पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Caution | Care
हि एक सत्य घटना आहे .माझ्या आसपास घडलेली .खूप दिवसा पासुन लिहायची होती .एक सल मनात होती .आता व्यक्त होत आहे.
ताईडी एक सोळा , सतरा वर्षीची कोवळी पोरं .अजुन थोडी शहाणी थोडी अजाण .आई वडील शेतकरी लहान भाऊ .चौकोनी कुटुंब .सावळीच पण नाकी डोळी निटस , तरतरीत आणी चेहऱ्यावर आत्मविश्वास ओसांडुन वाहणारा .त्यामुळे सगळ्यांना हवीहवी वाटायची .पटकन कोणाच्या हि नजरेत भरायची.
ब-याच ठिकाणच्या पाहुण्यांचा तिच्या वर डोळा होता .आपल्या घरची सून व्हावी म्हणून आशा .तिच्या आत्याच्या मुलांची लग्न जमलेल्या मुलीचा एक भाऊ लग्नाचा होता .मग काय ? बोलाचाली झाल्या एकत्रच लग्न करु असे ठरले अन् ताईडी मोहरली .
लग्न जरी जास्त काही कळत नव्हतं तरी एक गोड संवेदना मनात होतीच .उत्साहाने जमेल तेवढा खर्च करुन आई वडीलांनी लग्नाची खरेदी केली .साड्या ब्लाऊज शक्य तेवढी हौस करून आणल्या .तळहातावर सुंदरशी मेहंदी रेखाटली .घरात पाहुण्याची ये जा सुरू झाली .घर गजबजुन गेले.
लग्नाच्या आदल्या दिवशी नवरीला न्यायला पाहुणे आले .
तिच्या बरोबर मावशी , तिच्या वयाच्या मामाच्या मुली , मावशीच्या मुली , एक दोन मैत्रीणी , चुलते असे सगळे लग्न घरी दाखल झाले .नविन वातावरण , वेगळे गाव लग्नाची गडबड पाहून हरकुन गेली .गेल्या वर चहा पाणी झाले.थोडा पाहुणचार थोडी विश्रांती झाली
लग्न विधीला सुरूवात करायची .नवरीला तयार ठेवा निरोप आला.तशी ताईडी बावरुन गेली .एकदाच पहायला आल्यावर चुकून कटाक्ष टाकून पाहिलेला चेहरा डोळ्यासमोर तरळला .कधी पाहिन हुरहूर वाटत होती .छान आवरुन मंडपात दाखल झाली .सावळीच पण एकदम उठुन दिसत होती .एक एक विधी पार पडत होते .आता हळदीचा कार्यक्रम सुरू झाला जवळ जवळ बसल्यामुळे डोळे भरून नवरदेवाला पाहिले .भान हरपुन गेले .हळदी झाल्या .सुखी संसाराची स्वप्ने रंगवत रात्री कधी डोळे मिटले ते तिलाच समजले नाही .
एक सोनेरी पहाट घेऊन दिवस उगवला .मावशीने तिला उठवले ” अगं उठ , लग्न आहे ना ? आपलं सगळं आवरुन व्हायला हवं , पाहुणे येतील ‘ आता धरपडुन उठुन बसली .डोळे अजूनही रात्रीच्या धुंदीतच होते .मावशीची मुलगी बाहेर तोंड धुण्यासाठी गेली होती पळतच आत आली ‘ .आई बाहेर काय तरी गोंधळ झालाय , ति शेजारची बाई म्हणत होती .नवरदेव पळाला .बघ बरं , ‘ मावशी च्या घश्याला कोरड पडली म्हणाली ‘ गप्प बस , काय तरी बोलायचं , निट ऐकला नसशील ‘ ताईडीच्या हातापायातुन आवसान गळाले हातपाय थरथरू लागले .मावशी जानवस घराबाहेर गेली .काय झालयं पाहून येते म्हणाली .ताईडीचा जीव टांगणीला लागला .कोणाला विचाराने ? काय करावेच ? सांगणार कोण ?
शेवटी ताईडी मावशीला म्हणाली ‘ आत्याच्या पोरांना विचार ‘ त्याच्या जवळच्या वाड्यातच त्यांना रहायला दिले होते .मावशी दबकत गेली आणी विचारलं .आत्याची पोरं हि काळजीत पडली .आता काय करायचे ? पहाटेच नवरदेव पळुन गेला .कुठे गेला कोणालाही न सांगता गायब झाला .शोधाशोध सुरू झाली .सगळी कडे गोंधळ उडाला .सगळा स्वयंपाक तयार पाहुणे यायला लागले .थोड्या वेळात ताईडीचे आई वडिल आले पाहुणे , व-हाड , आत्याकडील सगळे आले .नवरदेवाचा पत्ता लागेना .आत्याच्या मुलांनी सांगितले ‘ हिच लग्न लागल्या शिवाय आम्ही लग्नाला उभे रहाणार नाही ‘ आता मोठा पेच निर्माण झाला .मग पाहुण्या तील जाणती मंडळी , मुलाचे वडील , चुलते एकत्र बसले .काही तरी मार्ग काढावा लागणार होता .
चर्चा अंती ठरले .नवरदेवाचा एक भाऊ लग्नाच्या कामात व्यस्त पाणी भरणे सामान आणणे कमीजास्त पाहणे अशा धावपळीत होता .त्याच्या बरोबर हिचे लग्न लावायचे .त्याला तयार केला .नवरदेवाचे वडील दुसरी दोन चार माणसे त्याला काही तरी सांगत होती .शेवटी त्याला तयार केले .आंघोळ घातली अर्धा तासात हळद लावुन लग्नाला उभे केले .ताईडी घाबरून गेली हे काय ? हळद एका बरोबर लग्न एका बरोबर , मोठ्या माणसाच्या पुढे बोलता येत नव्हते .काय चालले होतो समजत नव्हते .’ सावधान शुभ लग्न सावधान ‘ ताईडीच्या डोक्यावर अक्षदा पडल्या आणी मग आत्यांच्या पोरांची लग्न लागली .जेवण झाली .व-हाड पाहुणे परतले .
नविन घरात ताईडीचा प्रवेश झाला.गावदेव झाले .पण नवरा तिच्या कडे पहात हि नव्हता सत्य नारायणाची पुजा ठरली त्याच संध्याकाळी जागरण गोंधळ झाले .सकाळी ताईडीला वडीला बरोबर येती -जातीला पाठवले आठ दिवस झाले तरी काही निरोप नाही म्हणून वडील म्हणाले ‘ जाऊन येतो ‘ परत आले ‘ चल बाई ‘ आणुन सोडा म्हणाले पाहुणे .तिथे तिला ओल्या डोळ्यांनी सोडून वडील परतले .ति घाबरली .आता माझे काय ?
पहिला नवरदेव अद्याप घरी आला नव्हता आणी हा तिच्या बरोबर बोलता हि नव्हता .एक महिना झाला .सकाळी उठून घरातील कामे करु लागली .एकटीच एका खोलीत झोपायची .सुखी संसाराची स्वप्नं मातीमोल झाली .पुढे सगळा अंधार .एके दिवशी दुपारी सासु बाहेर गेली होती .शेजारची एक बाई घरी आली .तिच्या जवळ आली इकडे तिकडे पहात तिला बोलली ‘ मेला (पहिला नवरा )शेतात ऊसात राहतोय .घरुनच त्याला डबा जातोय , तु सावळी त्याला पसंत नव्हती पण तुझ्या आत्याच्या नव-याने आग्रह धरला म्हणून होय म्हणाला ‘ आणी ह्या बारक्याच दुसऱ्याच पोरीच लफड हाय ‘ म्हणून तुला त्याला नांदवायच नाही .’ पण बहिणीच लग्न मोडल म्हणून तयार झाला .
येवढ बोलुन ति गेली .अन् तिच्या वर आभाळ कोसळल .खर काय ते समजलं आज ना उद्या निट होईल हि आशा संपली .पण आता पुढे काय ? आठ दिवसांनी नगपंचमीला माहेरी पाठवले .महिना दोन महिने झाले कोणी न्यायला हि आले नाही कसला निरोप हि नाही .वडील चिंतेत ति तरी काय करणार ? तेथे जाऊन आणी येथे काय ? एके दिवशी वडील गेले विचारायला ‘ आता तिला काय आणु नका , आम्हाला तिला नांदवायचे नाही तिचा सासरा नवरा सासु म्हणाली .धोतराचा सोगा ओला होईपर्यत तेथुन घरापर्यत वडीलांच्या डोळ्याचे पाणी वहात होते .नशीब आपलं म्हणून येथेच पडेल ति कामे करून राहु लागली .
कधी तरी नेतील या आशेवर दिवस काढत होती .एक दिवस वडील बाजारला गेल्या वर समजले .पहिल्या आणी दुसऱ्या नवरदेवाचे लग्न झाले .आता काय ? सगळे संपले.
थोड्या दिवसांनी भावाचे लग्न झाले .नविन नविन भावजयीने शांत रहाणे पसंत केले .थोड्या दिवसांनी तिने तिचे रंग दाखवायला सुरूवात केली .’ तुझी आम्ही जन्म भर उचल घेतली काय सांभाळायला ? तुझी सोय बघ , आईवडीलांना पण घराबाहेर काढले .शेजारच्या एका खोलीत आईवडील आणी शेजारी एका वेगळ्या खोलीत ताईडी राहते .दुसऱ्याच्या शेतात काम करुन आपला उदरनिर्वाह चालवते.
एखाद्या वैराग्य योगीनि सारखी ह्यात तिचा बिचारीचा काय दोष ? दोष कोणाला द्यायचा ? खूप वाईट वाटते मध्ये एकदा दिसली अन् मन हेलावुन गेले
ह्या घटनेला पंचविस वर्षे झाली तिला पाहिल आणी गलबलुन आलं .मग लिहत व्हाव वाटल विचार करून कोणताही निर्णय घ्यावा .होणार चुकणार नाही पण खबरदारी घ्यायला हवी .म्हणून व्यक्त होत आहे .
-© सौ.कल्पना डुरे – पाटील
खबरदारी | Caution | Care हा कथा अवडला असल्यास शेअर करा.
खबरदारी | Caution | Care – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.