पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Zoom meeting
आपल्या गाडीपेक्षा ओला आणि त्यातही उबेर अनेकदा स्वस्त पडते. सोईचीही असते. पार्किंगचा त्रास मुख्य म्हणजे नसतो. त्यामुळे पुण्यात, शहरात तरी ‘उबेर’चा पर्याय मी अनेकदा निवडतो.
आज असाच ‘उबेर’ने निघालो. ड्रायव्हर जरा अशिष्टच वाटत होता. माझी ‘झूम मीटिंग’ सुरू होती. ‘सलोख्याचा विचार सर्वदूर पोहोचवण्यासाठी नेमके काय करता येईल’, याविषयी आम्ही काही मित्र बोलत होतो.
ड्रायव्हर मोठमोठ्यानं कोणाशी तरी फोनवर बोलत होता. बराच वेळ बोलत होता. त्याला प्रेमानं म्हटलं – “अहो, माझी एक मीटिंग सुरू आहे मोबाइलवर. तुम्ही हळू आवाजात बोला. तुमचा आवाज तिकडंही ऐकू जातोय.”
तर तो म्हणाला – “का? बोलायची चोरीय का? बहिणीबरोबर तर बोलतोय.”
त्याला बराच वेळ पटवूनही तो काही ऐकेना. गाडी चालवताना फोनवर बोलू नये, असे सांगूनही तो चूप होईना. त्याचा आवाज कमी होईना. वरच्या पट्टीत तो मलाच सुनावू लागला.
मला त्या क्षणी तातडीनं काही करणं भाग होतं.
अखेरीस, मी मीटिंगमध्ये स्वतःला म्यूट केलं. आणि, मीटिंगमध्ये बोलतोय, अशा पद्धतीने मोबाइलमध्ये पाहात मोठ्याने ओरडलो- “काय मूर्खपणाय हा! दोन्ही पीआयना सांगा. पोलीस स्टेशनला कळवा. आपले सीआयडीचे पाच कॉन्स्टेबल पाठवा. आणि, आत घ्या साल्याला. बदडून काढा.”
आणि, क्षणार्धात,
त्याचा फोन बंद. एकदम गडी मऊ.
देहबोली आक्रसलेली.
माझी झूम मीटिंग निर्विघ्न पार पडली.
पैसे ‘फोन पे’ करत असताना त्यानं अगदीच मऊ आवाजात विचारलं – “साहेब, तुम्ही डिपार्टमेंटमध्ये आहात का?”
मी म्हटलं – नाही बा.
“मग मघाशी ते!”
“हां, ते होय. आमच्या एका नाटकाची प्रॅक्टिस सुरू होती.”
उगाच या फडतूस माणसाला आपण मघाशी घाबरलो, असे भाव त्याच्या चेह-यावर होते!
नाट्यशास्त्रात ‘डिप्लोमा’ केल्याचे असेही फायदे असतात!
संजय आवटे
झूम मीटिंग | Zoom meeting हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
झूम मीटिंग | Zoom meeting – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.