पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Amazon Affiliate Disclaimer - This post/page may contain Amazon Affiliate Links, meaning we get a commission if you decide to purchase through our links, at no cost to you.
Punctuality | Timely | Prompt
आमच्या बिल्डींगमध्ये मध्यंतरी एक कुटुंब राहायला आलं….!!
होतं तसं रेग्युलर मध्यम वर्गीयच.
पण त्यांचा असा समज होता की, आपण मध्यमवर्गीयांपेक्षा थोडे उच्च कुळातले आहोत….!!
त्यातल्या त्यात नवरा जो होता, अघळपघळ आणि अस्ताव्यस्त होता, पण नाईलाजाने त्याला सिक्स पॅकेट बर्मुडा आणि जर्सी वगैरे घालून फिरावं लागे…
बायकोचं स्टेटस सांभाळायचं म्हटलं, तर इतकं तर अपेक्षित होतंच…!!
त्यातल्या त्यात बायको भिशीला वगैरे गेली की, हा टॉवेल गुंडाळून बनियन वर दोनेक तास मनासारखं जगून घ्यायचा….!!
पुन्हा बायको घरी यायची वेळ झाली की, जर्सी बर्मुडा घालून रेडी…!!
वहिनींचा वापर अगदी टापटीप. नवऱ्याला बर्मुडा सुद्धा रोज घडी करून कपाटात ठेवावा लागे.
सर्वात महत्वाचं म्हणजे, वहिनींची समयसूचकता.
दैवी वरदानच म्हटलं पाहिजे. कुठल्या ही घटनेचे दूरगामी परिणाम काय होऊ शकतात, हे त्यांना दिव्य दृष्टीने आधीच कळायचे…!!
एक दिवस त्यांच्याकडे एक गेटटूगेदर अरेंज केलं होतं. नुसता बाळबोध वरण -भात -भाजी -पोळी चा बेत केला असता तर इमेज ला धक्का लागला असता.
मग वहिनींनी युट्यूब वर एक नॉव्हेल आयटम शोधला. “पनीर पिझ्झा विथ बेबी मशरूम टॉपींग्ज..”
बाकीचं साहित्य वहिनींनी स्वतः बाजारांत जाऊन हायजेनिक असल्याची खात्री करून आणलं.
पण “बेबी मशरूम” त्यांच्या एरियात मिळाले नाहीत.
नवऱ्याला आणायला सांगितलं. नेमकी त्यादिवशी कुठलीतरी क्रिकेट ची फायनल मॅच होती.
नवरा सकाळपासून बिना दाढी-आंघोळीचा मॅच पाहत पसरला होता. विराट कोहलीची बॅटींग सोडून बेबी मशरूम आणायसाठी बाहेर पडण्या इतका बावळट तो नक्कीच नव्हता…!!
त्याने बायकोला अफलातून आयडीया दिली.
“अगं, आपल्या मागच्या सर्व्हिस लाईन मध्ये बघ.
शेकडो डॅडी मशरूम उगवले आहेत. ते घेऊन ये.
मी वाटलंच तर डॅडीचे बेबी करून देतो बसल्याबसल्या मॅच बघत.”
“अहो, पण मी ऐकलंय, ते विषारी असतात म्हणून..” बायकोनं आपलं मेडिकल ज्ञान पाजळलं..
“अगं, मी सुद्धा बारावीपर्यंत बॉटनी शिकलो आहे.
कांही विषारी-बिषारी नसतात ते.
शिवाय गावरान गोडवा असतो त्यात..”
नवऱ्यानं टाईमपास उत्तर दिलं आणि पुन्हा मॅचमध्ये रमला..!!
बायकोला नाईलाजानं पटलं,
पण समयसूचकता आडवी आली…!!
“हे मशरूम विषारी असले तर…??”
पण वहिनींजवळ उत्तर नाही असा प्रश्न अजून तरी जन्माला आला नव्हता…!!
त्यांनी लगेच विषाची परीक्षा पाहायचा निर्णय घेतला.
सर्व्हिस लाईन मधून डॅडी मशरूम घेऊन आल्या आणि नवऱ्याच्या चोरून दोन तीन मशरूम दारांत बांधलेल्या टीप्याला खाऊ घातले. टीप्यानं शिवाम्बु प्यायल्यासारखा वेडावाकडा चेहरा केला.. पण लगेच फ्रेश झाला.
स्वयंपाकाला तीन तास अवकाश होता.
नवरा मॅच पाहत होताच.
बायको टीप्याला प्रेमाने पाहत होती.
मधूनच ती टीप्याच्या पाठीवरून हात फिरवायची.
टीप्या आनंदाने उड्या मारत मालकीणशी मस्त्या करायचा.
नवऱ्याने विकेट गेल्यावर टाळ्या वाजवल्या, की बायको सुद्धा, “टीप्या अजून आहे!!” या आनंदात टाळ्या वाजवायची…!!
तीन तास उलटले. मॅच संपली. टीप्या नाचत बागडत मैत्रिणीला भेटायला बागेत गेला….!!
मित्र मंडळी आली. पनीर पिझ्झा विथ मशरूम टॉपींग्ज सर्वांनी भरपूर हादडला.
जेवणं आटोपली.
इतक्यांत….
वहिनींचा पाच वर्षीय मुलगा हमसून हमसून रडत घरी आला….
“आई, आपला टीप्या देवबाप्पाच्या घरी गेला.. तो…”
वहिनींनी समयसुचकपणे मुलाचं तोंड दाबलं आणि…. मटकन खाली बसल्या.
पण वहिनींजवळ उत्तर नाही असा प्रश्न अजून तरी जन्माला आला नव्हता….त्यांनी फटाफट निर्णय घ्यायला सुरुवात केली….वीस माणसं म्हणजे किमान दोन अँब्युलन्स.
डॉक्टरशी बोलून वीस रूम्स बुक केल्या.
फूड पॉईझनिंग ची केस असल्याची कल्पना देऊन ठेवली. डॉक्टर फटाफट तयारीला लागले.
पंचवीस तीस एरंडेल तेलाच्या बाटल्या आणि एनिमा चे सेट तयार केले.
पाहुण्यांना सोप सुपारी न देताच भराभर अँब्युलन्स मध्ये कोंबण्यात आलं.
तृप्तीचा ढेकर द्यायच्या आतच त्यांना एरंडेल पाजून ढेकर दाबून टाकण्यात आले…इमर्जन्सी केसेस म्हणून त्यांना एनिमा देऊन खाल्लेलं सगळं बाहेर काढण्यात आलं….पाहुणे कन्फ्युज होते.
शेजारच्या खाटेवर झोपलेल्या मित्राला…..
“हे काय सुरु आहे?” असं विचारत होते….
खाटेवरचा मित्र रिकाम्या पोटाने फक्त आकाशात बोट दाखवायचा.
दोन तास हीच धावपळ सुरू होती.
हॉस्पिटलचं बिल चाळीस हजार झालं होतं.
वहिनी बिल द्यायला काउंटरवर उभ्याच होत्या.
इतक्यांत त्यांचा मुलगा त्यांना मागून बिलगला..
रडणं थोडं कमी झालं होतं. तो आईला सांगायला लागला….
“आई, तू किती दयाळू आहेस..
किती काळजी करतेस आपल्या पाहुण्यांची….
जग मात्र फार दुष्ट आहे बघ…..
आपल्या टीप्याला ज्या मोटारीनं चिरडलं,
तिचा मालक गाडी न थांबवता पळून गेला…
देवबाप्पा त्याला नक्की उकळत्या तेलाच्या कढईत टाकील. तू फक्त बघतच रहा…..!!”
आणि वहिनी…
खरोखर नुसत्या वेड्यासारख्या बघतच राहिल्या…!!
समयसूचकता | Punctuality | Timely | Prompt हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
समयसूचकता | Punctuality | Timely | Prompt – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.