Housewife .. She stays at home

गृहिणी.. ती तर घरीच असते | Housewife/Homemaker/Housemaker/Housekeeper .. She Stays at Home

पोस्ट अस्वीकरण

या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.

Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.

Housewife/Homemaker/Housemaker/Housekeeper .. She Stays at Home

काही वर्षांपूर्वी नोकरी करणारी स्त्री म्हणजे तशी दुरापास्त गोष्ट असायची. त्यातल्या त्यात ती एकतर शिक्षिका म्हणून कामाला जाणार किंवा फारफार तर तिची बँकेतली नोकरी असेल तरच ती लोकांच्या पचनी पडतसे. त्याउलट आता मात्र क्षेत्र कुठलेही असो, आजची स्त्री “जॉब करते” एवढंच काय ते सगळ्यांच्या पचनी पडणारं असतं!!!

अश्यात अपवाद ठरते ती “जॉब न करणारी” स्त्री!! आता या अपवादातला अपवाद म्हणजे नेटकेसे शिक्षण असूनही जॉब न करणारी स्त्री!! “शिक्षण असूनही तू जॉब का करत नाहीस?” हा प्रश्न तिच्या वाट्याला हमखास येतोच. मग समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया “म्हणजे ही घरीच असते तर..” अशी असू शकते हे माहीत झालंय!!! कारण आपल्याकडे “जॉब न करणे म्हणजे घरीच राहणे” हा सर्वमान्य समज पसरलेला आहे.

अलीकडच्या काळात जशी “working women” ची मोठी community उदयाला आलेली आहे तशीच “घरीच राहणाऱ्या” बायकांची जमात सुद्धा अजूनही अस्तित्वात आहे! घरी राहते म्हणून नव्हे तर नोकरी करत नाही म्हणून ती “गृहिणी” असते. नोकरी न करणाऱ्या स्त्रीची “गृहिणी” म्हणून स्वतंत्र ओळख असते हे सर्वमान्य व्हायला हवं.

आजकाल स्त्रियांनी शिक्षण, आर्थिक गणितं, व्यक्तिस्वातंत्र्य इ. गोष्टी लक्षात घेता जॉब करणं ही necessity झालीय हे मान्यच आहे. परंतु गरज पडल्यास तत्सम कारणांनी त्यांना नोकरी सोडावीही लागते. बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत कुटुंब हेच नोकरी सोडण्याचं मुख्य कारण असतं. हां.. पण आजूबाजूच्या लोकांची (खोचक) बोलणी नेहमी कानावर येत असतात. कुणी म्हणतं.. “घरातच तर असते”. कुणी म्हणतं.. “शिक्षण आहे तरी घरी बसलिये”. कुणी म्हणतं.. “नोकरी केली नाही तर शिक्षण वाया जातं गं”. पण असं बोलणाऱ्या लोकांच्या शिक्षणाबद्दल आपणच शंका घ्यावी नाही का??

बऱ्याच जणींवर करिअर की कुटुंब हा निर्णय घेण्याची वेळ का यावी?? मग अश्या वेळी निःसंकोचपणे करिअरच निवडले गेले पाहिजे. पण तसे नसून घरच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणे सुध्दा अधिक महत्त्वाचे ठरते.
बाहेर पडून करिअर करणारी स्त्री नक्कीच कर्तृत्ववान ठरते. घराची व्यवस्थित सोय लागल्याशिवाय नोकरीसाठी बाहेर पडता येत नाही. मग गृहिणी जर घरच्या जबाबदाऱ्या जास्त महत्त्वाच्या मानत असेल तर ती सुध्दा तितकीच कर्तृत्ववान का ठरू नये??

स्त्रियांनी finanacially independent असणे बरोबरच आहे. नोकरी करण्यामागे मुख्य कारण म्हणजे आर्थिक गरज भागवणे हे असावं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण मग ही आर्थिक गरज पूर्ण झाली हे कसं ठरवणार.. कारण पैसे कितीही कमावले तरी कमीच असतात. म्हणून मग केवळ आर्थिक गरज सर्वोच्च असे आपण म्हणू शकत नाही. त्या बरोबरीने रोजच्या जीवनातल्या इतरही गरजा तितक्याच महत्त्वाच्या असतात. तरच त्या कमावलेल्या पैश्याला अर्थ मिळतो. मग स्वतः कमावत नसली तरी वेळोवेळी बचत करून गृहिणी आर्थिक गणितं सांभाळते इतकी हुशारी तिच्यात नक्कीच असते.

शिकलेल्या मुलींनी नोकरी करायलाच हवी. शिक्षण फक्त नोकरी करण्यासाठीच करायचं असतं का… की नोकरी करायची म्हणूनच शिकायचं असतं??? आजकाल असाही समज दिसतो की शिक्षण असूनही नोकरी न करणे म्हणजे शिक्षण वाया जाणे.. परंतु शिक्षण असूनही त्याचा उपयोग योग्य वेळी, योग्य जागी केला नाही तर मात्र ते नक्कीच वाया जाईल.. मग तुम्ही घरी राहा किंवा घराबाहेर पडा!
कुटुंबासाठी किंवा मुलांसाठी मी माझ्या नोकरीचे “सॅक्रिफाइस” केले.. आपल्याच माणसांसाठी काही करायचं तर त्यात “तडजोड” केली असं का म्हणायचं.. त्यातून मिळणारं समाधान आणि आनंद कमावला जाऊ शकतो का??
गृहिणीच्या मनात बऱ्याचदा विचार येतात की आपणही बाहेर जाऊन काहीतरी करायला हवं. शिक्षण वाया जातंय.. आपण काही चूक करतोय का.. घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना बाहेरच्या जगात कमी पडतोय का..

तसंच नोकरी करणाऱ्या बायकांच्या मनातही असे विचार येतच असतील की आपणही घरासाठी पुरेसा वेळ द्यावा, तीही तितकीच महत्त्वाची जबाबदारी आहे.. आपण काही चूक करतोय का.. नोकरीच्या जबाबदाऱ्या पार पाडताना घरात कुठे कमी पडतोय का..

मग दोघींपैकी योग्य कोण ?? सरस कोण??

नोकरी केली तरच स्त्रीचं अस्तित्व टिकून राहतं का..?? मग नोकरी न करणाऱ्या गृहिणीचं काय अस्तित्व असेल?? स्वतःला सिध्द करण्यासाठी स्त्रियांनी नोकरी करायला हवी. मग तर एकहाती कितीतरी कामे करणारी गृहिणी हरप्रकारे स्वयंसिद्ध असते. दगड एका जागी पडून असला तरी काही ना काही उपयोगी येतो. त्याच दगडाला शेंदूर लावला तर अगदी देवत्वच प्राप्त होतं. गृहिणी तर हाडाची काडं करून घर जिवंत ठेवत असते.. त्यासाठी तिला ते देवत्व वगैरे बहाल केलं नाही तरी चालतंय.. पण एक महिनाभर तिच्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलवताय का बघा.. तसं झालं नाही तर मग मात्र देवच आठवतो!!

Work from home च्या काळात work for home पण तितकंच महत्त्वाचं आहे. नवरा – बायको दोघेही जॉब करणारे असले तरी घर काही आपोआप चालत नाही. तसंच गृहिणी घरीच असते म्हणून घराचं घरपण टिकून राहतं असेही पूर्णपणे म्हणता येणार नाही. कोणत्याही परिस्थितीत दोघांचा एकमेकांना support असावा लागतो.. आणि एकमेकांविषयी आदर असावा लागतो.
बाहेरच्या जगात गृहिणीच्या कामाला काडीची किंमत मिळत नाही. कारण त्यातून तिची “कमाई” दिसत नाही. पण नवऱ्याच्या, मुलांच्या छोट्या छोट्या achievements मध्ये तिचा मोठा आनंद लपलेला असतो. मग तिच्याकडे मोठा पगार नसला तरी मोठं मन मात्र नक्कीच असतं!

माझ्या दृष्टीने working women असो कि full time housewife दोघींमध्ये तुलना केली जाऊ शकत नाही. दोघीही आपापल्या जागी योग्य असतात. कारण आजच्या काळात करिअर मध्ये पुढे जाणे जितके महत्त्वाचे आहे.. तितकेच कुटुंब सांभाळणे ही महत्त्वाचे आहे.

Working women च्या बाबतीत “ती जॉब करते” हे म्हणजे सगळ्या प्रश्नांवरील एकमेव उत्तर. पण “ती घरीच तर असते” हे सिध्द करण्यासाठी मात्र गृहिणीला कितीतरी प्रश्नांना सतत उत्तरं द्यावी लागतात.

गृहिणीच्या प्रोफेशनल करिअरचा ग्राफ भलेही थांबला असेल.. पण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या प्रगतीचा ग्राफ उंचावताना तिचा खारीचा वाटा नक्कीच असतो! न दमता सकाळ ते संध्याकाळ धावपळ करण्यासाठी लागणारी खारूताईची चपळता तिच्या अंगी असतेच!! त्यातून मिळणारा आनंद तिच्यासाठी सहा अंकी पगारापेक्षा मोठ्ठा असतो. तिला सुध्दा deadlines पूर्ण करायच्या असतात. कारण घरी असते म्हणून कुठलेही काम कधीही करून चालत नाही. त्यामुळे time management हा गुण तिच्यात उपजतच असतो. एका वेळी अनेक कामं करता येण्याच्या multi-tasking मध्ये तिचा हात कुणीही धरू शकत नाही!!

तिच्याकडे कामवाल्या बाईला सुट्टी देण्याचा अधिकार असतो. पण स्वतःसाठी सुट्टी घेण्याचा हक्क मात्र तिला नसतो. त्यामुळे weekly 7 days ती officially working असते!!
त्यामुळे “ती तर घरीच असते” असं म्हणणाऱ्यांनो.. ती घरी असते म्हणजे दिवसभर ती रिकामटेकडी, जबाबदारी मुक्त, टेन्शन मुक्त नसते हे लक्षात घ्या.

आणि गृहिणींनो… कुणी विचारलं “तू जॉब करत नाही का?” ह्या प्रश्नाचे उत्तर “मी घरीच असते” असे देणे चुकीचे ठरेल.
मॅनेजर, टीचर, सॉफ्टवेअर डेव्हलपर वगैरे वगैरे…. जरी नसलात तरी यशस्वी “होम मेकर” नक्कीच आहात ह्याचा अभिमान बाळगा. पुढच्या वेळी कुणी विचारलेच Are you working??
मग आपल्याकडे उत्तर आहेच…

Yes. I am working for the whole day!!

अनुजा पाटील

गृहिणी.. ती तर घरीच असते|Housewife/Homemaker/Housemaker/Housekeeper .. She stays at home हा लेख अवडला असल्यास शेअर करा.

गृहिणी.. ती तर घरीच असते|Housewife/Homemaker/Housemaker/Housekeeper.. She stays at home – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.

Share गृहिणी.. ती तर घरीच असते | Housewife/Homemaker/Housemaker/Housekeeper .. She stays at home

You may also like

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Ads Blocker Image Powered by Code Help Pro

Ads Blocker Detected!!!

We have detected that you are using extensions to block ads. Please support us by disabling these ads blocker.

Powered By
Best Wordpress Adblock Detecting Plugin | CHP Adblock