पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Vitthal Rakhumai Temple at Guruwar Peth, Satara
साताऱ्याच्या गुरुवार पेठेत, दत्ताच्या देवळाशेजारी, उदय गुजरच्या घरासमोर एक छोटेखानी विठ्ठल रखुमाईचे देऊळ आहे.
छोटंसंच आहे…
दगडी बांधकाम…
बांधीव शिखर…
दरवाज्यातून आतमधे गेल्यावर दगडी फरशाचे छोटेसेच अंगण… एका बाजूला हातपाय धुवायला पाणी भरुन ठेवलेला ड्रम… एका बाजूला बहरलेली विठ्ठल तुळस आणि शेजारी पारिजातकाचे झाड…
पुढे देवळाचा सभामंडप आणि त्यानंतर गाभारा !
गाभाऱ्यातल्या चौथऱ्यावर विराजमान विठ्ठल रखुमाई ! काळ्या पाषाणातल्या रेखीव मूर्ती.
कर कटीवर, उभे विटेवरी, कानात मकरकुंडले, पुजारी काकांनी अतिशय काळजीपूर्वक मायेने विठ्ठल रखुमाईची केलेली वेषभूषा , तेवढ्याच कलात्मकतेने विठ्ठलाच्या कमाळावर चंदनाचा टिळा आणि मधोमध बुक्क्याचा गोल ठिपका…
रखुमाईच्या कपाळावर गोल ठसठशीत लालबुंद कुंकू रेखलेले आणि त्याच्याखाळी हळदीचा पिवळाधम्मक गोल…
रुपे सुंदर म्हणजे काय हे तेव्हा समजलं !
कार्तिक मास सुरु झाला की याच विठ्ठल रखुमाईची आठवण येते.
आई साडे चार – पाच वाजता हाक मारुन उठवायची. डोळे चोळत उठायचं, हातावर गुलाबी गोडसर चंचला किंवा थोडीशी खरखरीत माकड छाप काळी टूथ पावडर घेऊन दात घासून, दूध पिऊन तयार व्हायचं.
माझा हा कार्यक्रम होईपर्यंत आईची गार पाण्यानं आंघोळही झालेली असायची. तिची लगबग लगबग सुरु असायची.
तिचं आवरलं की आम्ही निघायचो. तिच्या हातामधल्या पिशवीत हळद, कुंकू, बुक्का, टाळ, एक निरांजन, तुपाची डबी, चार फुलवाती, काडेपेटी आणि छोट्याश्या स्टीलच्या डबीत लोणी साखर घेतलेले असायचे.
बाहेरच्या हवेमधे कार्तिक मासारंभाच्या थंडीची चाहूल असायची. अधेमधे थोडंफार धुकंही असायचं.
मठातून खाली उतरलो की दिवेकरांच्या बागेच्या कंपाऊंडवरुन वाकून खाली उतरलेल्या जास्वंदीच्या फांदीवरची दोन फुलं घ्यायला आई सांगायची.
लगबगीने आम्ही दोघं उतरणीवरुन पेठेतल्या रस्त्यावरुन अनवाणीच चाललेलो असायचो.
चालताना आई तोंडातल्या तोंडात व्यंकटेश स्तोत्र पुटपुटत असायची.
दत्ताच्या देवळात जाऊन दर्शन घ्यायची. निरांजनात थोडंस तूप घालून फुलवात लावायची….
‘काकड आरती स्वामी श्रीगुरुदत्ता
सद्भावें ओवाळू चिन्मयरूप अवधूता…’
आई दत्तमहाराजांचा काकडा म्हणायची.
शेवटच्या ओळी म्हणत असताना आई निरांजन तिथे ठेवून साष्टांग नमस्कार करायची…
‘निरंजन ओवाळू जातां तद्रूप झाला
सद्गुरुप्रसादें अहंभाव निमाला…’
साष्टांग नमस्कार करताना तो फरशीचा गार स्पर्श खूप छान वाटायचा.
आई मग दत्तासाठी तिथे डबीतले थोडं लोणीसाखर नैवेद्य म्हणून अर्पण करायची.
फुलवाती शांत झाल्या की त्या काजळीचे बोट माझ्या गालावर टेकवायची.
दत्त महाराजांना काकडा करायला आम्ही दोघं तिघेच असायचो.
मग शेजारच्या विठ्ठलाची देवळात जायचो. तिथे वीस पंचवीस जणं असायची. इथला काकडा हा सोहळा असायचा.
पुजारी काकांनी गाभाऱ्याचा दरवाजा उघडलेला असायचा. समोर विठोबा रखुमाई आळसावून उठल्यासारखे दिसायचे. सावळा विठू तर सक्तीने उठवल्यासारखा चेहेरा करून जबरदस्तीने कर कटीवर ठेवून उभा असायचा आणि रखुमाई तिरपा कटाक्ष त्याच्याकडे टाकत मनातल्या मनात हसत असायची… ‘कशी गंमत झालीय एका माणसाची आज !’ तिच्या चेहेऱ्यावर असे भाव दिसायचे.
आई पुढे जाऊन पुजारी काकांना आपण आणलेले लोणी साखर देत असे. मग काका सगळे लोणी साखर एकरुप करुन चांदीच्या भांड्यातून विठ्ठल रखुमाईसमोर ठेवून नेवैद्य अर्पण करायचे.
गाभाऱ्यात उदबत्ती आणि धूपाचा गंध दरवळत असायचा. नुकतीच उमललेली पारिजातकाची फुले विठ्ठल रखुमाईच्या पायाजवळ ठेवलेली असायची. आईने दिलेली जास्वंदीची फुले दोघांच्या मस्तकावर दिमाखादारपणे ठेवलेली असायची.
पुजारी काका पाच वातींचा काकडा लावायचे. त्यांच्या हातामधल्या त्या काकड्याच्या प्रकाशात विठ्ठल रखुमाईचे मूळचे लोभस चेहेरे अतिशय सुप्रसन्न दिसायचे.
पुजारी काका हलक्या आवाजात काकडा सुरु करायचे… देवाला जागं करायचं तर आवाज असाच हलका, हळवा, मायाळू हवा… अगदी आपल्या लहान मुलाला झोपेतून जागं करतोय तसा पुजारी काकांचा आवाज असायचा…
बा पांडुरंगा, रखुमाईताई… उठा आता ! दिवस उजाडायला सुरुवात झालीय ! देवळाच्या उंबरठ्यावर सूर्यदेव आलेत ! उठा देवा… जागं व्हा… हे सगळे भक्तगण आपल्यासाठीच आलेत…
काका पांडुरंगाला सांगायचे…
उठ गोपाळजी जाय धेनुकडे
पाहती सौंगडे वाट तुझी
उठ पुरुषोत्तमा वाट पाहे रमा
पाही मुखचंद्रमा
मंद झाला शशी…
काकांचा आवाज घोगरा होत होत सूर धरायचा…
भक्तिचिये पोटी बोध काकडा ज्योति
पंचप्राण जीवे – भावे ओवाळू आरती
ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा
दोन्ही कर जोडोनि चरणी ठेविला माथा…
हळुहळू त्यांचा आवाज ओलसर होई. खांद्यावरच्या उपरण्याने ते डोळे टिपत…
तुका म्हणे दीप घेऊनी उन्मनीत शोभा
विटेवरी उभा दिसे लावण्यगाभा…
नंतर लगेचच ‘वाटी’…
घ्या देवा लोणीसाखर
आले पायाशी नका देऊ अंतर
घ्या देवा लोणीसाखर
बाई देखीयली परब्रह्म मूर्ती
शंख चक्र गदा आयुधे हाती
रूप पाहता हरली मनाची स्फूर्ती
द्या मजला चरणी मुक्ती…
‘द्या मजला चरणी मुक्ती…’ म्हाटल्यावर सगळेजण विठू-रखुमाईला साष्टांग नमस्कार करायचे.
काकडा सुरु व्हायचा…
काकडा झाला
आता मुख प्रक्षाळा
मधु नवनीत शर्करा
घेऊन आली जनकाची बाला…
एका पाठोपाठ एक…
कांकड आरती परमात्मया रघुपती
जीवीं जीवा ओंवाळी
निजीं निजात्मज्योति
त्रिगुणकांकडा द्वैतघृतें तिंबिला
उजळली आत्मज्योति
तेणें प्रकाश फांकला…
देवळातले सगळेजण त्या लयीत, भक्तिभावात लीन झालेले असायचे. मी-तू पण विसरले जायचे. तू मी – मी तू वेगळे नाहीच ही मनात उमजून जायचे. मी हरवून जायचो त्या सगळ्यात ! मी मला विसरुन जायचो.
पुजारीकाकांनी बुक्का लावण्यासाठी माझ्या कपाळवर बोट टेकवले की मी भानावर यायचो.
बाहेर थोडीशी थंडी, थोडंसं धूकं… आणि देवळात हे असं गोजिरं वातावरण… हवंहवंस !
आजही गडावर होत असणारी रोज पहाटेची समर्थांची काकड आरती असाच अनुभव देऊन राहते.
समाधीवरची मेखला उचलतानाचा तो ‘जय जय रघुवीर समर्थ’ असा गजर… सकाळी सकाळी समाधीचे ते होणारे सगुण-निर्गुण दर्शन आणि नंतरची काकड आरती…
मन भरुन राहतं…
हे संस्कार, या चालीरीती जीवंत राहायाला हव्यात असं वाटतंय !
–©उमेश कुलकर्णी
साताऱ्याच्या गुरुवार पेठेत विठ्ठल रखुमाईचे देऊळ | Vitthal Rakhumai Temple at Guruwar Peth, Satara हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
साताऱ्याच्या गुरुवार पेठेत विठ्ठल रखुमाईचे देऊळ | Vitthal Rakhumai Temple at Guruwar Peth, Satara – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.