पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Mom For Rent
टिंग टॉंग…”
दारावरची बेल वाजली मिसेज साने यांनी दार उघडले .
समोर एक पस्तीशीत ला तरुण उभा होता. तो बोलला ” हे मिसेस साने यांचे घर आहे ?”
“हो, बोला”
“मी रोहित जोशी मीच तुम्हाला काल फोन केलेला “
“हो अच्छा, या आत या” मिसेज साने नी दार उघडलं. ” बसा, हा बोला”
“काल व्हाट्सअप वर तुमची ऍड बघितली ‘आई भाड्याने मिळेल’. थोडं विचित्र वाटलं “
“त्यात काय विचित्र…! आणि हे विचारण्यासाठी तुम्ही इतक्या लांबून आलात? तुम्हाला हवी आहे का आई ?” मिसेज साने चा प्रश्न
"हो मला आई हवी आहे .पण आई भाड्याने? काही कळलं नाही " परत रोहितचा प्रश्न.
"हे बघा जोशी साहेब कामाचं बोला ना ..एक आई स्वतःच्या परिवारा करता तिच्या मुलाबाळांसाठी जे करते ती सगळी कामे मी करते अजून काही..." मिसेज साने यांचे उत्तर.
रोहित अजूनही गोंधळलेला होता पण मिसेज साने समोर कमी बोललेलंच बरं... आणि तो डायरेक्ट मुद्द्यावर आला, फक्त दोन महिन्या करता मिळेल का हो आई?"
" नक्की मिळेल ना "
"तुम्ही त्यांना बोलवता का ?"
"कोणाला ?"
" त्या आईना "
” अहो मीच तुमच्या समोर बसले ना”
रोहित आश्चर्यचकित होऊन बोलला "तुम्ही..!?"
" हो, मी का नाही जास्त एजेड आजीबाई काकूबाई सारखी हवी होती का तुम्हाला ?"
" नाही तसं नाही " रोहित .
" तुमचेही बरोबरच आहे म्हणा माझं वय काही जास्त नाही साधारणतः माधुरी प्रियंका यांच्या एवढि असेन..मी "
"कोण माधुरी, प्रियांका?" रोहित चा प्रश्न.
" अहो माधुरी दीक्षित आणि प्रियंका चोपडा जोन्स." आणि हसू लागल्या.
रोहितला मिसेज साने खूप कुल वाटल्या.
"हा, बोला आता, काय काम आहे आईचं?" मिसेज साने यांनी विचारलं
" माझी मिसेस प्रेग्नेंट आहे पूर्ण दिवस भरले आहेत, माझी आई किंवा तिची आई येणार होती पण या लॉकडाऊनमुळे आता दोघीही इकडे येऊ शकत नाही . हे आमचं पहिलं बाळ आहे मला यासाठीच आई हवी होती ", रोहितच स्पष्टीकरण...
" हो मी तयार आहे. तुम्ही तुमचा पत्ता व फोन नंबर द्या . जेव्हा गरज असेल तेव्हा कॉल करा मी लगेच येते .." मिसेज साने.
तरिही रोहित तिथेच ताटकळत उभा...." काय झालं ?काही शंका आहे"
" नाही ,तसं काही विशेष नाही करतो कॉल .पण मला या जाहिरातीबद्दल, तुमच्याबद्दल थोडं सांगाल ? तुम्हाला प्रॉब्लेम नसेल तर... मी अजूनही थोडा गोंधळलेला आहे." रोहित चा प्रश्न.
"हो बोलेन.. सगळं सविस्तर सांगेन पण नंतर कधीतरी निवांत वेळ काढून.... तुमचं काम होऊन जाऊ द्या"
तीन महिन्यानंतर ....
" चला मिस्टर जोशी माझं काम संपलं . दोन महिन्याचे तीन महिने झाले .आता मला रजा द्या ...काळजी घ्या बाळाची आणि तुम्हा दोघांची"
मिसेज साने, रोहित जोशी यांना बोलल्या..
आता रोहितला ऐकायचं होतं मिसेज साने यांची कहाणी आणि तो बोलला "आई काकू , आज वेळ आहे थांबा ना , बोला ना तुमची स्टोरी...'आई भाडयाने मिळेल ...' ..या संकल्पनेमागची"
" बरं बाबा सांगते, नाही तरी आता तू कुठे सोडणारे आणि तसंही आज खूप वर्षांनी कोणालातरी फक्त माझ्याशीच बोलायचं, माझ्या बद्दल ऐकायचा आहे ... मग ऐक .
मी लग्न होऊन या श्री गजानन साने, माझे सासरे यांच्या घरी आली ना तेंव्हा बाकी सगळं ठीक होतं. ठीक म्हणजे छानच...
बर्यापैकी मोठं घर, मोठें घर , गाडी , नोकर , चाकर... ..अबोल असली तरी मनानं सरळ असलेली सासू, बहिणीची माया लावणारी नणंद, आणि जीव ओवाळून टाकावा असा लाडोबा शेंडेफळ स्मार्ट नवरा , श्रीकांत . आपले लाड करून घेण्यात पटाईत...
असं सासर ..मैत्रिणींना माझा खूप हेवा वाटे .माहेरी साधेपणाने राहणारी, इथे माझं कौतुक बघून मीपण स्वतः ला भाग्यवान समजत होते. विविध स्वप्नात हरखून जाई..
सुरवातीची 2 - 3 वर्ष नवलाई , नणंदेच लग्न , सणवार यातच गेली, पण हळूहळू लक्षात येऊ लागलं ...नवऱ्याला माझ्यात काहीच इंट्रेस नव्हता. ह्यांनी माझी स्तुती करावी,केसात गजरा माळावा , रात्रभर दोघांनी खुप गप्पा कराव्या असे खुपदा वाटे..पण व्यर्थ.. माझं आकर्षण नाही , प्रेम नाही आणि नंतर कळलं की त्यांना पुरुषांच आकर्षण होतं...तुमच्या आजच्या भाषेत गे का काय म्हणतात ते ...आणि सासूबाईंना हे सगळं समजलं होतं , माहीत ही होतं पण घर,सासरे,समाज यांच्या भीतीने त्या गप्प...
" पण त्यात घाबरण्यासारखं काय? गे म्हणजे काही गुन्हा किंवा आजार नाही " रोहित चा विस्मयकारी प्रश्न..
" हो रे ....बाबा तुम्ही आजची नवीन पिढी , त्यावेळी, त्याकाळी हा गुन्हा किंवा आजार म्हणूनच समजला जाई . खूप वेळा सासूबाईंनी वेगवेगळ्या साधू बाबांना दाखव, गळ्यात गंडे-दोरे बांध पण काही उपयोग झाला नाही. सासऱ्यांना वारस, वंशाचा दिवा हवा होता.. तेव्हा काय करावं , कसं जगावं तेच समजेना . त्यांचा मुलगा मला आईपण देऊ शकत नाही हे मी कोणालाच सांगू शकले नाही ...आणि वांझ म्हणून शिक्कामोर्तब झाला ते अजून भर ... माहेरी जाऊन राहण्याची सोय नव्हती. शेवटी सासूबाईंनी नणंदेच्या मुलाला दत्तक घेण्याचं ठरवले...नणंदेने तिची सोय बघीतली ..मुलगा चांगला शिकला , नोकरी लागली तर स्वतः जवळ बोलवून घेतले . .काळानुसार सासू सासरे गेले. नणंदेच्या नवऱ्याने गोड बोलून सगळं स्वतः च्या नावे करून घेतलं...
त्यावेळी खुप निराश झाले...पण स्वतःलाच समजावले... आयुष्यातले सगळे झोके उंचच-उंच जायला हवे असा अट्टाहास कशाला ? म्हणजेच उंच झोके घेऊ नयेत असं काही नाही ..घ्यावेत की त्यांची ही एक आपली गंमत असतेच... पण तेव्हा हे सुद्धा लक्षात ठेवा की उंच गेलेला झोका हा कधीतरी खाली येणारच तो निसर्गाचा नियम आहे .त्यामुळे त्या उतरण्याचा ही तितक्याच प्रेमाने स्वागत करण्याची मनाची तयारी असायला हवी आणि मगच घ्यावे उंच झोके... बरेचदा उंचावर राहण्याचा अट्टाहास आयुष्यात खूप काही तरी गमवायला ही कारणीभूत ठरू शकत हाच विचार करून स्वतः ला समजावले...शेवटी आम्ही दोघेच..माझं एकतर्फी प्रेम बघून त्यांना नेहमी माझी फसवणूक केल्याचा पश्चाताप होता .
भाळणं संपल्यावर उरतं ते फक्त सांभाळणं .., ज्याला सांभाळत जमलं तोच जिंकला...पण त्यांनीही या करोनाच्या लाटेत माझी साथ सोडली...आणि या जगात मी एकटी झाले.
एखादा जवळचा माणूस लांब गेल्यावर आलेलं रिकामपण मोजता येणारं नसतं.
हेच रिकामपण घालवण्यासाठी माझ्यातल्या आईपणाला जागं केल.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की गाडी, बंगला ,घर, पैसा सगळ्यांकडे आहे पण कमी आहे...ती जिव्हाळ्याची आपली म्हणणारी , गरजेच्या वेळी कामात येणाऱ्या ...माणसांची...,असा एकही माणूस कोणासोबत नाही .
त्यावेळी लक्षात आला...
की नोकरी करणाऱ्या पालकांना त्यांच्या लहान मुलांकडे लक्ष द्यायला आई हवी आहे.
कोणाला एकटेपणा घालवण्यासाठी आई हवी आहे .
एखाद्या वयोवृद्ध आजी किंवा आजोबा ना स्वतःच्या भूतकाळातील आठवणी शेअर करायला सोबत हवी .
एखाद्याला फक्त आईच्या हातचं जेवण हवं.
एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याला त्याच्या आजारी आहे आई किंवा वडिलांची सेवा करण्याकरता आई हवी आहे .
एखाद्याचा मानसिक ताणतणाव कमी करायचं....
आणि काही घरात लॉकडाऊन मुळे कमाई बंद ...खायला काही नाही...त्यांना आईची खूप गरज आहे..उदरभरणासाठी ...त्यांना फ्री...
असे एक ना दोन हजारो कामांसाठी आई सारखी च एखाद्या आईची गरज असते .
आणि यासाठीच सुरू केलं..."आई भाड्याने मिळेल " चा प्रवास..जेव्हा ज्यांना गरज असेल त्यांना स्वतः च हक्काचा माणूस बनून मदत करायची...कमाई पण आणि जीवनातील रिक्तता भरण्याचा प्रयत्न पण...
चला जोशी साहेब निघते...अजून कोणाला "आई भाड्याने" हवी असेल तर सांगा..."
आई भाडयाने मिळेल – Mom For Rent ही कथा आवडली असल्यास शेअर करा.
आई भाडयाने मिळेल – Mom For Rent – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
13 thoughts on “आई भाडयाने मिळेल | Mom For Rent”