अंगवस्त्र | Mistress/Concubine

अंगवस्त्र | Mistress/Concubine

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Mistress/Concubine

गावापासून थोडा दूर, नव्यानेच बांधलेला हा ‘माणिक नगर’ कॉम्प्लेक्स.

‘माणिक नगर’ मध्ये राहायला आलेले लोक तसे इथे सगळेच नवे. त्यातलीच ‘ती’ सुध्धा एक.

तरुण,देखणी,पण झीरो फिगरच्या जमान्यात थोडीशी दाक्षिणात्य चित्रपटातील नायिके सारखी अंगापिंडाने भरलेली. ‘Voluptuous‘ म्हणता येईल अशी.

गुबगुबीत लोभस चेहरा, चेहऱ्याला शोभणारे करवंदी टपोरे डोळे, नितळ गोरा रंग,मध्यम उंची आणि झटकन लक्ष वेधून घेईल असा काळयाभोर केसांचा गुढग्यापर्यंत रुळणारा लांबसडक शेपटा.

हळूहळू सगळ्यांच्या आपापसात ओळखी

होत होत्या. त्यात शेजाऱ्या पाजाऱ्यांना तिच्याबद्दल जी काही थोडी फार माहिती मिळाली ती अशी……

तिचे नाव…अपर्णा

ती राहते तो फ्लॅट मनोज म्हणजे ज्याला गावात ‘ मन्या दादा’ ह्या नावाने ओळखतात, अशा एका गाव गुंडाने बिल्डर कडून खूपच कमी किमतीत लाटलाय….

ही काही त्याची लग्नाची बायको नाही.

मन्या दादाचे घर गावात आहे आणि तिथे त्याची लग्नाची बायको आणि मुले आहेत. ह्या घरी तो अधून मधून येतो पण एरव्ही

‘ती’ एकटीच राहते.

अपर्णा मन्याची लग्नाची बायको नाही हे कळल्यावर तिच्याकडे पाहायचा दृष्टीकोनच बदलला सगळ्यांचा. काही पुरुष मन्याला वचकून, तिच्याशी डायरेक्ट बोलत नसले तरी डोळ्यांच्या कोनातून तिला अपादमस्तक

न्याहाळीत. बायका तिच्याशी सहसा बोलणे टाळत पण ही अप्सरा आपल्या आसपासच राहते म्हणून त्यांच्या जीवाला घोर लागून

राही…आणि त्या आपापल्या नवऱ्यांवर अगदी बारीक लक्ष ठेवीत.

अपर्णा मात्र सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असे. सोसायटीच्या गार्डन मधून देव पूजेसाठी फुले आणणे,घरासमोर लहानशी का होईना पण नित्य नेमाने एखादी रांगोळी काढणे ह्या सारख्या कामांची तिला मनापासून आवड.

कधी कधी स्वतः साठी फुले आणताना शेजारच्या आजीसाठीही अपर्णा फुले आणी. कधी कुणाच्या हातातील जड पिशवी घे तर कधी बाजारातून कुणाचे काही सामान आणून दे. वीज गायब झाल्यास खालच्या नळावरून पाणी भरावे लागे,तेव्हाही ती खूप जणांना मदत करीत असे..म्हाताऱ्या बाया बापड्यांनी, त्यासाठी तिचे कौतुक केले की अपर्णा म्हणे……

आजी, मला आशीर्वाद द्या… एक गोड, गोंडस मुलगी माझ्या पोटी जन्म घेऊ देत असा”…हे ऐकून काही बायका कुत्सितपणे हसत. तिच्या ह्या अशा बोलण्याचीच नाही, तर एकंदर तिच्या राहणीमानाचीही त्या थट्टा करत. तीचं ठसठशीत मंगळसूत्र,हिरवा चुडा, मोठी टिकली.

तिने केलेलं हळदीकुंकू.

अपर्णा आमंत्रण देत असे, म्हणून त्या तिच्या घरी हळदी कुंकवाला जात..पण पाठीमागे मात्र निंदाच करत..तिच्या घरून निघाल्यानंतर त्यांची आपापसात हीच चर्चा चाले… “कसले कचकड्याचे सौभाग्य मिरवत असते ही ग ही बया….??”

वटसावित्रीचे व्रत काय करते.? हरतालकेचा उपवास काय ठेवते..?? जसे काही आम्हाला माहीतच नाही…ही त्या मन्याची लग्नाची बायको नाही ते.

खरं तर तिच्या आरस्पानी सौंदर्याची त्यांना असूया वाटे.पण त्याचवेळी तिची ती घर टापटीप ठेवण्याची,

स्वतः पाच सहा तास खपून अनेक पदार्थ रांधून ते खायला घालण्याची,एक गृहिणी म्हणून जगण्याची धडपड पाहिली की त्या बायकांना त्यांचे स्वतःचे अन्यथा अतिसामान्य वाटणारे संसार ,तिच्या ह्या लुटूपुटू च्या संसारा पुढे झळाळून निघाल्या सारखे वाटत…आणि मग त्या तिची अजूनच कीव करीत….

त्यातच एक दिवस दारूच्या नशेत मन्या दादाने कुणाला तरी सांगितले की त्याने किडनी स्टोनचे ऑपरेशन करावे लागेल असे खोटेच सांगून अपर्णाचे Tubal ligation चे ऑपरेशन केले आहे. त्यामुळे तिला मुले होणार नाहीत…ही बातमी वाऱ्यावर पसरत,पसरत माणिक नगर कॉम्प्लेक्स मध्येही पोहचली. आता तर आसपासच्या बायका तिची अधिकच कीव करू लागल्या.

ह्याला अपवाद होती अपर्णाच्या अगदी शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणारी रेवती, ती मात्र अपर्णाशी फार प्रेमाने वागायची.. रेवतीच्या घरच्यांना मात्र हे अजिबात आवडत नसे…तिची आजी एकदा वाती वळता वळता रेवतीला म्हणाली…”तुम्ही हल्ली ते काय मिस्ट्रेस का डीस्ट्रेस काय ते म्हणता…ना, पण आमच्या काळी अशा बायकांना, ‘अंगवस्त्र’ (Mistress/Concubine)

म्हणत…

“अंगवस्त्र” (Mistress/Concubine) म्हटलं काय आणि मिस्ट्रेस (Mistress/Concubine)

म्हटल काय..??

शेवटी ठेवलेली बाई ती ठेवलेली बाईच ना..?”

रेवतीची आई, निवडलेली मेथीची भाजी किचन मधे घेऊन जाता जाता फणकाऱ्याने

म्हणाली. रेवतीच्या कानात कितीतरी वेळ तो आजीने सांगितलेला “अंगवस्त्र” (Mistress/Concubine) हा शब्द घुमत राहिला..

अपर्णाशी चांगली गट्टी जमल्यावर रेवतीने तिला विचारले…” अपर्णाताई..तू आधी कुठे रहायचीस .?

आणि ह्या मन्या बरोबर इथे कशी आलीस..?

तो मन्या कसा भीतीदायक आहे ग

दिसायला..आणि तू…?? तू किती सुंदर,गोड,नाजूक

एखादी शापित

अप्सराच जणू.

अपर्णाने एक दीर्घ सुस्कारा सोडत, कुठलाही आडपडदा न ठेवता स्वतः ची इत्यंभूत माहिती दिली..” रेवती.. मी, माझी लहान बहीण आणि आई, मुंबईला एका झोपडपट्टीत राहायचो माझे वडील खूप दारू प्यायचे… त्यातच त्यांचा अंत झाला…आई धुण्या भांड्यांची कामे करायची. मी नववीत असताना शाळा सोडली.. आणि आईला मदत करू लागले. आम्हाला जेमतेम दोन वेळचे अन्न मिळत होते. अशीच पाच सहा वर्षे गेली आणि आई अधून मधून आजारी पडू लागली पण तरीही ती आजरपण अंगावर काढत कामाला जात असे. पण काही दिवसांनी आईला कॅन्सर झाल्याचे कळले. तिच्या आजारपणात आईची आणि माझी सगळी कामे सुटली. जो काही थोडा फार पैसा गाठीशी होता तो औषध पाण्यावर खर्च झाला. वर्षभरात आई आम्हाला सोडून गेली..त्यानंतर मी आणि माझी धाकटी बहीण आम्ही दोघीच एकमेकींचा आधार.

आम्हाला त्या झोपडीचे भाडेही परवडेनासे झाले.. घरमालक दर महिन्याला येऊन शिव्या द्यायचा…खूप वाईट नजरेने बघायचा.

उपासमारीने, गरिबीने आणि लोकांच्या वाईट नजरा झेलून जीव नकोसा झाला होता..अशीच कुणा कुणाकडून पैसे उसने घेत , हाता पाया पडून कामं शोधत मी कशीबशी लहान बहिणीला घेऊन, जीव मुठीत धरून राहत होते.

एक दिवस हा मनोज ,मन्या तिथे आला . खूप मागे लागला…म्हणाला.

“माझ्याबरोबर चल. तुझ्याशी लग्न नाही करणार पण तुला काही कमीही नाही पडू देणार..चांगलचुंगल खायला आणायचा..कपडेलत्ते.. घेऊन द्यायचा..एक दिवस नोटांच्या थप्प्याच्या थप्प्या समोर ठेवल्या … खरं सांगते रेवती तुला…पडला मला मोह..समोर एक वाट दिसत होती.. काय योग्य .? काय अयोग्य.? काहीच सुचत नव्हतं. कुणाचाही आधार नाही, हातात पैसा नाही अशा परिस्थितीत लहान बहिणीला घेऊन जगणं फार कठीण झालं होतं.

मग ठरवलं.

मन्याची ऑफर मान्य करायची..गावाकडचं एक स्थळ बघून बहिणीच लग्न केलं… मी मन्या बरोबर राहणार हे कळल्यावर तिच्या सासरच्या लोकांनी, माझ्या बहिणीने माझ्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध ठेवायचा नाही अशी अट घातली.

निदान तिला तरी घर मिळावं…तिचा तरी संसार व्हावा…म्हणून त्यांची अट मान्य करून मी तिचं लग्न लावून दिलं..सगळा खर्च ह्या मन्यानेच केला…बहिणीची पाठवणी करून आणि ती झोपडी कायमची सोडून मी इथे आले….इथे निदान डोक्यावर छप्पर तर आहे. मन्याला वचकून का होईना पण कुणी लगट तर करत नाही….एक सुस्कारा सोडून अपर्णा बोलायची थांबली…रेवतीनेही मग तिला जास्त प्रश्न विचारले नाहीत..

…त्यातल्या त्यात अपर्णाला

रेवतीचा खूप आधार वाटे….एक तीच होती जिच्याशी मनातल्या गोष्टी बोलता येत.

पण रेवातीचा सहवास ही अपर्णला फार काळ लाभला नाही.

काही दिवसांतच रेवतीचे लग्न ठरले. मुलगा अमेरिकेत राहणारा.

अपर्णाने रेवतीला केळवणाचे आमंत्रण दिले. खरं तर, तिच्या पूर्ण कुटुंबालाच आमंत्रण होते पण आली फक्त एकटी रेवती…. अपर्णाने प्रत्येक पदार्थ तिच्या आवडीचा केला होता. रेवतीला आवडते म्हणून ..

कोथिंबीर वडी,नवलकोलची कोशिंबीर, बटाटा भजी,शिमला मिरचीची भजी, भरली वांगी आणि ज्वारीच्या भाकऱ्या,मसाले भात, पुरणपोळ्या,कटाची आमटी आणि रेवतीला अतिशय आवडणारी राजस्थानी पद्धतीची ‘गट्टे की सब्जी’.

अपर्णाची माया पाहून रेवतीला भरून आले.

“अपर्णाताई अग, किती पदार्थ केलेस…?.आणि किती रुचकर झाले आहेत सगळेच पदार्थ…!

“रेवती …अग लहानपणी तर जेमतेम एक वेळ खायला मिळायचे. अलीकडेच पुस्तकं वाचून, TV वर पाहून हे सगळे पदार्थ करायला शिकले. त्या दोघी जेवत असतानाच वॉचमनचा मुलगा ‘रतन’ तिथे आला.

” ये रे रतन…

हात पाय धू आणि बस जेवायला.” अपर्णा म्हणाली….

“अपर्णाताई हा रतन,अलीकडे रोज तुझ्याकडे जेवायला असतो काय ग..?

आणि शाळेतून direct तुझ्याच घरी येतो की काय..? “

“अग , मीच सांगितलय त्याला.. येत जा जेवायला म्हणून.

आईविना पोर आहे.

खातो दोन घास माझ्याकडे…”

“धन्य आहेस ग अपर्णाताई तू…तुला सगळ्या जगाचा कैवार.”

“रेवती , तुला खरं सांगू..?

मी रतनवर कुठलेही उपकार करत नाही. उलट त्याचेच उपकार आहेत माझ्यावर….

त्याच्यावर माया करून मी खरं तर माझीच वात्सल्याची भूक भागवत असते.”

अपर्णाच्या डोळ्यांत पाणी तरळले.

रेवतीनेही मग तो विषय जास्त

वाढवला नाही. काही न बोलता फक्त अपर्णाला घट्ट मिठी मारली.

जेवणे उरकल्या नंतर अपर्णा आणि रेवती संध्याकाळ पर्यंत गप्पा मारत बसल्या.

काही दिवसात रेवतीचे लग्न झाले आणि ती अमेरिकेला गेली.

अपर्णाची एकमेव सखी तिला सोडून साता समुद्रापार गेली पण जाताना आईकडून आणि भावाकडून ती एक वचन घेऊन गेली.

रेवती तिच्या आईला म्हणाली..”आई , मला माहिती आहे तुम्ही सगळे अपर्णाताईचा किती दुस्वास करता ते पण, तुला आणि दादाला हात जोडून एक कळकळीची विनंती करतेय,

अपर्णाताईचे इथे कुणीही नाही.रात्री अपरात्री तिला गरज लागल्यास निदान माझ्यासाठी तरी तिला मदत करा.” मला शब्द द्या तसा.

सुरुवातीला काही दिवस रेवतीचे, अपर्णाची विचारपूस करणारे फोन येत. पण नंतर ती देखील परदेशात तिच्या धावपळीच्या जीवनात व्यस्त झाली.

वर्षा मागून वर्षे सरत होती. सरणारा काळ अपर्णाच्या चेहऱ्यावर , शरीरावर ,आपल्या खुणा दाखवत होता. मूळचा कमनीय बांधा आता थोडा स्थूल आणि बेढब दिसू लागला होता. केतकी वर्ण फिकट निस्तेज दिसू लागला. एके काळचा विपुल केशसंभार आता विरळ झाला होता. कानाच्या आसपासच्या बटा चंदेरी दिसू लागल्या . डोळ्या भोवती गडद काळी वर्तुळे दिसू लागली. चेहऱ्यावर एक दोन चुकार सुरकुत्या देखील मुक्कामाला आल्या. प्रकृतीच्या लहान सहान तक्रारी सुरू झाल्या.

एक दिवस एका उन्हंकललेल्या दुपारी, अपर्णाला खूप अवस्थ वाटू लागले. दरदरून घाम फुटला.छातीत कळ जाणवली,डोळ्यापुढे अंधारी आली. तिने कशी बशी रेवतीच्या फ्लॅटची बेल वाजवली.

रेवतीच्या आईने दरवाजा उघडताच अपर्णा भेलकांडत तिथेच कोसळली.

माणुसकीला जागून की रेवतीला दिलेल्या वचनाला स्मरून कुणास ठाऊक पण रेवतीच्या आईने तिचे डोके मांडीवर घेऊन तिला थोडेसे पाणी पाजले आणि अपर्णाने डोळे मिटले ते कायमचेच.

अपर्णाला कुटुंब नव्हतेच. तिच्या मृत्यूची बातमी कुणाला कळवावी..??

मन्यादादाला खूप निरोप पाठवले पण त्याचा काही पत्ताच नव्हता…

“तो मन्या पडला असेल कुठेतरी दारू ढोसून…

आणि तो कशाला येईल म्हणा..?? ही काय त्याची लग्नाची बायको आहे का..?? सगळे सोपस्कार करायला…??”

रेवतीचा भाऊ डाफरला.

शेवटी कुणाच्याही अंत्ययात्रेला हौसेने जाणारी सोसायटीतील चार टाळकी जमा झाली आणि अपर्णाला जवळच्या स्मशानात घेऊन गेली.

त्याचवेळी एक कावळा जवळच्या पिंपळ वृक्षावर येऊन बसला आणि तार स्वरात कर्कश्य ओरडू लागला.

बऱ्याच वेळाने वॉचमनचा रतन,

घाई घाईत आला आणि चितेला अग्नी देऊन, मागे वळूनही न पाहता घाई घाईतच आल्या वाटेने निघून गेला.

पिंपळावरचा कावळा आकाशात झेपावला.

मावळतीचा सूर्य क्षणभर क्षितिजावर रेंगाळला आणि मग तोही अस्ताला गेला.

आता त्या करकरीत संध्याकाळी तिथे उरली होती फक्त ती धगधगणारी चिता आणि त्या चितेवर जळणारे एक …..’अंगवस्त्र'(Mistress/Concubine)

-©मधुरा द्रविड

अंगवस्त्र | Mistress/Concubine हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

अंगवस्त्र | Mistress/Concubine – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share अंगवस्त्र | Mistress/Concubine

You may also like

One thought on “अंगवस्त्र | Mistress/Concubine

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
100% Free SEO Tools - Tool Kits PRO