिसचे छत! मोठे गमतीशीर ऑफिस होते. खरोखरच माझ्या ‘हाकेच्या अंतरावर’ होते त्याचे हे ‘ऑफिस’ ‘समजा तू ऑफिसमध्ये दिसला नाहीस तर?’ मी उगाचच विचारले. शर्टच्या वरच्या खिशातून त्याने चार पाच चिठ्ठ्या काढल्या. त्यातून एक चिठ्ठी मला देत तो म्हणाला, ‘माझा मोबाईल नंबर आहे या वर’ सुरेख अक्षरात कागदाच्या एका तुकड्यावर त्याचे नाव आणि मोबाईल नंबर इंग्रजीत लिहीलेला होता. अक्षर झक्क होते, पण बायकी वळणाचे होते. मला ते ‘व्हिजीटींग कार्ड’ देऊन तो पसार झाला.

टिव्हीच्या खोक्यावर तो कागद ठेवून मी माझ्या कामाला लागलो. कामे आटोपता आटोपता संध्याकाळचे पाच वाजले. चहाची प्रचंड तलफ आली‌. या हाॅटेलमध्ये रेस्टॉरंटसुद्धा नव्हते‌. कामाच्या गतीत खंड पाडून खाली जायचा कंटाळा आला होता. मला एकदम अहमद आठवला. तसाच बाल्कनीत गेलो. अहमद त्याच्या ‘ऑफिस’ मध्ये एक माळ ओवत प्लॅस्टिक खुर्चीच्या सिंहासनावर बसलेला होता!

मी आवाज दिला, ‘अहमद…’ वरती बघत, हात करत त्याने विचारले, ‘येस रवि सर?’

या पठ्ठ्याने रिसेप्शनवरून माझे नावही शोधले होते!

‘चहा पाहिजे. दुध हवे आणि साखर नको!’ ‘येस्सर. पाच मिनिटांत…’

बिन दरवाज्याचे, विना फर्निचरचे ते ‘ऑफीस’ तसेच सोडून तो बाजूच्या एका गल्लीत अंतर्धान पावला.

पाचच मिनिटांत चहा आला. चहाच्या किंमती व्यतिरिक्त वरच्या एका पौंडानी माझा खिसा हलका झाला! साडेसातला थोडी भुक लागल्यासारखे वाटले, परत अहमदला आवाज. यावेळी पाववड्यासारखा काहीतरी पदार्थ आणण्यासाठी तीन पौंड ‘सर्विस फी’ द्यावी लागली. माझी या ‘फी’ विषयी खरोखरच काहीच तक्रार नव्हती. एका स्वस्तातल्या हाॅटेलमध्ये मला हवे ते खोली-पोच मिळत होते, तक्रार करायची कशाला? तसेही इतर ठिकाणी गुरकावून आणि हक्क असल्यासारखे ‘बक्षिस’ मागायचे, त्यापेक्षा या पोराची अधिकृत ‘फी’ कधीही बरी!

पाय मोकळे करावे आणि जेवणही आटोपावे, म्हणून रात्री नऊ वाजता खाली उतरलो. सरळ अहमदच्या ऑफिसकडे गेलो. अहमद सर फोनवर बिझी होते! हातानेच खुण करून दोन मिनिटे मला थांबायला सांगून त्याने फोनवरचे संभाषण संपवले.

‘सर, डिनर?’ मनकवडा होता हा पोरगा!

‘हो. जवळपास कुठे फक्त शाकाहारी असलेले रेस्टाॅरंट आहे का?’ अहमदकडे उत्तर तयार होते. ‘तसे मांसाहार मिळत नाही असे एक रेस्टॉरंट आहे सर, पण पत्ता तोंडी सांगणे अवघड आहे. मला स्वतःला यावे लागेल’

‘म्हणजे, तुला परत दोन पौंड द्यावे लागणार मला!’ मी डोळे मिचकावत म्हणालो.

‘अर्थातच सर. पण दोन नाही. पाच!’

बहुतेक मी नाराज झालो आहे,असे वाटून तो परत म्हणाला, ‘माझा तेवढा वेळ जाईल ना सर’

खरेतर मी गंमतीत म्हटलो होतो. त्याच्या त्या ‘बिझिनेस माईंड’ वर मी तुडुंब खुश झालो!

अहमदच्या ऑफिसला कुलूप वगैरे लावायची गरज नव्हती. तो लगेचच माझ्याबरोबर निघाला.

‘अरे त्या बरण्या तशाच ठेवायच्या का? कोणी नेल्या तर?’ मी त्याच्या खुर्ची मागे फळीवर ठेवलेल्या बरण्यांकडे बघत म्हणालो. ‘त्यांना कोणी हात लावत नाही. त्या राहू द्या तशाच!’ ‘आहे काय त्यात?’ ‘मणी आहेत. फावल्या वेळात मी जप करण्यासाठी माळा ओवून देतो’

या पोराला फावला वेळ मिळतो तरी कधी? आणि अशा माळा गुंफून किती कमावत असेल हा? आणि सकाळी सहाला इथे येणारा हा पोरगा घरी जातो तरी कधी? माझ्याकडे प्रश्नांची रांग लागली होती.

पाच पौंडाच्या आशेने माझ्या बरोबर चालणाऱ्या त्या निरागस पोराकडे आता मी कुतुहलाने बघू लागलो.

‘घरी जातोस कधी तू?’ मी प्रश्न मालिकेला सुरूवात केली. ‘साडे नऊ वाजता जातो, पण जेवण करून परत येतो. मग साडेअकरा पर्यंत थांबतो’

‘म्हणजे आता मला रेस्टॉरंट मध्ये सोडून, नंतर तू घरी जाणार?’ ‘नाही सर. तुमचे जेवण होईपर्यंत बाहेर थांबेल. तुमचे जेवण झाल्यावर तुम्हाला परत इथे तुमच्या हाॅटेलवर सोडूनच घरी जाईल’ ‘असे का?’ ‘एकतर रात्री तुम्हाला परतीचा रस्ता सापडणार नाही आणि तसेही आमच्या गावात परदेशी प्रवाशाने रात्री शक्यतो एकट्याने फिरू नये!’

मी आता या दहा वर्षांच्या पोराचे कौतुक करणेच सोडून दिले. माझे जेवण होईपर्यंत हा रेस्टॉरंटच्या बाहेर वाट बघत उभा राहणार, हे काही माझ्या मनाला पटले नाही.

‘अहमद, माझ्याबरोबर जेवशील?’ तो सरळ हो म्हणेल ही अपेक्षा होती. मी बरोबर जेवायला बोलावतोय, हे ऐकून हा हरखून जाईल असे वाटले होते. पण हा मुलगा सरळसाधा नव्हता.

‘माझ्या जेवणाचे पैसे तुम्ही भरणार असाल, तर जेवेल!’ एकदम स्पष्ट! उगाच नंतर वादावादी नको!

मी हसतच त्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्याचा चेहरा उजळलेला मला स्पष्ट जाणवला. स्वारी एकदम खुशीत आली. चालता चालताच त्याने मोबाईलवरून एक ‘मेसेज’ पाठवला. ‘काय रे, घरी मेसेज पाठवला का?’ ‘हो सर. जेवायला घरी येणार नाही ते कळवले’ ‘फोन करायचास ना मग…’ ‘मला दिडशे एस.एम.एस. फुकट आहेत. आउटगोइंगचे पैसे कशाला वाया घालवायचे?’ त्याच्या प्रश्नाने मला निरूत्तर केले. मग त्याने लक्सोरमध्ये कुठल्या मोबाईल कंपनीचे नेटवर्क चांगले आहे आणि कुठला ‘प्लॅन’ स्वस्त पडतो, यावर दोन मिनिटे माझे उद्बोधन केले.

चालत चालत एव्हाना आम्ही लक्सोर मंदिरासमोर आलो होतो. मंदिरात संध्याकाळी होणारा ‘लाईट अॅंड साऊंड शो’ संपला होता, पण काही दिवे चालूच होते. त्या रंगीत दिव्यांनी दिसत होती, तेवढी स्थापत्ये भव्य आणि गुढ वाटत होती.

‘हे लक्सोर मंदिर! (Luxor Temple)’

न सांगताच त्याने फुकट गाईडचे काम सुरू केले. ‘हो. माहिती आहे. मी उद्या इथेच येणार आहे’ ‘अर्धे तरी मंदीर नवीन बनवले आहे. सगळ्या मुर्ती पुरातन आहेत सांगून फसवतात सगळे’ अहमदने मला आश्चर्याचा धक्का दिला!

पुढची दहा मिनिटे अहमदने मला लक्सोरमधील इतर प्रेक्षणीय स्थळांपाशी होणाऱ्या फसवणूकींविषयी थोडक्यात माहिती दिली, लक्सोरमध्ये ‘शाॅपिंग’ कुठे करावी यावर मौलिक सल्ला दिला. मी रहात असलेल्या हाॅटेलमध्ये दोन वर्षांपूर्वी २-३ महिने तळ ठोकलेल्या एका इंग्रज संशोधकाने अहमदला कामचलाऊ इंग्रजीच शिकवले असे नाही, तर लक्सोरमधील पुरातन कलाकृतींविषयीची त्याची निरीक्षणेही सांगितली.

जेवताना एकदम शांत असलेला अहमद जेवण संपल्यावर मात्र परत सुरू झाला. मी दोघांचे मिळून एकूण ५४ पौंडांचे बिल देत असतानाच तो म्हणाला, ‘ते रेस्टॉरंट दाखवण्याचे ५ पौंड नाही दिले तरी चालतील आता!’

परतताना मी त्याला त्याच्या घरच्या मंडळींविषयी विचारले. खरे तर विचारावे की नाही, याबद्दल मी जरा चाचरतच होतो, पण अहमदने मनमोकळेपणाने सगळे सांगितले. तो दोन वर्षाचा असतांनाच त्याच्या वडिलांनी त्याच्या आईला सोडले होते. नियमाप्रमाणे त्याच्या आईला काही रक्कम दरमहा मिळे, पण कालांतराने ती मदत येणे बंद झाले. आई मिळेल ते काम करू लागली. पैसे म्हणजे काय आणि या जगात जगायचे असेल, तर हा पैसा नावाचा कागद कमवावा लागतो, हे अहमदला फार लवकर कळले. वयाच्या सहाव्या वर्षी ‘कमावणे’ म्हणजे काय, हे त्याला समजावून घ्यावे लागले. त्याची आई आणि मोठी बहीण, तो सध्या बसतो तिथेच बसून माळा गुंफायचे काम करायच्या.

मशिद जवळ असल्याने माळांना मागणी असायचीच. येता जाता लोक ‘खैरात’ही द्यायचे. असाच एकदा आईजवळ बसलेला असताना हाॅटेलवाल्या महंमदने त्याला एका प्रवाशासाठी साबण आणायला सांगितला. साबण घेऊन आलेल्या अहमदला महंमदने थेट त्या प्रवाशाच्या खोलीत पाठवले. खोलीत एकदम लख्ख गोरा माणूस आणि त्याच्याहून गोरी असलेली एक मड्डम! एवढ्या लहान मुलाने साबण आणलेला बघून त्या दोघांना अतिशय कौतूक वाटले. त्या बाईने अहमदला एक बिस्कीटचा पुडा दिला आणि माणसाने दोन पौंड!

आपली आई दिवसभरात कष्ट करून जेवढे कमावते, त्याच्या एक दशांश आपण पाच-दहा मिनिटांत कमावले आहे, हे या चाणाक्ष पोराच्या पक्के लक्षात आले! यापुढचे चार दिवस त्याने आईची साथ सोडली आणि तो हाॅटेलच्या पायरीवर बसू लागला. बरोबर सहाव्या दिवशी त्याची कमाई त्याच्या आईच्या दिवसभराच्या कमाईपेक्षा जास्त झाली, आणि अहमदचे ‘ऑफिस’ सुरू झाले…

आईला रस्ता सोडून घरून काम करायला सांगितले, बहिणीला परत शाळेत जायला सांगितले आणि वयाच्या सातव्या वर्षी अहमद घरातला कर्ता पुरुष बनला!

अद्भुत होते हे सारे! मी इतक्या वेळ कौतूकाने त्यांच्याकडे बघत होतो, तो आता आदराने बघू लागलो. एवढ्या लहान वयात हा पोरगा किती मोठी जबाबदारी पार पाडत होता.

‘बहिणीला का शाळेत पाठवले? तू का शाळेत जात नाहीस?’ ‘ती माझ्यापेक्षा हुषार आहे. तिला शिक्षणाचा काहीतरी उपयोग होईल. मी दोन वर्ष गेलोय शाळेत, पण आपल्याला अभ्यासात काही गती नाही, हे माझ्या लक्षात आले. उगाच पैसे वाया घालवायला नको!’

फक्त दोन यत्ता शाळेत घालवून हा या अशा पोक्त असल्यासारखा मोठमोठ्या गप्पा लिलया करत होता.

‘वय किती रे तुझे अहमद?’ ‘बहुतेक ११. नक्की सांगता येणार नाही’ ‘आणि बहिण?’ ‘ती १४ ची झालीय, हे मात्र नक्की’

मोठ्या बहिणीला शाळेत पाठवून स्वतः काम करणारा हा धाकटा भाऊराया आगळाच.

पाच वर्षांपासून हा माझ्या हाॅटेलसमोर पथारी पसरून हाॅटेलमधील प्रवाशांसाठी हरकाम्या बनलायं. कुठलीही वस्तू हवी, की अहमदमियां तत्काळ हजर! यामुळे प्रवासी खुश आणि ‘रूमसर्विस’ साठी वेगळे कर्मचारी ठेवण्याची गरज पडत नसल्याने हाॅटेलमालक खुश! चार पैसे मिळत असल्याने अहमदही खुश. या एका पोरामुळे सगळीकडे खुशीच खुशी पसरलेली होती. तो पुरवत असलेल्या वस्तूंमध्ये कंगवा, साबण पासून सिगारेट, खाद्यपदार्थ वगैरे सगळे होते. हाॅटेलच्या परीसरात कुठली वस्तू कुठे स्वस्त मिळते, हे अहमदला पक्के ठाऊक होते. त्याचे दुकानदारही त्याला ओळखायचे. त्याच्या पुढच्या प्रश्नाने मात्र मी दचकलो.

‘सर, उद्या संध्याकाळी काही पिणार का? मी खोलीवर आणून देईल…’

मी थक्कच झालो.

एक अकरा वर्षाचे पोरगं मला मोकळेपणाने ‘काही घेणार का’ असे विचारत होते.

‘दारूसाठी तशी मी पाच पौंड सर्विस फी घेतो. तुम्हाला फक्त ३ पौंड’ अहमदमधल्या व्यावसायिकाने त्याचे वाक्य पुर्ण केले.

हाॅटेल जवळ आले होते. जवळच्या मशिदीतला आवाज अस्पष्ट ऐकू येत होता. रस्त्यावरची वर्दळ कमी होत चालली होती. मध्येच रस्त्यावरून मंदपणे जाणारा एखादा टांगा त्याच्या उग्र वासाने आपली उपस्थिती जाणवून द्यायचा. आम्ही चाललो होतो, त्या रस्त्याच्या पलिकडे छोट्या इमारतींची रांग होती. मागे सगळे मोकळे असावे असे वाटत होते.

चांदणी रात्र होती. अर्धा चंद्र ठळकपणे नजरेत भरत होता. असला अर्धोन्मिलीत चंद्र आणि असले टिपूर चांदणे फार दिवसांनी बघत होतो. हे असले टिपूर चांदणे मला माझ्या बालपणात घेऊन जाते. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे भावंडं अंगणात सतरंज्या टाकून चांदण्या मोजायचा कार्यक्रम करायचो. आडवे पडल्या पडल्या सत्तर – अंशी चांदण्या मोजून होईपर्यंत झोप कधी यायची, हे समजायचेही नाही. जगाची पर्वा नसायचे दिवस होते ते. खेळ आणि दंगामस्ती यातून वेळ काढून जेवण आणि उरलेल्या वेळात झोप, यापलीकडे आम्हाला या जगातील काहीच माहिती नव्हते.

माझ्या तेव्हाच्याच वयाचा असणारा एक पोक्त मुलगा आज माझ्याबरोबर इजिप्तमध्ये चालत होता. या वयात तो नुसता पैसे कमवतच नव्हता, तर त्याच्या समवयीन मुलांपेक्षा प्रौढही झाला होता.

‘या इमारतींपलीकडे नाईल नदी आहे, सर’ समोरच्या इमारतींकडे बोट दाखवत अहमद सांगत होता. ‘माझ्या बहिणीची शाळा पलीकडच्या तीरावर आहे. ती दररोज इथून बोटीने पलीकडच्या तीरावर जाते’

त्याचा आजचा दिवस संपला होता, जेवणाचीही चांगली सोय लागली होती. यामुळे दिवसभर असायचा त्यापेक्षा तो जास्त खुलला होता. भरलेला खिसा आणि भरलेले पोट कोणालाही उत्साही बनवते.

‘दिवसभरात किती कमावतो तू?’ मी विचारले.

‘असे निश्चित नसते. कधी कधी तुमच्या या हाॅटेलमधून पंचवीस – तिस पौंडाच्या वर कमाई होते, पण नेहमीच नाही.’ म्हणजे महिन्याला झाले नऊशे पौंड. साडे चार हजार रूपये!!

‘महिन्याला नऊशे पौंड?’

‘नेहमीच नाही सर. कधी कधी पाच सहाशे पौंडच मिळतात’

‘अरे, पण तसे असले तरी चांगली कमाई आहे की!’

‘हो. पण त्यासाठी धावपळ किती करावी लागते’

हे खरे होते. काल सकाळी सहा वाजताच मी याला माझ्या हाॅटेलसमोर बघितले होते. हा म्हणत होता त्याप्रमाणे रात्री ११ पर्यंत तरी तो ‘रूम सर्विस’च्या धावपळीत असायचाच.

‘एवढे सगळे उपद्व्याप करण्यापेक्षा तू सरळ या हाॅटेलमध्ये नोकरीच का करत नाहीस? कमाईची अनिश्चितता रहाणार नाही आणि दर महिन्याला ठराविक तारखेला पगारही मिळेल’ मी उगाचच न मागता सल्ला दिला.

काय अशिक्षित माणूस आहे हा, अशी नजर टाकत तो म्हणाला, ‘महंमद तर दर महिन्याला मला नोकरीची ऑफर देतो. पण छ्या. नोकरीत मजा नाही’

मला समजले नाही.

‘मी फक्त ‘सर्विस-चार्ज’ वर पैसे कमावत नाही’

हा पोरगा आश्चर्याचे धक्के देत होता.

‘म्हणजे?’ मी औत्सुक्याने विचारले.

‘मी ज्यांच्याकडून वस्तू घेतो, त्यांच्याकडूनही दर महिन्याला पैसे घेतो!’

‘त्यांच्याकडून कशाबद्दल? त्यांनी नाही दिले तर?’

अहमद हसला. म्हणाला, ‘त्यांनी नाही दिले तर मी सप्लायरच बदलतो. दुसऱ्याकडून सामान घेतो. मग ते बरोबर वठणीवर येतात!’

हे समजायला अवघड होते. या पोराला ‘भांडवलशाही अर्थव्यवस्था’ हा शब्द माहिती असण्याची शक्यता नव्हती, पण सारे ज्ञान तो कोळून प्याला होता.

मला फार मजा येते आहे, असे वाटून तो मला समजावून सांगू लागला.

‘मी समोरच्या चहावाल्याकडून दिवसाला दहा चहा तरी नेतो. महिन्याला जवळपास तिनशे कप. एवढा धंदा त्याला देतो, मग त्याच्याकडून महिन्याला पन्नास पौंड मागितले, तर काय चुकले?’

त्याचा विचार पटण्यासारखा होता. माझ्या ‘नोकरी कर’ या सल्ल्याला नाकारल्याने नाही म्हंटले तरी मी दुखावलो होतो. पंचवीस वर्षे ‘कार्पोरेट लाईफ’ मध्ये काढलेल्या माझ्या सारख्या ‘उच्चशिक्षिता’चा मोलाचा सल्ला हे छटाकभर पोरगं सरळ धुतकारत होते. मला पराभूत झाल्यासारखे वाटले. मी नेटाने परत माझा मुद्दा रेटला.

‘तरी महंमदशी बोल. तो तुला पाच -सहाशे पौंड महीना तरी देईल. रूम सर्विस नसल्याने त्याचे बरेच ग्राहक परत जातात’

मी किती भोळा आहे, असे त्याच्या बोलण्यावरून जाणवले.

‘सर, मला फक्त सर्व्हिस चार्ज मिळतात असे नाही. मी तुम्हाला फक्त सर्व्हिस चार्ज किती कमावतो, तेवढेच सांगितले. तुम्ही आज मला २+१+३ असे एकूण ६ पौंड ‘सर्विस’बद्दल दिले आणि ३ पौंड बक्षिस म्हणून! किती झाले?’

खरेच की! याला न मागता, ‘बक्षिस’ देणारेही भरपूर असणार.

‘दोन – तिनशे पौंड तर बक्षिसची रक्कमच होते महिन्याला!’ अहमद खुशीत सांगत होता. आवाज एकदम हळू करून एखादे मोठे गुपित सांगितल्यासारखा तो म्हणाला, ‘सर, बक्षिसाबद्दलची एक गंमत सांगू? कोणाला पैसे परत द्यायचे असतात, तेव्हा मी मुद्दामच मळक्या, फाटक्या नोटा परत देतो. त्या इतक्या खराब असतात की कोणीही त्या बक्षिस म्हणून परतच देतात!’

आपल्या बोलण्याला पुरावा म्हणून त्याने खिशातून पाच दहा विटक्या आणि चुरगाळलेल्या नोटा काढून मला दाखवल्या. आज सकाळी मी नाकारलेल्या आणि त्याला बक्षिस म्हणून दिलेल्या नोटाही त्यात असणार!

भले बहाद्दर!

‘या व्यतिरिक्त मी दारू आणताना प्रत्येक बाटली मागे किंमतीपेक्षा १० पौंड जास्त लावतो’

‘तसे का?

‘कारण व्यसने करणारे लोक किंमतीबाबत जास्त खळखळ करत नाहीत.’

अफाट निरीक्षण होते या पोराचे. ‘ग्राहकाचे मानसशास्त्र’ किंवा ‘कन्झ्युमर सायकाॅलाॅजी’ हा शब्दही याने ऐकला नसेल, पण अनुभवाने त्याला हे सारे शिकवले होते.

‘त्यात दारूवाला दुकानदार मला महिन्याला कमिशन देत नाही, मग मी त्याला दरवेळी मुळ किंमतीपेक्षा दोन तीन पौंड कमीच देतो. मी दररोजचा ग्राहक असल्याने तो पण मला तेवढी सवलत देतो !’ अहमद बोलत होता आणि मी डोळे विस्फारून ऐकत होतो. दुसरे मी करूच काय शकत होतो?

‘पण, हे सगळे तू नोकरी करूनही करू शकतो ना?’ मी आपला हट्ट सोडला नाही. माझी बाजू भलतीच कमकुवत पडत चाललीय, हे मला जाणवत होते.

‘असे कसे? नोकरीत असताना कमिशन मागितले तर माझे सगळे सप्लायर हाॅटेलकडे तक्रार करतील. ती कमाई जाईल आणि सर्विस चार्ज घेता येणार नाही, हे दुसरे नुकसान!’

मी सपशेल माघार घेतली. या पोराला महिना पाचशे पौंड देणारी नोकरी भुरळ घालूच शकत नव्हती‌.

त्याच्या चतूर व्यावहारिक बोलण्यात कुठे फट सापडली तर बघावी, म्हणून मी विचारले, ‘मग हे असे सगळे मिळून तु महिन्याला कमावतो तरी किती?’

कमाई फक्त एवढीच नाही. जपमाळ ओवायची कमाई वेगळी. गेल्या दोन महिन्यांपासून हाॅटेलवाला महंमदही मला महिन्याला शंभर पौंड देऊ लागलाय. दुसऱ्या हाॅटेलसमोर जाऊन बसेल असा दम दिला होता त्याला!’

‘मुद्द्यावर ये. महिन्याला एकूण किती कमावतोस?’

‘खोटे बोललो तर अल्ला मला माफ करणार नाही. महिन्याला तीन हजार पौंड तर कुठेच जात नाहीत, सर!’

महिना पंधरा हजार रूपये! एक अकरा वर्षाचे, बापाचे छत्र नसलेले, शाळा न शिकलेले एक अशिक्षित पोरगं स्वतःच्या हिमतीवर या काळात एवढे पैसे कमावत होते. बापाचे लाखो रूपये खर्चून वेगवेगळे कोर्सेस करून माझ्या कंपनीत १०००० ते १२००० रूपये महिना कमावून कृतकृत्य होणारे तरूण मला आठवले. दहा दहा वर्षे नोकरी करून विस – पंचवीस हजारापुढे न सरकलेले तरीही नोकरी शाबूत असल्याबद्दल देवाचा नवस फेडणारे तर अनेकजण मी बघितलेत.

‘सर, तुम्ही व्यवसाय करता की नोकरी?’ आम्ही आता माझ्या हाॅटेलपर्यंत पोहोचलो होतो.

‘नोकरी’

हे सांगताना मी विलक्षण ओशाळलो होतो.

‘निव्वळ हौस म्हणून तुम्ही एवढ्या दूर इजिप्तपर्यंत येऊ शकलात, म्हणजे तुम्हाला पगार चांगलाच मिळत असणार. तरी सांगतो सर, नोकरीपेक्षा धंद्यात मजा असते.’

हे शेवटचे वाक्य मला नको असतानाही प्रतिध्वनी होत होतं ऐकू आले. त्याचे पुढचे वाक्य तर मी आयुष्यभर विसरणार नाही. जाता जाता तो म्हणाला,

‘सर, धंद्यात रिस्क असते. थोडी रिस्क घ्या. जेवढी रिस्क जास्त, तेवढा पैसा जास्त. नोकरी सोडा!’

या अकरा वर्षांच्या, चार फुटी इजिप्शियन बटूमुर्तीने मला त्या दोन तासात जेवढे शिकवले, तेव्हढे मी पंचवीस वर्षांपूर्वी एमबीएच्या (MBA) दोन वर्षात आणि २५ वर्षांच्या ‘कार्पोरेट लाईफ’ (Corporate Life) मध्येही शिकलो नव्हतो!

दोन इयत्ता पास एमबीए! | Passed Two Classes MBA !©रवी वळेकर

दोन इयत्ता पास एमबीए! | Passed Two Classes MBA ! हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

दोन इयत्ता पास एमबीए! | Passed Two Classes MBA ! – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share दोन इयत्ता पास एमबीए! | Passed Two Classes MBA !

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO