Barren

वांझ | Barren/Sterile/UnFertile

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Barren/Sterile/UnFertile

वंदनाने रागात दरवाजा उघडला रडून लाल झालेले डोळे. दरवाजा जोरात आपटला , हातातील पर्स सोफ्यावर फेकली .. बेडरूममध्ये जावून बेड वर पडून परत रडू लागली. माझीच चूक.सगळ खापर माझ्यावरच फोडतात. मागच्या जन्मी काय पाप केलेलं ? मीच का ? मीच का ? स्वत:शीच बडबडत तिथेच रडत रडत झोपून गेली.

बऱ्याच वेळान खडबडून जागी झाली सगळीकडे अंधार पडला होता गडबडीत उठून लाईट लावले संध्याकाळचे सात वाजले.इतका वेळ कसे झोपलो , किती बेजबाबदार वागलो !!!!!

सासुबाई !!!!!

त्यांनी हाक नाही मारली … ती पळत त्यांच्या रुमकडे गेली लाईट लावली . Sorry आई !!! खरचं sorry. थोडं पडले बेडवर आणि तिथेच डोळा लागला तुम्हाला खूप वेळ अंधारात बसावं लागलं. सहाचा चहा …. मी चहा घेऊन येते. ती पटकन किचन मध्ये आली चहा बनवून घेऊन आली.

आई !!! चहा. एक मिनिट मी उठवून बसवते.तिने सासूबाईंच्या मानेखाली एक हात घालून दुसऱ्या हाताने पाठी मागे उशी लावून त्यांना बेडला टेकून बसवलं. त्यांच्या अंगातला गाऊन सरळ केला बशीत चहा ओतून फुंकर घालून थंड झाल्यावर त्यांच्या ओठाला बशी लावली.

आई रागावलात का ओ ??

सासूबाई – गोड हसून वंदना !!! नाही ग होत असं कधी कधी. मुद्दाम नाहीस करणार माहित आहे मला !!!

वंदनाने चहा झाल्यावर पाण्याचा हात तोंडावरून फिरवून रुमालाने त्यांचे तोंड पुसले तितक्यात दारावरची बेल वाजली.आई मी बघते हं ! आलेच .

वंदना – आई माने काकू आहेत .

काकू बसा मी पाणी घेऊन आले.

माने काकू – सासूबाईंना वहिनी तुम्हालाच भेटायला आले !!! कशा आहात ?

सासूबाई – मी मस्त मजेत. तुम्ही बोला !! कशा आहात ?

माने काकू – एकदम छान तिन्ही पोरांची लग्न झाली तिघांनाही मुलंबाळं आहेत. खूप आनंदात.

माने काकू अडखळत ..

वहिनी !!! एक विचारू?रागावणार तर नाही ना ?

सासूबाई – संकोच कसला विचारा !

माने काकू – ते …. वंदना ला काही औषध पाणी कुठं घेतलं का नाही ?

सासूबाई – कशासाठी ? ती तर एकदम ठणठणीत आहे .

माने काकू – अहो असं काय करता लग्नाला तेरा चौदा वर्षे तरी झाली असतील अजून ते …. मुलंबाळं……

वंदना पाणी घेऊन येत होती .शेवटचा शब्द ऐकून पावलं तिथंच थबकली.आत जायची हिंमतच नाही झाली. तिचे डोळे पाण्याने डबडबले. दुपारी पूजेसाठी गेले तिथंही साऱ्यांचा हाच प्रश्न ,त्या बायकांच्या नजरा, ती कुजबूज. असंख्य प्रश्न …. शिक्का…

वांझपणाचा …..

तेवढ्यात तिला सासूबाईंचे शब्द कानावर पडले.पण तिला तर मुलं आहे की,ती आई आहे एका मुलीची आठ वर्षाच्या.माने काकू गोंधळल्या .आणी म्हणाल्या काहीही काय बोलता वहिनी ? आम्हाला कसं माहित नाही.

वंदना ही बाहेर दचकली , हडबडली.

स्वतःशीच – आई अशा का बडबडतायत. वयोमानानुसार मनावर काही परिणाम…. वंदनाला भीतीच वाटली … तेवढ्यात परत सासूबाईंचा आवाज आला ही काय तुमच्या समोर ठणठणीत बसलेय तिची मुलगी !!!

माने काकू आश्चर्यानं मला काही कळलं नाही !

वंदनाही आई काय बोलतायत ते काळजीने पण लक्षपूर्वक ऐकू लागली.

सासूबाई – माने काकू वंदना माझी सून नाहीच. आठ वर्ष झाली ह्या मुलीचा जन्म झाला ! त्यावेळी ती आई झाली जेव्हा मोठ्या अपघातातून मी वाचले पण दोन्ही पाय गमावून … साडे सात महिने कोमात होते फक्त जिवंत आयसीयू त पडलेली. लेकानं कसलाच विचार न करता हॉस्पिटल मध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला.जीव वाचला पाय गमावले कायमचे.त्या डोळे मिटून क्षणभर मागे पडल्या. तुम्हाला सांगू माने काकू मृत्यूची वाट बघत होते पण माझी आई – वंदना जिने साडे सात महिने वाट बघितली डोळ्यात प्राण आणून आणी जेव्हा मी शुद्धीत आले तेव्हा तिच्या चेऱ्यावरचा आनंद आई झाल्यावर पहिल्यांदा बाळाला बघितल्यावर होतो न तितकाच अवर्णनीय होता , ओसंडून वाहत होता अगदी .

हे बाळ तिनं स्विकारले जसं आहे तसं. माने काकूंचे डोळे भरून आले. सासूबाई पुढे सांगू लागल्या. ही आई गेली आठ वर्ष सकाळी लवकर उठून आपल्या बाळाला स्वतःच्या हातानं न्हावू माखू घालून छान स्वच्छ कपडे घालून सगळ्या आंगाला सुगंधी पावडर लावते ,छान तेल लावून वेणी फणी करते. ओला झालेला बिछाना दिवसातन तीन तीन वेळा बदलते आणी कधी शरीरात वेदना झाल्या तर मी रात्र रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागी राहते. उशाशी बसून असते न कंटाळता.आणी खायला दोन तीन तासांनी गरम गरम हवं ते तांदळाची खीर , पेज , नाचणीची खीर , कधी फळांचा ज्यूस चमच्याने थोड थोड तासभर भरवत बसते .

इकडच्या तिकडच्या गप्पा मारत. कधी अंगावर सांडल तर त्रागा न करता कपडे बदलते. रुमालाने तोंड पुसते. कोण करत हे सगळं फक्त एक आईच ….एवढा संयम , सहनशीलता कोणात असते …..फक्त एका आईत …. लहानग्यान कितीही दमवावं आईन प्रेमानं सारं सहन करावं .सारे नखरे रूसवे फुगवे झेलावेत. गुणाच ते बाळ माझं म्हणत मन जपावं , लाड करावेत . बघा हं खुट आवाज जरी झाला तरी आई जागी होते रात्रीची कितीदा तरी उठून बाळाला बघते शांत झोपलय का तशी ही माझी आई रात्रीची चारदा मला बघून जाते. अंगावरच पांघरून नीट करते……. आईला नाही शिकवावं लागत बाळाला कस सांभाळायचं !

एका स्त्रीत ते सारं उपजतच असत नाही का ? माझ्या आईने आठ वर्ष झाली कसलीच हेळसांड नाही केली ह्या जीवाची. डोळ्यात किती वात्सल्य , माया. माझ्या वेदना देणाऱ्या मनावर मायेची हळूवार फुंकर घातली. प्रेमाचं अत्तर शिंपडल त्याच्या शिडकाव्याने आयुष्य परत सुगंधीत झालं. किती नाजुकतेने सांभाळलं हे नातं.आईच मन असतंच निर्मळ. ना कसला स्वार्थ ना परतफेडीची अपेक्षा. फक्त आनंद द्यायचा. दुःख सारं खोल अंतरंगात लपवून ठेवायचं .

फक्त स्वतःच्या पोटात नऊ महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येतं ? इतकं सोपं का आई होणं ? तिने साडे सात महिने वाट बघितली माझी कोमातून बाहेर येण्याची नवीन दिवस नवीन त्रास तरी ही आशेवर जगत आली. तिला ओढ होती मला कधी एकदा डोळे भरून पाहते याची. मी शुद्धीवर आले तो दिवस तिच्यासाठी प्रसववेदना सहन केल्यानंतर बाळाला बघितल्यावर होणाऱ्या आनंदा इतकाच श्रेष्ठ अच्युतम होता ……ती वांझ नाही… नक्कीच नाही.. !!!

माने काकू. “आपण विचारांनी वांझ ( Barren/Sterile/UnFertile )आहोत ” नवीन विचारांना , नविन बघण्याच्या दृष्टीला आपण जन्मच नाही देत. मला सांगा समाजात जे म्हाताऱ्या आई-वडिलांना सांभाळत नाहीत , त्यांच्याकडे आजारपणात , त्यांच्या दुःखाच्या काळात ढुंकूनही बघत नाहीत ती वांझ नाहीत. वर्षानुवर्षे आई वडील , भाऊ – बहीण एकमेकांशी बोलत नाहीत ती नात्यांनी वांझ नाहीत. संवेदनाहीन , दुसऱ्याच्या दुःखात आनंद माणनारी ती खरी वांझ………. वांझपण मुलाला जन्म दिला का यावर ठरवावं ?? वांझपणाचा शिक्का मारून आपण तिच्यातल्या स्त्रीत्वाचा अपमान करतो. आपण तिचं अस्तित्व नाही नाकारत आपल्यातल्या माणूसपणा वर प्रश्न निर्माण करतो.

एखादी स्त्री वांझ हे ठरवणारे आपण कोण ?? मुलगी झाली तर मुलगा हवा , दोन मुलगे असतील तर एक तरी मुलगी पाहिजेच बाई , आणि काहीच नसण्यापेक्षा मुलगी तर मुलगी. असले विवेकशून्य तकलादू , मतलबी, विचार आणि स्वतःच्या सोयीनुसार वाटा शोधणारे आपण तिचं मोजमाप नाही करू शकत !! तिला वांझ आपण ठरवणार ? समाज तिचं मातृत्व शोधतो ना तेव्हा स्व:तचं पोकळपण उघडं करतो . स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच पण माझ्या सारख्याची आई होण त्यासाठी आत्म्याची किती अथांगता , गहनता , मनाची शुद्धता हवी विचार करा. माझी वंदना सोडून कोण आलं ?

ह्या अपंग लेकराला झिडकारल नाही तिन हे सामर्थ्य ताकद फक्त एका आईची .. माझ्याही पोटच्या मुली आल्या तर तासभर भेटून गप्पा मारतात , आपुलकीने चौकशी करून निघून जातात. त्यांचा संसार , मुलंबाळं सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे ? मग मी मुलांना जन्म देवून ही वांझच ठरले का हा प्रश्न माझा मलाच पडतो तो पडायला हवा .

माने काकू तुमची स्वतःची मुलगी गेली सात वर्षे तुमच्याशी बोलत नाही मानपानावरून भांडण झाले म्हणून.तुम्ही म्हणता पोटच्याचा जीव कळकळतो त्यालाच शेवटी आपली माया येते असं असतं तर मागच्या वर्षी तुमचा पाय मोडला दोन महिने जागेवर होता लेक आईला बघायला ही नाही ना आली. अशावेळी आपण वांझ का हा प्रश्न पडू द्यावा मनाला. दुसऱ्यांच्या लेकरावर शिक्का मारताना आपल्यातल्या उणीवा दोष पडक्या बाजू सोयीने लपवायच्या हा तिच्यावर अन्याय नाही !

एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन माझी वंदना घराची आई झाली माझ्या लेकाची आई झाली. माझ्या मुलींना मायेने जपते. साऱ्यांचे हेवेदावे , टोमणे , रागलोभ सारं पोटात घालते देते ते फक्त प्रेम आईसारखं .निर्मळ ,निखळ . नात्यांची आई होण सोपं नाही ! प्रत्येकाचं पोट भरल्याशिवाय ह्या अन्नपूर्णाच्या घशाखाली घास नाही उतरत , ती ह्या घराची लक्ष्मी जिच्या बांगड्यांच्या किणकिणाटाने आणी पैजनाच्या आवाजाने साऱ्या घरात चैतन्याचा ,उत्साहाचा जन्म होतो. जिच्या घरातील अस्तित्वाने देवघरातील देवही आनंदी दिसतात आणि मनापासून आशिर्वाद देतात , जिच्या असण्याने बागेतली फुलं आनंदाने डुलतात , जी बागेतील प्रत्येक झाडाची मुलासारखी काळजी घेते , जिच्या सुंदर हातातून तुळशीपुढे रोज नविन रांगोळी जन्म घेते. ह्या घराला जिने घरपण दिलं , ह्या म्हाताऱ्या लेकीला जिने नविन आयुष्य दिलं ,जग दाखवलं ,भरभरून जगणं शिकवलं ती वांझ कशी असेल………

माने काकूंच्या डोळ्यांतून वाहणारं पाणीच त्यांच्या मनाची अवस्था सांगत होतं…….

हे सारं एकून वंदनाच्या चेहऱ्यावर तृप्ती , भारावलेपण ! काय नव्हतं. आईपणाची नविन जवाबदारी सांभाळण्यासाठी आनंद , आत्मविश्वास , उर्जा घेऊन परत एकदा नव्याने सज्ज झाली. मनावरचं ओझं, मळभ , जळमटं सारं काही दूर झालं …… वेगळ्याच आनंदाने चहाचं पातेलं गॅसवर ठेवलं ….

-©सौ.विजया देसाई

वांझ | Barren/Sterile/UnFertile हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

वांझ | Barren/Sterile/UnFertile – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share वांझ | Barren/Sterile/UnFertile

You may also like

2 thoughts on “वांझ | Barren/Sterile/UnFertile

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock