When we talk about women

आम्ही जेव्हा स्त्रियांबद्दल बोलतो तेव्हा… | When we talk about women

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

When we talk about women

इंग्लिश मध्ये प्रथम जेव्हा एका बाईचं वर्णन ‘सेक्सी बीच’ असं केलं जातं तेव्हा मनावर जो ओरखडा उठला तो अजून तसाच आहे. मराठीत आपण रागाने विचारतो, “काय रे, तुला आई बहिण आहेत कि नाही?” म्हणजे आई-बहिणींना सन्मान, परंतु त्याचा गर्भित अर्थ असा कि परक्या बाईची चाड ठेवायची पद्धत नाही. खटकतं ते. शिवाय आई-बहिण यामध्ये “बायको” नाही. ती आपली ‘पायातली वाहन पायातच बरी.’ किंवा “आपलं जनावर आपल्या ताब्यात हवं.”(हे लक्ष्मण माने यांच्या ‘बंद दरवाज्यातल वाक्य)
रांड म्हणजे नवरा मेलेली आणि संदर्भाने “छिनाल” स्त्री. माणसं सगळीच मरतात, पण एकाच्या मरणाची भयानक शिक्षा दुस-याला देणारे विधवांचे उल्लेख. तोंड दिसलं कि अपशकून होतो म्हणे. आणि सवाष्ण म्हणजे फार शुभ. तिचं कर्तृत्व काय तर नवरा जिवंत आहे. वांझ बाईची आणखीनच परवड. “मुल नसलेला पुरुष” याला भाषेत वेगळा शब्द सुद्धा नाही. पण वांझेची किती हेटाळणी वान्मायात सापडते.
!

आणि माणसाच्या जिव्हाळ्याचा जो विषय शृंगार तो मालकी भावनेशी जोडलेला. नवरा श्रेष्ठ हवा आणि नवरी कुमारिका. स्त्री पुरुषाचे शरीर मिलन हि नैसर्गिक क्रिया किती ओंगळ पणे बोलता येते! या स्पर्धेत मराठीचा नंबर वर लागावा. त्यातून दिसतं ते स्त्रीचं दुय्यम स्थान. पुत्रांना जन्म घालणारी पत्नी (मुलींची आई नव्हे) सोडली तर इतर स्त्रिया यथातथाच. शिवाय शरीराने तर ती मालकीची हवीच आणि कामजीवनात पासिव्ह. तिच्या शरीराचं वर्णन खायच्या वस्तूसारखं केलेलं. “छाती वरची फळं” वैगरे. त्यानं तिच्यावर झडप घातली, चोळामोळा केला. कुस्करली वैगरे. या सगळ्यातून शिकारी-सावज हे नातं दिसतं. नाहीतर खादाड – अन्न हे नातं दिसतं इतर शब्दांतून. तिला पाहून लाळ टपकायला लागली वैगरे. असली बुभुक्षित वर्णनं पुरुष देहाची होत नाहीत.

त्याहून अपमानास्पद बाजू म्हणजे बाई=शरीर हि कल्पना. “बायकांची अक्कल” विनोद विषय . किंवा बायकांची जाडी “जाडी'” दोहोंतून शरीर महात्म्यच दिसतं. वेगवेगळ्या पैलुंतून. “नाकापेक्षा मोती जड नको” हि वधू निवडताना अपेक्षा. “पायाची दासी”- सिंधू आमची फार आवडती. “तोंड मिटून सोसणारी” ती म्हणे खरी स्त्री. डोकं वापरून अन्यायाचा प्रतिकार करील तर तिच्यासाठी शब्द नाहीत. उलट ती सरस असली तर अनेक कुचेष्ठेचे शब्द आहेत. उदाहरणार्थ बोलभांड, जहांबाज, कजाग वैगरे. या शब्दांना वाईट वास आहे जसा काही. “हळवी, रडवी, दुबळी, अबोल” स्त्री आमची लाडकी. कर्तबगार स्त्रीला म्हणायचं “अरे वा रे वा! मक्ता पुरुषांनाच?
बाई शृंगारात रस घेणारी असली तर शब्द सगळे कुचेष्ठेचे किंवा तुच्छतेचे, छचोर, छिनाल, सैल, चालू, घसरलेली, वाकड पूल पडलेली, पोट वाढवणारी, वैगरे, पण या पायरीपर्यंत तिची साथ देणाऱ्या पुरुषाचे शव विच्छेदन नाही.
प्रत्येक प्रकारच्या अपमानाची थोडी थोडीच उदाहरणं मी दिली आहेत. आणखी शब्दकोशात सापडावीत. शरीर, मन, बुद्धी या तिन्ही क्षेत्रात स्त्रीला भाषिक समानता नाही. कारण सामाजिक विषमतेचा ठसा भाषेवर उमटलेला.
“एक गेली (मेली) तर छप्पन्न मिळतील” हा आमच्या नवर्यांचा बाणा. उलट वाक्य सापडतं का पहा बरं? नुसतं ” हा गेला तर दुसरा मिळेल” असं वाक्यसुद्धा इथल्या माणसांच्या कानांना कसंकसं च वाटत. आणि ते बाईच्या तोंडी वाङ्मयात सुद्धा क्वचितच आढळतं.(व्यंकटेश मंडगूळकरांनी मात्र एका फर्मास विनोदी कथेत –“त्या गावाला काही धोंडे मिळणार नाहीत का?” असा सूचक उल्लाओख केला आहे.)

“बायकांची अक्कल चुलीपुरती”, “बाईलबुद्धया” माणूस “बायकी” वृत्तीचा माणूस (म्हणजे कुचाळक्या, चहाडखोरीत आरएस घेणारा या अर्थाने), वगैरे. “घरकोंबडा” पुरुष टाकाऊ, पण बाई मात्र “उंबऱ्याच्या आतच राहणारी” चांगली.
राजकारण, गृहकारण सर्वत्र बायकांचा उल्लेख अनर्थला उत्तेजन देना-या असा होतो. “बायकोच्या तालावर नाचणारा माणूस” हो तुच्छ्तादर्शक, नव-याच्या आज्ञेतली बायको हे स्तुतीसुमन.
आर्थिक क्षेत्रात तर बाई हीच मालमत्ता, बायकपोरे, गुरेढोरे, जमीनजुमला हो एकाच श्वासात (माफ करा, इंग्रजी वाकप्रयोग) केलेले संपतीचे वर्णन. संकटात मात्र “आत्मानं सततं रक्षेत, दारैरपि धनरैपि,” बाईचं वर्णन उपयुक्त वस्तू म्हणून तर कितीतरी वेळा “माल” कसा आहे म्हणे किंवा गरीबघरची मुलगी पण “वस्तूलाभ” उत्तम म्हणून सून केली. किंवा एखादीची अब्रू “लुटली”. कन्यादान पण पुत्रदान नाही. दानावरती वरदक्षिणा द्यायची “कुणगा” हा स्पेशल शब्द. बायकोने नवर्याच्या नकळत ठेवलेल्या पैशांना म्हणजे गृहस्वामिनीला उघड आर्थिक अधिकार नाहीतच.
योनिशुचितेचा केवढा दंभ! बायको ‘शिळी” किंवा ‘उष्टावलेली’ नको आणि पुरुष? अनुभवामुळे ‘रसिक’ बनलेला. तिचं व्यक्तिमत्व एवढं नगण्य की लग्नात नावही बदलायचं. म्हणजे ‘राम’ असला की ‘सीता’, ‘रावण’ असलाकी ‘मंडोदरी’ असलं मॅचिंग, लहानपणापासून ती जी कोणी ‘क्ष’ होती त्या क्ष च्या अस्मितेवरच वरवंटा. बरं, आता जरा अध्यात्म क्षेत्रात पाहूया. तिथे तर चिखल फेकच. स्त्रीमोह हे नरकाचे साधन. “बरे झाले देवा बाईल कर्कशा” ही आमची संतवणी. स्त्री देहाची, शृंगारची, सहजीवनाची पवित्रता न समजलेली अति ओंगळ वर्णने “धर्म” या नावाने लिहिल्या जाणा-या पुस्तकातून सापडतात. बायकोबद्दल संशय तर इतका की बोलायची सोय नाही. रोमन लोक प्रत्यक्षच कुलूप लावून जात परदेशात. इथे सतत पहारा आणि मानसिक छळ. आग आणि लोणी म्हणे पुन्हा आग स्वयंभू, लोणी पराधीन.

मात्र “मातृशक्ती” चे कौतुक हा याला सन्माननीय अपवाद. “माता” या स्वरुपात का होईना स्त्रीचा बराच गौरव, तिच्या शक्तीची जाणीव दिसते, पाश्चात्य परंपरेत तेही नाही. नुसतीच सेक्स object. “अंगवस्त्र बाळगण” हा शब्द प्रयोग फार सभ्य म्हणावं असं बाकीच आहे इंग्रजीत. आणि जी गोष्ट नकारात्मक शब्दप्रयोगातून जाणवते तीच positive विधांनांच्या अभावातून. म्हणजे “पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा” पुरुषपुढे पराक्रमाचे क्षेत्र अमर्याद पण बाईबद्दल जास्तीतजास्त महत्वाकांक्षा म्हणजे “तिने सासर-माहेर दोन्ही कुळे उद्धरावी.” तिचं क्षेत्र घर-लग्न-मुलं बाळं यातच कसं फिरत राहावं हे शब्दांच्या ‘न’ असण्यातूनही जाणवतं. “बायकांच्या जातीला नसत्या चौकश्या कश्याला.” हा कुतूहल मारण्याचा प्रभावी फॉर्म्युला, बाईची सगळी किमत ठरायची ती परावर्तीत प्रकाशातून. तिचा बाप, नवरा,भाऊ, मुलगा यांच्या कर्तृत्वामुळे. अपवाद ‘कलावंतिण’ स्त्रियांचं त्यांच्या प्रतिभेला वाव. परंतु त्यांना मिळणारा सन्मान दुधारी तलवारीसारखाच. कलावंतीन आणि ‘गरती’ या वॉटर टाईड डिव्हिजन्स.

अगदी अखेरचा आणि मारमावर घाव घालणारा मुद्दा म्हणजे “शिव्या” सगळ्यात पॉवरबाज शिव्या कोणत्या तर आईबहिणीवरून दिलेल्या. पुरुषाचा सर्वात मोठा अपमान कोणता तर “त्याच्या” कक्षेतील बायकांचा शारीरिक उपमर्द. क्रोध जेव्हा अनावर होतो आणि तो दुर्बलतेचा क्रोध असतो. त्यामागे आपली स्थिति बदलणार नाही हे वैफल्य असतं. तेव्हा माणूस शिव्या देतो. एक प्रकारचं समाधान मिळत त्यातून अन्यायाला काही तरी तोंड दिल्याचं. शिव्या हा सेफ्टी व्हॉल्व्ह आणि तो मुख्यत्वे आईबहिणीवरून. यातून स्त्रीबद्दल कोणती वृत्ती सूचित होते? स्त्रियांबद्द्ल चा हा भाषिक हिंसाचार जर कधी मराठी भाषेतून पूर्ण नाहीसा झाला तर मराठी मनांच्या सुसंस्कृततेचे ते एक लक्षण होईल असं माला वाटतं. एखाद्याबद्दल शत्रुत्व व्यक्त करायला जमावाने जाऊन “त्याची” बायकामुलं मारणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, जीवंत जाळण असं आपण सवर्ण-दलित किंवा अशाच गटांबद्दल वाचतो. प्रत्यक्ष करण आणि तसं बोलून दाखवणं यात नातं आहे.

एडमंड गॉस च्या एका पुस्तकात आहे की, “दोन निरद्योगी म्हातार्या बायका विणकाम करता करता जेव्हा कुलुषित मनाने दुसर्या राष्ट्राच्या नागरिकांबद्दल बोलतात तेव्हा महायुद्ध एका पावलाने जवळ येतं” त्याचा संदर्भ त्या पुस्तकात इंग्लंड – जर्मनी बद्दल होता. या वाक्यात फार खोल अर्थ भरला आहे. “सहज” बोलता बोलता जेव्हा आपण ‘स्त्री’ ला ‘कमी’, ‘तुच्छ’ ‘धोकादायक’, ‘मोहाकडे नेणारी’ वैगरे समजतो आणि तसेच शब्दप्रयोग करतो. तेव्हा प्रत्येक तशा घटनेतून स्त्रीचं समानपण तिळातिळानं ऱ्हास पावतं. प्रत्येक नवजात कन्येला त्या विचारांचा वारसा मिळतो. तशातच तिचं बालपण घडतं..
लक्षं ठेवालं ना आता स्वता:वर बोलताना? तुमच्या शब्दांतून नकळत काय डोकावतं-स्त्री माणसाबद्दल?
(प्रस्तुत लेख हा श्रीमती आशा मुंडले यांचा ‘साधना’ मध्ये 15 ऑगस्ट 1984 मध्ये प्रकाशित झालेला आहे)

आम्ही जेव्हा स्त्रियांबद्दल बोलतो तेव्हा… | When we talk about women हा कथा अवडला असल्यास शेअर करा.

आम्ही जेव्हा स्त्रियांबद्दल बोलतो तेव्हा… | When we talk about women – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share आम्ही जेव्हा स्त्रियांबद्दल बोलतो तेव्हा… | When we talk about women

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO