पोस्ट अस्वीकरण
या साइटवरील साहित्याचे कॉपीराइट लेखकांसाठी राखीव आहेत आणि मराठीकट्टा केवळ साहित्य प्रकाशित करत आहे. जर तुम्हाला कोणत्याही साहित्याचे लेखक माहित असतील तर कृपया आम्हाला कळवा आणि संबंधित लेखकाला श्रेय देण्यास मराठीकट्टाला आनंद होईल.
Sanjana Bhatt
एखाद्या पत्नीने आपल्या पतीला भेटवस्तू देणे, अगदी सामान्य गोष्ट आहे … पण हीच गोष्ट विशेष होते जेव्हा ती पत्नी अतिशय साधारण घरातील असते आणि पतीला एका मोठ्या मंचावर बोलावून सर्वांसमक्ष भेटवस्तू देते! …
संजना भट (Sanjana Bhatt)… दिल्लीची एक अत्यंत साधारण घरातील विवाहिता… १२ वी झाली आणि मामा मामींनी विवाह करून दिला..
आओ तुम्हे चाँद पे ले जाये
प्यार भरे सपने सजाए
छोटा सा बंगला बनाये
एक नई दुनिया बसाए…
हेच गीत गुणगुणत सासरी आली .. पतीने दिलेल्या आश्वासनाने आश्वस्त झाली… जशी माहेरी परिस्थिती बेताची तशीच सासरी… १४ सदस्य असलेला एकत्र परिवार.. घरी ३ खोल्या… बेडरूम मोठ्या दिराच्या परिवाराला …बाहेरचा हॉल सासू, नणंद वगैरे … आणि यांचा परिवार स्वयंपाक घरात…! किती वेळ मिळत असेल एकमेकांशी बोलायला?… किती मिळत असेल प्रायव्हसी? …तरी कुठलीही कुरकुर नाही .. अवास्तव अपेक्षा नाहीत… जे आहे त्याला हसून स्वीकारायचं… तक्रार करायची नाही … परिस्थितीशी एकरूप होणं म्हणतात ते कदाचित हेच असावं आणि सुखाचं गमक देखील! …
दिल है छोटा सा, छोटी सी आशा
मस्ती भरे मन की भोली सी आशा
चाँद तारों को छूने की आशा
आसमानों में उड़ने की आशा…..
संजनाने पुढे शिकायची इच्छा बोलून दाखवली आणि त्याने ती अंमलात आणली…! आवाजात माधुर्य असलेल्या संजनाला गायनाची आवड होतीच… पतीने त्यालाही समर्थन दिलं… तिने ‘सारेगमप’ कार्यक्रमाचं ऑडिशन दिलं आणि पहिल्या १४ मध्ये तिची निवड झाली… गायन शिकलेली नसूनही तिची गायकी अतिशय सुरेल आहे … अर्थात बऱ्याच गाण्यांत बारकाव्यांची कमी जाणवते पण त्याची भरपाई तिचे गाण्यातील भाव करतात…
दोन छोट्याशा मुली, अडीच वर्षांची देवांशी आणि सहा महिन्यांची तृप्ती आणि पती देवेंद्र यांच्यासोबत अतिशय अभिमानाने आणि आत्मविश्वासाने ती सारेगमपमध्ये उतरली… नवऱ्याने आपल्याला सारेगमपमध्ये येण्यासाठी पूर्ण सहकार्य केल्याची भावना तिच्या चेहऱ्यावर असते आणि वागण्यातदेखील दिसून येते… रविवारच्या भागात तिने ते जाहीर व्यक्त केले… तिने सादर केलेल्या छोट्याशा कवितेतून ती म्हणते,
जब उठ रही थी डोली मेरी
जब हो रही थी विदाई मेरी
तो डर था रिश्तोंमे बैर न हो जाये
पर थामा था हाथ जब तुमने
मानो सारी दुनिया ही बदल गयी
तुम्हें पाकर सच में मेरी दुनिया ही बदल गयी
तुम ही मेरे स्वाभिमान हो
और ये भी सच है, तुम ही मेरे भगवन हो
अगर मौत भी जुदा करना चाहे हमें तो कर ले
बस इतनी सी ख्वाइश है मेरी कि
मुझे सुहागन ही इस दुनिया से विदा करना
हर जन्म मुझे बस तुम्हारा साथ मिले
बस यहीं दुवा करना ….
मी चहा केला तू ओतून घे… मी भात केला तू वरण कर .. मी ताट घेतले …तू पाट घे … पतिपत्नी संबंधात अशा प्रकारची ‘बरोबरी’ शोधणाऱ्या फेमिनिस्टांना पटणारे नाहीच हे! केलं तर काय झालं … हक्कच आहे माझा.. असं म्हणणाऱ्या पुरोगामी महिलांच्याही गळ्याखाली उतरणार नाही हे! .. हक्क सांगते ते प्रेम नाहीच! हक्क तर सर्वात शेवटी येतो … तो ही स्वखुशीने! .. जबरदस्तीने केला जातो तो सौदा! … प्रेम नव्हे!
संजना (Sanjana Bhatt) आणि तिचा पती देवेंद्र यांच्या बोलण्यात वागण्यात कुठेही हक्क नाही… चढाओढ नाही… समजूतदारपणा आहे … प्रेम आहे ..! तिच्या कामाची, समर्पणाची त्याला आणि त्याच्या सहकार्याची तिला जाणीव आहे ..! हाच आपलेपणा मध बनून तिच्या कवितेत उतरला.. आणि प्रेक्षकांच्या काळजापर्यंत पोहचला… तिला मिळालेल्या पैशातून तिने पतीसाठी एक शर्ट आणला… ‘गिफ्ट’ … सुखी माणसाचा सदरा म्हणतात तो बहुदा हाच असावा! … आदर्श जोडपं कसं असावं याचं जणू उदाहरणच दिलं त्यांनी!
हमें जब तुम्हारा सहारा न मिलता
भंवर में ही रहते किनारा न मिलता
किनारे पे भी तो, लहर आ डुबोती…
हमें और जीने की चाहत न होती
अगर तुम न होते, अगर तुम न होते…
तिने पतीसाठी गायले खरे पण भावना तिच्या पतीचीही तीच असावी … होतीच… का कुणास ठाऊक, ते अभावानेच दिसणारे निर्मळ प्रेम पाहून डोळे पाणावले.. स्त्री पुरुष समानता अशीही असू शकते! …
गम कहाँ सोये और ख़ुशी जगे
आज की है मंज़िल, तारो से आगे….
संजना (Sanjana Bhatt), तिचा पती आणि दोन छोट्याशा पऱ्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!
-©आसावरी इंगळे
(१९ जानेवारी, २०२२)
संजना भट|Sanjana Bhatt हा लेख अवडला असल्यास शेअर करा.
संजना भट|Sanjana Bhatt – आपले विचार कमेंट बॉक्स मधे टाका.