Time Passes and so does the Moment

वेळ निघून जाते आणि तो क्षण ही | Time Passes and so does the Moment

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Time Passes and so does the Moment

मृदुला दिवसभराच्या धावपळीने थकून जरा निवांत बसावं म्हणून चहाचा कप हातात घेऊन सोफ्यावर बसली. समोर लावलेली आपल्या लेकीची लहानपणीची फ्रेम बघून तिची नजर तिथेच खिळली. आपल्या लेकीचे आणि लेकाचे जन्मापासूनचे ते अगदी कॉलेजपर्यंतचे फोटो कोलाज करून हौसेने छानशी फ्रेम करून घेतली होती तिने. चहाचा घोट घेत ती एक एक करून ते फोटो पाहत बसली. “बघता बघता कित्ती लवकर मोठी होतात ना ही मुलं…!! इतकी वर्ष कशी भराभर सरली.. आधी मृण्मयीचा जन्म मग चार वर्षांनी मिहिर झाला.

दोघांचं सगळं व्यवस्थित करता यावं म्हणून आम्ही दोघांनी चर्चा करून मी जॉब सोडायचा घेतलेला निर्णय, या निर्णयामुळे पुढची कित्येक वर्ष मुलांचं संगोपन, त्यांचं शिक्षण यासाठी लागणारा पैसा, यासाठी जुळवाजुळव करताना करावी लागलेली आर्थिक ओढाताण यात गेली पण त्यांचे वाढदिवस आणि सण समारंभ साजरे करताना त्यांच्या वडिलांनी कॅमेरात टिपलेले हे काही गोड क्षण… आज हे सगळं आठवतंय कारण माझ्या लाडक्या मृण्मयीचा उद्या साखरपुडा आहे!! ही सत्तावीस वर्ष कशी भुर्रकन उडून गेली कळलंच नाही.. असं वाटतंय अगदी आत्ताच तर तिचे इवलेसे, कोमल, नाजूक हात मी पहिल्यांदा हातात घेतले होते आणि आता…. माझी लेक सासरी निघालीसुद्धा..” गालावरून ओघळलेले अश्रू पुसत मृदुला आठवणीच्या कुंचल्यातून आपले भूतकाळातले ते रंग पुन्हा हृदयात साठवून घेऊ पाहत होती.

इतक्यात दारावरची बेल वाजली. मृदुला उठली आणि तिने दरवाजा उघडला. तिचे पती मोहन आले होते. उद्या लेकीचा साखरपुडा म्हणून आज लवकर घरी आले होते.
“काय ग असा काय दिसतोय चेहरा तुझा?”
“काही नाही ओ.. दिवसभर उद्याची तयारी करत होते आणि चहा घ्यावा म्हणून जरा निवांत चहा पीत बसले तर या फ्रेम कडे बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या.. डोळे कधी भरून वाहू लागले कळलंच नाही मला.” बोलताना पुन्हा कंठ दाटून आला मुदुलाचा.
“हो ग खरंच” मोहनरावांच्या अवाजातही कंप जाणवला.

आता भावनिक होऊन आपल्याला चालणार नाही अजून बरीच तयारी बाकी आहे उद्याची असं म्हणत दोघेही पुन्हा एकदा एकमेकांशी चर्चा करू लागले उद्याच्या तयारीत काही राहून गेलं नाही ना!!
“बाकी मृदुला काही म्हण आपल्याला तशी जास्त धावपळ नाही करायला लागली ना? मुलांनी सगळंच अगदी व्यवस्थित प्लॅनिंग करून केलंय सगळं. हॉल पासून डेकोरेशनपर्यंत, कपड्यांच्या खरेदीपासून पाहुण्यांच्या आमंत्रणापर्यंत सगळी जबाबदारी चोख पार पाडली आहे. हल्लीची ही पिढी खरंच स्मार्ट आहे. सगळ्याच बाबतीत स्मार्ट. एका क्लिक वर सोल्युशन काढतात पटकन. ऑनलाईन शॉपिंग करून वेळही वाचवतात.” मोहनराव न थांबता बोलत होते आणि मृदुलाही कौतुकाने त्यांच्याकडे पाहत होती.

आतल्या बेडरूममध्ये मृण्मयी पार्लरवाल्या मुलीकडून मेहेंदी काढून घेत होती आणि दर काही मिनिटांनी त्याचा व्हिडिओ किंवा फोटो काढायला विसरत नव्हती. मिहिर अजूनही बाहेरची कामं आटपून घरी आला नव्हता. मृण्मयीची मेहेंदी झाल्यावर तिने बळेबळेच आईला म्हणजे मृदुलाला मेहेंदी काढून घ्यायला लावली आणि मग दोघींचा छानसा एक फोटो काढून तो सोशल मीडियावर अपडेट करून मगच झोपायला गेली.

दुसऱ्या दिवशी मृदुलाने सकाळीच उठून मृण्मयीच्या आवडीचा आमरस पूरी आणि मसालेभाताचा बेत केला आणि सगळं अगदी वेळेच्या आधीच आटपून घेतलं. मृण्मयीनेही उठल्या उठल्या आपल्या मेहंदीचा खुललेला लाल रंग कॅमेऱ्यात टिपून घेतला. हॉलवर संध्याकाळी चार वाजता पोहोचायच होतं म्हणून मृण्मयीने आपली साखरपुड्याची साडी आणि नंतर रिसेप्शनचा महागडा गाऊन, त्यावरचे मॅचिंग ज्वेलरी सेट सगळं एका बॅगेत भरुन ठेवलं. जाताना नेसायची साडी बाजूला ठेऊन दिली. अडीच वाजता मेकअप करायला पार्लरवाली येणार होती म्हणून आवरून बसली.

तिची ही सगळी तयारी मृदुला गेले कित्येक दिवस पाहत होती आणि आपल्या वेळेला हे असं काहीच नव्हतं हे आठवून या सगळ्याच तिला अप्रूप वाटत होतं. तिथे मिहिर एका जबाबदार भावाप्रमाणे सगळी तयारी माणसांकडून चोख करून घेत होता आणि ऑर्डर दिलेल्या केकची वेळेत delivery होईल ना याचीही खातरजमा करून घेत होता. बरोब्बर चार वाजता सगळे हॉलवर पोहोचले. काहीच मिनिटांत मुलाकडची मंडळीही आली.

मृण्मयी आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याने मनसोक्त फोटोसेशन करून घेतलं. हळूहळू करून पाहुणे आले. मृण्मयी पुन्हा आपली दुसरी साडी नेसायला रूममध्ये गेली. पाच वाजता ठरलेल्या मुहूर्तावर साखरपुडा पार पाडायचा म्हणून एकच लगबग झाली. पारंपरिक पद्धतीने छान साखरपुड्याचे विधी पार पडले. त्यानंतर पुन्हा तयारी करायला मृण्मयी आत गेली. त्यांनतर ती मस्त मरून रंगाचा गाऊन घालून आली.मृदुलाला अगदी बाहुलीच दिसत होती तिची मृण्मयी. नचिकेत म्हणजे मृण्मयीचा होणार नवरा तिथे हॉलच्या दाराजवळ जाऊन उभा होता आपल्या मित्रांसोबत.

मृण्मयी तयार होऊन स्टेजवर येताच गाणं सुरू झालं आणि त्या गाण्यावर ठेका धरत, नाचत नचिकेत ने entry घेतली. हॉलमधले सगळ्यांचे मोबाईल हा क्षण टिपायला नचिकेतकडे वळले. खूपच romantic पद्धतीने नाचत येत त्याने स्टेजवर येऊन मृण्मयी समोर गुढग्यावर बसून तिचा हात हातात घेतला आणि गाणं थांबलं.. पूर्ण हॉलमधील लोकं हा सोहळा, हे क्षण आपापल्या मोबाईल, कॅमेरमध्ये बंदिस्त करत होते.

लव मॅरेज ठरलेल्या नचिकेतने गुढग्यावर बसून अगदी फिल्मी पद्धतीने मृण्मयीला सगळ्यांसमोर पुन्हा प्रपोज केलं आणि त्यांच्या प्रेमाचा आज विजय झाला या आनंदात न्हाऊन निघत भरलेल्या डोळ्यांनी मृण्मयी ने सुद्धा त्याला होकार दिला आणि मग त्याने तिच्या बोटात अंगठी घातली. हा सगळा रोमंचभरला सोहळा, आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचा ओसंडून वाहणारा आनंद आणि तिच्या नवीन सुखी जीवनाची अशी सुंदर सुरुवात होताना बघून मृदुलाचे ही डोळे आनंदने भरून आले. तिने दोघांना मनभरून आशीर्वाद दिले.

त्यानंतर नव्या जोडप्याचा डान्स, त्यांच्या मित्र मैत्रिणींचा डान्स, cake cutting हे सगळं आताच्या रीती प्रमाणे साग्रसंगीत पार पडलं आणि साखरपुडा अगदी दणक्यात पार पडला. सगळे छान आनंदात होते. या सगळ्यात मृदुलाला मात्र आपला साखरपुड्याचा दिवस आठवला.

“त्या वेळी असे काहीच नव्हतं ना!! सगळं कसं साधं सरळ असायचं. नवरी मुलगी तर लाजून बराच वेळ मान खाली घालून असायची. साखरपुडा काय मी तर लग्नातही कित्ती नर्व्हस होते स्वतःच्या. फोटो काढताना सुद्धा अवघडलेपण असायचं. त्यानंतर संसारात पडले आणि संसार, मुलं यात इतकी रमले की हे असे छोटे छोटे कितीतरी क्षण कॅमेऱ्यात टिपले च नाहीत. आजची पिढी कसं प्रत्येक क्षण सोहळा म्हणून खास करते आणि तो कॅमेऱ्यात आठवण म्हणून जपून ठेवते पण आमच्यावेळी असं काहीच नव्हतं त्यामुळे त्या त्या वेळी कधी तडजोड म्हणून आम्ही त्या क्षणांना फारसं महत्त्व दिलंच नाही.

लहानच मोठं होणाऱ्या मुलांमध्ये च आपली स्वप्न पहिली आणि त्यांच्यासाठी , आपल्या संसारासाठी स्वतःला वाहून घेतलं. आज जेव्हा मी माझ्या मुलीला तिच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी एवढं भरभरून जगताना पाहते आहे तेव्हा तिच्यापेक्षा कैक पटीने तो आनंद मला होतो आहे पण मनात कुठेतरी सलतय ते म्हणजे माझी गेलेली वेळ आणि ते क्षण पुन्हा मला मिळणार नाही. काही गोष्टी आपल्या आयुष्यात एकदाच घडत असतात पण त्या घडताना त्यांना किती महत्व द्यायचं आणि त्याचा भरभरून आनंद घ्यायचा हे आपण विसरतो. .” मनातल्या भावनांना आवर घालत मृदुला सगळ्यांसोबत मिसळत, चेहऱ्यावर हसू आणत त्या सोहळ्यात आनंदाने पुन्हा सामील झाली.

खरंच… काही गोष्टी आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाच्या असतात पण आपण त्यांचा मनमुराद आनंद घ्यायचा त्या त्या वेळी विसरून जातो. आताची पिढी प्रत्येक क्षण जगू पाहते याच मोठं कारण म्हणजे त्यामागे त्यांच्या आईवडिलांनी त्याग केलेले असे कितीतरी छोटे छोटे असंख्य क्षण आहेत ज्यामुळे आज ही पिढी स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभी राहून आपलं आयुष्य आपल्या मर्जीने आणि आर्थिकदृष्ट्या सबळ रीतीने जगू शकते आहे. या आत्ताच्या पिढीने आपल्या आईवडिलांचे हे ऋण कधीच विसरता कामा नये.

आधीच्या पिढीने मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे की गेलेली वेळ पुन्हा कधीच येत नाही आणि तो क्षण पुन्हा उपभोगता येत नाही. याचा अर्थ घडलेल्या प्रत्येक गोष्टीचा फोटो घेत सुटायचा असं नाही. प्रत्येकाची आनंदाची, सुखाची परिभाषा वेगळी असते. कुणाला प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करायला आवडतात तर कुणाला डोळयात भरून घेऊन ह्रुदयात साठवून घ्यायला आवडतं. माझं म्हणणं इतकंच आहे की आपण सगळ्यांनी आपल्यासमोर जे काही आयुष्य आहे ते भरभरून जगावं, प्रत्येक क्षण मनापासून जपावा आणि आठवणीच्या सुगंधी कुपीत तो बंदिस्त करून ठेवावा म्हणजे मग नंतर मनात सल राहत नाही.
सदर कथेच्या प्रकाशनाचे हक्क लेखिकेकडे राखीव..

वेळ निघून जाते आणि तो क्षण ही | Time Passes and so does the Moment -©रश्मी केळुसकर

वेळ निघून जाते आणि तो क्षण ही | Time Passes and so does the Moment हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

वेळ निघून जाते आणि तो क्षण ही | Time Passes and so does the Moment – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share वेळ निघून जाते आणि तो क्षण ही | Time Passes and so does the Moment

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO