पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
पुस्तक…Pustak Kavita
जून कधीच नाही आवडायचा त्याला.
जून यायचा तो बंद शाळेची किल्ली घेवून.
जूनच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरू व्हायची.
नवा वर्ग.
नवे शिक्षक.
दोनचार नवे दोस्त.
बस एवढंच.
नवा गणवेश.
नवं दप्तर.
नवी कंपास.
नवी वाॅटरबॅग.
नवा डबा.
सगळं नवेपण.
दोन तीन वर्षातून एकदा.
जुनं ते सोनं..
रगडून वापरायचं.
कस लागेपर्यंत.
आखिरी दम तक.
अगदीच नाईलाज झाला, तर नव्याची खरेदी व्हायची.
तो तसा समंजस होता.
नव्याचं नवेपण जाणवायचंच नाही त्याला.
ऊलट ओझं वाटायचं.
आईबापाची ओढाताण.
नवं नकोसं वाटायचं.
पुस्तक…(Pustak Kavita)
ते मात्र त्याला नवीन हवं असायचं.
नेहमीच.
कधीच मिळायचं नाही.
बालभारतीचं ते मनभावन चित्र.
चित्रातले ते ताई दादा.
पुस्तकाच्या नवलाईनं हरखून गेलेले.
पुस्तकात हरवलेले.
मन लावून अभ्यास करणारे.
त्यांच्या चेहर्यावरचा तो निरागस आनंद.
त्याला नेहमी वाटायचं.
नवीन पुस्तक हातात यावं.
त्याचा तो वास.
मनापासून, श्वासागणिक हुंगून घ्यावा.
त्यातली ती चित्रं.
अगदी गणिताच्या पुस्तकात सुद्धा असायची.
गणित सोप्पं वाटायचं.
पान् पान अलगद ऊलटावं.
कुठलाही कोपरा दुमडलेला नसावा.
कुठल्याही शब्दाखाली रेघोट्या नसाव्यात.
फोडणीचा वास अन् शाईचे डाग.
अशी कुठलीही रांगोळी नसावी पुस्तकावर.
साधीशी असणारी पुस्तकातली ती जिवंत चित्रं.
कुठल्याशा फालतू अदाकारीनं, विद्रूप न झालेली असावीत.
आय. एम. पी. च्या नावाखाली कापलेल्या चौकटी.
सवय होती त्याला त्याची.
आपल्या हातानं तो त्या चौकटी लिहून काढायचा.
त्याच्या हाती येणार्या पुस्तकाला,
पहिलं अन् शेवटचं पान नसायचंच कधी.
अस्पर्श , नवंकोरं पुस्तक.
शेवटपर्यंत हाती लागलंच नाही.
जूनच्या पहिल्या आठवड्यात आईचं बोट धरून..
तो आप्पा बळवंत चौकात जायचा.
जोगेश्वरीपाशी सेकंड हॅन्ड पुस्तकं मिळायची.
त्यात कसला आलाय चाॅईस ?
त्यातल्या त्यात धडधाकट निवडायचं.
वर्तमानपत्राचं कव्हर घालायचं.
झाकता येईल तेवढं ऊसवलेपण झाकायचं.
तरीही..
तो मनापासून शिकला.
फार नाही पण थोडासा श्रीमंत झाला.
आज..
बाईक घेवून आप्पा बळवंत चौकात गेला.
त्याच्या लेकासाठी पुस्तकं घ्यायला.
नवीन पुस्तकं घ्यायची ही दुसरी वेळ.
दुसरीत गेलाय त्याचा लेक.
दुकानाबाहेर सेकंड हॅन्ड मिळायची.
आता तो दुकानात शिरतो.
त्याच्या मुलासाठी फर्स्टहॅन्ड पुस्तकं.
त्याच्या चेहर्यावरचा आनंद.
न मावणारा.
आज अंबानीएवढा श्रीमंत होता तो.
नवं दप्तर, कंपास , डबा, वाॅटरबॅग , वह्या , पुस्तकं,रेनकोट.
त्याच्यासाठी आज सगळं परवडणेबल.
त्याच्या चेहर्यावर थोडीशी गुर्मी.
तो आत दुकानात शिरणार..
बाहेर एक चिमुरडा त्याच्या आईबरोबर.
जुनी पुस्तकं ‘ निवडत’ होता.
तो फ्लॅशबॅकमधे.
ती मजबूरी पुन्हा जिवंत झालेली.
नाही रहावलं.
तो आणि त्याची आई.
खूप नाही नाही म्हणलं त्यांनी.
पहिलीची पुस्तकं घेत होती ती दोघं.
पहिलीच वेळ.
नवीन पुस्तकं घेवून दिली.
त्याच्या आईला म्हणाला ,
” एज्युकेशन लोन आहे असं समजा ताई..
माझा नंबर देतोय.
वर्षअखेरी चांगल्या मार्कांनी पास झाल्यावर फोन करा.
मगच लोन फिटेल हे.”
त्या पोराच्या चेहर्यावरचा तो आनंद.
आता तर तो बिल गेटस्पेक्षाही श्रीमंत झालेला.
भरल्या पोटी तो दुकानात शिरतो.
हातातली लिस्ट देतो.
पैशाचं गणित चुकतंय.
दप्तर कॅन्सल.
घरी येतो.
पोराची समजूत काढतो.
पुढच्या महिन्यात नवीन दप्तर घेवू.
त्याचं पोरगं त्याच्याहून श्रीमंत.
” बाबा , माझं दप्तर अजून वर्षभर सहज जाईल.
खरी महाग पुस्तकंच.
पुस्तकांपुढे दप्तराची किंमत शून्य.
मला नवीन पुस्तकं मिळाली.
बाकी काही नको.”
तो खूष.
त्याचं पोरगं आयुष्याचं पुस्तक वाचायला शिकलेलं.
नक्की चांगल्या मार्कांनी पास होणार.
आता जून आवडतो त्याला.
जुन्याचं ओझं नव्यानं संपलेलं.
आणि तो..
तो नव्या पुस्तकाला कव्हर घालू लागला
प्लॅस्टिकचं, ट्रान्सपरंट.
–कौस्तुभ केळकर नगरवाला
4 thoughts on “पुस्तक | Book”