पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Kaay Sangshil dnyanda?
कालच झालेल्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यानंतर ABP माझा ची “ज्ञानदा” (काय सांगशील ज्ञानदा फेम) रत्नांग्रीत पोहोचली. सकाळी सकाळी बापू हेगिष्ट्यांच्या दुकानावरील गर्दी पाहून कॅमेरामॅन सकट आपला मोर्चा तिने त्यादिशेने वळवला.
घोळक्यातील एकाला तिने प्रश्न विचारला,” कालच्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याबाबत काय सांगाल काका ?”
“दौरा ? कि फ्लाईंग व्हिझिट ?? अंतू शेठने थेट प्रश्न विचारला. पहिल्याच प्रयत्नात ज्ञानदाचा अण्णू गोगट्या झाला. (अण्णू गोगट्या झाला म्हणजे काय झालं,हे पुलंच्या महाराष्ट्रात कोणाला सांगायची गरज नाही.)😃
ज्ञानदा, “फ्लाईंग व्हिझीट म्हणा हवं तर, काय सांगाल ?”
मिश्कीलपणे खांदे उडवत अंतू शेठ म्हणाले,”काय सांगणार,ह्यापेक्षा जास्त वेळ तर आमची कोकण रेल्वे थांबते हो सायडिंगला.”😀
ज्ञानदा,”नक्कीच, कोकणाला केंद्राकडून मदतीचं मोठ्ठ पॅकेज मिळवून द्यायचं वचन दिलय मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल काय सांगाल.”
“अहो,स्वतःच्या खिशातुन रुपाया दिला ना तरी ती मदत होते हो, शेजारच्याच्या खिशात हात घालून शंभराची नोट काढून देण्यात काय अर्थ ?” – अंतूशेट😀
ज्ञानदा थोडीशी उखडली आणि म्हणाली,” नक्कीच, पण पॅकेज मोठ्ठ मिळालंय कि”
अंतू शेठ, ” पॅकेज घोषित झालाय, मिळेल तो सुदिन,काय ? अहो,अजून “निसर्ग वादळग्रस्तांचे” पैसे नाही मिळाले. हे म्हणजे आज रोख उद्या उधारसारखं चाललंय.”
ज्ञानदा,”निश्चित, केंद्राकडे काय मदत मागाल आपण ?”
“केंद्राला म्हणावं,आता चांगलासा मुख्यमंत्री पाठवा बस्स” चेहऱ्यावरची सुरकुती न हलू देता झम्प्या दामले म्हणाला.
ज्ञानदा,”मुख्यमंत्र्यांनी घाईघाईत दौरा आटपला असं वाटत आपल्याला ?”
“नाही, आटपला नाही, ऍ ट प ला असं वाटतं.” या वाक्यानंतर मंडळीत हशा पिकला.
ज्ञानदाच्या चेहऱ्यावरच्या आठ्या पाहात अंतू शेठ म्हणाले,”रागावणार नसाल तर मी एक प्रश्न विचारू का ?”
गुश्श्यात ज्ञानदा म्हणाली,”विचारा.”
कॅमेराकडे पाहात अंतूशेट म्हणाले,”अहो,पोटच्या पोरासारखी 25-25,30-30 वर्ष सांभाळलेली,वाढवलेली बाग होती. मुलांची शिक्षण केली,लग्न लावली,यांच्या जीवावर. आमच्या म्हातारपणाची काठी होती, एका दिवसात कट्कन मोडून पडली. आम्हाला वाटलं,सरकार आधार देईल. पण तुमच्या मुंबईपुण्यात डझनाला जो भाव येतो ना आंब्याला,तो भाव दिलाय आम्हाला एका झाडामागे सरकारने,आता काय सांगशील ज्ञानदा ?”
ज्ञानदा,काय सांगणार. कॅमेरामन तिच्या चेहऱ्यावरचे बदललले भाव टिपत होता आणि ती डोळ्यातले पाणी.
-©मंदार जोशी
ठाणे
काय सांगशील ज्ञानदा? – Kaay Sangshil dnyanda? ही कथा आवडली असल्यास शेअर करा.
काय सांगशील ज्ञानदा? – Kaay Sangshil dnyanda? – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.
One thought on “काय सांगशील ज्ञानदा? | Kaay Sangshil dnyanda?”